चित्रासारखं चित्र दिसलं, त्यात कलावंताचं हस्तकौशल्य दिसलं की साऱ्यांनाच बरं वाटतं! पण त्या कालातीत ‘शुद्ध’ पद्धतीनं काढलेली चित्रं आपल्याला आज काय देत असतात? शुद्धतेला एवढं महत्त्व का देतो आपण? हे प्रश्न विचारून त्यांची उत्तरंही शोधण्याची ताकद निखिल चोप्राच्या प्रयोगांमध्ये आहे. निखिल प्रेक्षकाला चित्र-शुद्धतेबद्दलच्या कल्पनांकडून ‘पाहण्या’च्या आणि त्याही पलीकडच्या अनेक अनुभवांकडे नेतो…
निखिल चोप्रा २००७ मध्ये मुंबईकरांना माहीत झाला असावा. मुंबईच्या कुलाबा भागात मॉर्टिमर चटर्जी आणि तारा लाल या जोडप्यानं रीतसर एक आर्ट गॅलरी उघडली, त्याआधीच निखिलचा प्रयोग त्यांनी ठेवला होता. गॅलरीभर छान पांढऱ्या भिंती होत्या आणि पांढऱ्या कपडय़ांतला निखिल चोप्रा, त्या चारही भिंतींवर चारकोलनं चित्रं काढणार होता. खोलीत बंद निखिल. पण ही खोली ज्या इमारतीत होती, त्या इमारतीच्या गच्चीवर अगदी उंच जागी एक ३६० अंशांत हलू शकणारा कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्याची जोडणी निखिलच्या खोलीतल्या एका संगणकाशी होती आणि त्या पडद्यावर बाहेरची जी दृश्यं दिसताहेत, ती निखिल आत ‘आणत’ होता. चार भिंतींवर अवघ्या चार दिवसांत, चारी दिशांचा अवघा आसमंत निखिलनं ‘उतरवला’. कुलाब्याच्या इमारती, जरा बुटक्या इमारतींची छपरं, रस्ता, त्यावरली वाहनं, दुकानं, पलीकडला समुद्र, समुद्रात दूरवर दिसणारी जहाजं, जरा एका बाजूला ‘ताज’चा घुमट.. सारं सारं ‘अवतरलं’ होतं निखिलच्या चित्रांत.
पण हे – जे एरवी बाहेर दिसणारच होतं किंवा ‘गुगल मॅप्स- सॅटेलाइट’ सुविधा वापरून अथवा ‘पॅनोरामिओ’सारख्या फोटो-अपलोड वेबसाइट वापरून कुणालाही पाहता येणारच होतं.. ते एका मोठय़ा खोलीत स्वत:च्या हस्तकौशल्यानं ‘आणणं’, ‘उतरवणं’ किंवा ‘अवतरवणं’ हे खरोखरच कौतुक करण्यासारखं होतं का? चारकोलनं अगदी यथातथ्य चित्रण निखिलनं केलं असतं, तरी फरक काय पडला? त्याच्याकडे कौशल्य आहे, त्यामुळेच तो वेगानं चितारू शकतोय, हे सगळं छान असेल, पण मग तेवढय़ासाठी फक्त निखिलचंच कौतुक का करायचं? हे तर आपल्या मराठी चित्रकारांच्या पिढय़ान्पिढय़ांकडे आहे की!
होय. मुद्दा पिढय़ान्पिढय़ांकडे हेच कौशल्य असण्याचाही आहेच. चारकोलनं केलेलं चित्रण ही एक गोष्ट अशी आहे की, तुमचं ते पॅनारोमिओ का फ्यानोरोमियो येवो नाही तर गुगल कितीही पुढे जावो.. चारकोल म्हणजे चारकोलच!
तर हे चारकोलचं कौशल्य निखिलच्या आजोबांकडेही म्हणे होतं. त्यांचं नाव म्हणे योगराज चित्रकार. ते म्हणे चारकोल वापरायचे.
आणि मुंबईच्या त्या गॅलरीत २००७ साली दिसलं ते हे की, निखिल चोप्रानं संपूर्ण चार दिवसांचा कालावधी त्याच्या आजोबांच्या – म्हणजेच ‘योगराज चित्रकार’च्या भूमिकेत जाऊनच घालवला होता. निखिल भूमिका जगला, हेच अधिक महत्त्वाचं होतं. ती भूमिका जगण्याचा एक भाग म्हणून तो चित्रकर्म करत होता. अखेरच्या दिवशी त्याची भूमिका संपणार होती आणि बदलणारही होती.. त्याच अखेरच्या काही तासांत चारही भिंतींवरली चित्रं पूर्णत: पुसली जाणार होती. हाच प्रयोग आधी श्रीनगरातही त्यानं केला होता. श्रीनगर का? तर चोप्रा घराणं तिकडलं. योगराज तिथंच चित्रं काढायचे. अनेक चित्रं गेलीच. निखिलनं चितारलेली खोलीही पुन्हा पांढरी झाली.
