ही गोष्ट १९३८ची आहे. स्वातंत्र्यसंग्राम ऐन भरात असलेला हा काळ होता. अटलबिहारी वाजपेयी हा कवीमनाचा स्वप्नाळू तरुण त्यावेळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरातील राम मंदिराच्या मागे लक्ष्मीगंज भागात राहायचा. मूळचे नागपूरकर असलेले नारायणराव तरटे ग्वाल्हेरमध्ये त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांनी अटल नावाच्या या तरुणाच्या डोळ्यात दिसणारी राष्ट्रभक्तीची ऊर्जा अचूक हेरली व त्याला संघाच्या शाखेत आणले. याच काळात लक्ष्मीगंज भागात संघाची पहिली शाखा सुरू झाली. १९३९ मध्ये अटलजी पहिल्यांदा शाखेत गेले आणि आयुष्यभरासाठी संघाचे झाले.
नारायणरावांबद्दल अटलजींना प्रचंड आदर होता. १९४० मध्ये नागपूरला रेशीमबागमध्ये संघ शिक्षा वर्ग होता. या वर्गाच्या समारोपाला अटलजी आले होते. संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांची प्रकृती त्यावेळी ठीक नव्हती, तरीही त्यांनी समारोपाला भाषण केले आणि त्यावेळेचे भाषण ऐकून अटलजी भारावून गेले. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी १९४१ मध्ये अटलजी संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गात नागपुरात सहभागी झाले. ते वर्ष अटलजींचे हायस्कूलमधील शेवटचे वर्ष होते. संघ शिक्षा वर्गासाठी पुन्हा नागपूरला आले होते. ते संपवून ग्वाल्हेरला गेले आणि त्यांनी पुढील शिक्षण घेतले. त्याच काळात अटलजींवर संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी संघाचे काम सुरू केले.
१९४४ मध्ये संघाच्या तृतीय संघ वर्गाच्या प्रशिक्षण वर्गाला आले. वर्गात त्यांनी देशभक्तीवर आधारिक कविता सादर केल्या. त्यावेळी देशभरातून जमलेल्या स्वयंसेवकांमध्ये त्यांची ओळख ‘तन मन हिंदू जीवन हिंदू रंग रंग मेरा परिचय..’ ही कविता रचणारा कवी अशीच होती. त्यावेळी अनेकदा ही कविता अटलजी गात होते. तृतीय संघ शिक्षा प्रशिक्षण पूर्ण करून ते ग्वाल्हेरला निघाले. गोळवलकर गुरुजी यांनी सरसंघचालक म्हणून नेतृत्व स्वीकारून चार वर्षे झाली होती. स्वातंत्र्याची लढाई ऐन भरात असताना उद्या स्वतंत्र होणारे नवजात राष्ट्र खंबीरपणे उभे करावयाचे असेल तर बलशाली संघटन हवे अशी गोळवलकर गुरुजींची भूमिका होती. ती अटलजींना मनापासून पटत होती. आयुष्याचा अर्थ आपल्याला संघ आणि संघविचार यांच्या चौकटीत शोधायला हवा हे अटलजींना याच भूमीत तिसऱ्या प्रशिक्षण वर्गाच्या काळात पुरते उमगले होते.मनाशी एक देशसेवेचे ध्येय ठरवून तृतीय संघ शिक्षा वर्ग पूर्ण करून ते ग्वाल्हेरला परतले आणि त्यानंतर त्यांनी ग्वाल्हेर संघाचे काम करत असताना जनसंघाचेही काम सुरू केले. आपल्या कर्तृत्वाने अटलीजी या पक्षाचे प्रमुख नेते झाले आणि पुढे देशाचे पंतप्रधानही झाले.
राम भाकरे