हर्षद कशाळकर
निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेल्या श्रीवर्धनच्या प्रसिद्ध रोठा सुपारीच्या बागा आणि बागायतदार यांना नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रोठा सुपारीची नवीन बुटकी जात विकसित करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन सुरू केले आहे. त्यात यश आले तर ते इथल्या सुपारी बागायतदारांसाठी वरदान ठरणार आहे.
रायगड जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर सुपारीची लागवड केली जाते. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होत असते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीची मोठी लागवड केली जाते. भौगोलिकदृष्टय़ा या परिसरात सुपारीसाठी अत्यंत पोषक वातावरण उपलब्ध आहे, त्यामुळे सुपारी लागवडीकडे बागायतदारांचा विशेष कल असतो.
चार वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड जिल्ह्यातील सुपारी बागांना बसला. वादळामुळे जवळपास ८० ते ९० टक्के सुपारीच्या बागा नष्ट झाल्या. भुईसपाट झालेल्या या बागामुळे बागायतदारांचे अपरीमीत नुकसान झाले आहेच, पण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीचे अस्तित्वही धोक्यात आणले आहे. रोठा सुपारीची नव्याने लागवड करण्यासाठी रोपांचीही कमतरता भासू लागली. बाहेरील रोपे आणून त्यांची लागवड करण्यास इथले बागायतदार उत्सुक नव्हते. कारण रोठा सुपारी ही इतर सुपारी यांच्या तुलनेत वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामुळे शेतकरी यांच्या बागा आणि सुपारी संशोधन केंद्राच्या रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून ती वितरित करण्यात आली.
सुपारीच्या स्थानिक जातीची झाडे ही उंच वाढतात. त्यामुळे चक्रीवादळात सुपारीला मोठा फटका बसला. शिवाय झाडे उंच असली तर त्यांचे व्यवस्थापन किंवा काढणी ही कामे त्रासदायक ठरतात. अशावेळी रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. अन्य प्रांतातील बुटक्या जातीच्या सुपारीबरोबर रोठा सुपारीचा संकर करण्यात येत आहे. रोठा सुपारीची चव गुणधर्म कायम ठेवून झाडांची उंची कमी कशी राहील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास बागायतदारांना सुपारीचे अधिकाधिक उत्पन्न घेणे शक्य होणार आहे.
रोठा सुपारीची बुटकी जात विकसित करण्याचा प्रयोग सुरू आहे. हे सध्या प्राथमिक स्तरावर असून, आमच्या वेगवेगळय़ा संशोधन केंद्रांमध्ये प्रायोगिक पातळीवर लागवड करण्यात येत आहे. हे संशोधन यशस्वी झाल्यास त्याचा खूपच लाभ बागायतदारांना होईल. झाडांची उंची कमी राहणार असल्याने चक्रीवादळात नुकसानीचा धोका कमी असेल. कीडरोग व इतर व्यवस्थापन तसेच काढणीचे काम सोपे जाईल. कमीतकमी जागेत जास्तीत जास्त रोपे लावता येतील. पर्यायाने उत्पन्न वाढीस मदत होईल. – डॉ. एस. एन. सावंत, प्रभारी अधिकारी, सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन
जगप्रसिद्ध रोठा सुपारी
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनची रोठा सुपारी जगप्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा भाग जास्त असतो. सुपारीत आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत चवीला आधीच चांगली असते. सुंगधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त मागणी असते. आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने या सुपारीवर संशोधन करून नवीन प्रजाती विकसीत केल्या आहेत. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते.
meharshad07@gmail. com