विको व्रजंतीच्या व्यवसायाला नुकतीच सुरुवात झाली होती. १९५५-५६ च्या काळामध्ये आमचे वडिल बंधू व्यवसायाच्या निमित्ताने रेल्वे, बसने, फोर्ड गाडीने प्रवास करायचे. व्यवसाय विस्तार होत गेला. दोन्ही बंधू स्वतंत्र झाले. वडील बाबूराव पेंढारकर यांच्या मनात गाडी घ्यायची इच्छा झाली. गाडी घ्यायची तर एकदम उत्तम. नाहीतर गाडी अजिबात नको असे वडिलांचे गाडीबाबतचे सूत्र. सेकंडहॅण्ड गाडीतर त्यांना अजिबात पसंत नसायची.
प्राण यांची क्रायस्लर गाडी खरेदी केल्याचा अनुभव, तसेच प्राण यांच्याविषयीची आपुलकी प्रसिध्द उद्योजक गजानन पेंढरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.  
एक दिवस आमचे परिचित कांदावाला स्वादी आमच्याकडे आले. केम्प्स कॉर्नर येथे त्यांचे शोरूम होते. म्हणाले एक चांगली गाडी विकायची आहे. घेणार का? अभिनेता प्राण याला त्याची क्रायस्लर गाडी विकायची आहे. प्राण पारसी कॉलनीत राहायचा. अशी गाडी तुम्हाला कधी बाजारात मिळणार नाही. नवीन गाडी प्राणला घ्यायची आहे. क्रायस्लर पूर्णपणे स्वयंचलित गाडी आहे. अॅक्सलेटर, ब्रेकचा वापर करून गाडी पळणारी आहे. कांदावाला यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन ही सेकंड हॅन्ड गाडी घेण्याचे वडिल बाबूराव यांनी ठरविले. गाडीची किंमत सहा हजार रूपये होती. वडिलांनी कांदावाला यांना गाडी खरेदीचे आश्वासन दिले. गाडीचे पैसे दरमहा पाचशे रूपये हप्त्याने फेडण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे कांदावाला यांनी प्राण याच्याबरोबर गाडी खरेदीचा व्यवहार केला. वडिलांनी वर्षभरातगाडीचे पैसे फेडले.
मुंबईत काही मोजक्याच २२ उंची गाडय़ा रस्त्यावर धावत त्यामध्ये आमची क्रायस्लर गाडी धावू लागली. गाडी प्राणची असल्याने आमच्या गाडीकडे लोक उत्सुकतेने पाहत.  नागपूरला आतेबहिणीच्या लग्नाला जाण्याचा योग आला. रस्त्यात चार थांबे घेत असत. पावसाचे दिवस होते. रस्ते चिकट झाल्याने लळित या नातेवाईकाने गाडी हळू चालविण्याची सूचना केली होती. कसारा घाटातून प्रवास करीत असताना माझे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी वेडीवाकडी रस्ता सोडून धावू लागली. समोरून चार ते पाच वाहने येत होती. गाडी कडय़ाच्या दिशेने जात असताना मृत्यू समोर दिसत होता. अचानक गाडी कडय़ाच्या कडेला गेली आणि एकदम वळून पुन्हा पाठीमागे आली. आणि पुर्नजन्म झाल्यासारखे वाटले. असा अनुभवही या गाडीने दिला. १९८५ पर्यंत आम्ही ही गाडी वापरत होतो. अमेरिकन बनावटीची ही गाडी होती. त्यानंतर या गाडीचे सुटे भाग मिळणे दुर्मिळ होऊ लागले. वयोमानाप्रमाणे गाडीचा खर्च वाढला. मग गाडीचा वापर कमी. प्राण यांना गाडय़ांचे प्रचंड वेड होते. दोन वर्षांनंतर नवीन गाडी घरी आलीच पाहिजे असा त्यांचा शिरस्ता होता, असे अनुभव उद्योजक गजानराव पेंढारकर यांनी सांगितले.  

Story img Loader