दलत्या परिस्थितीत टिकाऊ पदार्थ निर्माण करण्याच्या प्रयत्नातून द्राक्षापासून बेदाणा निर्मिती सुरू झाली, याला आता भौगोलिक मानांकनही मिळाले आणि चवही जगभर पोहोचली. सांगलीच्या हळदीबरोबरच बेदाण्याची ख्यातीही सातासमुद्रापार पोहोचली. द्राक्ष उत्पादनातील अनियमितता, दराची अशाश्वतता यातून बेदाण्याकडे कल वाढला असून, चालू वर्षी बेदाणा उत्पादन कमी होण्याचा अंदाज आल्याने दरही वधारले आहेत. गेल्या आठवड्यात प्रतिकिलो ३७१ रुपये सर्वोच्च दर मिळाल्याने यंदा बेदाणा उत्पादकांच्या हाती चार पैसे अधिकचे मिळतील असे वाटत असले, तरी बाजारातील फसवणुकीचे प्रकारही बंद होण्याची गरज या निमित्ताने भासत आहे.

सांगली जिल्ह्यातील द्राक्षांची १९७८-७९ पासून दुबईत निर्यात सुरू झाली. या वेळी पॅकिंग करताना मोठ्या प्रमाणात मणी शिल्लक राहत होते. ते मणी प्रथम उन्हामध्ये वाळवून काळा बेदाणा बनविण्यात आला. येथूनच खऱ्या अर्थाने बेदाणा उत्पादन व विक्रीची सुरुवात झाली. नंतरच्या काळात बागा वाढल्याने द्राक्ष निर्यातही वाढली. स्थानिक मार्केटमध्ये प्रतवारी सुरू झाली आणि त्यामुळे वेस्टेज मणी प्रमाण वाढले. उन्हामध्ये बनलेल्या काळ्या बेदाण्यास योग्य भाव मिळेनासा झाला. यामधूनच चांगला बेदाणा कसा करता येईल याचे प्रयोग सुरू झाले. आता हिरवा, पिवळा आणि काळा अशा तीन पद्धतीचे बेदाणा उत्पादन होते. मात्र, टपोरा, कणीदार, काचेसारख्या फुगीर बेदाण्याला मागणी आणि दरही चांगला मिळत आहे. हिरव्या बेदाण्याच्या उत्पादनाची सुरवात सर्वप्रथम दंडोबा डोंगराजवळ रॅकद्वारे झाली. नंतर मणेराजुरीशेजारी कोडाचे माळ येथे बेदाणा बनविला. या वेळी जुनोनी, शेळकेवाडी, आगळगाव या भागाचा भौगोलिक अभ्यास करून हा परिसर बेदाणा बनविण्यासाठी योग्य आहे, असा निष्कर्ष काढला. त्यानुसार तेथे बेदाणा शेडची मोठ्या प्रमाणात उभारणी सुरू झाली.

सन १९८६ पासूनचा काळ हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने परिवर्तनाचा ठरला. कारण त्यांना आता उत्पादनाचा आणखी एक मार्ग गवसला होता. शेतकरी कष्टाने द्राक्षाचे भरघोस उत्पादन घेऊ लागला. परंतु द्राक्षाच्या वाढलेल्या उत्पादनासाठी हवी तेवढी बाजारपेठ भारतात उपलब्ध नव्हती. त्यामुळे द्राक्षाचे दर कोसळू लागले. पर्यायाने शेतकरी रॅक उभे करून पिवळा व हिरवा बेदाणा बनवू लागले. पण, बाजारपेठ, साठवणुकीचा मोठा प्रश्न होता. शेतकरी बेदाणा घेऊन मुंबई, दिल्लीवारी करू लागले. परंतु त्यांच्या पदरी परत निराशा आली. कारण काही ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक झाली. त्यानंतर तासगाव आणि सांगली बाजार समितीमध्ये बेदाण्याच्या खुल्या सौद्यांना सुरुवात झाली.

झालेले उत्पादन साठविण्यासाठी शीतगृहाची गरज लक्षात आल्यानंतर कोल्ड स्टोअरेज व्यवसाय सांगली व तासगाव येथे उदयास आला. स्थानिक शेतकरी व तरुण उद्याोजकांनी या व्यवसायात पदार्पण केले. जेव्हा दर नसेल त्या वेळी शेतकरी स्टोअरेजमध्ये बेदाणा ठेवून व दर वाढल्यानंतर विक्रीस काढू लागले. जिल्ह्यातील सहकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बँकाही बेदाणा तारणावर कर्ज देऊन शेतकऱ्यांना मदत करू लागल्या. यावर स्थानिक मार्केट कमिट्या नियंत्रण ठेवू लागल्या. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक ताकद वाढण्याबरोबरच फसवणूकही रोखली गेली.

बेदाणा उद्याोगाने फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केला आहे. बेदाणा उत्पादन झाले नसते, तर द्राक्षबागा वाढल्या नसत्या. आता द्राक्षबागांबरोबरच जुनोनी, आगळगाव, शेळकेवाडी, तसेच ज्या ज्या ठिकाणी हजारो बेदाणे, शेड उभी राहिली. त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला. किराणा दुकानदार, हॉटेलचालक यांनाही व्यवसाय मिळाला. या भागामध्ये सर्वांत मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाताला बेदाणा निवडण्याचे काम मिळाले. अनेक लोकांच्या संसाराला या बेदाणा उद्याोगाचा हातभार लागला. असाच रोजगार सौदे निघण्याच्या ठिकाणी निर्माण झाला. आज एका व्यापारी पेढीत सात-आठ जण काम करतात. कोल्ड स्टोअरेजमुळे अनेकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. हमाल, ऑपरेटर, दिवाणजी, मॅनेजर, वॉचमन, ड्रायव्हर, वाहतूक व्यवसाय करणारे अशांना रोजगाराच्या संधी या बाजारपेठेने निर्माण केल्या.

गंधकविरहित बेदाणा हवा

बेदाण्याच्या वाढलेल्या उत्पादनाबरोबरच त्यांच्या दर्जातही घट झालेली दिसते. याला लहरी निसर्ग तितकाच कारणीभूत आहे. यामुळे नाईलाजास्तव गंधकाचा वापर वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून बेदाण्याची प्रत खालावू लागली आहे. त्यामुळे काही प्रमाणात खाण्यास बाधक ठरत आहे. याचा परिणाम बेदाण्याच्या विक्रीवर होऊ लागला आहे. हा धोका व बेदाणा उत्पादक, द्राक्ष बागायतदार संघ व व्यापारी यांनी लक्षात घेऊन संबंधित शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. यातून गंधकविरहित बेदाणा उत्पादनाकडे सर्वांचा कल वाढला पाहिजे.

फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात महाशिवरात्र आहे. यानंतर रमजान ईद, होळी हे सण आहेत. या कालावधीत देशभरात बेदाण्याला मागणीही असते. गेल्या हंगामातील सुमारे ५ हजार टन बेदाणा शिल्लक होता. आता गेल्या आठ दिवसांत नवीन हंगामातील बेदाणा बाजारात येत आहे. तरीही सद्या:स्थिती पाहता बेदाणा उत्पादन कमी होण्याची चिन्हे दिसत असल्याने दरही चांगला मिळेल, अशी अपेक्षा आहे. सध्या सांगली व तासगाव बाजारात प्रतिकिलो दर हिरवा बेदाणा १७० ते २७०, पिवळा बेदाणा १६० ते २०० आणि काळा बेदाणा ७० ते ११० रुपये असे प्रतवारीनुसार दर आहेत. या हंगामात सरासरी सव्वादोनशे ते ३०० रुपये दर राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.

सध्या सांगली व तासगाव बाजार समितीमध्ये आठवड्यातून दोन दिवस बेदाणा सौदे खुल्या पद्धतीने होतात. मात्र, या सौद्यावेळी पाच-दहा पेट्या मालाच्या कलमाचा लिलाव सर्वोच्च दराने सांगून अन्य मालाची कलमे कमी दराने घेतली जात असल्याची तक्रार आहे. तसेच नमुना पाहत असताना होणारी बेदाणा उधळणही मर्यादेबाहेर होत असल्याची तक्रार असून उधळलेला बेदाणा पुन्हा विक्रीसाठी कुणाच्या नावे खपवला जातो हे पाहणेही महत्त्वाचे आहे. यात उत्पादकांचे नुकसान होत आहे. वास्तव दराची कल्पना उत्पादकांना येण्यासाठी बाजार समिती, व्यापारी आणि अडते यांनी पारदर्शी भूमिका घ्यायला हवी. – नागेश केरीपाळे, बेदाणा उत्पादक

उत्पादन घटणार

या वर्षी बेदाण्याला गेल्या वर्षीपेक्षा २० टक्के अधिक दर मिळण्याची चिन्हे आहेत. कारण बेभरवशाच्या हवामानामुळे उत्पादन कमी झाले. उपलब्ध द्राक्षे बाजारात चांगला दर मिळत असल्याने बेदाणा निर्मितीकडे अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षी १ लाख ८० हजार टन बेदाणा उत्पादन झाले होते, ते यंदा १ लाख ६० हजार टनापर्यंत होण्याची चिन्हे आहेत.

digambarshinde64@gmail. com

Story img Loader