काळी जमीन, भरपूर पाणी आणि जोडीला साखर कारखानदारी यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील बहुतेक शेतकरी ऊस पिकाकडे वळत असताना काही शेतकरी मात्र वेगळी वाट निवडताना दिसतात. कृष्णाकाठच्या मजरेवाडी गावातील शेतकऱ्यांनी असेच ऊस पिकाऐवजी भाजीपाल्याची निवड करत यशाचा मार्ग दाखवला आहे.
शेती उत्पादनांना बाजारपेठेत चांगला दर कधी मिळेल याचे अचूक गणित साधणे आणि डोळ्यात तेल घालून पीक वाढवताना एकरी उत्पादन अधिकाधिक कसे वाढेल याकडे लक्ष दिले, तर भाजीपाला शेती फायदेशीर कशी होऊ शकते याचे आदर्शवत उदाहरण म्हणून शिरीष कागले या ३२ वर्षीय तरुण शेतकऱ्याकडे पाहायला हवे. कृष्णाकाठच्या मजरेवाडी गावातील या कल्पक शेतकऱ्याने यशाची किमया करून दाखवली आहे. काही क्षेत्र उसाचे वगळता उर्वरित शेतीमध्ये हंगामानुसार ढब्बू मिरची, काकडी, टोमॅटो, कारले अशी वेगवेगळी भाजीपाला उत्पादने घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. यातील अनेक उत्पादनांनी त्यांना लाखमोलाचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
शिरोळ तालुक्यामध्ये अनेक प्रगतिशील शेतकरी आहेत. उसाचे क्षेत्र या तालुक्यात मुबलक आहे. पाणी मुबलक आहे. जोडीला चांगली पिके घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल राहिला आहे. अशा अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळी पिके घेण्यावर भर दिला आहे. शिरीष कागले हे त्यांपैकी एक. मजरेवाडी या गावामध्ये त्यांची १३ एकर जागा आहे. सध्या त्यांनी तीन एकरात उसाची लागण करायचे ठरवले आहे. पण त्याआधी त्यांनी गेली सहा – सात वर्षे भाजीपाला उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
हेही वाचा : लोक शिवार : अतिवृष्टीचे आव्हान
अत्यंत जागरूकपणे ते शेती करीत असतात. त्यासाठी सतत कष्ट करण्याची तयारी असते. प्रसंगी रोपवाटिकांमध्ये जाऊन नव्या जातींचा शोध – अभ्यास करणे, एकरी अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधणे, कृषी साहित्याचे वाचन करून शेती अधिक समृद्ध कशी करता येईल याचा ते नेहमी विचार करीत असतात. यामुळेच गेली पाच-सहा वर्षे त्यांना भाजीपाला पिकाने चांगली साथ दिली आहे. मुख्य म्हणजे त्यांचा माल मुंबईसारख्या महानगरामध्ये जात असतो. तेथील दलालांकडून त्यांना कशा प्रकारचा माल हवा असतो याबाबतच्या अपेक्षा कळवल्या जातात. त्यानुसार बाजारपेठेत कोणते पीक चालेल हे पाहून त्यानुसार उत्पादन घेतले जाते. उदाहरणार्थ, काकडी विकायची असेल तर काही ठिकाणी पांढरी काकडी चालते. काही ठिकाणी ती हिरवी हवी असते. तर काही ठिकाणी पांढऱ्या- हिरवी रंगाचे मिश्रण चालत असते. त्यामुळे ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार दर्जेदार कंपनीचे बियाणे वापरून भाजीपाला पीक घेण्यावर त्यांचा भर आहे. पूर्वी त्यांचे वडील बापूसाहेब कागले हे शेती करायचे. ते सरपंचही होते. त्यांच्या हाताखाली पुढच्या काळामध्ये शिरीष यांनी शेतीची मुळाक्षरे गिरवली. काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. त्यानंतर १३ एकर बागायती शेतीची जबाबदारी शिरीष यांच्यावर आली. त्यांचे भाऊ सतीश हे नोकरी करतात. उरलेल्या वेळात ते शेती कामासाठी मदत करतात. शेती कामाची मुख्य जबाबदारी शिरीष यांच्या खांद्यावर आहे.
