१९८० च्या दशकात शरद जोशींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकवार या राज्यातला शेतकरी संघटित झाला होता. पुढे सुमारे पंधरा-वीस वर्षांत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व राष्ट्रीय पातळीवरही शेतकरी चळवळीने विविध वळणं घेतली. कोणत्याही चळवळीत अनुभवाला येणारे चढ-उतार पाहिले. काही वेळा अपयशाचंही धनी व्हावं लागलं, पण ‘शेतीमालाला रास्त भाव’ हा विषय राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेवर आणण्याचं श्रेय जोशींच्या नेतृत्वाखालील या चळवळीला अपरिहार्यपणे जातं.
तसं पाहिलं तर तो एक मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबातला तरुण. अर्थशास्त्र विषयात एम.ए. पदवी संपादन केली आणि स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी झाल्यावर इंडियन पोस्टल सव्‍‌र्हिसमध्ये नोकरीही मिळाली. त्यानिमित्ताने परदेशात काम करत असताना जागतिक पातळीवरचे व्यापार-उद्योगाच्या विकासाबाबतचे अनेक अहवाल वाचायला मिळाले आणि आपल्या देशाच्या दारिद्रय़ाचं मूळ शोधणाऱ्या त्या तरुणाला उत्तरही गवसलं. शेतीप्रधान म्हणवणाऱ्या या देशात शेतीचा व्यवसाय तोटय़ातच ठेवण्याची व्यवस्था सत्ताधाऱ्यांनी केल्यामुळे त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसत असल्याचं त्याला जाणवलं, पण हे प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे तपासून पाहण्याची गरज होती. त्याबाबतची ओढ इतकी तीव्र होती की, १९७६ मध्ये परदेशातली ती गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून तो तरुण भारतात परतला. पुण्याजवळ आंबेठाण इथे जिरायत शेती खरेदी करून शेतीतल्या अर्थशास्त्राचे प्रयोग सुरू झाले. सर्व प्रकारच्या साधनसामग्रीचा वापर करूनही शेती तोटय़ातच राहते, कारण शेतीमालाला उत्पादनावर आधारित रास्त दर देण्याची व्यवस्था इथे नाही, या तात्त्विक भूमिकेला त्या प्रयोगांमधून पुष्टी मिळाली. मग हे तत्त्वज्ञान भवतालच्या सामान्य, अडाणी, अर्धज्ञानी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याची धडपड सुरू झाली. त्यातून शेतकरी संघटित होत गेला आणि एक दिवस पुणे-नाशिक रस्त्यावर चाकणच्या शेतकऱ्यांनी बैठक मारून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. या अभिनव, अराजकीय शेतकरी आंदोलनाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यापाठोपाठ झालेल्या नाशिक जिल्हय़ातल्या ऊस आंदोलनाने या चळवळीच्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली.
देशातल्या शेतीच्या व्यवहाराला अर्थशास्त्राची भक्कम बैठक शरद जोशींनी दिलीच, शिवाय या विचाराच्या प्रसारासाठी कार्यकर्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलं. सुरुवातीच्या काळातल्या शंकरराव वाघ किंवा बाबूलाल परदेशी यांच्यासारख्या चाकण परिसरातल्या स्थानिक कार्यकर्त्यांबरोबरच भास्करराव बोरावके, माधवराव खंडेराव मोरे, प्रल्हाद पाटील-कराड, अनिल गोटे, राजू शेट्टी यांच्यासारखी मोठय़ा सभांमधून शेतकऱ्यांना चेतवू शकणारी मंडळीही त्यांच्याभोवती गोळा झाली. प्रा. सुरेशचंद्र म्हात्रेंसारखे अबोलपणे शिस्तबद्ध काम करणारे कार्यकर्ते मिळाले. शेतकरी महिलांचं चांदवडला झालेलं अधिवेशन हे तर वेगळय़ा पातळीवरच्या संघटन कौशल्याचा ऐतिहासिक आविष्कार होता. सार्वजनिक जीवनाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना अशा स्वरूपाची, राज्याच्या ग्रामीण, सामाजिक-आर्थिक जीवनाला व्यापणारी चळवळ उभी करण्याचं शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललं, कारण ‘कोणताही मनुष्य शंभर टक्के निरुपयोगी नसतो’, या विचारावर त्यांची गाढ श्रद्धा होती आणि त्याच आधारे भवताली जमणाऱ्या ‘शेतकरी भावा-बहिणीं’च्या पाठीवर थाप मारत लढण्याचं बळ दिलं. एरवी काहीसे फटकळ वाटणारे जोशी आंदोलनातल्या हिंसाचारात कार्यकर्त्यांचा बळी गेला तर मात्र इतके हळवे होत की, त्याच्या कुटुंबीयांना सराईत राजकारण्याप्रमाणे लगेच भेटायला जायचंही टाळत असत. त्याबाबत एकदा छेडलं असता ते म्हणाले होते की, त्याच्या कुटुंबाची त्या काळातली अवस्था मी पाहिली असती तर मला पुन्हा आंदोलन छेडण्याचं धर्य झालं नसतं!
शेतकऱ्याच्या दारिद्रय़ाचा शोध घेण्याच्या ओढीने पत्नी आणि दोन मुलींसह जोशी भारतात आले खरे, पण त्यानंतरचा काही काळ, आपला हा निर्णय चुकला तर नाही ना, असं त्यांना वाटून जात असे. ‘या विचाराने अस्वस्थ होऊन मी रात्री मध्येच जागा होत असे, पण नंतर झोपताना विचारांची तोटी बंद करण्याचं कौशल्य मी आत्मसात केलं,’ असं रहस्य त्यांनी गप्पांच्या ओघात उघड केलं होतं. पत्नी लीला यांच्या आकस्मिक निधनानंतर ‘आता काही काळासाठी तरी माझ्या आयुष्याची चौकट मोडल्यासारखी झाली आहे,’ असं त्यांनी बोलून दाखवलं होतं.
हिंदी, मराठी, इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन या भाषांवर प्रभुत्व असलेल्या जोशींना मराठी साहित्याचीही मोठी आवड होती. एकदा प्रवासात केवळ मराठी कवितांच्या भेंडय़ा सुरू झाल्या आणि जोशींनी सर्वाना हरवलं. संस्कृत भाषेच्या भक्कम पायामुळे आपल्या साहित्यिक जाणिवा जास्त प्रगल्भ आणि समृद्ध झाल्या, असं ते अभिमानाने म्हणत. शेतीची प्रयोगभूमी असलेल्या आंबेठाणच्या शेतघराला ‘अंगारमळा’ आणि पुण्यातल्या उच्चभ्रू सिंध हौसिंग सोसायटीतल्या बंगल्याला ‘मृद्गंध’ ही त्यांनी दिलेली नावंही अतिशय समर्पक होती. आंदोलनाच्या काळात भवताली पोलिसांचा बंदोबस्त असताना कार्यकर्त्यांना पत्नीमार्फत आवश्यक संदेश पाठवण्यासाठी त्यांनी फ्रेंच भाषेचा वापर केल्याचा किस्सा कार्यकर्ते नंतर किती तरी दिवस रंगवून सांगत असत.
यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या रूपाने महाराष्ट्रात शेतकऱ्यांची ताकदवान चळवळ उभी राहिली होती, पण काँग्रेसी राजकारणाच्या रेटय़ात तिची वाताहत झाली. त्यानंतर १९८० च्या दशकात प्रथमच शरद जोशींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकवार या राज्यातला शेतकरी संघटित झाला होता. पुढे सुमारे पंधरा-वीस वर्षांत शरद जोशींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात व राष्ट्रीय पातळीवरही शेतकरी चळवळीने विविध वळणं घेतली. कोणत्याही चळवळीत अनुभवाला येणारे चढ-उतार पाहिले. काही वेळा अपयशाचंही धनी व्हावं लागलं, पण ‘शेतीमालाला रास्त भाव’ हा विषय राष्ट्रीय कार्यक्रम पत्रिकेवर आणण्याचं श्रेय जोशींच्या नेतृत्वाखालील या चळवळीला अपरिहार्यपणे जातं.
कोणत्याही चळवळीत नेत्याला आंदोलन मागे केव्हा आणि कसं घ्यायचं, याचं भान आधी ठेवावं लागतं, असं जोशी म्हणत असत. दूध-भातसारख्या आंदोलनाच्या निमित्ताने आलेलं अपयश त्यांनी जाहीरपणे मान्य केलं. त्याचबरोबर मालेगाव तालुक्यात टेहरे इथे आयोजित शेतकरी अधिवेशनाच्या दिवशीच इंदिरा गांधींची हत्या झाल्यामुळे अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय किंवा पुण्यात सारसबागेसमोर आयोजित शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी राजीनामा दिल्याचं कळताच मागे घेण्याचा निर्णय त्यातूनच आला होता. याच संदर्भात काही वेळा बोलताना, ‘शेतकरी आंदोलन म्हणजे काही रोज तीन खेळ व्हायलाच हवेत असा सर्कशीचा प्रयोग नाही,’ असं ते ठासून सांगत असत.
गेल्या काही वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्यामुळे जोशींचे दौरे, जाहीर कार्यक्रम काहीसे कमी झाले होते, पण बोपोडीच्या घरी निवांतपणाच्या काळात रेल्वेचं प्रदर्शन उभं करण्याचा छंद जोपासण्याचा प्रयत्न त्यांनी करून पाहिला होता. उमेदीच्या काळात पूर्ण इहवादी असलेले जोशी अलीकडच्या काळात काहीसे अध्यात्माकडे झुकू लागले होते. चित्रपटांच्या सीक्वेलच्या भाषेत बोलायचं तर हा शरद जोशी-२ आहे, ही ड्रायव्हर बबन शेलारची कॉमेंट सांगून ते स्वत:ही हसत असत, पण त्या आवर्तातून पुन्हा बाहेर येत ते पूर्वीप्रमाणे तात्त्विक मांडणी करू लागले होते. काही महिन्यांपूर्वी ‘लोकसत्ता’साठी घेतलेल्या मुलाखतीतही त्याचं प्रतिबिंब पडलं होतं. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी हेच जोशींसाठी खरं टॉनिक होतं. ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना त्यांनी तसा मनसुबाही व्यक्त केला होता. दुर्दैवाने तसं फारसं शक्य झालं नाही. नाशिकच्या ऊस आंदोलनाचा आँखो देखा हाल सर्वप्रथम सादर करणाऱ्या साप्ताहिक ‘माणूस’च्या दिवाळी अंकात संपादक कै. श्री.ग. माजगावकर यांनी जोशींना ‘योद्धा शेतकरी’ हा किताब दिला होता. आयुष्याच्या अखेपर्यंत तो मात्र त्यांनी प्राणपणाने जपला.
pemsatish.kamat@gmail

Story img Loader