बांगलादेशात भारताबद्दल कृतज्ञता आणि प्रेमही आहे, हे पदोपदी जाणवतं. गरज आहे ती या लोकपातळीवरील पायाभूत प्रेमभावनेच्या आधाराने परस्पर संबंधांची मजबूत इमारत उभी करण्याची. आसाम- बंगालमधील अवैध घुसखोरी आणि ग्रामीण बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार हे मुद्दे गंभीर आहेतच. पण म्हणून केवळ घुसखोरी प्रश्नाच्या चष्म्यातून बांगलादेशकडे पाहता येणार नाही. दक्षिण आशियात इस्लामची उदारमनस्क, समावेशी आणि लवचीक आवृत्ती येथे अजूनही खूप ताकदीने उभी आहे. ती अधिक मजबूत होण्यासाठी भारताचे पाठबळ अपरिहार्य आहे..

अलीकडेच आणि अगदी अवचितच ढाक्याला जायचा योग आला! गेली सात वर्षे सलगपणे बांगलादेशात सत्तेत असलेल्या अवामी लीग या सत्ताधारी पक्षाच्या विसाव्या त्रवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी जगभरातल्या प्रमुख राजकीय पक्षांना निमंत्रण दिले होते. भाजपच्या वतीने मी आणि राष्ट्रपतीनियुक्त राज्यसभा सदस्या रुपा गांगुली आणि आणखी दोघे जण असे या अधिवेशनात उपस्थित होतो. होतो दोनच दिवस, पण तेवढय़ातही या सख्ख्या शेजाऱ्याची जी नवी ओळख झाली त्यात अनेक उल्लेखनीय गोष्टी होत्या.

आधी जाणीव होतीच, पण ढाक्यात उतरल्यानंतर आपण भारताबाहेर आहोत असं अर्थातच वाटत नाही. सुमारे  १६ कोटी लोकसंख्येच्या या देशाची राजधानी असलेले दीड कोटी लोकसंख्येचे ढाका शहर म्हणजे नुसती किचाट गर्दी. बांगला भाषेतली हिरव्या- लाल रंगातल्या भिंती- भिंतीवरची घोषणाबाजी, माणसांनी ओथंबून वाहणाऱ्या छोटय़ामोठय़ा बसेस, रिक्षा, सायकलरिक्षा, विटकरी- लाल रंगातले फूटओव्हर ब्रिजेस आणि पाहावं तिकडे माणसंच माणसं, असं सारं काही बरंचसं कोलकात्याची आठवण करून देणारं!

भारतीय राजकीय पक्षाचे इतरही प्रतिनिधी होते. गुलाम नबी आझाद, माजिद मेमन, तृणमूलचे पार्थो चतर्जी, आसामचे प्रफुल्लकुमार महंत, मिझोरमचे माजी मुख्यमंत्री झोराम थांगा असे अनेक. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अवामी लीगचे महासचिव सय्यद अश्रफूल इस्लाम यांनी सर्व परदेशी पक्ष-प्रतिनिधींसाठी मेजवानी आणि नृत्य-संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. बांगलादेशचा नृत्य-संगीतमय इतिहास सांगणारे एक नृत्य-नाटय़ही खूप प्रभावी होतं. दुर्गापूजा, सरस्वतीपूजा यांसारख्या सणांचे मुबलक संदर्भ नृत्य-नाटय़ात होतेच, शिवाय उपासना पद्धती कोणतीही असो, बहुसंख्य मुली ठसठशीत बिंदी लावून, इतरही अनेक हिंदू मानल्या गेलेल्या प्रतीकचिन्हांसह मोकळेपणाने पदन्यास करीत होत्या.

दुसऱ्या दिवशी ढाक्याच्या मध्यात असलेल्या विस्तीर्ण सुऱ्हावर्दी- उद्यानात पक्षाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही तीन-चार लोकनृत्ये सादर झाली, त्यातही हीच गोष्ट दिसली. हीच आमची बांगला संस्कृती आहे हेही सांगितले गेले. हातात एकतारी घेऊन कृष्णाची आराधना करणाऱ्या भक्त-नृत्यांगनांचा समावेश असलेलं एक नृत्यही खूप कलात्मकतेने सादर झाले. विशीच्या आत-बाहेरचे तरुण-तरुणी स्टेजवर आणि एरवीही मोकळेपणी वावरत होते. दाढी राखणारे पुरुष आणि बुरखा घालणाऱ्या महिला क्वचितच दिसत होत्या.

अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात परदेशी प्रतिनिधींची शुभेच्छापर संक्षिप्त भाषणे झाली. पक्षाच्या महासचिवांनी एक अहवाल सादर केला आणि शेवटी पक्षाध्यक्षा आणि पंतप्रधान, सत्तरीच्या घरातल्या शेख हसीना यांचं मुख्य भाषण झालं. सर्वाच्याच भाषणाचा शेवट जोय बांगला, जोय बोंगबंधू आणि बांगलादेश चिरायू होवो या तीन घोषणांनी झाला. शिवाय स्वागत-समितीचे निमंत्रक खासदार मोहमद नसीम यांचंही भाषण झालं. त्यांच्या भाषणाच्या इंग्रजी तर्जुम्याच्या प्रती आम्हा सर्वाना वाटण्यात आल्या होत्या. त्या भाषणाच्या आशयावरून अनेक छोटय़ामोठय़ा पण महत्त्वाच्या गोष्टींची कल्पना आली. भाषणाचा बराचसा भाग इतिहास उगाळणारा होता. १९७१ पूर्वी पाकिस्तान्यांनी केलेला विध्वंस, दमननीती, त्यानंतरचा वंगबंधू शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्वाखालचा संघर्ष, १९७५ मधली वंगबंधूंची हत्या, १९९१ मध्ये लष्करशाहीविरोधात झालेला जनउठाव  हे तर होतंच, पण मुख्य विरोधी नेत्या आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी)च्या अध्यक्षा बेगम खलिदा झिया यांच्यावर तीव्र टीकाही होती. खलिदा झिया यांनीच धार्मिक-सामाजिक सौहार्दाची परंपरा असलेल्या बांगलादेशात अतिरेकी गटांना खतपाणी घातले आणि १९७१ च्या युद्धगुन्हेगारांचीही पाठराखण केली, असंही या भाषणात कोणताही आडपडदा न ठेवता सांगितलं गेलं. मुफ्ती हननसारखा हरकत-उल- जिहादचा अतिरेकी कडवा नेता आणि जेएमबी गटाचा शेख अब्दुर रेहमान यांसारख्या ‘विषवृक्षांना’ खलिदा झिया यांनीच खतपाणी घातलं, असा स्पष्ट आरोप या भाषणात होता. उल्लेखनीय म्हणजे बीएनपीशी अवामी लीगचे इतके हाडवैर असूनही या अधिवेशनाला त्यांनाही निमंत्रित केलं गेलं होतं. अर्थात अवामी लीगच्या नेत्यांनी बीएनपीच्या कार्यालयात जाऊन ‘अक्षत’ दिलेली असतानाही पहिल्या दिवशी तरी बीएनपीचे प्रतिनिधी फिरकले नव्हते.

या अधिवेशनात परदेशी प्रतिनिधींचीही भाषणं झाली. उल्लेखनीय म्हणजे प्रफुल्लकुमार महंत यांनीही बांगलादेशातून आसामात होणाऱ्या माणसांच्या निर्यातीच्या उल्लेखासहच, पण समजूतदार भाषण केलं. ममतादीदींचे सहकारी मंत्री पार्थबाबूही बोलले खरे; पण तिस्ता नदीच्या पाणीवाटपाच्या संदर्भात ममता बॅनर्जी बांगलादेशाची मागणी मान्य करीत नसल्याने पाणीवाटप प्रश्नाची निरगाठ अजूनही सुटू शकलेली नाही. कम्युनिस्ट नेते बिमान बासू यांनी शेख हसीना यांचा उल्लेख चक्क ‘श्रद्धेय’ अशा विशेषणांनी करावा याची गंमत वाटली. विस्तीर्ण सभामंडपाच्या समोर अवामी लीगचं निवडणूक चिन्ह असलेल्या शिडाच्या बोटीच्या आकाराचं भव्य, नेत्रदीपक व्यासपीठ उभं केलं होतं आणि तिथूनच सर्व कार्यक्रम झाले. बांगलादेशाच्या माजी परराष्ट्रमंत्री दीपू मोनी परदेशी पाहुण्यांच्या व्यवस्थेच्या प्रमुख होत्या. सर्वाचं हवं-नको पाहण्यात त्या हसतमुखाने व्यग्र होत्या. या अधिवेशनाच्या निमित्ताने लाखांची गर्दी झाली होती आणि परिणामत: वाहतूक विस्कळीत. संपूर्ण शहरभर अवामी लीगच्या फलकांची दाटीवाटीने उभारणी केलेली होती आणि पावलापावलांवर शेख हसीना, डोक्यावर पदर घेऊन सुस्मित वदनाने हात उंचावून अभिवादन करीत असल्याची चित्रे होती. ढाक्यात मुळातच जे दुर्मीळ ते शहरी सौंदर्य या फलकबाजीमुळे नासून गेले होते. आपल्याकडे प्रत्येक फलकाखाली ‘शुभेच्छुक’ म्हणून डझनभर नावे असतात ती मात्र दिसली नाहीत; पण उल्लेखनीय म्हणजे शेख मुजिबूर रहमान, शेख हसीना यांच्याबरोबरीने पंतप्रधानपुत्र ‘जॉय’ याचीही छबी सर्व फलकांवर झळकत होती!

दुसऱ्या दिवशी आम्ही ढाकेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो आणि नंतर ढाका विद्यापीठात. सर्व परदेशी पाहुण्यांच्या सरबराईचं काम ‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ शिकणाऱ्या तरुण, चुणचुणीत मुलांकडे दिलं होतं. अबूबकर ऊर्फ प्रिन्स नावाचा विशीतला विद्यार्थी आमच्याबरोबर होता. ढाकेश्वरी मंदिरानजीक, बक्षीबाजार भागात आल्यावर तो सहजपणे सांगून गेला, ‘‘सर, हे आमचं राष्ट्रीय मंदिर.’’ मी अर्थातच चमकून बघितलं. नंतर दर्शन घ्यायलाही बरोबरची हिंदू- मुसलमान सर्व मंडळी आली. सर्वानी नमस्कार केला, तीर्थप्रसाद घेतला. सत्तर वर्षांपूर्वी फाळणी झाली तेव्हा इथली देवीची मूळ मूर्ती कोलकात्याला हलविण्यात आली हे जरी खरं असलं तरी आजही या मंदिराचा खर्च सरकारतर्फे होतो, असंही सांगण्यात आलं.

नंतर ढाका विद्यापीठात गेलो! तेथे सौम्य प्रकृतीची, मृदुभाषी कुलगुरू डॉ. ए. ए. एम. एस. आरेफिन सिद्दीक यांनी आमचं मनापासून स्वागत केलं. इतिहासतज्ज्ञ आ. सी. मजुमदार इथे कुलगुरू होते आणि जगदीशचंद्र बोस हेही याच विद्यापीठात शिकवीत. १९२२ मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठाचा परिसर खूप विस्तीर्ण आहे. १९११-१२ मध्ये पाकिस्तान सरकारने तिथल्या इतिहासाच्या पुस्तकात बांगलादेशाचा मुक्तिसंग्राम गुंडांनी चालविल्याचा उल्लेख केला होता. त्याची प्रतिक्रिया म्हणून या विद्यापीठाने पाकिस्तानशी अकादमिक पातळीवरही कोणतेही संबंध न ठेवण्याचा निर्धार केला. १९७१ मध्येच पाकिस्तान्यांनी इथल्या काही प्राध्यापकांना ठार केल्याची आठवण म्हणून इथे डिसेंबरमध्ये बुद्धिवंतांच्या हौतात्म्याचा दिवस पाळण्यात येतो. याच बुद्धिवंत हत्याकांडात तत्त्वज्ञानाचे थोर प्राध्यापक गोविंदचंद्र देव यांचीही निर्घृण हत्या झाली होती!

कुलगुरू सिद्दीकसरांनी मुद्दाम वेळ काढून विद्यापीठाचा मोठा परिसर स्वत: फिरून दाखविला. सध्या या विद्यापीठात सुमारे ३३००० विद्यार्थी शिकतात. बारा हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृहात राहतात. जगन्नाथ हॉल हे विस्तीर्ण वसतिगृह हिंदू विद्यार्थ्यांसाठी आहे. या वसतिगृहाच्या इमारतीसमोर मुलांना पोहण्यासाठी सुंदर जलाशय आहे आणि समोर स्वामी विवेकानंद आणि गौतम बुद्धाच्या भव्य मूर्ती! विद्यापीठात हिंदी विभाग आहे. ‘‘आमच्याकडे जवळजवळ सर्व विभागांमधून सरस्वतीपूजा अगदी दणक्यात आणि अधिकृतपणे साजरी केली जाते!’’ हे कुलगुरूंनी आवर्जून सांगितलं.

एकूणच बांगलादेशात मुस्लिमांची बहुसंख्या असली तरी हिंदू-बांगला संस्कृतीची छाप अजूनही कायम आहे. आम्ही तिथे असतानाच ढाक्यात एक नाटय़ महोत्सव सुरू होता. त्याचं नाव होतं गंगा-जमुना उत्सव! इथल्या सैन्यात हिंदूंना अधिकारपदे न देण्याचा अलिखित संकेत असल्याचं मला एका हिंदू बांगलादेशी नागरिकानं सांगितलं, पण ते काहीही असलं तरी पाकिस्तान-पूर्व इतिहासाशी हा देश प्रतिबद्ध आहे. पाकिस्तानप्रमाणे फाळणीपूर्वीचा इतिहास ना तो नाकारतो, ना त्यापासून फटकून राहतो. इथलंही राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी रचलेलं आहे. ‘‘रवींद्रनाथ हे बहुधा एकमेव नोबेल विजेते असतील जे दोन देशांना वाटून घेता येण्याजोगे आहेत. ‘चित्त जिथे भयशून्य, उंच जिथे माथा’ हे सरहद्दीच्या उभय बाजूंना, आपणा सर्वापुढचे आदर्श जगाचे चित्र आहे,’’ असं मी माझ्या भाषणात सांगितलं तेव्हा टाळ्या वाजवून लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला!

