दामदुप्पट पैशाचे आमिष दाखवत सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचा सिलसिला सुमारे १५ वर्षांपूर्वी पल्प ग्रीन या संस्थेने कोकणात सुरू केला; पण त्यानंतर आलेल्या संचयनी प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने जास्त व्यापक आणि दीर्घकाळ ही परंपरा चालवली. संचयनीच्या एजंटांचे जाळे तालुका किंवा शहरांपुरते मर्यादित न राहता गावपातळीपर्यंत पोचले होते आणि हा सारा डोलारा सांभाळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मोठय़ा प्रमाणात नियुक्ती करण्यात आली होती. अशा प्रकारे गोळा केलेला पैसा जिरवण्यासाठी संचयनीने शहरात काही मालमत्तांची खरेदी केली; पण अखेर त्यांचे बिंग फुटले. कोर्ट-कचेऱ्याही झाल्या संचयनीच्या मालमत्ता जप्त करून त्यांच्या विक्रीतून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिले; पण प्रत्यक्षात फारशी कार्यवाही होऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांत रूढ झालेल्या ‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ पद्धतीचा अवलंब करत ‘कल्पतरू’ ही संस्था रत्नागिरीत अवतरली. लोकांकडून ठेवी गोळा करण्याबरोबरच शहरात मध्यवर्ती ठिकाणी मल्टी ब्रँड स्टोअर्स सुरू करण्यात आले. मात्र जेव्हा लोकांच्या ठेवींवर पैसे मिळेनासे झाले तेव्हा या दुकानाचीच संतप्त ठेवीदारांनी तोडफोड करून आपल्या संतापाला वाट करून दिली. तरीसुद्धा त्यानंतर आलेल्या ‘कल्पवृक्ष मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेच्या आमिषाला लोभी रत्नागिरीकर बळी पडलेच. दामदुप्पट पैशाच्या लोभापायी सुमारे सहा हजारपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी मिळून या संस्थेत दोन कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. रत्नागिरी व चिपळूणमध्ये विभागीय कार्यालये उभारून २००३ ते २००५ या कालावधीत या कंपनीने लूटमार केली. ठेवीदारांच्या तक्रारीनंतर कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, पण ठेवीदारांचे पैसे परत मिळू शकले नाहीत. या दोन संस्थांपेक्षाही अलीकडच्या काळात आलेल्या सॅफरॉन इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि सॅफरॉन व्हेंचर लिमिटेड या कंपनीने अल्प मुदतीच्या ठेवींवर दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून पुन्हा एकवार रत्नागिरीकरांना लुबाडले. कंपनीचा संचालक शशिकांत राणे याच्याविरोधात सुमारे दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी गोळा करून फसवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या. या प्रकरणात अनेकांना पैसे परत मिळाले, पण राणेला अटक झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात गुंतवलेले पैसे बुडाले.
अशा प्रकारे उघडकीस आलेल्या संस्थांव्यतिरिक्त आजही रत्नागिरी शहर व जिल्हय़ात काही व्यक्ती किंवा संस्थांकडून या तंत्राने पैसे गोळा केले जात असल्याची वदंता आहे. मात्र अजून उघड तक्रार न झाल्यामुळे त्यांची मूठ झाकलेली राहिली आहे.