– निखिल भालेराव
अजिंठा, वेरूळ लेण्यांमुळे आपल्या शहराचे नाव जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आले. ८० च्या दशकात येथे झपाट्याने औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. जेव्हा बजाज ऑटोने वाळुज येथील मोठ्या प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पामुळे शहरातील औद्याोगिक विकासाला एक नवी दिशा मिळाली. बजाज ऑटोच्या स्थापनेमुळे, शहराने एक ते चार पर्यंतच्या सुट्ट्या भाग पुरवठादारांची एक मजबूत साखळी निर्माण केली. यामुळे, शहराने औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण उन्नती केली. सुरुवातीला केवळ रेल्वे स्टेशन परिसरात एमआयडीसी होती. नंतर चिकलठाणा आणि वाळुज, पैठण अशा एकापाठोपाठ औद्योगिक वसाहतींचा विकास होत गेला. छत्रपती संभाजीनगरचा औद्योगिक विकास विस्तारत असताना, येथे ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, फार्मास्युटिकल्स, स्टील आणि बिअर उत्पादन क्षेत्रातील मोठ्या कंपन्या स्थिरावल्या आहेत. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कंपन्यांनी आपले उत्पादन युनिट स्थापन केले आहे. यापूर्वी आशियातील सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराची विकास गती गेल्या काही वर्षांत मंदावली होती. मात्र, अलीकडील गुंतवणुकीमुळे ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे.
मराठवाड्याच्या विकासासाठी शासकीय पातळीवर, तसेच सीएमआयए सारख्या औद्योगिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे ‘ऑरिक सिटी’त या क्षेत्रातील उद्योगांसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहन धोरण सकारात्मक असून त्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.
हेही वाचा – आरोग्याच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे
शहरीकरण आणि पायाभूत सुविधा
छत्रपती संभाजीनगरचे शहरीकरण हा औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा घटक आहे. मराठवाड्यात मागील काही वर्षांत रस्ते, रेल्वे नेटवर्क, आणि अन्य पायाभूत सुविधांचे महत्त्वपूर्ण उभारण झाले आहे. राज्य सरकारने शहरी विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे, ज्यामुळे विभागाच्या पायाभूत सुविधा वाढविण्यात मदत झाली आहे. समृद्धी महामार्ग, जो नागपूरला छत्रपती संभाजीनगरशी जोडतो, हा शहराच्या लॉजिस्टिक फायदेशीरतेसाठी महत्त्वाचा आहे. मराठवाड्यातील शहरीकरणाचा दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी असला तरी भविष्यात यामध्ये वाढ होण्याच्या मोठ्या संधी आहेत. मराठवाडा येथे मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यामध्ये इंडो जर्म टूल रूम, सिपेट, निलेट, तांत्रिक शिक्षण देणारे महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. आजच्या घडीला सुमारे ३० हजार विद्यार्थी दर वर्षी आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहेत. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट (बीवायएसटी) आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय पातळीवरील उद्योग संघटना उद्योग इकोसिस्टम पोषक करण्यासाठी काम करीत आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून (जनभागीदारी) निर्माण झालेले मराठवाडा ऑटो क्लस्टर, देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर या सारखे प्रकल्प भविष्यात इतरही उद्योग क्षेत्रात निर्माण होण्याची गरज आहे.
पायाभूत सुविधा विकास वाढीचे इंजिन
कोणत्याही विभागाचा विकास हा तेथील पायाभूत सुविधेच्या स्थितीवर अवलंबून असतो. गेल्या काही काळात छत्रपती संभाजीनगरमधील पायाभूत सुविधांचा विकास गतीने होत आहे. भौगोलिक स्थिती, मराठवाडा विभागाची राजधानी आणि पर्यटन, उद्योग क्षेत्रात असेलेले महत्वाचे स्थान यामुळे शहर आणि शहराला जोडणारे अनेक मोठे प्रकल्प राबविले जात आहेत किंवा त्याविषयी घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने शहरालगत जाणारा समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, शेंद्रा-वाळूज जोडणारा अखंड पूल, शहरांतर्गत मेट्रो (मास रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम – MRTS), विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे पिटलाईन, रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण, आणि मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प यामुळे छत्रपती संभाजीनगरसह एकूण मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठी प्रयत्न गरजेचे
औद्योगिक शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून आजच्या घडीला शंभरहून अधिक देशांना निर्यात केली जाते. या आर्थिक वर्षात शहरातून सुमारे २५ हजार कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वाहन क्षेत्र, फार्मा, फायबर ऑप्टिक्स, केमिकल, फर्निचर, कृषी आधारित उत्पादनांचा समावेश होतो. राष्ट्रीय स्तरावर निर्यात देशाच्या सुमारे एक टक्का असून, देशात हे शहर २७ क्रमांकावर आहे. येथील उद्योग जगताने स्थानिक विमानतळावरून कार्गो सेवा सुरु करण्यासंदर्भात मागणी केली आहे. येथील उद्योग, शेतीमालाला नवीन बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी कार्गो हबला लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात येत असून लवकरच आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा उपलब्ध होणार आहे, असे प्रशासनाकडून माहिती सांगण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे कार्गो हब सोबतच ‘एमआरओ’ अर्थात विमान दुरुस्ती व देखभालीचे केंद्र म्हणून समोर आल्यास विविध शहरांशी हवाई सेवा वाढण्यास मदत होईल.
भविष्यातील आव्हाने
छत्रपती संभाजीनगरने आपल्या औद्योगिक वाढीमध्ये काही आव्हानांचा सामना केला आहे. रखडलेले विमानतळ विस्तारीकरण, कमी गतीने होणारे रेल्वे प्रकल्प औद्योगीकरणाच्या गतीला ब्रेक लावतात. मराठवाड्यात जालना येथे प्रस्तावित ड्राय पोर्ट मराठवाड्याला सागरी, रेल्वे आणि रस्ते मार्गांशी जोडण्यास मदत करणार आहे. भविष्यात, हे पोर्ट कृषिमालाच्या निर्यातीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ज्यामुळे या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला आणखी गती मिळेल. असे असले, तरी मागील काही वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. त्याला गती मिळणे खूप गरजेचे आहे.
हेही वाचा – Marathwada Liberation Day : हवामान बदल हेच मराठवाड्यासमोरचे आव्हान
मराठवाडा विभागाचा आर्थिक अनुशेष भरून काढायचा असेल, तर छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विकासाच्या वाढीचे इंजिन म्हणून पुढे आणून, या शहरभवती मराठवाडा, खांदेश आणि विदर्भाचा काही भाग यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे. जालना देशाची स्टील आणि सीड राजधानी आहे. मराठवाडा कृषिप्रधान क्षेत्र असून, रेशीम आणि कापूस कापड उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. हिमरू कापड म्हणून स्थानिक पातळीवर पिकवलेल्या कापसासह रेशमाचे सुरेख मिश्रण विकसित केले गेले. देशाच्या एकूण कापूस निर्यातीपैकी २५ टक्के हिस्सा मराठवाड्यातून जातो. नांदेड विभागात वस्त्रोद्याोग, यंत्रमाग उद्योग नावारूपास आले आहे. लातूरमध्ये अनेक तेल आणि साखर कारखाने आहेत. लातूर येथे ऑइल मिल, रेल्वे कारखान्याच्या माध्यमातून आगामी काळात वंदे भारत या देशातील सर्वांत प्रगत रेल्वेच्या कोचची निर्मिती होणार आहे. पाच हजारांपेक्षा अधिक लोकांना थेट रोजगार देणारा हा प्रकल्प औद्योगिक विकासाला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या पुढे नेत मराठवाड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत नेईल.
सद्या:स्थितीत राज्यातील एकूण औद्योगिक गुंतवणुकीमध्येही मराठवाडा विभागाचा हिस्सा ६ टक्के, तर रोजगारामध्ये ५.६ टक्के इतका आहे आणि भविष्यात यात सुधारणा होण्यासाठी मोठा वाव आहे. गरज आहे ती विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या नेतृत्वाची. आगामी काळात छत्रपती संभाजीनगर येथे उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसोबतच सेवा आधारित क्षेत्र, माहिती-तंत्रज्ञान, इनोव्हेशन, इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, डिफेन्स हब आणि ऑरिक औद्योगिक वसाहतीचा सर्वांगीण विकास म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणूक आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत असताना पुढील २५ वर्षांत मराठवाडा देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपास येईल. कारण विकसित भारताचा रस्ता विकसित छत्रपती संभाजीनगर आणि विकसित मराठवाड्यामधून जाईल, हे नक्की!