हे जे भूमिका जगणं वगैरे आहे, ते निखिलनं मुद्दाम ठरवून केलं होतं. नाटक नव्हे, भूमिका जगणं. त्यासाठी अभ्यास करणं. तो अभ्यास प्रयोगात उतरवणं. ‘रिच्युअल आर्ट’ अशी एक इंग्रजी संज्ञा तुम्ही ऐकली असेल. भक्ती किंवा ईश्वरसंवाद यांच्या प्रभावाखाली अत्यंत प्रेरित होऊन नाचणं, चित्रं काढणं- हे आदिवासींच्या कलात्म आविष्काराचा भाग असल्याचं कधी तरी वाचलं असेल. तशीच, पण भक्तीऐवजी अभ्यासातून आणि ईश्वराऐवजी संस्कृतीशी संवादातून आलेली प्रेरणा निखिल चोप्राच्या प्रयोगांमध्ये दिसते.
निखिल ज्या अनेक भूमिका जगला, त्यांची माहिती ‘निखिलचोप्रा.नेट’ या वेबसाइटवर त्यानंच व्यवस्थित दिलेली आहे. फोटोही आहेत. या भूमिका फक्त ऐतिहासिकच होत्या, असंही नाही. बर्लिनच्या एका गॅलरीत पाच तास वस्त्रहीन अवस्थेत निखिलनं आधी भिंतभर गिरगटलं. मग त्या चारकोलच्या रेघांचं जंजाळ स्वत:च्या हातांनी घासून मिटवण्याचा प्रयत्न त्यानं केला. निखिलला भान होतं, पण त्या पाच तासांपुरतं सगळंच्या सगळं भान त्यानं या एका प्रयोगाला वाहिलं होतं. या प्रयोगातली भूमिका बर्लिनची अख्खी भिंत बेभानपणे रंगवून काढणाऱ्या तरुणांची होती की नव्हती, याबद्दल निखिल काहीच बोलला नाही आणि त्याला तसं कुणी हटकलंही नाही.
करणं आणि मिटवणं हे दोन्ही भाग निखिलच्या प्रयोगांमध्ये असतात. उगम आणि विलय. त्या दोन टोकांच्या मधला प्रदेश अनुभवाचा. तो अनुभव तुम्हाला देण्यासाठी निखिलनं अभ्यास केलेला असतो- तो ‘आहार्य आणि आंगिक अभिनय’ (अतिसोप्या शब्दांत: वेषभूषा आणि हावभाव) यांसाठीचा असतो. पण मग, कुलाब्याचा आसमंत एका खोलीत ‘अवतरलेला’ पाहून मुंबैकर प्रेक्षकाला जसं मनातून बरं वाटलं असेल, तसं योकोहामात, टोकिओत, पॅरिस, व्हेनिस किंवा सिडनीत कशानं बरं वाटेल, हे निखिलनं हेरलेलं असतं. तिथल्या इतिहासाला आणि त्या सांस्कृतिक इतिहासात दबलेल्या राजकीय, सामाजिक, कलाविषयक गोष्टींना आपण साद घालायचीय, हे निखिल आधी ठरवतो. मग करतो.
कुणी तरी अगदी भान विसरून चारकोलनं काही तरी चितारतंय, हे पाहण्याचा अनुभव हा चित्रकलेच्या प्रेक्षकासाठी अगदी शुद्ध अनुभव.. त्यामुळेच, निखिलला तसं चितारताना पाहून अंगावर रोमांच उभे राहतील.. पण निखिलचा प्रयोग असा की, हे उभे राहिलेले रोमांच भादरून काढून, तो तुम्हाला तुमच्या कला-संस्कृतीविषयक कल्पना तपासून घ्यायला भाग पाडेल. प्रयोगातले निखिलचे फोटो विकलेही जातात. पण हा अपवाद वगळता कला आणि कलावंत, इतिहास आणि संस्कृती यांचं दर्शन तो घडवतो आणि मोडतोही.
निखिलच्या प्रयोगांकडे पाहताना आपण स्वत:ला तपासून घेतलं, तर कदाचित ‘शुद्ध कला’ आपल्याला महत्त्वाची वाटते की ज्याला समीक्षक लोक ‘संपृक्त’ म्हणतात तसा- म्हणजे अनेक कल्पना किंवा अनेक विचार एका ठायी आणणारा- ‘दाट अनुभव’ महत्त्वाचा असतो, हे तुम्ही तुमच्यापुरतं तरी नक्की ठरवू शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा