तब्बल ५५ हजार फूट उंचीवरून आणि ध्वनीहून अधिक म्हणजे ताशी २,६५० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने शत्रूचा प्रदेश पालथा घालू शकणारे ‘सुखोई’ हे जगातील सर्वोत्तम बॉम्बफेक करणारे लढाऊ विमान आहे. भारतीय हवाई दलाची शान असणाऱ्या या विमानाला गेल्या काही वर्षांत अनेकदा अपघात झाल्याने तूर्तास या विमानांचे उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला.  ‘सुखोई’च्या अपघातांवर मात करण्याचे मोठे आव्हान भारतीय हवाई दलासमोर आहे..
जगातील सर्वोत्तम बॉम्बफेक करणाऱ्या विमानांच्या यादीत अग्रभागी असणारे ‘सुखोई’ म्हणजे भारतीय हवाई दलाची प्रतिष्ठा. परंतु पुणे येथे सरावादरम्यान झालेल्या विचित्र विमान अपघातामुळे या प्रतिष्ठेस धक्का पोहोचला. हा धक्का इतका जबरदस्त ठरला की ताफ्यातील जवळपास २०० सुखोई विमानांच्या उड्डाणांवर र्निबध टाकण्यात आले. आता सखोल तांत्रिक तपासणी झाल्यानंतरच आकाशात पुन्हा झेप घेण्याचा त्यांचा मार्ग खुला होईल. याआधी अशाच कारणांस्तव दोन वेळा सुखोईच्या उड्डाणाला स्थगिती देण्यात आली होती. पाच वर्षांत एकापाठोपाठ एक झालेल्या सुखोईच्या पाच अपघातांमुळे हवाई दलाच्याही चिंतेत निश्चितच भर पडली आहे.
खरेतर अपघातांच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘मिग-२१’ विमानांना निवृत्त करण्यासाठी भारताने रशियाच्या सहकार्याने सुखोई विमान बांधणी कार्यक्रम हाती घेतला आहे. ही आधुनिक विमाने अपघातांच्या शृंखलेत सापडल्यास ते देशाला परवडणारे नाही. भारतीय हवाई दलासाठी पाचव्या पिढीतील अत्याधुनिक विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. मात्र ‘सुखोई-३० एमकेआय’ची क्षमता विलक्षण आहे. जगातील सर्वोत्तम बॉम्बफेकी लढाऊ विमान म्हणून त्याचा लौकिक आहे. सद्य:स्थितीत भारतीय हवाई दलाची मुख्य भिस्त याच विमानांवर आहे. पुढील दोन ते तीन दशके त्यांच्यावर हवाई प्रभुत्व गाजविण्याची जबाबदारी राहणार आहे. यामुळे त्यांचे सुरक्षित उड्डाण अनिवार्य ठरते. साधारणत: १२ वर्षांपासून हवाई दलात ही विमाने टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जात आहेत. प्रारंभी ५० विमाने थेट रशियाकडून खरेदी करण्यात आली होती. पुढील काळात तंत्रज्ञान हस्तांतरण कराराच्या माध्यमातून १८० सुखोईंची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) बांधणी केली जात आहे. एचएएलने आतापर्यंत त्यातील १३४ विमाने हवाई दलाच्या स्वाधीनही केली आहेत. दरम्यानच्या काळात रशियन तंत्रज्ञांच्या सहकार्याने आवश्यक ते बदल करून विमानाची प्रगत आवृत्ती तयार करण्यात आली. सध्या हवाई दलाच्या ताफ्यातील सुखोईत रशियाकडून खरेदी केलेली आणि देशातच बांधणी केलेल्या विमानांचा असणारा समावेश लक्षात घेणे गरजेचे आहे. रशियाने सुखोईची रचना (डिझाइन) भारतासाठी तयार केली होती. प्रारंभी त्यांनी या विमानांचा वापर केला नाही. पुढील काळात रशियाच्या हवाई दलात त्यांना स्थान देण्यात आले. आज भारत, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया अशा काही राष्ट्रांकडे ही लढाऊ विमाने आहेत. त्याचा प्रथम वापरकर्ता भारत असल्याने या ठिकाणी विमानात जे जे दोष समोर येतात, त्यावर मग रशियन तंत्रज्ञांमार्फत तोडगा काढला जातो. एका अर्थाने रशियाच्या सुखोई विमानांच्या चाचणीचे भारतीय हवाई दल प्रयोगशाळा ठरल्याचे लक्षात येते.
हवाई दलाच्या पुणे येथील तळावर काही दिवसांपूर्वी सरावादरम्यान विचित्र व अनाकलनीय पद्धतीने सुखोई अपघातग्रस्त झाले. यामुळे त्या अपघाताची कारणमीमांसा होणे आवश्यक ठरले. तब्बल २५० कोटी किमतीचे हे विमान काही तांत्रिक दोष अथवा मानवी चुकांमुळे नष्ट होणे आर्थिकदृष्टय़ाही परवडणारे नाही. पुण्यातील अपघाताने सर्वाना पेचात टाकले आहे. उड्डाणादरम्यान काही आपत्कालीन स्थिती ओढावल्यास वैमानिकाला विमानातून बाहेर पडण्यासाठी खास व्यवस्था असते. त्यास ‘इजेक्शन सीट’ म्हणतात. अगदी निर्णायक अवस्थेत वैमानिक स्वत:च्या बचावासाठी अखेरचा पर्याय म्हणून त्याचा वापर करून हवाई छत्रीद्वारे जमिनीवर येऊ शकतो. पुण्याच्या दुर्घटनेत वैमानिकांनी असा पर्याय दिला नसतानाही आपोआप तो निवडला गेला आणि वैमानिक बाहेर पडले. सारथी नसल्याने विमान जमीनदोस्त होणे अटळ होते. याआधीच्या एका अपघातात तसाच प्रकार घडला होता. यामुळे त्याचे गांभीर्य वाढले आहे. अपवादात्मक स्थितीत कधीतरीच असे घडू शकते. मात्र त्या व्यवस्थेत काही तांत्रिक दोष असल्यास ती अतिशय गंभीर बाब ठरेल. यामुळे अपघातग्रस्त विमानाच्या चौकशीसमवेत सर्व सुखोईंच्या तांत्रिक तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.vv02सर्वसाधारणपणे पक्षी येऊन धडकणे, मानवी चुका व तांत्रिक दोष ही प्रामुख्याने विमान अपघाताची कारणे असतात. पक्ष्यांमुळे होणाऱ्या अपघातांचा कमी उंचीवरून उड्डाण करताना धोका असतो. त्यावर नियंत्रण आणणे तसे अवघड असते. तथापि, मानवी चुका आणि तांत्रिक दोष यामुळे घडणारे अपघात आवश्यक ती दक्षता घेऊन नियंत्रणात आणता येतात. सुखोईचा पहिला अपघात झाला तो ‘फ्लाय बाय वायर’ दोषामुळे. विमान संचालनाचे कार्य या व्यवस्थेमार्फत होते. संचालनाची ही यंत्रणाच अचानक बंद पडल्याने तो अपघात घडल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. वास्तविक, विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर जमिनीवरील तंत्रज्ञांकडून ही यंत्रणा बंद केली जाते. वैमानिकाने तिचा वापर करावयाचा नसतो. समोर दिसणारी कळ वैमानिकाकडून दाबली गेल्यामुळे यंत्रणा बंद पडल्याने तो अपघात घडला. ही बाब लक्षात आल्यावर सुखोईतील ‘फ्लाय बाय वायर’ व्यवस्था बंद करण्याची कळ बंदिस्त करण्यात आली; जेणेकरून वैमानिकाला आता सहजपणे तिचा वापर करता येणार नाही. सुखोईच्या दुसऱ्या अपघातास इंजिनातील दोष कारणीभूत ठरला. शक्तिशाली बनविण्यासाठी सुखोईत दोन इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कंपनांमुळे विमानाचे एक इंजिन मध्येच बंद पडत असे. पर्यायी दुसऱ्या इंजिनवर उड्डाण घेणे वा उतरणे शक्य असले तरी एखादे इंजिन बंद पडणे ही धोकादायक बाब होती. या तांत्रिक दोषाच्या निराकरणासाठी बरेच काम करण्यात आले.
सुखोईमध्ये वेगळ्याच कोनात बसविलेल्या ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’मुळेदेखील अडचणींना सामोरे जावे लागले. कोणत्याही विमानाचा ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ हा महत्त्वाचा भाग. विमान अपघातग्रस्त झाल्यास त्यातील माहितीद्वारे अनेक धागेदोरे हाती लागतात. सर्वसाधारणपणे विमानांमध्ये तो एका विशिष्ट कोनातच (व्ही अँगल) बसविला जातो. सुखोईत तो बसविण्याची रचना बदलण्यात आली होती. यामुळे सुखोईच्या प्रारंभीच्या तीन अपघातांत ‘फ्लाइट डेटा रेकॉर्डर’चे नुकसान झाले. त्यातून माहिती काढणे अवघड बनले. पहिल्या अपघातावेळी ही बाब एचएएलने रशियन तंत्रज्ञांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रेकॉर्डर विशिष्ट कोनात बसवून तो सुरक्षित राहील अशी जागा शोधली गेली. हा उपाय प्रत्यक्षात येईपर्यंत सुखोईच्या आणखी दोन अपघातांच्या घटना घडल्या होत्या.  vv03प्रचंड प्रहार क्षमता लाभलेल्या सुखोईची उच्चतंत्राधारित रचना अतिशय गुंतागुंतीची आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण करारामुळे सुखोईच्या ६० हजारांहून अधिक सुटय़ा भागांची निर्मिती देशात एचएएलच्या प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहे. त्यात ‘एअर फ्रेम’साठी ४३ हजार संबंधित सुटे भाग, इंजिनकरिता ६३००, तर इतर ९६०० वेगवेगळ्या सुटय़ा भागांची देशांतर्गत निर्मिती करत एचएएलने सुखोईच्या बांधणी कार्यक्रमात ७२ टक्के तंत्रज्ञान ग्रहण करण्यात यश मिळविले आहे. रशियाकडून मिळालेल्या रचनेनुसार हे सुटे भाग बनविले जातात. त्यात १०० टक्के अचूकता आणि परिपूर्णता नसल्यास काही दोष समोर येऊ शकतात. अपघातग्रस्त सुखोई विमाने ही देशात बांधणी केलेली होती की रशियाकडून खरेदी केलेली ते उघड करण्यात आलेले नाही. त्यामुळे देशात बनविल्या जाणाऱ्या सुटय़ा भागांच्या गुणवत्तेवर प्रकाश पडू शकतो. सुखोई हवाई दलाच्या स्वाधीन केल्यानंतर एक वर्ष त्यांच्या देखभालीची जबाबदारी एचएएल सांभाळते. त्याकरिता सुखोई असणाऱ्या हवाई दलाच्या तळांवर एचएएलच्या तज्ज्ञांचे पथक कार्यरत असते. वर्षभराचा कालावधी संपुष्टात आल्यावर देखभालीची जबाबदारी हवाई दलाकडे जाते. प्रत्येक उड्डाणाआधी व उड्डाणानंतर विमानाची तपासणी व तत्सम कामे जमिनीवरील तंत्रज्ञांकडून केली जातात. या प्रक्रियेत उच्चस्तरीय तंत्रज्ञान शिस्त पाळण्याची निकड असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. एखादी छोटीशी चूक वा निष्काळजीपणा लढाऊ विमान आणि वैमानिकाला धोक्यात टाकणारा ठरू शकतो. सलग दोन वर्षांपासून भारतीय हवाई दलाचा वार्षिक अपघात दर ०.२ टक्के आहे. जगातील विकसित व विकसनशील राष्ट्रांतील अपघात दराचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात इतकेच असते. भारतीय हवाई दल अपघात दर कमी करण्यात प्रगती करत असताना सुखोईच्या अपघाताने या मार्गात काहीसा अवरोध आला आहे.
सामर्थ्य सुखोईचे
*खास भारतीय वातावरणासाठी भारतात निर्मिती. जगातील सर्वोत्तम बॉम्बफेकी लढाऊ विमान.
*तब्बल ५५ हजार फूट उंचीवरून आणि ध्वनीहून अधिक म्हणजे ताशी २,६५० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने उडण्याची ताकद.
*वेगवेगळ्या प्रकारची सुमारे सात ते आठ टन वजनाची शस्त्रास्त्रे आणि अणुबॉम्बही लीलया वाहून नेऊ शकते.
*टबरेफॅन स्वरूपाची दोन इंजिने हवेत कसरती करू शकते. 
*थ्रस्ट व्हेक्टरिंग तंत्राचा समावेश. अचानक वेग कमी करून वरच्या दिशेने वळण्याच्या या तंत्रामुळे ते विमानविरोधी क्षेपणास्त्रालाही चकवू शकते.
*रडारला चकविण्याचीही आणि शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रांची माहिती देणाऱ्या यंत्रणेचा समावेश.
*सध्या ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची व्यवस्था सुखोईवर बसविण्यात येत आहे.