रॅगिंग वा विद्यार्थ्यांच्या छळवादाविरोधात कायदे असले तरी त्यावर अद्याप चाप बसलेला नाही, हे विद्यापीठ अनुदान आयोगाने केलेल्या एका पाहणीतूनच पुढे आले आहे. सुमारे ४० टक्के मुले अजूनही छळवादाला बळी पडतात. मात्र त्यातील फक्त ८.६ टक्के मुले तक्रारी करतात किंवा आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडतात, असेही वास्तव समोर आले आहे. महाविद्यालयांत छळाचे प्रकार का होतात, त्यावर उपाय काय, याचा अभ्यास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने ही पाहणी केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केला. प्रा. मोहन राव, डॉ. शोभना सोनपर, डॉ. अमित सेन, प्रा. शेखर शेषाद्री, हर्ष अगरवाल, दिव्या पडलिया यांचा या समितीत सहभाग होता. यात देशभरातील ३७ महाविद्यालयांतील १० हजार विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.
भाषा, प्रांत, जात हे कारण!
छळाच्या विविध कारणांचा शोधही या सर्वेक्षणात घेण्यात आला. भाषा, प्रादेशिक विभाग या कारणामुळे जवळजवळ २५ टक्के प्रकार घडतात. तर ८ टक्के घटना या जातीमुळे होत असल्याचेही दिसून आले. छळाचे सर्वाधिक प्रकार हे व्यावसायिक महाविद्यालयांत होतात. या महाविद्यालयांतील हे प्रकार सुमार ६० टक्क्य़ांच्या आसपास आहे. जातीभेद हे यामागे कारण असल्याचे ८ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. उत्तर भारतातील महाविद्यालयांत रॅगिंगचे प्रकार सर्वाधिक असून, उत्तर प्रदेशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत जातीभेद आणि लिंगभेदावरून छळ होण्याचे प्रकार जास्त आढळून आले.
विकृतीतील आनंद
पाहणीत आणखी एक गमतीदार माहितीही पुढे आली. सुमारे ३२ टक्के विद्यार्थ्यांनी रॅगिंगमुळे मजा वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच छळानंतर त्याच विद्यार्थ्यांनी अभ्यासात मदत केल्याचे ६० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र ६० टक्के विद्यार्थ्यांनी याबद्दल नकारात्मक मत व्यक्त केले, तर ६५ टक्के मुलांनी छळवादी वरिष्ठ विद्यार्थ्यांशी जुळवून घेता येत नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे रॅगिंगमुळे नव्या-जुन्या विद्यार्थ्यांमध्ये एकसंधतेची भावना निर्माण होते, या समजाला छेद दिला आहे.
मुलींचाही छळ
मुलींपेक्षा मुलांमध्ये छळाचे प्रकार जास्त असले तरी मुलींमध्येही छळ होत असल्याचे दिसून आले आहे. मुलांमध्ये शारीरिक त्रास दिला जातो. त्याऐवजी मुली मानसिक त्रासाला बळी पडतात. मुलींच्या छळाचे प्रकार दिसून येत नसले तरी त्यांचा प्रमाणही लक्षणीय असून, अधिक धोकादायक आहे.
घातक परिणाम
छळामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही असे सुमारे २५ टक्के मुलांचे मत आहे. मानसिक खच्चीकरण होते आणि बराच काळ त्यातून बाहेर पडता येत नाही, असे मत सुमारे ६५ टक्के मुलांनी व्यक्त केले. मात्र ३३.८ टक्के विद्यार्थ्यांना वाटते की यामुळे आत्मविश्वास वाढतो, तर ३४.८ टक्के विद्यार्थ्यांना मानसिक बळ येते, असे वाटते.

Untitled-13

Untitled-14