-रावसाहेब पुजारी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळ बदलला, शेती करण्याची आयुधं बदलली. बदलत्या हवामानामुळे ऋतुमानातच मोठे बदल झाले. ढोर मेहनतीची शेती आता स्मार्ट शेती झाली. आयटीची पोरं शेतीत एआयचा वापर करू लागली. एका मूठीत मावणारी खतं एका एकराला पुरू लागली. सुक्ष्मजीव, गांडूळं यांचा शेतीच्या मशागतीसाठी सर्रास वापर केला जाऊ लागला. नॅनो -टेक्नॉलॉजीने शेती मायक्रो तंत्रज्ञान वापराकडे झूकू लागली. तरीही कृषी विद्यापीठं शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मशागतीसाठी रानाची उभी-आडवी नांगरट करा आणि एकरी ४० गाड्या शेणखत घाला असा सल्ला न चुकता आवर्जूनही देतात. हे सारे खरेच जमिनी वास्तवावर शक्य आहे का आणि शेतकरी शिवारात ते तो पाळतो काय, याचा विचार होण्याची गरज आहे. शेती एका दिशेला आणि विद्यीपीठीय संशोधन भलत्या दिशेला हे चित्र बदलण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या पावसाचा अंदाज देण्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वांपार ७ जूनला पावसाचे आगमन होते. मात्र पावसाचे अंदाज वर्तवण्याच्या शास्त्रातही आता आमुलाग्र बदल झालेले आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर याबाबत मोठे संशोधन सुरू असते. अधिक अचूकतेकडे त्याची वाटचाल सुरू आहे. आपल्याकडे पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यात पडतो. आजही आपल्याकडे फार मोठे क्षेत्र कोरडवाहू आहे. तेथे हंगामी पावसावरच पीक पद्धती विकसित झालेली आहे. खरीप आणि रब्बी अशा दोन हंगामात शेती केली जाते आहे. या दोन्ही हंगामापूर्वी पेरणीपूर्व मशागती कराव्या लागतात. त्यातून प्रत्येक शेतकरी जात असतो. मात्र यातील परंपरा, शास्त्र आणि वास्तव यामध्ये बऱ्याच विसंगती दडलेल्या दिसतात. बदलत्या हवामानामुळे हिवाळ्यात थंडी गायब होते, त्यामुळे थंडीवर येणारी पिके धोक्यात येतात. उन्हाळ्यात बऱ्याच पाऊस पडतो आणि उन्हाळी पिके मातीमोल होतात आणि पावसाळ्यात दोन सत्रामध्ये मोठे आंतर पडू लागल्याने पावसाळी पिके पावसाळी राहिलेलीच नाहीत.

हेही वाचा…कोल्हापुरातील उन्हाळी नाचणीच्या प्रयोगाचे यश

समुद्रानजीकचा प्रदेश खास करून कोकणात भातशेती फार मोठ्या प्रमाणत केली जाते. भातशेती राब, चिखलणी, लावणी अशा पद्धतीने भाताच्या रोपांची लागण करून केली जाते. आता त्यात पेरभाताची पद्धती आली आहे. एसआरटी तंत्रज्ञानाचा त्यात समावेश झालेला आहे. भातशेती प्रामुख्याने खाचरात केली जाते. लावणी करताना ती खाचरं पाण्याने भरून घेतली जातात. त्यात चिखलणीने मशागत केली जाते. उन्हाळ्यात पूर्वमशागती म्हणून या क्षेत्रातून राब केला जातो. यासाठी शेतकरी, त्यांची कुटुंबिये संपूर्ण उन्हाळाभर त्याची तयारी करीत असतात.

घाटमाथ्यावर भाताची धुळपेरणी केली जाते. पाऊस हमखास येईल या भरवश्यावर ऐन उन्हाळ्यात कोरड्या रानात पेरणी केली जाते. त्याची पेरणीपूर्व तयारी खूप आधीपासूनच शेतकरी करीत असतो. या प्रदेशात जमीनधारण क्षेत्र फारच छोटे असते. पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. शिवारं पाण्याने भरून जातात. जी भातशेतीसाठी पूरक असतात. यामुळे कोकणात भातशेतीच अधिकतर केली जाते. यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यच राबत असतात. इथे व्यापारी उत्पादनाचा काही एक संबंध नसतो, फक्त कुटुंबाची वर्षाची बेगमी यासाठी शेती केली जाते. ही पारंपरिक आणि एकल पद्धतीची शेती आहे. ही पारंपरिक भातशेती फायदेशीर नसते. यातील कष्ट, मनुष्यबळाचा वापर याचा फारसा परतावा नसतो. पण अलिकडे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने काही बदल केले जात आहे. एसआरटी तंत्रज्ञानाने यातील ढोर मेहनत कमी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कमी मनुष्यबळात, कमी कष्टात, कमी वेळेत पेरणीची कामे उरकली जाऊ लागली आहेत. उत्पादनात थोडेफार बदल दिसू लागले आहेत.

