मराठी कथाव्यवहार संपुष्टात आल्याच्या काळात नवकथा या सांस्कृतिक घुसळणीची निव्वळ धुसर आठवण काढली जाते. नेमकी या घुसळणीसारखीच, परंतु विस्तारित आवृत्ती अमेरिकेमध्ये साठच्या दशकामध्ये अकथनात्मक साहित्यात झाली होती. गे तलिस, टॉम वुल्फ, हण्टर थॉम्पसन, नॉर्मन मेलर या पत्रकारांनी आपल्या वृत्तलेखनात कथात्मक शैलीचा अंतर्भाव करून वृत्तकथनाची पत्रकारिता सुरू केली. सत्याचा आग्रह धरणारीच पण रंजक, सकस, शब्दकसरतींची, वाक्यप्रयोगांची कास धरणाऱ्या या नवपत्रकारितेने साहित्य आणि पत्रकारिता ही दोन्ही विश्वे व्यापली आणि जगभरात ती पाझरत गेली. लेखन व्यवहार गांभीर्याने मानणाऱ्या आणि ते श्रमदत्त असल्याची जाणीव जगाला देणाऱ्या अमेरिकेत ही न्यूजफीचरयुक्त पत्रकारिता आजही किती सशक्त आहे, हे ‘लाँगफॉर्म’ अथवा डेली बिस्टवरील ‘लाँगरीड’ या निव्वळ दोन संकेतस्थळांचे अवलोकन केल्यावर लक्षात येईल. तरीही या फीचरसमृद्ध राष्ट्रामध्ये यंदा पुलित्झर पारितोषिक मिळण्यायोग्य फिचरच जन्मले नाही, असा परीक्षक मंडळाने निर्णय घेतला. आपल्याला काय त्याचे, असे न म्हणता, या समृद्ध आणि कठोर लेखनसंस्कृतीवर दृष्टिक्षेप टाकणे या निमित्ताने महत्त्वाचे आहे. कथेसोबत देशीफीचरही घसरणीला गेल्याच्या आजच्या स्थितीची जाणीव करून देणारा आढावा..
भारतात गेल्यावर्षी उत्तराखंडमध्ये जो जलप्रलय झाला त्यात फीचरसाठी सुयोग्य असे अनेक विषय होते, त्याची तुलना स्नो फॉल या गोष्टीरूप बातमीशी करता येईल यात शंका नाही, त्यातून जिवंत रसरशीत अनुभव सामोरा आला असता. मृत्यू समोर असताना दिलेला लढा, माणुसकीचे अनुभव, माणुसकीहिनतेचा कळस असे अनेक पदर त्यात होते. मात्र आपण ही घटनाच रोजच्या वृत्तओझ्यांमध्ये विसरून गेलोय. त्याबाबत वाचनात आलेले लेखांक, वृत्तपत्रीय गरजभरू वृत्तांकने, घटनांचे राजकारण, त्रोटक रिपोर्ताज या पुसटशा आठवणी काहींच्या डोक्यात असतील, मात्र आयुष्यभर विस्मृतीच्या हवाली होऊ शकणार नाही, असे ठोस फीचर लेखन अपवादानेच कुणाच्या स्मृती कप्प्यांमध्ये जतन असेल. हीच बाब देशातील बॉम्बस्फोटांच्या घटनेपासून ते पूर, वादळे, गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींबाबतही कायम राहिली आहे. ट्वेंटीफोर बाय सेव्हन वृत्तदळणामध्ये, सर्वात आधी वृत्तठग कोण बनतो याच्या स्पर्धेत लोकांचा विस्मृती विस्तार व्हावा याची काळजी घेणारे वकूबहीन फीचर लेखन ही सध्याची परंपरा बनले आहे. साठ-सत्तरच्या दशकात माणूस या साप्ताहिकाने केलेली विशेष रिपोर्ताजी पत्रकारिता आणि निवडक वृत्तपत्रांखेरीज फीचर लेखन दिसते ते फक्त निवडक वार्षिक दिवाळी अंकांत. अनिल अवचट, विजय तेंडुलकर, निळू दामले आणि अगदी फारच चौकस वाचन असेल, त्यांना आठवतात ते ‘शाळा’कार मिलिंद बोकील यांचे समुद्रापारचे समाज रंगविणारे पुस्तक. वाचक अगदीच ताजा असेल तर ‘अंतर्नाद’कार भानू काळेंचा बदलता भारत. इंग्रजीत अशी नावे दुपटी-तिपटीने असली, तरी एकूण फीचर कार्यकर्त्यांची देशी संख्या अत्यल्प आहे. आटलेले वाचन, लेखनावर मेहनत घेण्याचा कंटाळा आणि सरधोपट शब्दांचे सहाय्य आणि साप्ताहिके, मासिके यांनी केलेली जागेची कोंडी यातून देशी फीचर लेखन विकास पावण्याच्या आतच संपून गेलेले दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा