प्रसिद्ध दाक्षिणात्य पाश्र्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. तिथल्या कार्यक्रमात गाणी सादर करण्यापूर्वी इलिया राजा यांच्या वकिलाची नोटीस त्यांना मिळाली आणि इलिया राजांच्या परवानगीशिवाय त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायली तर तो कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हा ठरेल, असे या नोटिसीमध्ये म्हटले आहे आणि त्यामुळे चित्रपट संगीतावरील कॉपीराइटचा प्रश्न परत चर्चेत आला त्याबद्दल..
इलिया राजा आणि एस.पी. बालसुब्रमण्यम..एक सूरतालाचा बादशहा आणि दुसरा आवाजाचा जादूगार. इलिया राजा यांनी दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात आणि विशेषत: तमीळ भाषेत अनेक गाणी संगीतबद्ध केली आहेत. आजतागायत त्यांनी जवळजवळ ६००० गाण्यांना आणि १००० चित्रपटांना संगीत दिले आहे. एस. पी. बालसुब्रमण्यम (यांना प्रेमाने त्यांचे चाहते एसपीबी म्हणतात). हे दक्षिणेतलेच मोठे जानेमाने गायक! त्यांनी तर जवळजवळ ४०,००० गाण्यांना आपला आवाज दिला आहे. इलिया राजा यांची सगळ्यात जास्त गाणी कुणी गायली असतील तर ती एसपीबी आणि चित्रा यांनी! सदमा किंवा अप्पू राजा या मूळच्या दक्षिणेतल्या चित्रपटावरून हिंदीत बनवलेल्या चित्रपटात आपण या दोघांच्या संगीताची कमाल पाहिली आहे! पण सध्या मात्र या दोन गुणी कलाकारांमध्ये वितुष्ट येऊ पाहातंय!
तर त्याचं झालं असं.एसपीबी यांनी नुकतीच त्यांच्या चित्रपटातील सांगीतिक कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी ते सध्या कॅनडा, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका दौऱ्यावर आहेत. चित्रा या दक्षिणेतील मोठय़ा पाश्र्वगायिकाही एसपीबी यांच्याबरोबर आहेत. एसपीबी अमेरिकेत पोचले आणि त्यांच्या हातात पडली ती इलिया राजा यांच्या वकिलाकडून आलेली एक नोटीस! इलिया राजा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी एसपीबी यांनी कुठल्याही कार्यक्रमात म्हणता कामा नयेत आणि गायची असतील तर त्यांची रॉयल्टी इलिया राजा यांना द्यायला हवी अशी ही नोटीस आहे. या पूर्वसूचनेकडे लक्ष न देता जर एसपीबी यांनी इलिया राजांची गाणी गायली तर ते इलिया राजांच्या कॉपीराइटचे उल्लंघन ठरेल आणि त्याकरिता इलिया राजा यांना मोठी नुकसानभरपाई द्यावी लागेल असेही यात म्हटले आहे.
यावर एसपीबी यांनी असे म्हटले आहे की ‘‘मी कॉपीराइट कायद्याबद्दल सपशेल अज्ञानी आहे. त्यामुळे मी गाणी गातोय, ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबद्दल मला खरंच कल्पना नाही. पण ते खरंच बेकायदेशीर असेल तर मी ते करणार नाही. मी इतर अनेक संगीतकारांकडे अनेक गाणी गायली आहेत, ती मी गाईन. पण माझ्या चाहत्यांनी कृपया याला मी आणि इलिया राजा यांच्यामधल्या भांडणाचा रंग देऊ नये.’’
एसपीबी यांनी हे फेसबुकवर लिहिताच माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले. ‘‘स्वत:चीच गाणी गायला कसली आलीये परवानगी? कायदा एसपीबी यांच्या बाजूने आहे..त्यांनी गात राहावं’’ असाच सूर सगळीकडे आळवला गेलेला दिसला. पण एकूणच हा सूर एसपीबी यांच्यावरच्या प्रेमामुळे भावनाविवश होऊन लावलेला दिसत होता. पण खरोखर याबाबत कॉपीराइट कायदा काय सांगतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न झालेला दिसला नाही. कॉपीराइट कायदा आणि एकूणच बौद्धिक संपदा कायदा याबाबत अजूनही भारतात कमालीचे अज्ञान आहे.
बौद्धिक संपदा हक्कांचे निरनिराळे प्रकार आहेत, उदाहरणार्थ: पेटंट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाइन, भौगोलिक निर्देशक आदी. आणि या सगळ्यांबद्दल भारतात वेगवेगळे कायदे आहेत. बौद्धिक संपदा हक्कातला एक महत्त्वाचा हक्क म्हणजे कॉपीराइट. कलाकारांना त्यांच्या कलाकृतींवरच्या या हक्कांपासून वंचित व्हावे लागू नये म्हणून या बौद्धिक संपदेची निर्मिती झाली. सन १७१० मध्ये ब्रिटनमध्ये केला गेलेला statute of Anne हा कॉपीराइटविषयक पहिला कायदा. त्यानंतर वेगवेगळ्या देशांत अशा स्वरूपाचे वेगवेगळे कायदे संमत होऊ लागले. पण १८८६ मध्ये बर्न कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय ठराव मंजूर होईपर्यंत या निरनिराळ्या देशांच्या कायद्यात कोणताही सुसंवाद नव्हता.
इतर सर्व प्रकारच्या संपदांपेक्षा ही बौद्धिक संपदा वेगळी समजली जाते. ती यासाठी की यात मुख्य भर व्यापारावर नव्हे, तर कलाकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यावर असतो. अर्थात त्यात व्यापार येतोच, पण तो याचा प्रमुख उद्देश नव्हे. कॉपीराइट कशाकशावर मिळतो? तर साहित्य, कला, संगीत आणि नाटय़ यांच्याशी संबंधित कोणत्याही कलाकृतीवर. कॉपीराइट आणि इतर प्रकारच्या औद्योगिक बौद्धिक संपदा (पेटंट्स, ट्रेडमार्क्स, इंडस्ट्रियल डिझाइन्स) यांच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे इतर सर्व प्रकारचे बौद्धिक संपदा हक्क मिळण्यासाठी त्यांची नोंदणी करावी लागते. ते हक्क मिळावेत म्हणून त्या त्या खात्यांकडे अर्ज करावा लागतो. पण कॉपीराइट्सचे मात्र असे नाही. नोंदणी केली किंवा नाही केली तरी कलाकृतीच्या निर्मात्याकडे तो असतोच. भविष्यात कुणी कलाकृतीची चोरी केल्यास कोर्टात ते सिद्ध करण्यासाठी कॉपीराइट्स नोंदणीकृत असले तर निश्चितच मदत होते, पण ते सक्तीचे नव्हे.
कलाकाराला कलाकृतीवर कॉपीराइट असतो म्हणजे नक्की कोणते हक्क असतात? तर १. त्याच्या परवानगीशिवाय त्याच्या कलाकृतीच्या प्रती काढण्यापासून तो कुणालाही थांबवू शकतो २. आपल्या कलाकृतीवर आधारित दुसऱ्या कुठल्या कलाकृतीची (derivative work) निर्मिती तो थांबवू शकतो आणि ३. जर ती कलाकृती ध्वनिमुद्रित असेल तर त्याच्या परवानगीशिवाय तिचे प्रसारण करू देण्यापासून रोखण्याचा हक्कही तिच्या निर्मात्याला आहे. ४. त्याच्या परवानगीशिवाय कुणीही त्याच्या कलाकृतीचा सार्वजनिक प्रयोग करू शकत नाही..मग तो नाटककाराच्या नाटकाचा प्रयोग असेल, किंवा कादंबरीचे वाचन किंवा मग दृक्श्राव्य माध्यमातील कलाकृती म्हणजे चित्रे किंवा चित्रपट किंवा गाणी यांचे सार्वजनिक प्रदर्शन आणि प्रसारण, लाइव्ह कार्यक्रमात गाणी गाणे हे करण्यासाठी निर्मात्याची परवानगी आवश्यक आहे. कॉपीराइटमुळे कलाकाराला मिळणारे हे सगळे झाले आर्थिक हक्क. कारण या सर्व कृती करण्यासाठी परवानगी देताना तो योग्य ती बिदागी मागू शकतो. याशिवाय कॉपीराइटमुळे लेखकाला काही नैतिक हक्कही मिळतात. ते म्हणजे ती कलाकृती त्याची आहे याचे श्रेय सार्वजनिकरीत्या त्याला नेहमी मिळाले पाहिजे. आणि दुसरा म्हणजे त्याच्या कलाकृतीमध्ये जर काही बदल करण्यात आले, ज्यामुळे त्या कलाकृतीचे सौंदर्य नष्ट होते आहे, किंवा त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोचतोय असे त्याला वाटले तर त्यापासून रोखण्याचा अधिकार.
