महेश सरलष्कर
गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कधीही भ्रष्टाचाराचे आरोप झाले नव्हते. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होते. मोदी हेच जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असल्याचे भाजपचे नेते अभिमानाने सांगत असत. मोदींच्या या कोरीव प्रतिमेला फेब्रुवारीमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तडा दिला.
अदानी समूहाच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांवर बोट ठेवून ‘अदानींशी तुमचा संबंध काय’, असा प्रश्न विचारला. आता तर ‘मोदींभोवती असणारे लोक भ्रष्टाचारलोलुप असूनही मोदींना त्याची कोणतीच फिकीर नाही. मोदी आपल्याच दुनियेत मस्त आहेत’, असे थेट शरसंधान साधण्याचे धाडस सत्यपाल मलिक यांनी केले आहे. कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जेमतेम महिन्यावर आली असताना, तिथे भाजप सरकारचा भ्रष्टाचार हाच कळीचा मुद्दा बनला असताना मोदींच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या मलिकांच्या आरोपांत केंद्रातील सत्ता उलथवून टाकण्याची क्षमता आहे.
आता भ्रष्टाचार हाच मुद्दा
दोन लोकसभा निवडणुका, तसेच विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील भाजपच्या अभूतपूर्व यशामागे पक्षाची आणि संघाची ताकद असली तरी, मोदी हेच भाजपच्या विजयाचे खरे शिल्पकार होते. कर्नाटकमध्येदेखील बसवराज बोम्मई सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पोखरले असताना मोदींचा चेहरा भाजपला वाचवू शकेल असे पक्षाचे नेते बोलून दाखवतात.
भाजपसाठी मोदी देव्हाऱ्याच्या गाभ्याप्रमाणे पवित्र आहेत, त्यांना अभद्र गोष्टी शिवू शकत नाहीत, यावर भाजपच्या नेत्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच अदानी मुद्दय़ावरून राहुल गांधींनी मोदींवर भ्रष्टाचाराचे शिंतोडे उडवलेले भाजपला जिव्हारी लागले की, त्यांनी राहुल गांधींना लोकसभेतून बडतर्फ केले. इथे तर सत्यपाल मलिकांनी मोदींविरोधात आरोपांची मालिका उभी केली आहे.
भ्रष्टाचारमुक्त कारभार, लोकांचे कल्याण, लोकशाहीवर निष्ठा, राष्ट्रहिताची कळकळ ही सगळी भाजपची व्यवच्छेदक लक्षणे मानली जात होती. त्यांचा मलिकांनी सुमारे एका तासाच्या मुलाखतीत बुरखा फाडला आहे. मलिकांमुळे भाजपच्या गोटात आणि पंतप्रधानांच्या कार्यालयात खळबळ माजली आहे.
विरोधकांच्या एकजुटीला वेग
सत्यपाल मलिकांच्या आरोपांमध्ये केंद्र सरकार उलथवण्याची क्षमता असल्याचे कोणीही नाकारू शकत नाही. मलिकांचे आरोप विरोधकांच्या एकजुटीसाठी चुंबकाचे काम करू शकतील. त्यांच्यामधील विसंवाद कमी करण्यास राहुल गांधींची बडतर्फी उपयोगी पडली होती. आता तर मोदींविरोधात ‘स्फोटके’ हाती लागली आहेत. कर्नाटकमध्ये भ्रष्टाचारासंदर्भात मोदींवर झालेले आरोप हा राष्ट्रीय मुद्दाच स्थानिक प्रचाराचा मुद्दा बनेल. मोदींना कर्नाटकमध्ये गांधी कुटुंबाच्या आधारावर निवडणूक लढवणे अवघड जाईल. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ‘सीबीआय’-‘ईडी’चा जाच विरोधी पक्षनेत्यांना सहन करावा लागला होता. खरे तर विरोधक एकत्र येण्याचा हा समान धागा आहे, पण आता विरोधकांचे लक्ष्य मोदींच्या वर्तुळातील लोकांच्या, भाजप आणि संघातील नेत्यांच्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवर केंद्रित झालेले असेल.
पकड ढिली होण्याचा धोका?
मलिकांच्या आरोपांमुळे भाजपभोवती वादळ घोंगावू लागले असून कर्नाटक भाजपच्या हातून निसटू शकते. मग, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल याची जाणीव भाजपला झालेली असेल. गुजरातमध्ये मुख्यमंत्र्यांसह अख्खे मंत्रिमंडळ बदलले गेले, विद्यमान आमदारांना घरी पाठवले गेले. तरीही, कोणी एक चकार शब्द काढला नाही. कर्नाटकने मोदींचे ‘गुजरात प्रारूप’ मोडून काढले असे म्हणता येईल. भाजपमधील बंडखोरीची सुरुवात हिमाचल प्रदेशातून झाली होती. मोदींची उजळ प्रतिमा आणि शहांची करडी नजर यांच्या मिश्रणामुळे पक्षावर दोघांचे पूर्ण नियंत्रण राहिले. कर्नाटकमध्ये बंडखोरांनी त्यांच्या वर्चस्वाला जणू झुगारून दिले आहे. पुढील तीनही विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीत बंडखोरीची ही लागण पक्षांतर्गत पसरली तर, ‘सीबीआय’- ‘ईडी’च्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह लागेल.