आपल्याकडे साधारणत: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर होत असल्याचा अनुभव आहे. पंजाबमध्ये मात्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्यासही अवधी असताना सत्तेतील प्रमुख दावेदार असलेल्या आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली. राज्यात सत्तारूढ अकाली दल-भाजप आघाडीविरोधात आप असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसने जरी खासदार अमरिंदर सिंग यांच्याकडे धुरा सोपवली असली तरी त्यांना सत्तेची फारशी संधी नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या बाजूने वातावरण तयार केल्याचे पंजाबमधील जाणकारांनी मान्य केले. राज्यात सत्तेत असताना अकाली दल-भाजपने औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष केले त्याचा फटका बसणार आहे. अकाली दल हा भाजपचा जुना सहकारी. मात्र या वेळी भाजपने वेगळे लढावे तरच पक्षाची ताकद वाढेल असा सूर पंजाबमधील एका ज्येष्ठ नेत्याशी बोलल्यावर जाणवला. परस्पर सामंजस्याने वेगळे लढावे अशी काहीशी वेगळी भूमिका त्यांनी मांडली. अर्थात ही गोष्ट कठीण असल्याचे त्यांनी मान्य केले. असे वेगळे झाल्यासच सत्ता राखण्याची शक्यता असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. भाजप वेगळे झाल्यास राज्यात फुटीरतावादी चळवळ वाढेल अशी भीती निर्माण केली जाते. मात्र त्यात काही तथ्य नाही असेही या नेत्याने सांगितले. मात्र अकाली दलाबरोबर राहिल्याने भाजपची राज्यात वाढ झाली नाही. तसेच राज्यातील भाजपमध्ये दूरदृष्टीचे नेतृत्वही नसल्याचे त्यांनी मान्य केले. वेगळे लढल्यास दोघांना ताकद कळेल हे सांगताना त्यांनी महाराष्ट्रातील युतीमधील घडामोडींचा हवालाही दिला. तसेच निकालानंतर पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकेल असे स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा