भक्ती बिसुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अडीच दशकांपूर्वी बिहारमधून कामाच्या शोधात पुण्यात आलेल्या एम. ए. हुसेन यांनी रुग्णसेवा, त्यांचं पुनर्वसन करता-करता ‘रिअल लाइफ, रिअल पीपल्स’ ही संस्था उभी केली. या संस्थेद्वारे त्यांनी शेकडो रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घातली. आता त्यातल्या निराधारांना कायमस्वरूपी निवारा मिळवून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
आपल्या आजारपणात जवळचं कुणी आपली काळजी घ्यायला असावं असं प्रत्येक रुग्णाला वाटतं. गरीब श्रीमंत, कुणीच याला अपवाद नाही; पण आजारपणाबरोबर येणारं आर्थिक संकट दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत असलेल्या कुटुंबाला कोलमडून टाकतं. अशा वेळी कुणी प्रेमानं बोललेले चार शब्द किंवा भरवलेले दोन घासही त्यांना बळ देतात. आजकाल मोठमोठय़ा रुग्णालयांमध्ये यासाठी पगारी वैद्यकीय समाजसेवक – अर्थात मेडिकल सोशल वर्कर असतात; पण असं काही करिअर असतं हे माहितीही नसलेली एक सर्वसामान्य व्यक्ती तिच्याही नकळत गरीब, गरजू, बेवारस रुग्णांना आधाराचा हात देऊ लागली आणि आज ती पूर्णवेळ सेवाभावी वैद्यकीय समाजसेवक म्हणून काम करते आहे. या व्यक्तीचं नाव – एम. ए. हुसेन. हुसेन हे आता पिंपरी- चिंचवडमधल्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल हॉस्पिटल अर्थात ‘वायसीएम’मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या रुग्णांसाठी काम करत आहेत.
हुसेन हे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून १९९७ मध्ये पुण्यात आले. घरची गरिबी. आई-वडील आणि भावंडांना चांगलं आयुष्य द्यायचं म्हणून पुण्यात आल्यावर त्यांनी काम शोधायला सुरुवात केली. बॉलपेन मार्केटिंगच्या व्यवसायात त्यांना यश आलं आणि बघता बघता जादूची कांडी फिरल्यासारखे दिवस बदलले. सोमवार ते शनिवार शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये बॉलपेन विक्री करता करता पुरेसा नफा व्हायला लागला. काहीही न करता निवांत आयुष्य जगावं अशी परिस्थिती होती, पण बहुधा नियतीला हुसेन यांच्याकडून बरंच काम करून घ्यायचं असावं. कारण रविवारी घरी बसून काय करायचं म्हणून त्यांनी बॉलपेन विक्रीसाठी रुग्णालयांमध्येही जायला सुरुवात केली. रुग्णालयांत उपचारांसाठी आलेले गरीब गरजू रुग्ण, त्यांचे अर्धपोटी राहणारे नातेवाईक पाहता हुसेन यांना त्यांनी गरिबीत काढलेले दिवस आठवले नसते तरच नवल.. ‘आप खाना खा लिजिए,’ असं म्हणत त्यांनी आपल्या खिशातले दहा-वीस रुपये गरीब आणि गरजूंना द्यायला सुरुवात केली. हळूहळू ‘जेवायला-खायला घालणारे हुसेन साब’ म्हणून सगळेच त्यांना ओळखायला लागले. शेवटी २०१० मध्ये त्यांनी ‘रिअल लाइफ, रिअल पीपल्स’ ही स्वयंसेवी संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदवली. त्यानंतर वर्षभर वायसीएम रुग्णालयात जाणं आणि गरीब गरजू रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना जेवणासाठी कूपन देणं असं काम हुसेन यांनी सुरू केलं; पण रुग्णांची शुश्रूषाही करा, असं रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यामुळे हुसेन आणि त्यांचे पाच सहकारी तेही करू लागले. हुसेन यांचे काम पाहून पिंपरी-चिंचवड महापालिकेनं रुग्णालयात त्यांच्या संस्थेच्या कामासाठी छोटी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे ‘रिअल लाइफ, रिअल पीपल्स’ संस्थेला आणि हुसेनसाहेबांना एक कार्यालय मिळालं. रुग्णसेवेत सक्रिय झाल्यानंतर बेवारस रुग्ण, त्यांची शुश्रूषा, त्यांचं पुनर्वसन असे या सेवेचे अनेक पैलू हुसेन यांच्यासमोर उलगडत गेले आणि त्यातूनच त्यांच्या कामाचं स्वरूपही विस्तारलं.
