सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला ‘सैराट’ चित्रपट ग्रामीण भागातील जातवास्तवाचे चित्रण करतोच शिवाय तेथील शिक्षण व्यवस्था व अर्थकारणावरही नेमके बोट ठेवतो. व्यावसायिकदृष्टय़ा ‘सैराट’ यशस्वी होण्यामागे दिग्दर्शीय प्रतिभेसह जातिसंस्थेच्या विनाशाला आसुसलेल्या जनतेचाही भाग आहे. जातीसंस्थेचे बळी असणाऱ्या बहुसंख्य भारतीयांनी व्यापलेले हे ‘कास्ट मार्केट’ ही ‘सैराट’ पायवाट राजमार्गात रूपांतरित करील, अशी इवलीशी आशा आता वाटू लागली आहे.
जात हे भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय कलावंत हे जातिग्रस्त भारतीय मातीतूनच निर्माण झाले असल्याने सामाजिक ‘जात’ वास्तवाचा त्याच्या जाणीव-नेणिवेवर प्रभाव पडणे क्रमप्राप्त आहे. भारतीय नाटय़-सिनेसृष्टीलाही जातिसंस्थेचे बांध पडले असल्याने शुद्ध वर्गीय या अर्थाने ती व्यावसायिक नाही. परिणामी ‘बॅण्डिट क्वीन’ अथवा ‘सुजाता’ असे नियम सिद्ध करणारे अपवाद वगळता सामान्यत तथाकथित व्यावसायिक भारतीय दिग्दर्शकाला जातिसंस्थेच्या शासन-शोषणात नाटय़ आढळल्याचे ठळकपणे दिसून येत नाही.
या पाश्र्वभूमीवर, दिग्दर्शक नागराज मंजुळे भारतीय सिनेसृष्टीत नवा अध्याय लिहित आहेत, असे म्हणावे लागेल. भौतिक मुक्तीच्या या काळात ‘जात’ उच्च जातीयांनासुद्धा त्रासदायक ठरू लागली आहे. हे अर्थातच तिच्या अंतकाळाचे सुचिन्ह आहे. मात्र या अंतकाळातदेखील सतानी जातिसंस्था शेवटचे आचके देत ‘सैराट’ वागत आहे. हे शेवटचे आचके एवढे अमानुष असतील तर तिच्या ऐन उभारत्या काळात काय घडले असेल!
कथानक साधेच आहे. एफवाय बीएमध्ये शिकत असलेल्या अर्चना ऊर्फ आर्ची व प्रशांत ऊर्फ पश्र्या या ग्रामीण विद्यार्थ्यांची ही प्रेमकथा आहे. अशा प्रेमकथा आपल्या आजूबाजूला घडत असतात. परंतु एखाद्याच नागराजला त्यातील नाटय़ गवसते. ‘सैराट’ ग्रामीण भागातील जातवास्तवाचे चित्रण करतोच शिवाय तेथील शिक्षण व्यवस्था व अर्थकारणावरही नेमके बोट ठेवतो. पश्र्या पारधी व आर्ची पाटील यांच्या जातीच्या नामसाधम्र्यात ‘पा’ असला व शेवटच्या दोन अक्षरांतील अकार-ईकार काही अक्षरांसह मागेपुढे झालेला असला तरी हा फरक जातीय समाजरचनेत आकाश पाताळासारखाच आहे. जिथे एकाच मराठा जातीतील देशमुख पाटलाला तुच्छ समजतो व पाटील सामान्य मराठय़ांना कपदार्थ समजतो तिथे पाटील-पारधी प्रेमविवाह म्हणजे अब्रह्मण्यम! त्यामुळे भौतिक मुक्तीची आर्ची पारध्याच्या पश्र्याला मिळणार कशी? मिळाली तरी ब्राह्मणवादाची गुलामी ‘एन्जॉय’ करणाऱ्या साधनसामग्री संपन्न पाटलांच्या राज्यात अभावग्रस्त पश्र्या स्वतसह तिलाही सुरक्षित ठेवणार कसे?
यानिमित्ताने एकेकाळी महात्मा फुले यांच्या चळवळीत हिरिरीने भाग घेणारा मराठा समाज, निदान त्यातील एक हिस्सा, आज ग्रामीण भागात सतानी जातिसंस्थेचा कट्टर पुरस्कर्ता म्हणून का उभा राहिला आहे, यावर मंथन होणे आवश्यक आहे. खेडय़ापाडय़ांत शेतीच्या जमिनीची बहुसंख्य मालकी मराठा जातीकडे आहे. डॉ. आंबेडकरांनी ‘स्मॉल होिल्डग्ज’मध्ये सांगितल्याप्रमाणे तुकडे पडल्यामुळे व यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे आज सामान्य शेतकरी आतबट्टय़ात चालला असला तरी त्याच्या अडीनडीला मदत म्हणून स्वजातीय भाऊबंद व जातीय अर्थशास्त्रावर आधारित सहकारी पतपेढय़ा, कारखाने, शिक्षण संस्था, दूध डेअऱ्या हात देतात. तथागतप्रणीत ‘अनित्यता’ सिद्धांताप्रमाणे मराठा जात एकसंध नाही, हे खरे आहे. त्याचप्रमाणे संकरामुळे चांगले धान्य-पशू मिळतात, हेदेखील हाडाच्या शेतकऱ्याला अनुभवाने माहीत आहे. शाहू महाराजांनी आपल्याच घराण्याचा एका धनगर घराण्याशी सोयरसंबंध जोडला होता, ही वस्तुस्थिती निदान अभ्यासू मराठय़ांना माहीत असण्यास काहीच हरकत नसावी. मात्र, एका मुलीचा आंतरजातीय विवाह झाला की सग्यासोयऱ्यांत नाचक्की होते व घरातील तसेच भाऊबंद नातेवाईक यांच्याकडील उपवर मुलींना स्थळे मिळत नाहीत, या चिंतेपोटी हा सामान्य मराठा शेतकरी आंतरजातीय विवाहाचा विरोधक झाला आहे. हापूस आंबे आवडीने खाणाऱ्या व जर्सी गाईच्या दुधाचा पुरवठा करून रुपयांच्या चळती मोजणाऱ्यांना ब्राह्मण-मेहेतर, सारस्वत-मातंग, कायस्थ-चर्मकार, मराठा-ढोर अशा सरसकट आंतरजातीय विवाहांतून अधिक बुद्धिमान व सक्षम पिढी निर्माण होणार आहे, हे कळते आहे. फक्त जातिसंस्था निर्मूलनाच्या या संक्रमणशील काळात ‘पडिले वळण सकळ इंद्रिया’ या भूतकाळातील न्यायाने ते वळत नाही!
यावर उपाय काय? आर्ची-पश्र्याचा निशब्द करणारा कारुण्यमय शेवट हा विध्वंसक उपाय बेकायदेशीर आहेच शिवाय नव्या विध्वंसाला जन्म देणारा आहे. तात्या पाटलाच्या घरातील दोन गोजिरवाण्या मुलींच्या तथाकथित सुरक्षित भविष्यासाठी आर्ची-पश्र्याचा बळी दिला गेला आहे, हे उघड आहे. तथापि, जातीची सुरक्षितता ही आभासी असल्याचे ख्यातनाम मराठी साहित्यिक सांगतात. कालवश विभावरी शिरुरकर यांनी टिपलेले ‘कळ्यांचे नि:श्वास’ कोणाही संवेदनशील व्यक्तीला बेचन करतात. कादंबरीत भालचंद्र नेमाडे यांनी खानदेशातील लेवा पाटील महिलांच्या दुखाचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. ‘आयदान’मधून ऊर्मिला पवार, तर ‘निळ्या डोळ्यांच्या मुलीची गोष्ट’ सांगताना शिल्पा कांबळे आंबेडकरी समाजातील महिलांच्या व्यथावेदनांना बोलते करतात. ओबीसी-मुस्लीम स्त्रियांची अवस्था यापेक्षा भिन्न असू शकत नाही. खरे तर सर्वजातीय उपवर मुलींच्या लग्नाचा प्रश्न सतानी जातिसंस्थेने अतिशय जटिल बनविला आहे. म्हणूनच त्या आर्चीसारखे बंड करण्यास धजावत आहेत. आज निव्वळ ‘पदर जुळत नाही’ म्हणून कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो विवाहयोग्य मुली एकटय़ाने आयुष्य कंठीत आहेत. मंगळ, पत्रिका अशा राहू-केतूंचे बळी असलेल्यांची संख्याही लक्षणीय आहे. मग या लक्षावधी मुलींना आपल्याच जातींमध्ये विवाहयोग्य मुले का मिळत नाहीत? याचाच अर्थ असा की, जातिसंस्था अशीच राहिली तर तात्या पाटलाच्या घरातील दोन गोजिरवाण्या मुलींचे भविष्य एक तर महिलांसारखे असेल अथवा पदर न जुळणाऱ्या, मंगळ-राहू-केतुग्रस्त मुलींसारखे असेल अथवा त्यांनी बंड केलेच तर आर्चीसारखे असेल! मथितार्थ असा की, समस्त भारतीय स्त्रियांच्या दुखाला सतानी जातिसंस्था जबाबदार आहे. ती मोडीत काढून दुख विनाश करता येऊ शकतो. तथापि, तात्या पाटील जे दुखाचे कारण आहे त्यालाच उपाय समजत आहे. हे गतानुगतिक मानसिकतेचे लक्षण आहे. पारधी जात पंचायतीपुढे ढसढसा रडून शरण जाणारा पश्र्याचा पितादेखील अशाच मानसिकतेचा बळी आहे. अशा भूतकाळात रमलेल्या प्रतिगामी मानसिकतेला उज्ज्वल भविष्याची सोनेरी किरणे कशी दिसणार? सबब, आपल्याच जातीच्या भोंगळ व विजोड स्थळांपेक्षा दुसऱ्या जातीच्या अधिक चांगल्या व अनुरूप स्थळांना प्राधान्य देऊन आपल्या समाजाने विवाह न होऊ शकलेल्या मुलींचा प्रश्न सोडवायला हवा. ही सोडवणूक विधायक आहे. तिला कायद्याचा आधारदेखील आहे. ‘सैराट’ सुरू होतानाच, क्रिकेटच्या सामन्यात उच्च जातीय परंतु लायकी नसलेल्या मंग्याच्या जागी कनिष्ठ जातीय परंतु लायक पश्र्या उभा करून दिग्दर्शकाने हे फार सहजतेने दाखविले आहे.
‘सैराट’मधील शिक्षण व्यवस्थेचे चित्रण आपल्या शैक्षणिक दुरवस्थेवर झगझगीत प्रकाश टाकणारे आहे. मोबाइलवर जोराने बोलू नको, असे सांगणाऱ्या प्राध्यापकाच्या कानशिलात वाजविताना तात्या पाटलाच्या ‘सु’पुत्राला- प्रिन्सला काहीही वाटत नाही. तसेच शिक्षक-प्राध्यापकांना संस्थाचालकांच्या घरगुती सभा-समारंभांना खंडणीसह कशी वेठबिगारी करावी लागते, हे चित्रणही भन्नाट आहे. असा हा (फुले-आंबेडकरांचा!) महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात, जागतिक तर सोडाच निदान राष्ट्रीय स्तरावर तरी कसा नावलौकिक मिळविणार आहे? अशा ग्रामीण महाराष्ट्रातील संस्थाचालकांचे सर्व ‘बुद्धिजीवी’ शिक्षक-प्राध्यापक बटीक झाल्यावर तेदेखील शेज सजविण्याच्या पलीकडे महिलांचा विचार कसा काय करणार? अशा प्राध्यापकांपेक्षा ‘विद्यार्थी’ पश्र्या अधिक प्रगल्भ आहे. तो आर्चीवर आपले खरे प्रेम असल्याचे सांगून आपल्या गुरूंवर ‘माणूस’ म्हणून मात करतो!
