|| प्रताप भानू मेहता
फाळणी ही एक वेदनादायी घटना होती. एका मिश्र संस्कृतीतून स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वाची आस असलेले दोन समुदाय त्या फाळणीमुळे विभागले आणि त्यातून भारत व पाकिस्तान हे दोन देश अस्तित्वात आले. सत्तरहून अधिक वर्षे लोटली त्यांच्या अस्तित्वाला, पण आजही फाळणी हा त्या दोन्ही देशांतील मानसिक असुरक्षिततेचा स्रोत आहे. ही फाळणी हा नेहमीच वादचर्चेचा मुद्दा राहिलेली आहे; पण तो वाद केवळ फाळणीच्या इतिहासाविषयीचाच नाही. वाद फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या दोन्ही देशांच्या अपूर्णतेबाबतचा किंवा वैधतेबाबतचाही आहे. अजूनही दोन्ही देश युद्धसम स्थितीत आहेत. भारतातील अनेकांना, त्यातही खास करून हिंदू राष्ट्रवाद्यांना फाळणी हा त्यांचा पराभव वाटतो. आपल्या पवित्र भूमीचे अपवित्रीकरण झाल्यासारखे वाटते आणि त्याचा सूड घेतला गेला पाहिजे असे वाटते. फाळणीकडे अशा दृष्टिकोनातून पाहताना ते नेहमी पाकिस्तानची वैधता नाकारत असतात. दुसऱ्या बाजूला काश्मीर हे फाळणीच्या वेळी अपुरे राहिलेले काम आहे, असे पाकिस्तानला वाटत आहे.
या सगळ्या परिस्थितीत फाळणीमुळे जी समस्या सुटणे अपेक्षित होते ती तशीच राहिली आहे. दक्षिण आशिया हा ज्या प्रकारचा स्वतंत्र भाग असावयास हवा होता तसा तो राहिलेला नाही. उलट तेथील राजकारण ‘आयडेंटिटी’ – अस्मिताविषयक नाराजीने, रोषाने खदखदत राहिले आहे. पाकिस्तानात याच असुरक्षिततेच्या भावनेतून स्वविनाशी लष्करीकरण आणि प्रतिगामी शक्ती यांना वैधानिक मान्यता प्राप्त झाली. भारतातही असाच प्रकार घडला. तेथे बहुसंख्याकांचे आधिपत्य निर्माण करून आणि अल्पसंख्याकांना वेसण घालून फाळणीचा सूड घेता येईल या दृष्टिकोनाला भाजप सत्तेवर आल्यानंतर पाठबळ मिळाले. अशा परिस्थितीत जर भाजपच्या विरोधात राजकीय वातावरण निर्माण झाले नाही, तर बहुसंख्याकवादी शक्तींनी पेटविलेल्या जातीय हिंसाचाराच्या उंबरठय़ावर भारतीय उपखंड जाऊन ठेपेल.
सध्या अलिगढ मुस्लीम विद्यापीठात जिना यांच्या संदर्भात जो वाद सुरू आहे तो समजून घेण्यासाठी हे सगळे संदर्भ – ते अगदी परिचित असले तरी – समजून घेणे आवश्यक आहेत. अलिगड मुस्लीम विद्यापीठात जिनांचे छायाचित्र लावणे योग्य की अयोग्य हा तो वाद नाही. तर तो वाद काही हिंदू राष्ट्रवादी संघटनांनी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी तयार केलेले निमित्त हा आहे. हे सगळे लिहीत असताना मी जिथे राहतो त्या गुरगावमध्ये नमाज पढण्याच्या ठिकाणावरून वाद सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी नमाज पढू नये असे काहींचे म्हणणे आहे. त्याला राज्य सरकारचेही समर्थन आहे. हे सगळे पाहिले की आपण फाळणीसाठी जी पूर्वपीठिका होती त्याच १९३० मधल्या सांस्कृतिक प्रश्नांची पुनरावृत्ती करीत आहोत असे दिसते. गाय, नमाज, ऐतिहासिक स्मारके, जिना यांच्या चित्राचा असंबद्ध वाद हे सगळे या पूर्वपीठिकेतील एकेक विषय आहेत. भारताच्या कुशलमंगलाशी या गोष्टींचा खरे तर काही संबंध नाही.
दुसरे म्हणजे क्षणभर आपण जिना हे फाळणीसाठी दोषी होते असे मानले तरी तो राजकीय प्रश्न आता उपस्थित करण्यात काय हशील आहे? १९४७ पासून आपण तेच तेच रडगाणे गाऊन प्रगतिपथावर कसे जाणार आहोत? शेवटी फाळणीनंतर दोन देश निर्माण झाले हे वास्तव आहे. दक्षिण आशियात जर काही मनोमीलन किंवा समेटाचे वातावरण तयार करायचे असेल तर आधी फाळणी झाली, त्यानंतर दोन देश निर्माण झाले, ही बाब नाकारून चालणार नाही. वस्तुस्थिती मान्य करूनच पुढे जावे लागेल.
भारत व पाकिस्तान या दोन देशांनी एकमेकांच्या अस्तित्वाची वैधता नाकारणे सोडून द्यायला हवे. दोन्ही देशांना एका नव्या भवितव्याकडे वाटचाल करताना मतभेद मिटवायचे असतील तर एकमेकांचे अस्तित्व आधी मान्य करणे क्रमप्राप्त आहे. दोन्ही देशांत कुरबुरी आहेत. पाकिस्तान सतत काश्मीरचे तुणतुणे वाजवत असतो. भारतातील हिंदू राष्ट्रवादी लोक पाकिस्तानच्या अस्तित्वाचे वास्तव नाकारून पाकिस्तान जे करीत आहे तेच वेगळ्या मार्गाने करीत आहेत. आपण या गुंत्यात इतके अडकलो आहोत की, त्याला सीमा नाही. याचे उदाहरणच द्यायचे तर द्विराष्ट्र सिद्धांतावर दोन देशांची निर्मिती झाली, त्यावर टीका करण्याऐवजी आपण थेट पाकिस्तानचे अस्तित्वच बेकायदा ठरवून टाकतो. द्विराष्ट्र सिद्धांतामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली हे सर्वानाच माहिती आहे. सतत पाकिस्तानच्या अस्तित्वावर प्रहार करणे हे आपल्याला कितीही आवडत असले, तरी त्या दाव्यांतून परस्परविषयक असुरक्षिततेचे एक चक्रच सुरू राहते. त्यापुढे आपल्याला जायला हवे.
यानंतर आता येथे जिनांचा विषय सुरू होतो. यापूर्वी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी व जसवंत सिंह यांना वेगळ्या पद्धतीने जिनांबाबतच्या सत्याचा साक्षात्कार झाला होता. दक्षिण आशियाचे भवितव्य हे सामूहिक असणार आहे हे मान्य केले तर पाकिस्तानची कायदेशीरता किंवा वैधता नाकारता येणार नाही. पाकिस्तानात हिंसाचार आहे, दहशतवाद आहेच. आतापर्यंत त्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे; पण आपण कल्पना करतो, त्याप्रमाणे त्याहून त्यांचे अधिक काही नुकसान होणार नाही. भारताच्या अंतर्गत परिस्थितीमुळे होणाऱ्या भारताच्या हानीहून तर ते जास्त नसेल. तेव्हा पहिल्यांदा आपण अशा स्तरावर यायला हवे, की प्रत्येक चर्चेत वास्तवाला नकार देत भावनिक होणे किंवा मग फाळणीतून आकाराला आलेल्या घटिताची वैधानिकताच नाकारणे हे बाजूला ठेवून या दोन्ही देशांनी एकमेकांबाबतची वस्तुस्थिती प्रथम मान्य करायला हवी. या संदर्भात जिना यांच्याकडे एक खलनायक म्हणून पाहण्याऐवजी एका गुंतागुंतीच्या कठीण प्रक्रियेतून एका राष्ट्राची संस्थापना करणारे म्हणून पाहणे हेच अधिक योग्य ठरेल. ज्याप्रमाणे गांधींनी किंवा अन्य कोणी फाळणीला विरोध केला आणि ते पाकिस्ताननिर्मितीच्या मार्गात अडथळा म्हणून उभे राहिले याकरिता कोणा पाकिस्तान्याने त्यांचा द्वेष केल्याने भारतीयांना काही फरक पडणार नाही, त्याचप्रमाणे सतत जिनांवर टीका करीत राहण्याने पाकिस्तानी लोकांनाही काही फरक पडणार नाही. त्या अर्थाने पाहता, जसवंत सिंह व अडवाणी यांनी जिना यांच्या स्वीकाराचे जे आवाहन केले, ते फाळणीविषयक चर्चेत एकाच मुद्दय़ावर अडकून न पडता पुढे जाण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यांचे ते म्हणणे कदाचित परिणामशून्य असेल; परंतु – आपण वादचर्चेच्या अटी बदलू या का? – असे म्हणण्याची त्यांची ती एक पद्धत होती. जिनांची चित्रे कुठे लावावीत, कुठे लावू नयेत, असावीत की असू नयेत यावर चर्चा होऊ शकते; पण जिनांच्या चित्रांच्या निमित्ताने जे लोक वाद उकरून काढत आहेत ते अजूनही आपला देश फाळणीच्या पश्चात्तापाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडलेला नाही हे दाखवून देत आहेत. फाळणी ही तुम्हाला चूक वाटत असेल तर आपण व्यक्तिस्वातंत्र्यास पोषक, जेथे कुणाचीही ओळख पुसली जाणार नाही तसेच कुणाला जातीधर्माच्या नावाखाली लक्ष्य केले जाणार नाही असे वातावरण निर्माण केले पाहिजे. पण त्याऐवजी होतेय काय, की फाळणीची ‘चूक’ ही ज्या गोष्टींमुळे झाली, त्याच गोष्टी त्या चुकीचे तर्कट पुढे नेण्यासाठी वापरल्या जात आहेत. जिना हे त्या वादातले एक हत्यार आहे.
इतिहासासंबंधीच्या अनेक जाहीर चर्चा दोन पापांच्या धनी ठरतात. त्यातील एक म्हणजे द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत बळकट करणारी समुदायाची पक्षपाती भावना. म्हणजे – ‘मी हिंदू खलनायक शोधतो. तू मुस्लीम खलनायक शोध’ अशी ती वृत्ती. खरे तर फाळणी, त्यासोबत आलेला रानटीपणा हे हिंदू, मुस्लीम आणि शीख यांच्यातील हिंसाचाराशिवाय उद्भवूच शकला नसता. घटनात्मक मार्ग सोडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची जबाबदारी जिना यांच्यावरच येते, पण हिंदू महासभा व इतर संघटनांचाही त्यात वाटा होता हे नाकारून चालणार नाही. दुसरी बाब म्हणजे, फाळणी नेमकी कशामुळे व का घडली असावी याबाबत बाळबोध व सरधोपट मते मांडण्याची सवय आपण सोडून दिली पाहिजे. जे काही घडले त्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी एखाद्याला पकडून त्याचे खलनायकीकरण करणे आपण थांबवले पाहिजे. इतर अनेक महत्त्वाच्या घटनांप्रमाणे फाळणी हा चुका व अनेकांच्या फसलेल्या अंदाजांचा परिपाक होता. भारत व पाकिस्तान या देशांची सध्याची जी परिस्थिती आहे, ती फाळणीमुळे झालेली आहे, हे खरे असले तरी त्या वेळचे संदर्भ पाहता फाळणी ही चांगल्या हेतूने केली गेली होती. फाळणीमुळे पुढे काय होऊ शकते याचा अंदाज त्या प्रक्रियेशी निगडित नेत्यांना आला नसावा. आपले सगळे नेते इतिहासावर मांड ठोकण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्या इतिहासानेच त्यांचा पराभव केला.
वसाहतवादानंतरची एक मोठी शक्ती म्हणून आपण खरोखरच जर भारताकडे बघत असू, तर १९४०च्या दशकातील नायक-खलनायकांना लढवण्याचा हा खेळ आता थांबवायला हवा. भारत व पाकिस्तान यांना त्यांच्या नागरिकांसाठी कुठल्या प्रकारचा समाज, कुठल्या प्रकारचे स्वातंत्र्य आणि समता हवी आहे, हा खरा प्रश्न आहे. पाकिस्तानने आधीच याचे निराशाजनक उत्तर दिले आहे. तिथल्या परिस्थितीतून हे दिसतेच आहे. हिंदू राष्ट्रवादी लोक जिनांच्या विस्मृतीत गेलेल्या छायाचित्रांच्या आडून, आपल्याला पाकिस्तानच्याच मार्गाने नेऊ पाहत आहेत. जिनांच्या छायाचित्राची जणू धून चढली आहे अशा प्रकारे वागून ते जिनांनाच विजयाचे समाधान मिळवून देत आहेत..
(अनुवाद – राजेंद्र येवलेकर)