हुसेन सांगतात, ‘‘खिशातले पैसे खर्च करून रुग्णांना जेवायला घालणं हे काम खूपच सोपं आहे; पण गरीब आणि गरजू रुग्ण, बेवारस रुग्ण, त्यांचे उपचार, उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करण्याचे काम अवघड होतं. बायकोला कर्करोग झालाय, हे कळल्यानंतर नवरा घर सोडून जातो, तर नवरा दुर्धर आजाराशी झुंज देत दोन-अडीच महिने रुग्णालयात राहून बरा झाला म्हणून घरी आला तर बायको त्याला घरात घेण्यास नकार देते.. असे एक ना अनेक अनुभव आहेत. त्यातून बेवारस रुग्णांची समस्या समोर आली. अनेकदा असे रुग्ण निर्वतल्यानंतर त्यांचे मृतदेह स्वीकारण्यासही नातेवाईक नकार देतात. स्किझोफ्रेनियासारख्या आजाराच्या रुग्णांचे नातेवाईकही त्यांना कुटुंबात घेण्यास नकार देतात हे पाहिलं. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची गरज जाणवली. आज पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेल्या जागेत आम्ही निवारा केंद्र चालवतो. या केंद्राचा महिन्याचा खर्च साधारण तीन ते चार लाख रुपये आहे. बेवारस रुग्णांवर अंत्यसंस्कार हाही आमच्या रोजच्या कामाचा भाग आहे. रोज किमान दोन बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करतो. करोनाकाळात ही संख्या दररोज चार ते पाच मृतदेह एवढी होती. शक्यतो मृताच्या धार्मिक पद्धतीप्रमाणेच हे अंत्यसंस्कार केले जातात, मात्र मृत व्यक्तीचे नाव, धर्म या गोष्टी माहिती नसल्यास हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात’’, असं हुसेन आवर्जुन नमूद करतात.
करोनाकाळात डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून हुसेन यांनी काम केलंय. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरी नेऊन सोडणं, त्यांना करोना संसर्ग झालेला नाही हे त्यांच्या कुटुंबीयांना पटवून देणं, बाहेरगावच्या नागरिकांना हेल्थ सर्टिफिकेट देणं अशी कामं करण्याबरोबरच करोना वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांना धीर देणं, त्यांची शुश्रूषा करणं हेही हुसेन यांनी केलं; पण या प्रवासात त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक तडजोडी कराव्या लागल्या. हुसेन सांगतात, काम सुरू केलं तेव्हा मी दिवसाला पाच ते सहा हजार रुपये मिळवत असे. त्यातले काही पैसे समाजासाठी खर्च झाले तरी अडचण नव्हती. या कामात स्थिरावलो तसं व्यवसायाकडे दुर्लक्ष झालं. बचत, बायकोचे दागिने, काही मालमत्ता विकून पैसे उभे करत गेलो आणि काम सुरू ठेवलं, कारण मी स्वीकारलेल्या सेवेच्या मार्गावरून परत फिरणं मला शक्य नव्हतं. दरम्यान कुटुंबातले अनेक जण दुरावले. आज माझा भाऊ आमचं कुटुंब चालवतो. एके काळी अनुभवलेलं सुखासीन आयुष्य आता दुर्मीळ झालंय, पण बायको आणि मुलांनी कधी तक्रार केली नाही. उलट त्यांच्या परीने त्यांनी मला सहकार्यच केलंय. त्यामुळे मीही माझ्या ध्येयापासून दूर न जाता काम करत राहू शकलो, हे हुसेन आवर्जून नमूद करतात.
हुसेन यांच्या कामाचं स्वरूप पाहाता चांगल्या-वाईट अनुभवांची पोतडीच त्यांच्याकडे आहे. आळंदीच्या आसपासच्या लहान गावातला एक तिशीतला तरुण एकदा कामासाठी घराबाहेर पडला आणि त्याला पक्षाघाताचा झटका आला. कुणी तरी त्याला वायसीएमला आणून दाखल केलं; पण त्याचा ठावठिकाणा काहीच माहिती नव्हता. दोन-अडीच महिने रुग्णालयात राहिल्यावर तो संपूर्ण बरा झाला. या काळात हुसेन त्याची काळजी घेत होते. शेवटी घरी सोडायची वेळ आली तेव्हा पक्षाघातामुळे बोलता येत नसलेल्या या रुग्णाला आपला पत्ताही सांगता येत नव्हता. अखेर दोन-अडीच महिन्यांपासून दुरावलेला आपला मुलगा-पती-बाप परत आल्याचा आनंद त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर होता. पुढे तो धडधाकट होऊन काम करेपर्यंत हुसेन यांनी या तरुणावर सगळे उपचार केले. आतापर्यंत काहीशे सदस्यांना त्यांच्या दुरावलेल्या कुटुंबात सोडायचं पुण्य आपल्या गाठीशी असल्याचं हुसेन सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद वेगळाच असतो.
हुसेन यांचं काम पाहिलं की ‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ या गाण्याच्या ओळी आठवतात. बिहारसारख्या दूरवरच्या राज्यातल्या खेडेगावातून पोटासाठी पुण्यात आलेल्या एम. ए. हुसेन नामक ‘परप्रांतीयानं’ पिंपरी-चिंचवडमध्ये आपल्या कामाच्या बळावर इथल्या अनेकांची कुटुंबं एकत्र आणली. ज्यांना कुटुंब नाही त्यांना नवं कुटुंब मिळवून दिलं. आता हुसेन यांच्या विस्तारलेल्या कुटुंबाला गरज आहे ती हक्काच्या निवाऱ्याची.. सढळ मदत करणाऱ्या हातांची!