उपलब्ध वस्तूंचे पर्याय वाढले म्हणून जगण्यात असमाधानही वाढले, किंवा सुबत्ता वाढली म्हणून काही समाधान वाढत नाही, असे युक्तिवाद केले जातात. त्यात तथ्य किती आहे? वस्तूंच्या पटीत आनंद वाढेलही, पण समाधान वस्तूंमुळे वाढत नाही.. आणि वस्तूंचेच म्हणाल तर, खरोखरच आपल्यापुढे पर्याय असतात का?
सुबत्ता वाढली पण असमाधानही वाढले, असा  तक्रारीचा सूर अनेकदा  लावला जातो. आज जगण्यातील आनंदाचेही वस्तूकरण झाले आहे का, वस्तूंच्या पटीत आनंद मोजला जातो आहे का, असा विचार करताना जगण्यासाठी वस्तूंचे पर्याय भरपूर वाढले, परंतु तेवढय़ाच प्रमाणात असमाधानही वाढले, असा युक्तिवाद केला जातो. खरे तर, सर्व पर्याय आपल्याला उपलब्ध नसतातच मुळी..
उदाहरणार्थ मला गाडी घ्यायची आहे. आज  ४०-५० विविध मॉडेल्स बाजारात आहेत, पण माझे बजेट मला ४-५ मॉडेल्सचाच विचार करू देते. मी माझे बजेट ५ लाखाचे असताना २ लाख ते २ कोटींपर्यंतच्या सर्व पर्यायांचा विचारच करायचे कारण नाही. सबब सोडाव्या लागणाऱ्या पर्यायांनी दु:खी होण्याचे कारण नाही. गोष्ट अशी असते की माझे बजेट ५ लाखाचे असताना ते १० लाखाचे असते तर अजून आलिशान गाडी घेता आली असती हे असमाधानाच्या मुळाशी असते. पण केवळ पर्याय उपलब्ध आहेत म्हणून ही गोष्ट अवघड होत नाही तर खरेदीला जाण्यापूर्वी आपला विचार पक्का झालेला नसतो म्हणून ही गोष्ट अवघड होते. विचार पक्का झालेला नसतो, याचे कारण आपल्याला काय हवे ते आपणच निश्चित करू शकत नाही. ते आपण निश्चित करू शकत नाही, कारण आपल्याला  निवडीचे निकष माहीत नसतात. केवळ आपल्या आकांक्षा पुढे पळत असतात इतकेच ते नसते. तेव्हा अगदी कोणत्याही तऱ्हेने ही पर्यायांमुळे निर्माण झालेली स्थिती नसून त्यातून निवड कशी करायची हे कळत नसल्याने झालेली स्थिती असते. म्हणजे ती Existantial Anguish असते. ही संज्ञा ज्यांच्याकडून आली ते अस्तित्ववादी इतके पर्याय नव्हते तेव्हाही हीच तक्रार करत होते.
खरे तर कुठल्याही गोष्टीची निवड कशी, कुठल्या आधारावर करावी यासाठी आता इतका चांगला काळ इतिहासात पूर्वी कधीही नव्हता. विविध माध्यमांतून झालेल्या माहितीच्या स्फोटानंतर अमुक एक विषयावर माहिती मिळत नाही असे सांगण्याचा अधिकार कोणाला राहिलेला आहे असे म्हणता येत नाही.
मॉलमध्ये गेलेल्याला निवड करणे अवघड जाते, कारण कोलेस्टेरोल असलेले चवीला चांगले लागते तर कोलेस्टेरोल फ्री चवीला वाईट लागते. कोलेस्टेरोल तब्येतीला चांगले नाही आणि कोलेस्टेरोल फ्री तब्येतीला चांगले आहे. तर काय करावे हा पेच असतो. स्वत:चीच इच्छा आणि विचार यांचे युद्ध त्याला बेजार करत असते. निवड करणे अवघड करत असते. त्याला पर्यायांची उपलब्धी कारणीभूत नसते. निवडीचे निकष उपलब्ध नसतात हेही नसते. निकष माहीत असतात, पण ते पचनी पडत नसतात हा मुद्दा असतो..
ज्या आर्थिक सुबत्तेमुळे अधिक पर्याय खुले होतात, ती एका मर्यादेपर्यंत समाधानात वाढ करते आणि त्यानंतर मात्र सुबत्ता वाढत गेली तरी समाधान वाढत नाही असा निष्कर्ष काह्न्ेमान यांच्या चमूने काढला. वार्षिक ७,५०,००० डॉलपर्यंत समाधान वाढते पुढे मात्र ते स्थिर राहते असे त्यांना अमेरिकेत आढळले. विविध देशातील समाजाची सांपत्तिक स्थिती, तेथील राहणीमान इत्यादींवर हा आकडा वेगळा असू शकेल, पण जितके अधिक आर्थिक उत्पन्न तितके अधिक समाधान असे कुठेही नसते. अशा पाहणींच्या आधीही ही बाब विचारवंतांना ठाऊक होती. बट्र्राड रसेल यांनी याचा उल्लेख त्याच्या एका निबंधात केला आहे आणि सर्वसाधारणत: असेच वार्षिक उत्पन्न समाधानी राहण्यास पुरेसे असते असे म्हटले आहे.
वास्तविक स्थिती अशी आहे की, अधिक पैसा हाती आला की माणसाचा वारू उधळतो. रोजची विवंचना संपते आणि पुढची फिकीर तो करेनासा होतो. या बाबतीत बिहेविअरल इकॉनॉमिक्समधून पुढे आलेले उदाहरण  बोलके आहे. नोकरीला रूजू होताना अमेरिकेत कर्मचाऱ्याने एक फॉर्म भरावयाचा असतो. त्यात त्याने मी निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होत आहे/ नाही असा पर्याय निवडायचा असतो. पूर्वी फॉर्ममध्ये निवृत्तिवेतन योजनेत मी सहभागी होऊ इच्छित नाही असा डिफॉल्ट होता तेव्हा बहुसंख्येने लोक निवृत्तिवेतन योजनेत सहभागी होत नसत आणि हे सारेचजण २००८ मध्ये रस्त्यावर आले. रिचर्ड थॅलर यांनी त्या जागी निवृत्तिवेतन योजनेत मी सहभागी होत आहे असा डिफॉल्ट करा असा बदल ओबामा प्रशासनाला सुचवला आणि तो अमलात आणल्याने आता बहुसंख्येने निवृत्तिवेतन योजनेत लोक येऊ लागले. इथे जो प्रथम पर्याय असतो तोच असू देण्याची आळशी आणि तितकीच बेजबादार वृत्ती इतक्या महत्त्वाच्या बाबीतही आढळून येते असाच निष्कर्ष काढावा लागतो.
जगण्यातील आनंद, जीवनाचे सार्थक, जगण्याची गुणवत्ता या भिन्न आणि नीट व्याख्या न करता येण्यासारख्या आणि म्हणून पुष्कळ वेळा सरमिसळ केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. काह्न्ेमान यांचे म्हणजे हॅपिनेस (आनंद) आणि समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हॅपिनेस हा बराचसा आपल्या त्या वेळच्या मूडवर अवलंबून असतो.  कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये कामासाठी जाऊन आलेल्या लोकांकडून रिस्पॉन्स घेतला तर तो नक्कीच अनहॅपी असा असेल. पण हॅपिनेस आणि समाधान हे वेगळे ठेवले पाहिजे.
हॅपिनेसमध्ये तात्कालिक घटना, त्यावेळची आपली मानसिकता, त्याला कारणीभूत असलेले घटक यांचा सहभाग असतो तर समाधान यात तडीस नेलेली कार्ये, केलेल्या निश्चयांची पूर्तता, जबाबदारी निभावणे, कार्यात मिळालेले यश त्याला समाजाकडून मिळालेले सन्मान अशासारख्या घटकांचा समावेश असतो. त्यांनी असाही एक निष्कर्ष काढला की सुरुवातीला ज्यांना आयुष्यात पैसे महत्त्वाचे वाटत होते त्यांनी पुढे अधिक पैसे मिळवले आणि ज्यांना पैसे तितके महत्त्वाचे वाटत नव्हते त्यांनी त्यांच्यापेक्षा मिळवले. पण दोघेही समाधानी होते. हा निष्कर्ष हार्वर्डमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना २० वर्षांनी पुन्हा गाठून त्यांनी काढला.
 तेव्हा आपण जे ठरवतो आणि साध्य करतो त्याने समाधान मिळत असावे.. त्या त्या टप्प्यांवर चूक वा बरोबर उद्दिष्ट ठरवणे,  हा कळीचा मुद्दा आहे.

Story img Loader