कॉ. गोविंद पानसरे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार गावचे. गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पण शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नसलेल्या या तरुणाला मूळच्या कोल्हापूरच्या पण स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारी गटात काम करणारया गोविंद दामोदर पत्की या स्वातंत्र्यसैनिकाने हात दिला आणि शिक्षणासाठी वयाच्या १५ व्या वर्षी पत्कींचे बोट धरून पानसरे कोल्हापुरात आले. तेव्हापासून पानसरे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक चळवळींचा प्रमुख आधारस्तंभ बनले.
कोल्हापूरला दोन फाटक्या कपडय़ानिशी शिक्षणासाठी दाखल झालेल्या गोविंदरावांना राहण्यासाठी ना निवारा होता ना भुकेची व्यवस्था! कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणारया ‘बुक स्टॉल द रिपब्लिक’ या दुकानात तर कधी बिंदू चौकात फुले, आंबेडकरांच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्र काढली आणि कधी सणगर गल्लीतील बी. एन. भोसले या शिक्षकाच्या घरी त्यांना स्वयंपाकाला मदत करून तर कधी सांगलीहून येणाऱ्या एम. के. जाधव या एस. टी. कामगाराच्या डब्यामध्ये त्यांनी आपला जठराग्नी शमविला. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे प्रवेश मिळाल्यानंतर पानसरे पदवीधरही झाले आणि कायद्याचे शिक्षण घेवून नामवंत वकील ही बिरुदावली त्यांच्या नावामागे लागली. अर्थात या प्रवासात नगरपालिकेच्या जकात नाक्यावर शिपाई म्हणून त्यांनी नोकरीही केली, वृत्तपत्रे विकली आणि प्रसंगी रस्त्यांवर कंगवेही विकले. या सर्व प्रकारात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. पानसरे १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद बनले. कोल्हापुरात आल्यापासून तर कम्युनिस्ट विचार रूजविण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. त्यांनी आपल्या प्रखर बुध्दिमत्तेने, उत्तुंग ध्येयवादाने, प्रामाणिक तत्वज्ञानाने आणि कडव्या संघर्षांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात आपले अढळस्थान निर्माण केले. कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाचे आकारमान जरी छोटे असले तरी त्यातही सामाजिक भान असणाऱ्या निष्ठावंत लढाऊ कार्यकर्त्यांची एक फळी गेल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये या ना त्या लढय़ाच्या निमित्ताने लढताना दिसते, याचे संपूर्ण श्रेय पानसरे यांना द्यावे लागेल. अशा कार्यकर्त्यांना घडवण्यासाठी ते भाषणाचे वर्ग घेत होते, मार्क्सवादाचे मोफत क्लास चालवित होते, जागतिक घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडी यांची तरूण कार्यकर्त्यांना ओळख करून देण्यासाठी त्यांनी हजारो व्याख्याने दिली.
पक्ष हाच जणू त्यांचा संसार होता आणि कार्यकत्रे ही त्यांची मुले म्हणूनच ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’ मध्ये वावरत होती. आपल्या कार्यकर्त्यांची सुखदुखे त्यांच्या अडचणी यामध्ये धावून जाणाऱ्यात पानसरेंचा पहिला नंबर असायचा. यामुळे ‘अण्णा’ या नावाने वावरणारे हे व्यक्तिमत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधी आपल्या कुटुंबापासून दूरचे वाटलेच नाही. कोल्हापुरात तर जिथे अन्याय तिथे पानसरे हे समीकरणच जणू ठरलेले! विशेषत: सामाजिक अन्याय आणि अंधश्रध्दा यांनी जिथे जिथे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे संघर्षांने पेटून उठून या प्रकारांना जमिनीत गाडण्यात ते अग्रेसर राहिले. वर्णव्यवस्थेबाबत शंकराचार्यानी केलेल्या विधानाचा निषेध असो अथवा पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी राज्यपालांनी काढलेल्या फतव्याचा निषेध असो, कोडोलीच्या नग्न पूजेच्या विरोधातील आंदोलन असो वा वाशीचे दारूबंदी आंदोलन असो, अथवा राज्य शासनाच्या फलज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध असो, इतकेच काय हुपरीच्या दलित-सवर्ण दंगलीत जळलेल्या दलितांची घरे पुन्हा सवर्णाकडूनच उभे करून घेणारे पानसरे प्रत्येक ठिकाणी आपली निश्चित भूमिका घेवून उभे राहिले. पानसरेंच्या आयुष्यात शोषित, कष्टकरी, गरीब आणि ‘नाही रे’ वर्गातील लोकांसाठी त्यांनी केलेल्या शेकडो आंदोलनांचा परामर्ष जागेच्या मर्यादेमुळे घेता येत नसला तरी त्यांच्या दोन आंदोलनांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे.
