दीपक महाले

राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. जळगावमध्ये तापमानाने तर उच्चांकी पातळी गाठली आहे. उष्णतेच्या या लाटेत केळी बागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. उन्हाळय़ात अधिक तापमान, तीव्र सूर्यप्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमानामुळे वातावरणातील सापेक्ष आद्र्रता कमी होणे, तसेच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे आदी अप्रत्यक्ष परिणाम होतात.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
The Meteorological Department has given the forecast of rain in the state of Maharashtra
थंडी सुरू झाली नाही की आता पाऊस येऊन धडकणार…राज्यातील या भागात…
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !
Maharashtra, cold, winter, weather forecast, 15 November
राज्यात गुलाबी थंडीची चाहूल, मात्र…

एप्रिलमध्ये राज्यातील विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्याचा पिकांवर मोठा परिणाम झाला. आता राज्यातील तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांवर पोहोचला. राज्यात जळगावमध्ये तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. उष्णतेच्या लाटेचा पिकांवरही विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे या लाटेत केळी बागांचे उन्हापासून संरक्षण करण्याची गरज आहे. उन्हाळय़ात अधिक तापमान, तीव्र सूर्यप्रकाश, वादळी वारे या घटकांचा केळी पिकावर प्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमानामुळे वातावरणातील सापेक्ष आद्र्रता कमी होणे, तसेच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होणे आदी अप्रत्यक्ष परिणाम होतात.

जळगाव जिल्ह्यातील केळीला केवळ राष्ट्रीय पातळीवरच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही मोठी मागणी असते. जळगावच्या केळीचे वैशिष्टय़ म्हणजे चव. जिल्ह्यातील केळीला वेगळाच गोडवा आहे. रावेर, चोपडा, यावल व भुसावळ या तालुक्यांतील केळीसाठीचे आवश्यक उत्तम हवामान हे एक प्रमुख कारण आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या क्षेत्रावर केळीचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. मुबलक प्रमाणातील भूगर्भातील पाण्याची उपलब्धता, नत्राचे व पालाशचे जास्त प्रमाण असलेल्या व गाळाच्या सपाट जमिनी व मेहनती शेतकरी यांमुळे येथे केळीचे क्षेत्र वाढले आहे व परिणामी उत्पादकताही वाढलेली आहे. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ५२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते.

देशातील बहुतांश भागात ४० अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात ४४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वाढत्या तापमानामुळे केळीबागा होरपळून निघत आहेत. तापमानाने सहनही होईना आणि सांगताही येईना अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. सकाळपासून कडक उन्हं असल्याने केळीबागा करपू लागल्या आहेत. केळीची पाने तापमानामुळे पिवळी पडत असून काही पाने वाळली आहेत. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने काही ठिकाणी केळीची झाडे उन्मळून पडत आहेत, तर तापमान वाढल्याने केळीच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तापमानाच्या भट्टीत केळीबागांची कमालीची होरपळ होत आहे. केळी बागांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठीचे नियोजन, केळीबागांना सर्व बाजूंनी जैविक वारारोधक लागवड कशी करावी. जेणेकरून बागेमध्ये बाहेरून येणारी उष्ण हवा वारारोधकांमधून फिल्टर होऊन थंड हवा बागेमध्ये खेळती राहील. यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.

अतितापमानामुळे उन्हाळय़ात गरम वारे वाहतात. त्यामुळे बागेतील तापमान वाढते. वाऱ्यामुळे पाने फाटून मोठे नुकसान होते. त्यासाठी लागवडीच्या वेळी बागेच्या चारही बाजूने शेवरीची लागवड करावी किंवा उसाच्या तीन ते चार ओळी दाट लावाव्यात. त्यामुळे गरम वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होते. असे काही केले नसल्यास गवताची सहा-सात फूट उंचीची ताटी पिकाच्या चारही बाजूंनी लावावी. त्यामुळे बागेत आद्र्रता वाढून गारवा वाढतो. केळीबागेत ३० मायक्रॉन जाडीच्या चंदेरी किंवा काळय़ा रंगाच्या पॉलिइथिलीन कापडाचे आच्छादन करावे किंवा केळीच्या दोन ओळींत केळीची खराब झालेली पाने, उसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा, सोयाबीनचा भुसा यांचे सेंद्रिय आच्छादन करावे. त्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच तणांचा बंदोबस्त होऊन आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते.

उन्हाळय़ात बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित करण्यासाठी केळी पानांवर बाष्परोधकांची फवारणी करावी. केळीला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. या पद्धतीत प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीच्या २५ ते ३० टक्के पाणी लागते, तसेच उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ मिळते. शिवाय, उन्हाळय़ात १५ दिवसांच्या अंतराने केओलिन भुकटी ८० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. उन्हाळय़ात गरम हवा तसेच पाण्याची असमानता यामुळे घड बुंध्यापासून सटकतात. जास्त उन्हामुळे घडाच्या दांडय़ांवर काळे चट्टे निर्माण होतात. तेथे दांडा मोडून किंवा सटकून मोठे नुकसान होते. त्यासाठी केळीच्या पानांच्या सहाय्याने घड झाकावेत. उरलेल्या पाण्याची पेंडी करून घडाच्या दांडय़ावर ठेवावी व उन्हापासून घडाचे संरक्षण करावे. जमिनीत वाफसा स्थिती ठेवावी किंवा ग्रीनशेड जाळीच्या कापडाने घड झाकावेत. जेणेकरून घडावर तीव्र उन्हाचा परिणाम होणार नाही. अधिक तापमानाच्या काळात केळी पिकात वाफसा राहिल्यास बागेतील तापमान कमी राहते. त्यासाठी सकाळी व सायंकाळी दोन तास ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. जेणेकरून बागेत वाफसा राहील, असे राज्याच्या केळी संशोधन केंद्राचे डॉ. सी. व्ही. पुजारी यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी

सध्या उन्हाचा ताण वाढत असल्याने केळीस पिकाची अवस्था व आवश्यकता यानुसार पाणी देण्याची गरज आहे. पाण्याने नियमित नियोजन करून जमिनीमध्ये वाफसा टिकून राहील. उन्हाळय़ात केळी पिकाचा ताण कमी करण्यासाठी सिलिकॉन २० मिलिलिटर प्रतिपंप फवारणी किंवा कॉर्न स्टार्च आधारित झेबा पाच किलो प्रतिएकर जमिनीद्वारे द्यावे. यामुळे मातीच्या कणांमध्ये पाणी धरून ठेवण्याची म्हणजेच जमिनीची जलधारण शक्ती वाढते. यामुळे पिकास योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा होऊन पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते. एकूण पिकाच्या कालावधीत केळीला १६०० ते दोन हजार मिलिमीटर पाण्याची गरज असते. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीने मृगबाग केळीला मेमध्ये दिवसभरात प्रतिझाड २०-२२ लिटर पाणी द्यावे. सूर्यकिरणांपासून संरक्षणासाठी पॉलिप्रॉपलीन कापडाची स्कर्टिग बॅग किंवा पिशवीने घड झाकावा. वाळलेल्या केळीच्या निरोगी पानांचाही घड झाकण्यासाठी वापर करता येतो. पक्वतेच्या अवस्थेत असलेल्या घडांना आधार देणे आवश्यक आहे. त्यासाठी घडांना बांबूचा किंवा पॉलिप्रॉपलीन पट्टय़ांचा आधार द्यावा. केळी पिकाच्या पोषणासाठी निसवणीच्या तसेच घड पक्वतेच्या अवस्थेतील मृगबागेस प्रतिहजार झाडांसाठी १२ आठवडय़ांपर्यंत प्रतिआठवडा युरिया ५.५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश सात किलो, अशी खतमात्रा द्यावी, असे महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाचे तज्ज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे यांनी सांगितले.

पिकासाठी १५-४० अंश तापमान चांगले

उष्ण व दमट हवामान केळीच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पोषक असते. पिकाची वाढ १५-४० अंश सेल्सिअस तापमानात चांगली होते. उन्हाळय़ात उष्ण वारे व हिवाळय़ात कडाक्याची थंडी पिकास हानिकारक ठरते. केळीला समशीतोष्ण आणि दमट हवामान व कमी वाऱ्याचा प्रदेश अधिक चांगला मानवतो. केळीला सरासरी वार्षिक १००-३२५ सेंटिमीटर पर्जन्यमानाची गरज असते. केळीच्या पिकाला खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. केळीला भारी, काळी कसदार, सेंद्रिय पदार्थानी परिपूर्ण, गाळाची, भुसभुशीत जमीन अधिक मानवते. कमी खोलीच्या जमिनीतही सेंद्रिय खतांचा पुरवठा करून केळीची लागवड करता येते, असे डॉ. पुजारी यांनी सांगितले.

उष्ण कटिबंधीय प्रदेशात केळी लागवड

केळीची लागवड पुरातन काळापासून आशिया खंडाच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात केली जात आहे. या पिकाचे मूळ स्थान भारतातील आसाम राज्यातील आहे, असे समजले जाते. भारतातील एकूण फळबागांमधील क्षेत्रापैकी २० टक्के क्षेत्र केळी पिकाखाली आहे. भारतात केळीची लागवड तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यांत केली जाते, तर महाराष्ट्रात जळगाव, नांदेड, परभणी, धुळे, सांगली, वसई, वर्धा या जिल्ह्यांतील केळीखालील क्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे.

परकीय चलन मिळवून देणारे पीक

भारतातून सौदी अरेबिया, इराण, कुवेत, दुबई, जपान व युरोपीय बाजारपेठेत केळीची निर्यात होत असून, परकीय चलन मिळवून देणारे केळी हे एक महत्त्वाचे फळपीक आहे. सध्या केळीला प्रतिक्विंटल ८०० ते ११०० रुपयांपर्यंत भाव आहे. पिकलेल्या केळीचा उपयोग खाण्यासह जॅम व पावडर तयार करण्यासाठी, तर कच्च्या केळीचा उपयोग भाजी, चिप्स, पीठ तयार करण्यासाठी करतात. केळीच्या फुलांचा उपयोगसुद्धा भाजी करण्यासाठी करतात. दक्षिण भारतात केळीच्या पानांचा उपयोग जेवण करण्यासाठी करतात. केळीच्या कंदांपासून स्टार्च तयार करतात, तर खोडाचा उपयोग धागा तयार करण्यासाठी करतात. पिकलेली केळी ही उत्तम पौष्टिक अन्न असून, या फळात साखर, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ही खनिजे व जीवनसत्त्वे ब भरपूर प्रमाणात असतात.