(संकलन- दिनेश गुणे, संदीप आचार्य, मधू कांबळे, उमाकांत देशपांडे, संजय बापट, रेश्मा शिवडेकर, प्राजक्ता कासले, वीरेंद्र तळेगावकर, प्रशांत मोरे, प्रसाद रावकर, शेखर जोशी, रोहन टिल्लू, विवेक सुर्वे, मीनल गांगुर्डे, प्रसाद हावळ. छाया : वसंत प्रभू, दीपक जोशी, दिलीप कागडा)
जगभरात शिक्षणक्षेत्रात विविध प्रयोग होत असताना आपल्याकडे मात्र काही मोजक्याच शाळा व शिक्षक आपले उत्तरदायित्व ओळखत विद्यार्थ्यांच्या हिताचे वेगवेगळे प्रयोग राबवत असतात. ग्रामीण भागात काही तरुण शिक्षक आपल्या परीने एखाद-दुसरा उपक्रम राबवतो. विशेषत: जिल्हा परिषदेच्या सेवेतील शिक्षकांना असे उपक्रम राबविताना फारशी अडचण येत नाही, परंतु खासगी संस्थेच्या सेवेतील शिक्षकांना मात्र मर्यादा येतात. त्यातही महानगरांतील शाळांच्या ‘निव्वळ व्यावसायिक’ मानसिकतेत प्रयोगशील असणं कधीच फलदायी ठरत नाही. पण संस्थेच्या शाळेचा मुख्याध्यापक, प्राचार्यच उपक्रमशील असला आणि संस्थेचे त्याला पाठबळ असले, तर खासगी शाळाही इतरांसाठी आदर्श निर्माण करू शकते, हे शहरातील ‘राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया’ने सिद्ध केले आहे.
शहरातील वसंतनगर भागात तीन मजली टोलेजंग व देखण्या इमारतीत हे ‘राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय’ दरवर्षी गुणवान व प्रज्ञावान विद्यार्थी घडवत आहे. नियमित अभ्यासक्रम शिकविताना विद्यार्थी परिपूर्ण नागरिक कसा होईल, याबाबत शाळा व्यवस्थापन कमालीचे संवेदनशील दिसून येते. यासाठी संस्थेने आधुनिक अशा तब्बल २७ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय ३१ नावीन्यपूर्ण उपक्रम संस्था राबवते. विद्यापीठाप्रमाणे ‘राजर्षी शाहू विद्यालया’चे स्वतंत्र विद्यालय गीत असून ‘ज्ञान आणि विज्ञानाचे सक्षम सारसूत्र आहे! राजर्षी शाहू विद्यालय! आमुचे तीर्थक्षेत्र आहे!’ हे या गीताचे धृपद आहे. नुकताच या शाळेला नुकताच शंकरराव चव्हाण स्मृती आदर्श शाळा पुरस्कार मिळाला आहे.
सर्व काही विद्यार्थ्यांसाठी या समर्पण भावनेने कार्यरत साहित्यिक व उपक्रमशील व्यक्तिमत्त्व, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. सुरेश सावंत हे या शाळेचे मुख्याध्यापक व प्राचार्य आहेत. त्यांच्याच संकल्पनेतून आणि सहकार्याच्या तोलामोलाच्या साथीमुळे संस्थेची भरभराट होत आहे. ब्रिटिश कौन्सिलकडून ‘उपक्रमशील शाळा’ असे प्रमाणपत्र या संस्थेला मिळाल्यानंतर नोव्हेंबर, २०१४ मध्ये या संस्थेने ‘आय.एस.ओ.’ मानांकनालाही गवसणी घातली आहे.
शैक्षणिक कुंडली
या संस्थेची एकूण विद्यार्थी संख्या सुमारे अडीच हजार असून प्रत्येक विद्यार्थ्यांची ‘शैक्षणिक कुंडली’ येथे जपली जाते. हा कुठेही पाहायला न मिळणारा नावीन्यपूर्ण उपक्रम अनुकरणीय आहे. अन्य शाळा, महाविद्यालयांत वर्गशिक्षक वा विषय शिक्षकांशिवाय मुख्याध्यापक, प्राचार्य व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांची फारशी ओळख व त्याच्याबाबत माहिती नसते; परंतु राजर्षी शाहूचे मुख्याध्यापक त्यांच्या कक्षात बसून कोणत्याही विद्यार्थ्यांची भ्रमणध्वनी क्रमांकासह इत्थंभूत माहिती सांगू शकतात. आडवेळी एखाद्या विद्यार्थ्यांच्या पालकाला त्याचे बोनाफाइड हवे असल्यास इथे संबंधित शिक्षकाची गरज भासत नाही. शैक्षणिक कुंडली पाहून संबंधित विद्यार्थी आपल्याच शाळेचा आहे किंवा कसे हे मुख्याध्यापक वा कार्यालयीन अधीक्षकांना लगेच पडताळता येते. शाळेने ‘शिस्त’ आणि ‘गुणवत्ता’ या दोन शब्दांचा मंत्र जिवापाड जपला आहे.
विद्यालयातील ग्रंथसंपदा वाढावी यासाठी ‘ज्ञानपोई’ हा उपक्रम शाळेत सुरू झाला. प्रत्येक शिक्षकाने दरमहा एक पुस्तक विकत घेऊन वाचायचे आणि ते शाळेच्या ग्रंथालयाला भेट द्यायचे, अशी ही योजना आहे. यामुळे शिक्षकांच्या वाचनकक्षा तर रुंदावल्याच; परंतु विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरील पुस्तकेही विनासायास उपलब्ध होत आहेत. यातूनच शाळेत ‘मागेल त्याला मागेल ते पुस्तक’ ही योजनाही साकार झाली. वाचनसंस्कृती समृद्ध करण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे.
विद्यार्थी, शिक्षकांचे वाढदिवस
परस्पर सौहार्दाचे वातावरण वाढीस लागावे यासाठी शाळेत सर्व शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांचे वाढदिवस सार्वजनिक स्वरूपात साजरे केले जातात. प्रार्थनेच्या वेळी संबंधित विद्यार्थ्यांस शुभेच्छापत्र आणि पुस्तक देऊन त्यास आशीर्वाद दिले जातात. नवरात्रोत्सवात शिक्षिका व विद्याíथनींचा गौरव केला जातो. ‘गौरव नवदुर्गाचा’ असे या उपक्रमाचे नाव आहे.
संपूर्ण संगणकीकरण
शाळेच्या कार्यालयीन कामकाजाचे पूर्णपणे संगणकीकरण झाले आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या टेबलवर इंटरकॉमची सुविधा असून शाळेचा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत आहे. त्यामुळे शाळेला एक शिस्त लागली आहे. बायोमेट्रिक यंत्रणेमुळे शिक्षकांसह विद्यार्थीही वेळेचे पाईक झालेले दिसून येतात. शाळा, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी संगणकसाक्षर असून पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोपा करून शिकविला जातो. डिजिटल क्लासरूम विकसित करण्यात आली आहे. रोटरी क्लबच्या सहकार्याने ई-लìनगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
परिपूर्ण भौतिक सुविधा
शहरातील अन्य कोणत्याही शाळेला नसेल एवढे विस्तीर्ण पटांगण या शाळेला असून भोवताली संरक्षक िभत बांधण्यात आली आहे. हे या शाळेचे सुरक्षाकवच मानले पाहिजे. ‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या’तील निकषानुसार शाळेत अलीकडेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र पंचतारांकित स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. मुबलक शौचालय आणि स्वच्छतागृह येथे असल्याने देहधर्माविषयी कोणतीच अडचण संभवत नाही. शिवाय विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणीही आवर्जून केली जाते. यामुळे पालकांत आपल्या पाल्याविषयी सुरक्षेची भावना दृढ झालेली दिसते. सामाजिक सहभागातून १.५ लाख रुपये खर्च करून जलशुद्धीकरण यंत्र (आर.ओ.) बसविण्यात आल्याने शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
जीवन कौशल्याचा विकास (सालसेप)
राजर्षी शाहू विद्यालयात आणखी एक नावीन्यपूर्ण उपक्रम ‘सालसेप’ राबवला जातो. एकार्थाने शरीररचनाशास्त्राचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. मुली व महिलांबाबत समाजात वरचेवर घडणाऱ्या गरकृत्यांच्या पाश्र्वभूमीवर हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा असून मुलांपेक्षा मुलींना सुज्ञ करणं हा त्यामागचा हेतू आहे. विशिष्ट शालेय वयात शरीरात बदल होत जातात. या काळात मुले व मुलींची मानसिकता काहीशी अस्थिर असते, परंतु याच वेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पुढील वाट सुकर होते. मुलींना एका बंद वर्गात स्त्रीरोगतज्ज्ञांकरवी मार्गदर्शन केले जाते. यासाठी शहरातील नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञांना पाचारण केले जाते.
इतरही अनेक उपक्रम
शाळेत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावाने एक वनौषधी उद्यान विकसित करण्यात आले आहे. यात सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. अशा प्रकारचे उद्यान विकसित करणारी राजर्षी शाहू विद्यालय ही महानगरातील एकमेव शाळा आहे. शाळेच्या तीन मजल्यावर तीन दर्शनी फलक लावले असून ‘वृत्तदर्पण’, ‘अक्षरशिल्प’, ‘चित्रलिपी’ अशी या फलकांची नावे आहेत. पहिल्या फलकात विविध वृत्तपत्रांत प्रकाशित झालेल्या शाळेच्या बातम्या फोटोकॉपी करून लावल्या जातात. दुसऱ्या फलकात विद्यार्थ्यांचे निबंध, कथा, कविता प्रकाशित केल्या जातात, तर तिसऱ्या फलकात विद्यार्थ्यांनी काढलेली आकर्षक चित्रे प्रदíशत केली जातात.
याशिवाय ‘तंबाखूमुक्त शालेय परिसर’, ‘वनमहोत्सव’, ‘अल्पबचत’, ‘कॉपीमुक्त परीक्षा केंद्र’, ‘भव्य विज्ञान प्रयोगशाळा’, ‘अब्दुल कलाम स्मृती वाचनकट्टा’, ‘अध्यापक अध्ययन कक्ष’, ‘राष्ट्रीय छात्रसेना’, ‘बालभवन केंद्र’, ‘पर्यावरण रक्षकसेना’ यांसह इतर सुविधा, तर नावीन्यपूर्ण उपक्रमांसह ‘दररोज प्रभावी बहुभाषिक वर्गपरिपाठ’, ‘वृत्तदर्पण’, ‘अक्षरशिल्प’, ‘शालेय स्वच्छता’, ‘एक विषय.. एक हस्तलिखित’, ‘वर्गवार वाचनपेटी’, ‘डॉ.जे.जी. वाडेकर गुणवत्ता शिष्यवृत्ती’, ‘चित्रकला-हस्तकला’, ‘व्यवसाय मार्गदर्शन परिषदा’, ‘स्वयंसिद्धा’, ‘शोध एकलव्याचा’, ‘लेखक आपल्या भेटीला’, ‘माणिकमोती मंच’, ‘रद्दीतून ग्रंथालय’ अशा कितीतरी आणि नियमित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही शाळा खरीखुरी ‘आनंददायी शाळा’ बनली आहे.
रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com