‘सैराट’मधील खरा संदेश हा सत्तेत वाटा न मिळालेला असंतुष्ट मराठा (मंग्या), मुस्लीम (सलीम) व पूर्वास्पृश्य (विजय बनसोडे) या त्रिकुटाच्या एकीकरणाचा आहे. साखर कारखाने, बाजार समित्या, सहकारी संस्था, शिक्षण केंद्रे इत्यादी सत्ताकेंद्रे ताब्यात असूनही ग्रामीण भागातील गरीब मराठा व गरमराठा जनतेवर वर्चस्व गाजविणे तात्या पाटलांसारख्यांना जोखमीचे होत चालले आहे. तात्या पाटलाचा ‘आम्ही म्हणू ती पूर्व दिशा’, हा हेका ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणाईला मान्य नसून ते पेशवाई-मोगलाईसदृश या ‘पाटीलशाहीला’ पायबंद घालण्याच्या प्रयत्नात आहेत, असे यातून दिसून येते. माजी राज्यकत्रे असल्याच्या अहंगंडातील पोकळपणा मुस्लीम सलीमला कळून चुकला आहे. तर शहरी मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व प्राप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीशी ‘कनेक्ट’ न होऊ शकलेल्या (म्हणून फेंगडय़ा पायाचा दाखविलेल्या) विजयने प्रेमभंग पचविला आहे. सलीम-विजय हे ‘ट्रबल शूटर्स’ जीवाचा धोका पत्करून पश्र्याला साथ देतात, तर मंगेश जिवाचा धोका न पत्करता! साथ देण्यातील हा फरक लक्षणीय आहे व ‘जात’ विचारात घेतल्याशिवाय त्याचे आकलन होऊ शकणार नाही. तथापि मंगेश, सलीम व विजय यांच्यामुळेच आर्ची व पश्र्या आपल्या प्रेमाचा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पार करतात. आर्ची हे भौतिक मुक्तीचे प्रतीक असेल तर ही भौतिक मुक्ती मिळविण्यात हे त्रिकूट यशस्वी ठरले आहे, हे निर्वविाद. मात्र, कळीचा मुद्दा भौतिक मुक्ती मिळविण्याचा नसून ती टिकवून ठेवण्याचा आहे. ‘फॅण्ड्री’मध्ये नागराज मंजुळे यांनी भटक्या जब्या व बौद्ध पिराजी यांची दोस्ती दाखविली आहे. ‘सैराट’मध्ये त्यात मुस्लीम सलीम व गरीब मराठा मंग्याची भर पडली आहे. मात्र अजूनही त्यात गावकुसाच्या आत असणारा साळी, तेली, कुंभार, धोबी, सुतार, लोहार या ५२ टक्के ओबीसींची भर पडलेली नाही. ही भर पडल्याशिवाय भौतिक मुक्ती टिकविता येणार नाही. डॉ.आंबेडकर यांनी पाचव्या खंडात वर्णन केलेल्या जातिसंस्था निर्मूलनाच्या व्यूहरचनेप्रमाणे ओबीसींची साथसंगत अत्यावश्यक आहे. ‘सैराट’मध्ये ही साथसंगत दिसत नाही. म्हणूनही आर्ची-पश्र्याचे बंड अपयशी ठरले.
शेवटी, ग्रामीण अवकाश व शहरी अवकाशातील फरकाकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. मागास जाती-जमातींचे शहरीकरण बकाल वस्त्यांत झालेले असले तरी तिथे श्रम विकण्याचे ‘स्वातंत्र्य’ आहे. आर्ची-पश्र्याला आसरा देणाऱ्या परित्यक्तांसह कोटय़वधी मागासवर्गीयांनी याच अवकाशात आपला विकास साधला आहे. आंधळ्यासह भीक मागणाऱ्या जोडप्याकडून प्रेमाचा ‘साक्षात्कार’ झालेली आर्चीदेखील तिथून पुढे सलीमकडून दुचाकी दुरुस्ती शिकलेल्या पश्र्यासह याच अवकाशात आपल्या सहजीवनाला मोहक आकार देते. वडिलांवरील प्रेम मुलाला त्यांचेच नाव ठेवून ती अभिव्यक्त करते. मात्र, जातिसंस्थेने सैतान बनविलेला पिता प्रिन्समार्फत आपल्याच नातवाला मातेच्या रक्ताने भरलेली पावले टाकावयास लावून अज्ञात भविष्यात सोडून देतो !
व्यावसायिकदृष्टय़ा ‘सैराट’ यशस्वी होण्यामागे नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शीय प्रतिभेसह जातिसंस्थेच्या विनाशाला आसुसलेल्या जनतेचाही भाग आहे. याच जनतेने ‘ओह, माय गॉड!’ व ‘पीके’ यशस्वी करण्यात हातभार लावला आहे. शेंडा-बुडखा नसलेली कथानके, अनावश्यक िहसाचार, अंगविक्षेपी पांचट विनोद व स्वैराचाराचे कल्पनाविश्व यांत गुंतवून ठेवलेले भारतीय प्रेक्षक आधुनिक मूल्यांशी बांधिलकी असणाऱ्या चित्रपट कथानायक-नायिकांशी तादात्म्य पावतात, हा एक फार चांगला संकेत असून तो देशातील ‘कास्ट मार्केट’कडे अंगुलीनिर्देश करतो. जातीसंस्थेचे बळी असणाऱ्या बहुसंख्य भारतीयांनी व्यापलेले हे ‘कास्ट मार्केट’ नागराज मंजुळेंची ‘सैराट पायवाट राजमार्गात रूपांतरित करील, अशी इवलीशी आशा आता वाटू लागली आहे. ही आशा उद्याचा समतामय व सामथ्र्यशाली भारत उभा करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा