महाराष्ट्रातील वक्तृत्व कलेला राज्यस्तरीय व्यासपीठावरून उजाळा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धेला आता चांगलाच रंग भरू लागला आहे.. त्या निमित्ताने युवा पिढीसमोर ‘वक्ता दशसहस्र्ोषु’ म्हणून नावाजल्या गेलेल्या काही मातब्बर वक्त्यांची भाषणे येथे सादर करीत आहोत. या मालेतील पहिले भाषण आचार्य प्र. के. अत्रे यांचे.. पुण्यात राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केलेले..
राम गणेश गडकरी यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन करण्यास मला बोलाविले, हा मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान समजतो. (टाळ्या). आजपर्यंत मी काही कमी मानसन्मान नाही मिळविले. चित्रपटाचे राष्ट्रपतीपदक मिळविण्याचा मानही मला मिळाला आहे; परंतु त्या सर्व सन्मानांपेक्षा आज माझ्या थोर गुरूंचा पुतळा माझ्या हातून उघडला जात आहे, हा सन्मान अनन्यसाधारण आहे. (टाळ्या).
मोक्ष प्राप्त करून देणारी आणि अमृताचा वर्षांव करणारी ज्ञानेश्वरी मराठी भाषेतच लिहिली गेली. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा’ असे खडे बोल तुकोबांनी मराठीतच सांगितले. तुकाराम हे महाराष्ट्रीय युगप्रवर्तक लोकगीतकार होते. मराठी भाषेला त्यांनी प्रसाद दिला. ‘धटाशी आणावा धट, उद्धटासी उद्धट’ ही मराठी शिकवण समर्थ रामदास स्वामींनी दिली. ‘‘एक पाय सदैव तुरुंगात ठेवून लोकशिक्षणासाठी आम्ही हातात लेखणी धरली,’’ असे सांगणाऱ्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी मराठी भाषेला सामथ्र्यवान केले, तर गडकऱ्यांनी तिला सौंदर्यवान केले.
एखादा वीर योद्धा जसा लढता लढता रणांगणी पडतो, तसे गडकरी वीराच्या मरणाने मेले. ‘भावबंधन’चा शेवटचा प्रयोग लिहून त्यांनी लेखणी खाली ठेवली आणि अवघ्या तीस मिनिटांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ‘एकच प्याला’ हे त्यांचे लोकप्रिय नाटक तर मरणोत्तर प्रसिद्ध झाले. आजच्या मराठी भाषेवर गडकरी यांच्या भाषेचा पुष्कळच परिणाम झालेला आहे.
प्रत्येक कवितेत किंवा प्रत्येक लेखनात एक शब्द, एक कल्पना, एक भावना अगदी नवीन असलीच पाहिजे, अशी त्यांची प्रतिज्ञा असे व त्याप्रमाणे ते लिहीत असत. कवितेखाली त्यांचे नाव नसले तरी त्या कवितेच्या ढंगावरून ती गडकऱ्यांची असली पाहिजे असे ओळखू येत असे. गडकरी ज्या काळात नाटके लिहू लागले, त्या काळात कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे फार महान नाटककार म्हणून गाजले होते. अशा काळात नाटके लिहून यशस्वी करणे कठीण होते, कारण खाडिलकरांनी त्या वेळी लोकमान्यांचे राजकारण रंगभूमीवर आणले. त्या काळात पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात जहाल आणि मवाळ असे दोनच पक्ष होते. त्या जहाल पक्षाचे रूपक ‘कीचकवध’ या नाटकात खाडिलकरांनी दाखविले आहे. त्यातील भीम हा खरा नायक आणि लोकमान्यांचे धोरण त्याच्या तोंडून मांडले जाई. पुढे कालांतराने गांधी युग सुरू झाले. तेव्हा याच नाटकातील ‘धर्मा’च्या भूमिकेला भाव आला. (हशा). अशा परिस्थितीत खाडिलकरांपुढे अन्य कोणा नाटककाराचा निभाव लागला नसता..
नाटकाचे यश हे भाषेवर अवलंबून नाही, तर त्या नाटकातील संघर्षांवर ते यश अवलंबून असते. नुसती भाषा चांगली, पण नाटकात कोठेही खटका नसेल, संघर्ष नसेल, तर ते नाटक कोणीही पाहण्यास येणार नाही. प्रेक्षकांच्या हृदयाची पकड कशी घ्यावी, हे गडकरी चांगलेच ओळखत आणि म्हणूनच त्यांची नाटके लोकप्रिय ठरली. कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोद क्षेत्रातील गडकऱ्यांचे गुरू होत. गडकऱ्यांनी विनोद लोकप्रिय केला. कोल्हटकरांच्या विनोदाचे सौंदर्य गडकऱ्यांनी अधिक खुलवून सांगितले. गडकऱ्यांचा विनोद सामाजिक होता. समाजसुधारणेसाठी त्यांनी विनोदाचा उपयोग केला. गडकरी हे जातीयवादी नव्हते, तर प्रत्येक जातीचे स्वतंत्र वैशिष्टय़ त्यांना मान्य असून त्या प्रत्येक वैशिष्टय़ाचा देशाला व समाजाला उपयोग होत असतो हे त्यांनी आपल्या लेखनात व्यापक दृष्टीने व्यक्त केले आहे.
साहित्य ही एक शक्ती आहे. त्याबाबत वाद करण्याची आवश्यकता नाही. राज्यकर्ते नि साहित्यिक यांचे कार्य समान आणि परस्परावलंबी आहे. साहित्य क्रांती करू शकते. जगात समाजपरिवर्तनाचे अनेक प्रयोग सुरू आहेत. काही राज्यकर्ते हे कार्य कायद्याच्या जोरावर करू पाहतात; पण कायद्याने माणूस सुधारत नाही. त्यासाठी त्याचे हृदय पकडावे लागते. समाजाची नीती ही कायद्याने सुधारता येत नाही.
महाराष्ट्राची परंपरा ज्ञानेश्वरांची आहे. समाजवादी महाराष्ट्र संपन्न करायचा म्हटल्यास अन्य गोष्टींबरोबरच सुवाङ्मयाची, चांगल्या साहित्याची आवश्यकता आहे, गडकऱ्यांसारखे साहित्यिक ते काम करू शकतील. जगात शांतता नांदावी हे सर्वाना पटते. ती शांतता टिकविण्यासाठी तुष्टता हवी. म्हणजे समाज संतोषी राहिला पाहिजे आणि समाजात संतोष राहण्यासाठी लोक उपाशी राहता कामा नयेत. म्हणूनच सुखी समाज निर्माण करणाऱ्या आपल्या भारतीयांनी ‘शांतिरस्तु, तुष्टिरस्तु! पुष्टिरस्तु!’ हा मंत्र दिला आहे. (टाळ्या)..
(परचुरे प्रकाशन मंदिराने प्रकाशित आणि स.गं. मालशे संपादित
‘हशा आणि टाळ्या’ या पुस्तकावरून साभार/सौजन्याने)
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.
संकलन – शेखर जोशी