गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढत आहे.बारावी उत्तीर्णाची टक्केवारी तब्बल १५ ते २० टक्क्य़ांनी वाढून १०० टक्क्य़ांच्या आदर्शाकडे (?) वाटचाल करताना दिसते आहे. अभ्यासक्रम कठीण होत असतानाही ही वाढणारी टक्केवारी कशी चिंताजनक आहे, याचा ऊहापोह करणारा लेख..
डॉ. श्याम जोशी, श्रीराम दांडेकर
नुकताच नेहमीप्रमाणे १०वी व १२वी परीक्षांचा निकाल जाहीर झाला. या व आधीच्या वर्षीचा निकाल पाहिल्यास हे लक्षात येईल की गेल्या काही वर्षांपासून दहावीबरोबरच बारावीच्या परीक्षांची उत्तीर्ण टक्केवारीही वाढते आहे. गेल्या काही वर्षांत बारावी उत्तीर्णाची टक्केवारी तब्बल १५ ते २० टक्क्य़ांनी वाढून १०० टक्क्य़ांच्या आदर्शाकडे (?) वाटचाल करताना दिसते आहे. अभ्यासक्रम कठीण होत असतानाही सातत्याने वाढत जाणाऱ्या या टक्केवारीची सांख्यिक तपासणी केली असता या दोनही स्तरावरील ‘गुणवत्ता वस्तुस्थिती’ अनेक अंगांनी चिंताजनक परंतु दुर्लक्षित असल्याचे जाणवले.
राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर विविध प्रकारे निकालाची आकडेवारी दिली जाते. या आकडेवारीत महाराष्ट्रातील ९ विभागीय मंडळांचे आणि मंडळवार ३६ जिल्ह्य़ांचे संख्यात्मक ‘उत्तीर्ण’ निकाल सरासरी ९० टक्क्य़ांच्या उत्तम पातळीवर असले, तरी विद्यार्थ्यांची गुणात्मक टक्केवारी मात्र खूपच खालावलेली दिसते. अर्थात, मंडळस्तरापासून शाळास्तरापर्यंत उत्तीर्णतेच्या सांख्यिक टक्क्य़ांवरच ‘गुणावत्ता’ मोजली जात असल्याने, म्हणजे १०० टक्के किंवा त्या आसपास उत्तीर्ण निकाल देणारे मंडळ व शाळांची वाहवा होत असल्याने, जो तो गुणवत्तेऐवजी उत्तीर्णाच्या संख्यात्मक वाढीसाठीच धडपडत असल्याचे सदर निकालावरून जाणवते. त्यामुळेच एकीकडे शाळेत द्यावयाच्या २० ते ३० अंतर्गत मार्क्सचे मुबलक वाटप करताना बहुतांश शाळा व शिक्षक धन्यता मानताना दिसतात, तर दुसरीकडे अंतर्गत व लेखी परीक्षांमधील मार्क्सच्या स्वतंत्र मूल्यमापनाऐवजी त्यांची बेरीज हा उत्तीर्णतेचा निकष मानण्यात शिक्षणमंडळेही कुचराई करीत नसल्याचे वास्तव आहे. या संदर्भात आपल्या शेजारील कर्नाटक राज्याचा बारावी म्हणजेच पीयूसीचा ६० टक्क्य़ांच्या आसपास असणारा निकाल बरेच काही सांगून जातो. तेथे अंतर्गत व लेखी परीक्षांमधील मार्क्सचे स्वतंत्र मूल्यमापन केले जाते हेही लक्षात घेतले पाहिजे.
निकालांच्या संख्याशास्त्रीय तपासणीतून सामोरी आलेली चिंताजनक वस्तुस्थिती या संदर्भातील पुढील आलेखाद्वारे (आलेख १ अ व ब) सहजच स्पष्ट होते. २०१४ व २०१५ मध्ये बारावी विज्ञान, कला व वाणिज्य विभागात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनुक्रमे ५१.३४, ४३.६० व ३८.८ टक्के विद्यार्थ्यांना २०१४ मध्ये व ४८.४४, ४२.४९ व ३६.४८ टक्के विद्यार्थ्यांना २०१५मध्ये द्वितीय वर्ग म्हणजे ४५ ते ६० टक्क्यांच्या दरम्यान मार्क्स मिळाल्याचे स्पष्ट होते. द्वितीय वर्ग मिळालेल्या यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना शाळांकडून मिळालेले २० ते ३० अंतर्गत ‘मार्क्सदान’ वजा केल्यास त्यांनी लेखी परीक्षेत मिळवलेले सरासरी गुण २५ ते ४० टक्केच होतात. (शाळांच्या सर्वसाधारण मार्क्सपत्रिकेत यासंबंधी अधिक व ‘उद्बोधक’ माहिती मिळेल.)
(आलेख १ अ, १ ब)
या विद्यार्थ्यांचे यापुढील शिक्षण त्यांच्या पालकांना व एकूण समाजाला चिंता करण्याजोगे असेल अशी साधार भीती वाटते. याव्यतिरिक्त विशेष श्रेणी किंवा डिस्टिंक्शन मिळालेल्या विद्यार्थ्यांची तुटपुंजी संख्याही या चिंताभीतीत भरच घालते.
आलेख २ अ व ब मध्ये फेब्रुवारी २०१५ मधील विशेष व द्वितीय श्रेणीप्राप्त विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय टक्केवारी चढत्या श्रेणीत दिली आहे. बारावीसारख्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या परीक्षेतील ही टक्केवारी त्या त्या जिल्ह्य़ाच्या विकासाचा ढोबळ निर्देशक म्हणून पाहता येईल असे वाटते. आलेख आकडेवारीतून ते स्पष्टही होते. नऊ विभागीय मंडळांत उत्तीर्णतेत संख्यात्मकदृष्टय़ा प्रथम क्रमांकावर असलेल्या कोकण विभागातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे गुणात्मकदृष्टय़ा मात्र सर्वात मागे राहिलेले दिसतात. मात्र संख्यात्मक दृष्टिकोनामुळे याकडे दुर्लक्ष होताना दिसते. फेब्रुवारी २०१४ मधील ही आकडेवारीही एखाद्या जिल्ह्य़ाचा अपवाद वगळता अशीच आहे.
(आलेख २ अ, २ ब)
आलेख ३ अ ते ड मध्ये दहावी फेब्रुवारी २०१५ परीक्षेतील विभागवार श्रेणीनिहाय टक्केवारी दिली आहे. यातही सांख्यिकदृष्टय़ा आघाडीवर असलेला कोकण विभाग गुणात्मकदृष्टय़ा पिछाडीवर असल्याचे लक्षात येते. परंतु गुणात्मक अंगाने निकालाकडे पाहणे सोयिस्कररीत्या दुर्लक्षित करून यशाचा सांख्यिक आभास निर्माण करणे अनेक दृष्टिकोनातून धोक्याचे आहे हे प्रकर्षांने लक्षात घेतले पाहिजे.
(आलेख ३ अ, ३ ब, ३ क, ३ ड)
दहावी-बारावीचा ‘निकाल’
गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढत आहे.बारावी उत्तीर्णाची टक्केवारी तब्बल १५ ते २० टक्क्य़ांनी वाढून १०० टक्क्य़ांच्या आदर्शाकडे (?) वाटचाल करताना दिसते आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Result of ssc and hsc