साधारणत: जानेवारीच्या सुरुवातीला ते ढब्बू मिरची, कारली, काकडी यांची लागवड काही अंतराने करायला सुरुवात करतात. दोन महिन्यांनंतर मिरची विक्रीसाठी येते. हंगाम सात महिने चालतो. कारल्याचा हंगाम तीन महिने चालतो. तर काकडी १०० दिवसांनंतर विकण्यायोग्य होते. त्याचा हंगाम साडेतीन महिने चालतो. म्हणजे पावसाळा येण्यापूर्वी ही तिन्ही पिके बाजारात विकण्यासाठी येतात. मालविक्रीसाठी पुरेसा कालावधी मिळतो. याच काळात दरही चांगला असतो. पीक घेण्यापूर्वी रान वाळवून घेतले जाते. त्यानंतर एकरी दहा डबे शेणखत दिले जाते. हल्ली तापमानवाढीचा फटका शेतीला बसत आहे. यापासून दक्षता म्हणून हिरवळ खत वापरण्यावर कागले यांचा भर आहे. पूर्वी एकरी १५ ते १८ किलो हिरवळीचे खत वापरले जात होते. आता त्याचा वापर एकरी ३० किलोपर्यंत वाढला आहे. बाजारात असे हिरवळीचे खत ऐंशी ते शंभर रुपये किलो दराने मिळत असते. मल्चिंग करून त्यावर भाजीपाला पीक घेण्याची कागले यांची पद्धत आहे. पूर्वी पाच फुटांची सरी असायची; परंतु त्यामुळे औषध, कीटक फवारणी करताना अडचणी यायच्या. रोपे वाढल्यानंतर शेतात जाताना अडचणी येत असत. भाजीपाला तोडणीच्या वेळी मजुरांना त्रास होतो. त्यामुळे आता त्यांनी सहा फुटाची सरी करण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : Snails Damage Crops : शंखी गोगलगायींचापिकांवरील प्रादुर्भाव
भाजीपाला शेती ही कष्टप्रद आहे. बाजारपेठेत कधी दर मिळणार आहे यावर बारकाईने नजर ठेवावी लागते. पुढच्या बाजाराचा अंदाज घेऊन आधी दोन महिने पिकांची लागण करावी लागते. त्यासाठी पुरेशी निगा करावी लागते. काबाडकष्ट उपसावे लागतात. उसाप्रमाणे दुर्लक्ष करून चालत नाही. रोज शेतामध्ये फेरी असलीच पाहिजे. पिकावर अळी, किडी दिसते का याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे. काही गैर आढळले, तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती फवारणी तातडीने केली पाहिजे. अशा काही बाबींकडे लक्ष पुरवले, तर हिरवे सोने हाती येण्यास काहीच अडचण येत नाही, असे निरीक्षण शिरीष कागले नोंदवतात.
तापमानवाढीसारख्या काही घटकांचा फटका बसत असतो. अशा वेळी सावध असावे लागते. नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यामध्ये त्यांनी सिंड्रेला काकडीची लागवड केली होती. त्यातून एकरी केवळ २० टन उत्पन्न आले. प्रतिकिलो १८ रुपये दर मिळाला. एकरी तीन लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यांपैकी खर्च दीड लाख रुपये झाला. इतके कमी उत्पन्न असेल, तर शेती फायदेशीर म्हणता येणार नाही, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. हिरवे सोने पिकवल्यावर पदरी खरेखुरे सोने पडले पाहिजे, अशा पद्धतीने शेती केली पाहिजे, असा कागले यांचा दृष्टिकोन आहे.
गेल्या वर्षी त्यांनी कारले पीक घेतले. एक एकरात २२ टन उत्पादन घेतले. साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च झाला दीड लाख रुपये. साडेसात एकरामध्ये काकडीचे पीक घेतले. एकरी ४२ टन उत्पन्न आले. प्रति एकरी दोन लाख रुपये निव्वळ फायदा मिळाला. वीस गुंठ्यांत शेती उत्पादन घेतले तरी चालेल; परंतु एकरी उत्पादकता मात्र अधिक असली पाहिजे, असा आग्रह कागले धरतात. त्यांनी नुकतेच २० गुंठ्यांमध्ये मिरचीचे उत्पादन घेतले. ९ टन उत्पादन मिळाले. दोन महिन्यांच्या कालावधीत ४० रुपये किलो असा दर मिळाला असून, तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. अजूनही ९ टन उत्पादन होऊन आणखी तीन लाखाचे उत्पन्न मिळेल, असा त्यांचा हिशेब आहे. आत्तापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाला आहे. गेल्या हंगामात काकडीचे एकरी ४२ टन उत्पन्न घेतले. त्यातून साडेसात लाख रुपये उत्पन्न मिळाले. अडीच लाख रुपये खर्च झाला होता. अशाप्रकारे बाजारपेठेकडे लक्ष ठेवणे आणि एकरी अधिकाधिक उत्पन्न घेणे यावरच शिरीष कागले यांची भिस्त आहे. कूपनलिका आणि नदीचे पाणी मिळते. उरलेल्या क्षेत्रांमध्ये ऊस शेती केली जाते. त्यामध्येही गेल्या वेळी त्यांनी एकरी ९२ टन उत्पादन घेतले.
हेही वाचा : Silk Worm Farming : आदिवासी शेतकऱ्यांचा रेशीम शेतीचा प्रयोग
मजरेवाडी गावात क्षारपड जमिनीची मोठी समस्या आहे. गावात एकंदरीत ६५० एकर जमीन आहे. पैकी साडेचारशे एकर जमीन क्षारपड आहे. ती सुधारण्यासाठी श्रीहरी क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प मजरेवाडी ही संस्था स्थापन केली आहे. त्याचे अध्यक्ष शिरीष कागले आहेत. गावात त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये क्षारपड जमीन मुक्त करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण क्षेत्र क्षारपडमुक्त करण्यासाठी श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांचे मार्गदर्शन मिळत असते. कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ए. एस. पाटील यांच्याकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळत असते. हिरव्या भाजीपाल्यातून पिकणारे हिरवे सोने कागले कुटुंबीयांच्या जीवनात समृद्धीची हिरवाई आणत आहे.
dayanandlipare@gmail. com