या गीताच्या शब्दसुरांनी ज्याचे मन हेलावत नाही तो भारतीयच नाही. हे गीत ऐकून ज्याच्या पापण्या ओलावत नाहीत, तो भारतीयच नाही, असे हे गाणे.. ऐ मेरे वतन के लोगों! आज ५० वर्षांनंतरही हे गीत भारतीय मनांत रुंजी घालत आहे. कवी प्रदीप यांच्या तरल लेखणीतून साकारलेल्या या अजरामर गीताबद्दल त्यांच्या कन्या मितुल प्रदीप यांनी व्यक्त केलेल्या भावना खास प्रजासत्ताक दिनानिमित्ताने..
प्रत्येक गीत जन्माला येतं आपलं नशीब घेऊन. ‘ऐ मेरे वतन के लोगों..’ हे असेच मोजक्या नशीबवान गीतांपैकी एक. राष्ट्रकवी प्रदीप यांचं हे गीत. लतादीदींच्या स्वरात सर्व भारतीयांना मारलेली ही आर्त हाक. ती कानावर पडताच क्षणभर हात थबकतात, साऱ्या इंद्रियांचे कान होतात, कंठ दाटून येतो, डोळे भरून येतात. कारण १९६२ चा संघर्ष डोळ्यासमोर उभा करण्याचं सामथ्र्य यात आहे. ‘भारत-चीन भाई भाई’च्या घोषणांच्या पाश्र्वभूमीवर या दोन देशांत झालेला संघर्ष, चीनचे आक्रमण, भारतीय सेनेला घ्यावी लागलेली माघार, अनेकांना आलेले वीरमरण, सीमेवरून येणाऱ्या या साऱ्या बातम्या भारतीय नागरिकांना सैरभैर, दु:खी-कष्टी करत होत्या. प्रत्येक जण स्वत:ला असाहाय्य समजत होता. भारतीयांच्या या साऱ्या वेदना कवी प्रदीप यांच्या गीतात उतरल्या होत्या.
राष्ट्रकवी प्रदीप यांनी हे गीत लिहिलं, असं म्हणण्यापेक्षा त्यांना ते स्फुरलं असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. कारण चीनच्या आक्रमणानं तळमळणारं कवी प्रदीप यांचं मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. डोक्यात, मनात सतत तोच विचार. आपल्या काही कामासाठी ते माहीमला गेले होते. एका फुटपाथवर उभे होते. ते अचानक येरझाऱ्या घालू लागले. शब्द त्यांच्या ओठावर येत होते. त्यांनी तिथेच पडलेलं सिगरेटचं एक रिकामं पाकीट उचललं, फाडलं. त्याच बूथवाल्याचं पेन मागून घेतलं आणि झराझर कागदावर शब्द घरंगळू लागले. सारी अस्वस्थता त्या पाच कडव्यांत उतरली होती.
‘ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा
यह शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवायें
कुछ याद उन्हे भी कर लो, जो लौट के घर ना आये..’
हे गीत मी किती तरी वेळा ऐकले आहे. ते ऐकताना मी प्रत्येक वेळी अंतर्मुख होते. माझे डोळे पाझरू लागतात. मी, माझी मोठी बहीण सरगय आणि आई भद्रा या गीताच्या पहिल्या श्रोत्या होतो. माझे बाबा कवी होते आणि टीकाकारही. ते स्वत: लिहीत आणि त्यांच्यातील टीकाकार त्या गीताची चिरफाड करी. हे गीत त्याला अपवाद नव्हतं. म्हणूनच हे गीत १९६२च्या युद्धाचं शब्दचित्र उभे करते. आपलं कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्यांना वाहिलेली ती भावपूर्ण श्रद्धांजली होती. हे गीत सैनिकांना समर्पित होतं. मात्र साऱ्या भारतीयांना उद्देशून लिहिलं होतं म्हणून त्याचे शब्द साधे, सोपे, त्यातला आशय कोणाच्याही हृदयाला भिडावा असा होता, कधीही जुनापुराणा न होणारा. माझे बाबा मध्य प्रदेशचे. त्यांना शिक्षक व्हायचं होतं. ग्रॅज्युएशन झाल्यावर त्यांनी शिक्षक ट्रेनिंग कोर्स पूर्णही केला. त्याच वेळी त्यांनी कविता लिहिणं, त्याचं वाचन करणं यालाही सुरुवात केली. त्यांना सरस्वती जणू प्रसन्न होती. ते मुंबईत आले आणि पाल्र्याला स्थायिक झाले. अध्यात्म आणि देशप्रेम हा त्यांच्या कवितेचा आत्मा होता. त्यांना आणि आम्हा सर्वाना हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी आणि मराठी भाषाही उत्तम येतात. सारेच जण उत्तम वाचक. या गाण्यापूर्वीही त्यांनी ‘आओ बच्चो तुम्हे दिखाए झाँकी हिंदुस्तान की..’, ‘दे दी हमे आझादी बिना खडम्ग बिना ढाल..’, ‘कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख ना मिटे भाई’ अशी उत्तमोत्तम गीते लिहिली होती, पण या गीताची गोष्टच वेगळी.
१९६२ च्या युद्धात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्यांना श्रद्धांजली वाहणारं हे गीत दिल्लीत होणाऱ्या एका खास कार्यक्रमासाठी निवडलं गेलं. सी. रामचंद्र यांनी त्याला संगीत दिलं. लताजींनी गायलं. ते ऐकताच साऱ्यांचे डोळे पाणावले, पण हे सारं याचि देही याचि डोळा प्रदीपजी पाहू शकले नाहीत. कारण त्यांना दिल्लीचं आमंत्रणच नव्हतं. तेव्हा आतासारखे फोन, मोबाइल, टीव्ही नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी धावत येऊन कोणी तरी ही बातमी त्यांना दिली.
पंडितजी म्हणजेच पंतप्रधान नेहरूंना बाबांना भेटायचं होतं. त्याप्रमाणे २१ मार्च १९६३ ला मुंबई भेटीवर आले असताना त्यांनी बाबांना बोलावून घेतलं. तो पूर्ण दिवस बाबांबरोबर ते राहिले. वांद्रय़ाच्या एका कार्यक्रमात त्यांनी बाबांना हे गीत गायला सांगितलं. त्यांना संगीताची जाण होती. आवाज चांगला होता. त्यांच्या स्वत:च्या आवाजात ते गीत अधिक गहिरं, सुमधुर वाटत होतं. नेहरूजी भारावले. त्यांनी बाबांना त्यांच्या हस्ताक्षरात ते गीत लिहून देण्याची विनंती केली. बाबांचं अक्षरही मोत्यांसारखं होतं. गीत पाहून, ऐकून परत पंडितजींचे डोळे पाणावले. ते बोलले, ‘यह गीत इतना प्रभावशाली है कि कोई भी भारतीय इससे अनुप्राणित हुए बिना नहीं रह सकता। यदि ऐसा नहीं है तो वह हिंदुस्थानी नहीं है। वस्तुत: कवि प्रदीपजी ने फिल्म के सशक्त और सार्थक माध्यम का उपयोग करके देशवासियों में भारतीयता और राष्ट्रप्रेम का सतत प्रसार किया है।’
१९७५ च्या युद्धानंतरही बाबांनी गीत लिहिलं होतं-
‘कर लो प्रणाम ऐ लोगों, वे वंदनीय हैं बहनें
इस देश के लिए जिन्होने विधवा के कपडे पहने
प्रणाम उन दुल्हनों को मेरा, जिन्होने अपना सबकुछ गंवाया
वतन जिंदा रहे इसलिए अपना सुहाग-सिन्दूर लुटाया’
हे गीत आशा भोसले यांनी गायलं होतं. ‘ऐ मेरे वतन..’ या गीताएवढंच तेही प्रभावशाली होतं, मात्र त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
देशात आणीबाणी हा एक काळाकुट्ट कालावधी. त्यानंतर जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या क्रांतीने बाबा खूप प्रभावित झाले. त्यांनी जयप्रकाशजींच्या गौरवासाठी गीत लिहिलं, पण वर्षभरातच भ्रमाचा भोपळा फुटला. सरकार गडगडलं आणि ते गीत बाबांनी फाडून टाकलं.
बाबांना अनेक सन्मान मिळाले. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ तिकीट काढलं, १५०० पेक्षा जास्त गीते त्यांनी लिहिली, पण त्यांचा खरा सन्मान त्यांच्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’ या गीतानं जनमनात मिळविलेलं स्थान हाच आहे. ऐ मेरे वतन.. या गीताला २७-१-२०१४ मध्ये जशी ५१ वर्षे पूर्ण होत आहेत, अशीच ६ फेब्रु. २०१५ रोजी कवी प्रदीपजींची जन्मशताब्दी साजरी केली जाईल.
कुछ याद उन्हें भी कर लो..
या गीताच्या शब्दसुरांनी ज्याचे मन हेलावत नाही तो भारतीयच नाही. हे गीत ऐकून ज्याच्या पापण्या ओलावत नाहीत, तो भारतीयच नाही, असे हे गाणे..
First published on: 26-01-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember martyrs on republic day