मग या सगळ्या पाश्र्वभूमीवर इलिया राजा आणि एसपीबी यांच्यामधला वाद कुठे बसतो? इलिया राजांनी संगीतबद्ध केलेल्या आणि एसपीबी यांनी म्हटलेल्या गाण्यांवर हक्क कुणाचा? गाण्याचे दोन महत्त्वाचे भाग असतात..त्याचे शब्द आणि त्याचे संगीत. गाण्यावर कॉपीराइट कुणाचा? गाणे हे ज्याच्या बुद्धीची निर्मिती आहे त्यांचा. मग यातल्या शब्दांचा निर्माता आहे गीतकार आणि संगीताचा निर्माता आहे संगीतकार. म्हणून अर्थातच मग गाण्यावर या दोघांचा कॉपीराइट असतो. म्हणजे गाण्याच्या शब्दांवर गीतकाराचा आणि संगीतावर संगीतकाराचा. गाणी म्हणणारे गायक-गायिका किंवा त्यात संगीताचे तुकडे वाजवणारे कलाकार हे सगळेच त्या गाण्यात जीव ओतत असतात..पण ही त्यांच्या बुद्धीची निर्मिती नसते..ते संगीतकाराच्या सांगण्यानुसार आपले सादरीकरण करत असतात.
पण मग आपल्या माहितीतली किती तरी गाणी अशी आहेत, जी केवळ त्यातल्या गायकांच्या आवाजामुळे अजरामर झाली आहेत. गाइडसारख्या सिनेमातील सदाबहार गाण्यांची रफीऐवजी मुकेशच्या आवाजात कल्पना करून बघा. त्या गाण्यातले शब्द किंवा संगीताइतकाच त्यातला आवाज हाही अविस्मरणीय आहे. त्या गाण्याला मिळालेल्या अमाप प्रसिद्धीत गायकाचाही सिंहाचा वाटा आहे. मग त्याचा वाटा त्याला मिळायला नको का? त्याचे नाव होईल..ते गाणे भले त्याच्या नावाने ओळखले जाईल. पण त्याचा आर्थिक वाटाही त्याला मिळायला हवाच ना. गाणे तयार होत असताना अर्थातच गायकाला त्याचा मोबदला मिळालेला असतो. पण कधी ते गाणं अतिशय प्रसिद्ध होतं..तर कधी कुणाच्या लक्षातही राहत नाही. कधी त्या गाण्यामुळे चित्रपट चालतो. प्रचंड कमाई करतो. त्या गाण्याच्या ध्वनिफिती विक्रमी प्रमाणात विकल्या जातात. मग अशावेळी गायकांना किंवा गाण्यातील इतर कलाकारांनाही या कमाईचा वाटा नको का मिळायला?
या कलाकारांप्रमाणेच आणखीही दोन वर्ग आहेत, ज्यांचे हक्क डावलले जात असत. एक म्हणजे प्रसारण करणारी माध्यमे म्हणजे टीव्ही किंवा रेडियो चॅनेल्स (broadcasters) आणि दुसरे म्हणजे फोनोग्राम बनविणाऱ्या किंवा ध्वनिमुद्रण करणाऱ्या कंपन्या. अशा सर्व मंडळींसाठी, म्हणजे सादरीकरण करणारे कलाकार (गायक, नट वगैरे), प्रसारण करणाऱ्या संस्था आणि ध्वनिमुद्रक अशा तिघांसाठी निर्मिती करण्यात आली. कॉपीराइट्सशी ‘संबंधित अधिकार’ (रिलेटेड राइट्स), ज्याला काही देशात म्हणतात ‘शेजारी अधिकार’ (नेबरिंग राइट्स) ..म्हणजे कॉपीराइट्सच्या शेजारी राहणारे अधिकार. तर एसपीबी आणि इलिया राजामधल्या वादातदेखील गाण्यांवर कॉपीराइट हा निर्विवादपणे इलिया राजा आणि गीतकारांचा आहे. एसपीबी यांना त्या गाण्यावर ‘शेजारी अधिकार’ किंवा ‘सादरकर्त्यांंचे अधिकार’ नक्कीच आहेत, आणि त्यामुळे त्यांना गाण्याच्या प्रसिद्धीच्या प्रमाणात रॉयल्टीदेखील मिळत असेल. शिवाय एसपीबी गात असताना जर त्याचं ध्वनिमुद्रण कुणाला करायचं असेल तर ते करू देण्या किंवा न देण्याचा हक्कदेखील एसपीबी यांना याच सादरकर्त्यांंच्या अधिकाराने मिळालाय. पण आपण पाहिले की गाण्याचे सार्वजनिक सादरीकरण करण्यास परवानगी देण्याचे अधिकार फक्त आणि फक्त कॉपीराइटच्या मालकाला आहेत, म्हणजे इलिया राजांना आहेत. (जर संगीतकार कुठल्या संगीत कंपनीच्या नोकरीत असेल तर मग तो अधिकार त्या कंपनीचा आहे, पण इथे ती शक्यता संभवत नाही)
आता कॉपीराइट कायद्याबद्दल माहिती करून घेतल्यावर लक्षात आलेच असेल की १. इलिया राजा यांनी संगीतबद्ध केलेली जी गाणी गात आहेत त्याच्यावर संगीतकार म्हणून इलिया राजा यांचा आणि गीतकार म्हणून त्या त्या गाण्याच्या गीतकाराचा कॉपीराइट आहे. एसपीबींना त्यावर शेजारी अधिकार आहेत, आणि त्यानुसार त्यांना त्यावर रॉयल्टी मिळाली असेलही. २. कॉपीराइट कायद्यानुसार कॉपीराइटच्या मालकाला त्याच्या गाण्याचे सार्वजनिक सादरीकरण करताना परवानगी घेतली पाहिजे आणि योग्य मोबदला दिला पाहिजे. आणि म्हणूनच एसपीबी यांनी ही गाणी प्रेक्षकांपुढे गाताना इलिया राजा यांची परवानगी घेणे आणि त्या बदल्यात त्यांना मोबदला देणे भाग आहे! यानुसार एसपीबी यांनी इलिया राजा यांचीच नव्हे, तर त्या त्या गाण्यांच्या गीतकारांचीदेखील परवानगी सादरीकरणापूर्वी घ्यायलाच हवी होती.
या उद्योगात गेली ५० वर्षे व्यतीत केलेल्या एसपीबीसारख्या अनुभवी कलाकाराला याची कल्पना नसावी हे आश्चर्य आहे! किंवा कदाचित एखादी बेकायदेशीर कृती करून मला कायदा माहीत नव्हता म्हणून मी ती केली असे म्हटले की तिची तीव्रता जनतेच्या नजरेत कमी होते म्हणून त्यांनी हा पवित्रा घेतला असावा. पण ‘कायद्याबद्दलचे अज्ञान’ हा कुठल्याही कायद्यात बचावाचा मुद्दा होऊ शकत नाही. एसपीबी आता अमेरिकेत कार्यक्रम करणार होते, आणि अमेरिकी कॉपीराइट कायद्यानुसार तर कॉपीराइट मालकांची परवानगी न घेता कार्यक्रम केला तर त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि कार्यक्रम जिथे होणार त्या जागेच्या मालकांनादेखील नुकसानभरपाई द्यावी लागू शकते. आणि याची अंमलबजावणी होईल हे इलिया राजा ज्या भारतीय सोसायटीचे मेम्बर आहेत तिची सहकारी अमेरिकन सोसायटी पाहील. शिवाय एसपीबी यांनी विधान केले आहे की ‘इलिया राजांची नाही तर नाही..मी इतर संगीतकारांची गाणी गाईन’ हे साफ चुकीचे आहे. या ‘इतर’ संगीतकारांची परवानगी घेतली नसेल तर आज ना उद्या हे संगीतकारही एसपीबींना नोटिसा पाठविल्याशिवाय राहणार नाहीत.
एवढे मात्र नक्की की इलिया राजांच्या ‘आया है राजा’वर मस्त मजेत ‘झूम लो’ म्हणत मग्न होणाऱ्या एसपीबीला इथून पुढे इलिया राजाच्या परवानगीशिवाय त्यांच्या गाण्यांवर ‘झुमता’ येणार नाही. त्यांना इलिया राजांना रॉयल्टी देऊन मग त्यांच्या परवानगीनेच ‘झुमता’ येईल. राजा के संग संग नाही तर ‘इलिया राजा के संग संग झूम लो’ असं आता एसपीबीच्या बाबतीत म्हणावे लागेल.
– प्रा. डॉ. मृदुला बेळे
mrudulabele@gmail.com
( लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.)