हेही वाचा…लेख: मोदी असूनही थेट परकीय गुंतवणूक नाही?

कोकण सोडून आपण राज्याच्या इतर प्रदेशाकडे येतो तेव्हा तेथील शेतीच्या पद्धतीत बदल पाहायला मिळतो. जेव्हा एक पीक पद्धती होती तेव्हा उन्हाळ्यात जमिनीला विश्रांती दिली जात असे. उन्हाळा सुरू होताच रानाची उभी-आडवी, चार-सहा बैलांची नांगरट केली जात असे. आता बैलजोड्याच गावशिवारातून कमी झाल्या आहेत. आहेत त्या बैलजोड्यांना पेरणीच्यावेळीच बऱ्यापैकी काम असते. इतरवेळी त्यांना पुरेसे काम नसते. त्यामुळे त्यांचे पालनपोषण शेतकऱ्यांच्या अंगावर पडते. त्यामुळे यांत्रिकीकरणातून मशागतीसाठी ट्रॅक्टर, पावरलिटर, रोटाव्हेटर अशी यंत्रे आली आहेत. यातून जमिनीची उलथापालथ केली जाते. जमिनीच्या वरच्या सहा इंचाच्या थरामध्ये सर्वाधिक सेंद्रीय कर्ब असतो. तो नांगरणीने खाल-वर करून त्याच्या उच्चत्तम उपयोगावर मोठे आघात केले जातात. हे शेतीसाठी हानिकारक ठरते.

पेरणीपूर्व मशागत कशासाठी केली जाते? जमीन सुस्थितीत वापरता येण्यासाठी तिची स्वच्छता, डोळ्याना शिवार चांगल्या दिसण्यासाठी, बियांची नीट मांडणी करता यावी, रानाची नव्याने बांधणीसाठी मशागती केल्या जातात. काही वेळा जमिनीतील कृमि-किटक नांगरणीतून पृष्ठभागावर येऊन मरून जावेत यासाठी ही मशागत केली जाते. पण अशा मशागतीत फार मोठ्या प्रमाणात सेंद्रीय कर्ब मारला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. ते शेतकऱ्यांच्या लक्षातही येत नाही.

हेही वाचा…लेख: ‘फुकट’चे कल्याण नको रे बाबा…

आपल्याकडे बऱ्याचदा पेरणीपूर्व मशागतीचा भाग म्हणून उकिरड्यात कुजलेले शेणखत, कंपोष्ट खत वाहतूक करून नेवुन रानामध्ये टाकले जाते. ते रानातून परत विसकटून नंतर मातीत मिसळण्यासाठी रानाची मशागती केली जाते. खरे तर शेणखत, कंपोष्ट खत जमिनीत जागेवर कुजण्याला विशेष महत्त्व असते. मात्र पारंपरिक पद्धतीने दुर्लक्ष केले जाते. यातून अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. ही पद्धत विद्यापीठांच्या शिफारशीतून आलेली असल्याने त्याकडे शेतकरी अधिक डोळसपणे पाहत नाही. काळ खूप बदलला आहे. शेती करण्याची आयुधं बदलली आहे. पर्याप्त परिस्थितीत जे बहुसंख्य शेतकऱ्यांना शक्यही नाही, रानाची उभी-आडवी नांगरट करा, एकरी ४० गाड्या शेणखत घाला, अशी शिफारस करतात. साधारणतः ४०-५० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे जनावरांची संख्या बऱ्यापैकी होती, त्यांचे शेण स्वतःच्या व्यवस्थेतून शेताला देता येणे शक्य होते, तेव्हा ही शिफारस काही अंशी ठीक होती.

आजचे वास्तव तसे नाही. आज शेतकऱ्यांकडे एक-दोन जनावरे पाळणेही मुश्कील काम झालेले आहे. तेव्हा चार-पाच एकरवाला शेतकरी वर्षाला २०० गाड्या शेणखत कोठून आणणार आणि तो वास्तवात ते घालू शकतो का? याचा विचार केला जात नाही. मग सेंद्रीय खताचा व्यापार सुरू होतो. त्यातून शेतकऱ्यांची लुट सुरु होते. बोगस खते तयार होतात. ती शेतकऱ्यांच्या माथी मारली जातात.

आजकाल गांडूळ शेती, गांडूळ खत. गांडूळ कल्चर, व्हर्मिवॉशचा शेतीत वापर केला जातो आहे. तसेच सुक्ष्मजीवांची शेतात वाढ व्हावी, यासाठी काही कल्चर टाकली जातात. त्याचे चांगले रिझल्ट असताना याकडे मात्र दुर्लक्ष होते आहे. आजकाल संवर्धित शेती पद्धतीचा स्वीकार करणारे अनेक शेतकरी आहेत. चार बांधाच्या बाहेरून काहीही न आणता जागेवर उपलब्ध होणाऱ्या निविष्ठांचा वापर जमिनीतील सेंद्रीय कर्ब वाढीसाठी केला जातो. यासाठी हिरवळीची खते, तणांचे व्यवस्थापन रानात जागेवर कुजविले जाते. यातून जमिनीच्या सुपिकतेचा प्रश्न शून्य मशागतीवर सुटतो. अशा पद्धतीने शेती करणारे अनेक शेतकरी आहेत. सलग १८-२० वर्षे शेतातून चांगले आणि चढत्या क्रमाने उत्पादन घेताना दिसतात. यासाठी शून्य मशागत तंत्र, बिना नांगरणीची शेतीपद्धती, संवर्धित शेती तंत्र अशा काही पर्यायांचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी डोळस झाले पाहिजे. अवती-भवतीच्या बदलत्या भवतालाचा डोळस अंगीकार केला पाहिजे. पहिल्यांदा वाचन, मनन, चिंतन केले पाहिजे.

हेही वाचा…लेख: अविश्वासाच्या राजकारणातून परीक्षांचे केंद्रीकरण..

अनेकदा अतिमशागतीमुळे शेतीचे मोठे नुकसान होते. मग तो आंतरमशागत अतिरेक असेल, नको ते सेंद्रीय खताचे डोसेस असतील किंवा प्रमाणापेक्षा अधिक पाण्याचा वापर यातून शेतीत नव्या समस्या उभ्या राहू लागल्या आहेत. जमिनीची वाटचाल नापीकतेकडे सरकताना दिसू लागली आहे. पिकाच्या मूळाशी पाण्यातून ओलावा, पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार एसेरा पद्धतीचे खत व्यवस्थापन, नैसर्गिकरित्या उपलब्ध साधनांचा, कृत्रि किटकांचा शेतीत पिकासमवेत सहजीवनाची शेती करण्याची गरज असते. जमिनीतील सेंद्रीय कर्ब, जमिनीची पाणीधारण शक्ती आणि उपजाऊपणा वाढविण्यासाठी शेती पद्धतीत काही बदल केले पाहिजेत. पिकांचा फेरपालट, मुळांची कार्यक्षमता वाढविणे आणि उत्पादकता वाढीसाठी पिकांबरोबर सुक्ष्मजीवांचे सहजीवन जमिनीत तयार केले पाहिजे. यासाठी निसर्गाला सोबती घेता आले पाहिजे. नैसर्गिक शेती पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. निसर्गशेतीचा विचार अधिक नीटपणे शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

हेही वाचा…लेख: विद्यापीठांतील अविवेकामागे लोकशाहीचा ऱ्हास

जमिनीत करोडोंच्या संख्येने सुक्ष्मजीव काम करीत असतात. त्यांच्या जीवनक्रमाचा कालावधी अल्प असतो. अशावेळी त्यांच्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करण्याची गरज असते. यासाठी आच्छादन, वापसा, ओलावा आणि सतत जमिनीत अपशिष्ट पदार्थ कुजण्याची प्रक्रिया निरंतर चालू ठेवता आली पाहिजे. पहिल्या पिकाची मूळं जागेला कुजविणे ही पुढच्या पिकांसाठी चांगले सेंद्रीय खत असते. यासाठी जमिनीची पूर्वमशागत, आंतरमशागतीच्या नावाखाली उलटा-पालट फारशी गरजेचे नाही. यासाठी रानाची सतत पूर्वमशागतीची गरज नाही. उलट रानात फुकटात उपलब्ध संसाधनांचा वापर रानात करता येणे फार महत्त्वाचे होईल. हे काम पावसाळ्याच्या अगोदर, खरीप, रब्बी पेराच्या अगोदर निर्माण करणे योग्य ठरेल.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pre sowing tillage modernizing agriculture traditional methods to sustainable practices psg
Show comments