‘मी नथुराम गोडसे’ या नाटकावर कोल्हापुरात आयोजित परिसंवादाला जेव्हा जिल्हा प्रशासनाने संयोजकांवर दबाब आणून बंदी घातली तेव्हा शाहू स्मारकाच्या दारात दोनशे कार्यकर्त्यांसमवेत पानसरे यांनी त्याच ठिकाणी ‘कॉरिडॉर’मध्ये परिसंवाद घेऊन घटनेतील आपल्या स्वातंत्र्याची जाणीव प्रशासनाला करून दिली. केशवराव भोसले नाटय़गृहात पत्नीसमवेत ‘यदा कदाचित’ या नाटकाचा खेळ पाहत असताना हिंदुत्ववाद्यांनी गोंधळ करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा जिवाची पर्वा न करता तडक रंगमंचावर जावून आव्हान देऊन त्यांनी या नाटकातील विघ्न दूर केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत मोलकरणींसाठी संमत झालेल्या कायद्याचे शिल्पकारही कॉ. पानसरे हेच आहेत.
त्यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक, त्यांनी स्थापन केलेली ‘श्रमिक प्रतिष्ठान’ व ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ ही दोन व्यासपीठे त्यांच्या कार्यप्रवासातील मैलाचा दगड ठरली.
त्यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठानमुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले. ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’ मुळे कोल्हापुरात जातीय सलोख्याला कधी गालबोट लागलेले नाही. म्हणूनच १९९२मध्ये बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर संपूर्ण देश जातीय वणव्यात होरपळून निघत असताना ती झळ कोल्हापुरात प्रवेश करू शकली नाही.माणूस आपले दु:ख किती गिळू शकतो आणि गिळतागिळता आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न कसा करतो याचे दर्शन कॉ. पानसरे यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाच्या निधनावेळी कोल्हापूरकरांना घडविले.
कॉ. अविनाश पानसरे या पित्याप्रमाणे लढाऊ बाणा असलेल्या युवा नेत्याचे अकाली निधन झाल्यानंतर कोल्हापुरातील डावी पुरोगामी चळवळच हादरून गेली. हजारोंच्या उपस्थितीत अविनाशची अंत्ययात्रा बिंदू चौकातील ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’जवळ आली, तेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती. कोणाला काय करायचे हेच कळत नव्हते. अशावेळी पुत्र वियोगाने मुळापासून हादरलेले गोविंदराव पानसरे पार्थिव असलेल्या गाडीवर चढले आणि पक्षाचा झेंडा अविनाशच्या पार्थिवावर अंथरून त्यांनी आपली मूठ आवळली. ‘अविनाश पानसरे लाल सलाम’, ‘अविनाश का अधुरा काम कौन करेगा ?, हम करेंगे, हम करेंगे.’ अशी पानसरेंची घोषणा आसंमतात घुमली तेव्हा उपस्थितांच्या हृदयाला पाझर फुटल्यावाचून राहिला नाही. स्वत:च्या डोळ्यातील अश्रू लपवून कार्यकर्त्यांना आधार देणारया पानसरेंचा धीरोदात्तपणाही कोल्हापूरकरांनी तेव्हा अनुभवला आणि तत्वज्ञानाशी असलेल्या त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शनही घेतले.
जीवनपट
*नाव – कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे
*जन्म – २६ नोव्हेंबर १९३३, कोल्हापूर, (ता. श्रीरामपूर), जि. अहमदनगर<br />*शिक्षण – बी.ए. (ऑनर्स), एलएल.बी., प्राथमिक शिक्षण – जन्मगावी कोल्हार येथे. माध्यमिक शिक्षण – राहुरी, जि. अहमदनगर व अहमदनगर येथे. महाविद्यालयीन शिक्षण – राजाराम कॉलेज, कोल्हापूर, शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर, प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये शिक्षण घेतले.
व्यवसाय
– कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेता म्हणून काही वर्षे काम. म्युनिसिपालिटीत शिपाई म्हणून नोकरी, म्युनिसिपल स्कूल बोर्डात काही काळ प्राथमिक शिक्षक, १९६४ पासून वकिली, कोल्हापूर डिस्टिक्टि बार असोसिएशनचे अनेक वर्षे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात सहयोगी व्याख्याता म्हणून १० वर्षे काम.
लिखाण
*शिवाजी कोण होता? (१९८४) (एकूण चोवीस आवृत्त्या) कानडी, उर्दू, गुजराथी,इंग्रजी, हिंदी भाषेत प्रसिद्ध.
*मंडल आयोग आणि राखीव जागांचा प्रश्न (१९८३) (चार आवृत्त्या)
*अजून न स्वीकारलेला मंडल आयोग (१९९७) (दोन आवृत्त्या)
*मंडल आयोग आणि मागासलेले मुस्लीम (१९९८)
*काही कामगार कायद्यांची तोंडओळख (१९९२) (चार आवृत्त्या)
*३७० कलमाची कुळकथा (१९९४)
*मुस्लिमांचे लाड (१९९४)
*पंचायत राज्याचा राजीनामा
*अवमूल्यन : कळ सोसायची कुणी?
*राजर्षी शाहू : वसा आणिवारसा (तीन आवृत्त्या)
*शेतीधोरणपरधार्जिणे (तीन आवृत्त्या)
*कामगारविरोधी कामगार धोरणे (तीन आवृत्त्या)