आमच्या प्रतिनिधी मंडळाची शेख हसीनाबाईंशी त्यांच्या ‘गणभवन’ या निवासस्थानी भेट झाली, तेव्हा खूप मोकळ्या गप्पा झाल्या. १९७५ मध्ये शेख मुजिबूर यांच्या हत्येनंतर शेख हसीना सहा वर्षे दिल्लीत राहिल्या होत्या. हिंदीही त्या छान बोलतात. त्यांच्या बोलण्यात आपुलकी आणि भारताबद्दलची कृतज्ञता होती. मुक्तिसंग्रामाच्या काळात भारताने अन्नधान्याची रसद दिली म्हणून आम्ही जिवंत आहोत, असं त्या आवर्जून म्हणाल्या. पूर्वी आपल्याला इथल्या लष्करी सेनेने कसा त्रास दिला तेही त्यांनी मोकळेपणी शेअर केलं. ‘‘आईची ममता आणि नेत्याची निर्णयक्षमता, हे दोन्ही त्यांच्यामध्ये आहे,’’ असं माजी परराष्ट्रमंत्री दीपू मोनी म्हणाल्या, ते खरं असावं.

बेबंदशाही, लष्करशाही, कट्टरशाही आणि लोकशाही अशा मोठय़ा प्रवासानंतर बांगलादेश आता स्थिरावला आहे. जाणकार मंडळींनी सांगितलं की, त्यांनी लष्कराला भरपूर पगार देऊन प्रसन्न ठेवलंय आणि दुसरीकडे कट्टरपंथी अतिरेक्यांवर करडी नजर ठेवताना शेकडोंना यमसदनी पाठवलंय. २०४१ पर्यंत देशातील गरिबीचं उच्चाटन करण्याचा त्यांचा निर्धार आहे. देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे. वाढीचा दर ७ टक्के असल्याचं सांगण्यात आलं. इथे फळ प्रक्रिया उत्पादने, तयार कपडे आणि सिमेंट यांचं मोठय़ा प्रमाणात उत्पादन सुरू आहे. तयार कपडय़ांच्या बाबतीत तर हा देश खूपच पुढे आहे. स्वस्त मजूर आणि लवचीक कामगार कायदे ही दोन कारणं त्यामागे आहेत, असंही सांगण्यात आले. ‘‘अनेक परदेशी पाहुणे माझ्याकरिता त्यांच्या देशातून महागडे ब्रँडेड शर्ट्स आणतात, पण बहुसंख्य शर्ट्स पॅकेट उघडल्यावर मेड इन बांगलादेश असल्याचं लक्षात येतं,’’ असं कुलगुरू सिद्दीकसरांनी सांगितले. अबूबकर ‘प्रिन्स’सारखे अनेक विद्यार्थी आकाशवाणी आणि विविधभारती आवर्जून ऐकतात. इथल्या सर्वसामान्य लोकांनाही भारताबद्दल कृतज्ञता आणि प्रेमही आहे, हे पदोपदी जाणवतं. गरज आहे ती या लोकपातळीवरील पायाभूत प्रेमभावनेच्या आधाराने परस्परसंबंधांची मजबूत इमारत उभी करण्याची. आसाम-बंगालमधील अवैध घुसखोरी आणि ग्रामीण बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार हे मुद्दे गंभीर आहेतच; पण म्हणून केवळ घुसखोरी प्रश्नाच्या चष्म्यातून बांगलादेशाकडे पाहता येणार नाही. दक्षिण आशियात इस्लामची उदारमनस्क, समावेशी आणि लवचीक आवृत्ती येथे अजूनही खूप ताकदीने उभी आहे. ती अधिक मजबूत होण्यासाठी भारताचे पाठबळ अपरिहार्य आहे. कट्टरपणा निपटून काढणारे सरकार आणि नाकारणारे इथले लोक हीच दक्षिण आशियाची आणि अखिल विश्वाचीही महत्त्वाची गरज आहे.

विनय सहस्रबुद्धे (लेखक राज्यसभेचे सदस्य आहेत.)

vinays57@gmail.com