भारतीय, महाराष्ट्रीय पुराणवस्तू देशाबाहेर विकल्या जाताहेत, त्याकडे कुणाचे लक्ष नाही, अशा काळात डॉक्टर शांतिलाल पुरवार यांनी या वस्तू जमवणे, सांभाळणे सुरू केले; परंतु हा त्यांचा ‘छंद’ ठरला नाही. पुराणवस्तूंसोबत त्या काळच्या संस्कृतींचा अभ्यास वाढत गेला, त्यातून वस्तूंवरल्या प्रेमाची झळाळी वाढत गेली.. अशा वस्तूंचे संग्रहालय उभारायचे, एवढय़ा एका ध्यासापायी त्यांनी चालता दवाखाना विकला आणि मदत मिळेना म्हणून घराचेच संग्रहालय केले.. ते घर आता पोरके झाले आहे..  
सकाळी सकाळी दूरध्वनी खणखणला आणि एक वाईट बातमी देऊन गेला, ‘‘डॉ. पुरवार गेले.’’ या एका वाक्यानंतर सांगणाऱ्याच्या पुढच्या अन्य माहितीपेक्षाही त्या वेळी माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या संग्रहालयातील त्यांनी अत्यंत प्रेमाने, आस्थेने जमवलेल्या हजारो वस्तूंचे ते अबोल चेहरेच उभे राहिले. काहीसे रडवेले, पोरके झालेले!
साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट! संग्रहालयांचा अभ्यास करीत असताना डॉ. शांतिलाल पुरवार हे नाव माझ्या आयुष्यात आले. त्यांच्या कार्याबद्दल अनेकांकडून खूप काही ऐकले. मग एकदा असाच तडक ‘मातोश्री कौसल्या पुरवार संग्रहालय, सराफा रोड, औरंगाबाद’ हा पत्ता शोधत त्या सराफी दुकानांच्या भाऊगर्दीत एका जुन्या इमारतीपुढे उभा राहिलो. त्या इमारतीवर लटकलेली संग्रहालयाची ती छोटीशी पाटीही अंग चोरून उभी होती, पण आधारासाठी तिचाच हात पकडून आत शिरलो आणि जणू भोवतीच्या दागिन्यांच्या बाजारात मला संस्कृतीच्या खऱ्याखुऱ्या अलंकारांची एक पेढीच मिळाली.
एका निस्सीम, इतिहास-कलाप्रेमी माणसाची ही दुनिया होती. पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या या अवलियाने भारतीय इतिहास-संस्कृतीच्या वेडापायी कधी काळी आपली वैद्यकी क्षेत्रातली ओळख दूर सारून घरादारावर तुळशीपत्र ठेवत एक नवे जग निर्माण केले. संग्रहालय थाटले. ते गेल्याचे समजले आणि त्यांच्या या अचाट कर्तृत्वाची गाथाच पुन:पुन्हा डोळय़ांपुढे येऊ लागली. डॉ. पुरवार मुळातले एक संवेदनशील कलाकार! चित्र आणि शिल्प या दोन कलांची अंगे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच वारसा हक्काने मिळाली. यामुळेच वैद्यकीय व्यवसायातील वेगवेगळ्या पायऱ्या ओलांडत असताना त्यांची ही कलेच्या प्रांतातील मुशाफिरीही सुरू झाली. याच वेळी त्यांचे लक्ष वळले ते भारतीय संस्कृती, इतिहासकलेतील विखुरलेल्या अनमोल रत्नांकडे!
मराठवाडय़ाला सातवाहन, यादवांच्या प्राचीन राजवटींपासून ते मध्ययुगीन मुस्लीम सत्ताधीशांपर्यंत मोठा गौरवशाली इतिहास आहे. शेकडो वर्षांच्या या इतिहासाने या भूमीत संस्कृतीचे अनेक पदर विणले आहेत, पण पुढे स्वातंत्र्यानंतर हे सारेच जग उपेक्षित बनले होते. या उपेक्षेनेच डॉ. पुरवारांना अस्वस्थ केले होते.
अनेक ऐतिहासिक कलाकृती दुर्दशेचे जीवन जगत होत्या. काही नष्ट होत होत्या, तर काहींची चक्क छुपी विक्री सुरू होती. कानी येणाऱ्या या प्रत्येक अत्याचाराचे घाव त्यांच्या संवेदनशील मनावर होत होते. आपल्या या गौरवशाली कला-संस्कृतीचे वेळीच जतन व्हावे, त्यांना आश्रय-सुरक्षा आणि प्रेम मिळावे या विचारांनीच डॉ. पुरवारांना झपाटले. यासाठी सुरुवातीला त्यांनी शासनाशी पत्रव्यवहार केला, पण त्यांनी अपुऱ्या यंत्रणेचे कारण देत हात वर केले. मग अन्य संस्था-व्यक्तींना त्यांनी हाक दिली, पण त्यांनीही त्यांच्या मर्यादा उघड केल्या. शेवटी न राहवून पुरवारांनी स्वत:च या उपेक्षित वस्तूंचे पालकत्व घेण्यास सुरुवात केली आणि यातूनच औरंगाबादेत एक नवा इतिहास जन्माला आला.
चाळीस वर्षे या एकटय़ा माणसाने तन-मन-धनाने आपले सारे आयुष्य पणाला लावत, गावोगाव भटकत तब्बल वीस हजार ऐतिहासिक कलाकृतींचा संग्रह केला. कधी त्याचे महत्त्व सांगत, कधी प्रेमाने तर कधी स्वत:चा खिसा रिकामा करीत! अगदी अश्मयुगातील दगडी हत्यारांपासून ते अगदी काल-परवाच्या ब्रिटिश कागदपत्रे-नकाशांपर्यंत.. जे जे काही नष्ट होतेय, बाहेर विकले जातेय अशा प्रत्येक कलाकृतीला या माणसाने स्वत:च्या घराचा आसरा दिला. घराचाच एक मोठा भाग रिकामा करीत त्यांनी इथे संग्रहालय थाटले. ही सारी दालने असंख्य ऐतिहासिक वस्तूंनी भरलेली आहेत. काय नाही यात, पुरातत्त्व ते इतिहासापर्यंत आणि कला-साहित्यापासून ते शस्त्र-व्यापारांपर्यंत अशा अनेक विषयांना कवेत घेणाऱ्या वस्तू इथे आहेत. अश्मयुगीन हत्यारे, प्राचीन शिल्पं, खेळणी, शस्त्रे, नाणी, मुद्रा, हस्तलिखिते, चित्रे, वस्त्रालंकार, भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू असा हा हजारो कलाकृतींचा जणू खजिनाच आहे. जणू मानवाच्या आदिम सत्यापासून ते भारताच्या गौरवशाली इतिहास-कलेचे हे सांगाती!
डॉ. पुरवारांबरोबर या वस्तू पाहू लागलो, की या साऱ्याच वस्तू गळ्यात जीव आणून त्यांच्याबद्दल बोलू लागायच्या. हे लाखो वर्षांपूर्वीचे जीवाश्म, कुठल्या नदीपात्रात कसे सापडले. हे सातवाहन मातीचे दागिने दिवस-दिवसभर ऊन खात वाळूउपशावर लक्ष ठेवत कसे गोळा केले, भंगार-मोडीची दुकाने पालथी घालत मूर्ती-शिल्पांपासून दैनंदिन वस्तूंपर्यंत काय काय मिळवले, अशा अनेक सुरस कथा बाहेर यायच्या.
डॉ. पुरवारांनी केवळ वस्तू गोळा केल्या नाहीत तर त्या त्या वस्तूंच्या इतिहास संस्कृतीचाही शोध घेतला. सातवाहनांच्या कुठल्या राजाच्या नाण्यावर हत्तीची प्रतिमा आहे, पैठणीमध्ये सोन्याची जर कशी विणली जायची आणि दांडपट्टय़ासारखे हत्यार कसे चालवायचे, या साऱ्याच गोष्टींची माहिती ते आत्मीयतेने द्यायचे.
हजारो वस्तू आणि त्याभोवतीची ही संस्कृतींची भिन्न वर्तुळे या एका माणसाने कशी, कधी आत्मसात केली याचाच पाहणाऱ्यांना प्रश्न पडायचा.
संस्कृतीचा हा ठेवा जमा करण्यासाठी, जतन करण्यासाठी या व्यक्तीने अपार कष्ट उपसले. यातना भोगल्या आणि काही प्रसंगी कायद्याचा बडगाही सोसला, पण हे सारे हलाहल या तपस्वीने फक्त इतिहासावरील प्रेमापोटी सहज मनाने पचवले. वस्तू जमा करणे, बहुतेकदा त्या विकत घेणे, त्यांचे यथायोग्य जतन करणे यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याची सारी संपत्ती पणास लावली. स्वत:चा चालू दवाखाना विकला, राहते घर संग्रहालयासाठी रिकामे केले आणि बायका-मुलांसह कपडय़ाच्या आणि चपलांच्या एका जोडावर आयुष्य काढले.
पण आजही या संग्रहालयाला ना पुरेशी जागा आहे ना शास्त्रोक्त रचना! जिथे डॉ. पुरवार आणि त्यांचा मुलगा श्रीप्रकाश हेच सर्व जबाबदारी सांभाळायचे, तिथे अन्य कर्मचारी असण्याचा प्रश्नच नव्हता. वेळ, कष्ट आणि पैसा सर्व तऱ्हेने खर्ची पडलेले डॉ. पुरवार आजही नव्वदीत कुणी पर्यटक आला, की त्याला हा सारा संग्रह कौतुकाने दाखवायचे. अभ्यासकांपासून ते पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण संदर्भ माहितीसाठी त्यांचा उंबरा झिजवत होते.
दृष्टिआड नष्ट होणारा, वाईट हेतूने पळवला जाणारा हा सारा ठेवा एका अवलियाने त्याचे सारे आयुष्य पणाला लावून जतन केला. पुढच्या पिढीसाठी पोटच्या पोराप्रमाणे सांभाळला. हा सारा ठेवा समाजाचाच आहे तेव्हा तो एका चांगल्या-सुसज्ज संग्रहालयाद्वारे प्रदर्शित व्हावा अशी त्यांची खूप इच्छा होती. यासाठी अखेपर्यंत त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची खूप धडपड सुरू होती, पण केवळ अभिप्रायाची पुस्तके भरणाऱ्या राजकीय नेत्यांना हे काम महत्त्वाचे वाटले नाही आणि कुणा उद्योजकाला मदतीचा हात द्यावासा वाटला नाही. अनेक अहवाल, शिफारशी, धडपड, प्रयत्नानंतरही हा अमूल्य ठेवा या खोल्यांमध्येच अडकला. अखेरच्या काळात त्यांची प्रकृती खालावल्यावर त्यांच्याशी शेवटचे बोलणे झाले. त्या वेळी ते डोळ्यांत पाणी आणून म्हणाले होते, ‘‘ही राष्ट्रीय संपत्ती आहे, तिचे संग्रहालय व्हायला हवे. ते झाले तर मी स्वर्गातूनही खाली येईल!’’
डॉ. पुरवारांसारखी माणसे कुठल्याशा ध्यासावर ही असली कार्ये उभी करतात आणि त्यावर आमचा इतिहास, संस्कृती जिवंत राहते. पण मग जेव्हा अशा कार्यास मदत करण्याची वेळ येते तेव्हा सरकार कमी पडते आणि समाजही उणा पडतो. अशा वेळी मग डॉ. पुरवारांनी एखाद्या रक्षकाच्या भूमिकेतून आजवर वाचवलेली ही संस्कृती अद्याप पोरकीच वाटते!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा