भेट, सौजन्य –
अखेर तब्बल चार दशकांनंतर सचिन तेंडुलकर आणि सुधाकर फडके यांची भेट होण्याचा योग जुळून आला. ज्यावेळी सुधाकर फडके यांनी त्याला प्रत्यक्ष बघितले, तेव्हा तो अवघा चार महिन्यांचा होता. त्यांना गुरुस्थानी असणाऱ्या प्रा. रमेश तेंडुलकर यांच्या या धाकटय़ा मुलाचे त्यांनी अतिशय कौतुकाने आणि उत्साहाने फोटो काढले होते. भविष्यात हा लहानगा क्रिकेट जगतात विक्रमांचे एव्हरेस्ट सर करेल, याची सुतराम कल्पना तेव्हा त्यांना नसली तरी गुरूच्या मुलाची छायाचित्रे त्यांनी निगेटिव्हसकट जपून ठेवली होती. पुढे क्रिकेटच्या अवकाशात सचिन तेंडुलकरनामक तारा तळपू लागला, तेव्हा त्याला भेटून त्याची ही बालपणीची छायाचित्रे द्यावीत, असे त्यांना अनेकदा वाटले. पण प्रत्यक्षात ते घडले नाही. ती संधी त्यांना अखेर ‘लोकसत्ता’मधील बातमी आणि ‘लोकप्रभा’तील लेखामुळे मिळाली.
नोव्हेंबर महिन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सचिन आपला अखेरचा कसोटी सामना खेळत असताना ते निमित्त साधून क्रिकेटविश्वातील या देवाविषयी बरेच काही छापून येत होते. त्याचदरम्यान ‘लोकसत्ता’च्या ठाणे कार्यालयात कळव्यातील सुधाकर फडके सचिनचे फोटो घेऊन आले. सचिन अवघ्या चार महिन्यांचा असताना, त्याच्या आजोळी डोंबिवलीत काढलेले हे फोटो यापूर्वी कुठेही प्रसिद्ध झालेले नव्हतेच. इतकेच काय दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरनेही ते कधी पाहिले नव्हते. १५ नोव्हेंबरच्या ‘लोकसत्ता’त ‘ठाणेकर फडक्यांनी जपल्या डोंबिवलीकर सचिनच्या स्मृती’ या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध झाली. तोंडात बोट घालून आईच्या मुखाकडे कौतुकाने बघणाऱ्या लहानग्या सचिनचा फोटोही या बातमीत प्रसिद्ध झाला होता. त्यानंतरच्या आठवडय़ात ‘छोटा सचिन’ या ‘लोकप्रभा’तील लेखात सचिनची सुधाकर फडकेंनी काढलेली अन्य दुर्मीळ छायाचित्रेही होती. सचिनला एका निकटवर्तीयाकडून या दुर्मीळ छायाचित्रांविषयी समजले. करमरकर नावाच्या त्या गृहस्थांनी सचिनला लोकप्रभेतील ती छायाचित्रे दाखवली. दरम्यान ‘लोकसत्ता’ची बातमीही फेसबुकच्या माध्यमातून बरीच ‘लाइक’ झाली होती. वडिलांचे मित्र असणाऱ्या आणि आपले सर्वात लहानपणचे फोटो काढून ते जतन करून ठेवणाऱ्या सुधाकर फडकेंना भेटण्याची इच्छा सचिनने व्यक्त केली आणि अखेर सोमवारी ९ डिसेंबरला तो योग जुळून आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा