सोलापूर जिल्ह्य़ातला सांगोला तालुका म्हणजे दुष्काळाचं बारमाही ठिय्या आंदोलन! साहजिकच आर्थिक कुवत नसलेल्या कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष तीव्र होतो. संसारातली शांतता ढळते आणि तक्रारींचे पाढे वाढत जातात. हे असह्य़ झालं की नवरा-बायको दोघंही सांगोल्याला येतात. तक्रारींच्या मुळावर इथे घाव बसणार आणि सारं सुरळीत होणार, हा विश्वास त्यांना असतो. अनेकदा तसंच घडतं आणि एकमेकांना सांभाळून घेत घराचा गाडा पुन्हा सुरू होतो. अशा कितीतरी कुटुंबांना सांगोल्यात एक आधारस्तंभ मिळालाय. ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या स्वयंसेवी संस्थेचा!
वि वाहानंतर डॉ. संजीवनी केळकर पुण्याहून सांगोल्यात आल्या, तेव्हा तालुक्यात एकही महिला डॉक्टर नव्हती. पुरुष डॉक्टरशी बोलायची लाज वाटते म्हणून ग्रामीण भागातल्या अनेक महिला अंगावरच आजार काढत असत. संजीवनीताई आल्या आणि स्त्रिया दवाखान्याची पायरी चढू लागल्या, आणि कोंडून राहिलेल्या वेदना जिवंत होऊ लागल्या.. रुग्ण म्हणून येणाऱ्या स्त्रियांपकी प्रत्येकीलाच काही ना काही व्यक्तिगत वा कौटुंबिक समस्या आहेत आणि आजारपणातून उभं करण्याबरोबरच अशा महिलांना मानसिक िहमत देण्याचीही गरज आहे, या स्त्रियांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही जाणीव तीव्र होऊ लागली. तालुक्यातल्या प्रत्येक महिलेला सक्षम केलं पाहिजे. तिला आपल्या शक्तीची व क्षमतेची जाणीव करून दिली पाहिजे. ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या जन्माची मुळं इथूनच रुजू लागली होती.
..त्या दिवशी एक मुलगी संजीवनीताईंच्या दवाखान्यात आली. भयंकर अशक्त. पाऊलभर चालली तरी धापा टाकत होती. तिला रक्त देण्याची गरज होती. त्या वेळी सांगोल्यात रक्तपेढी नव्हती. तिची अवस्था पाहून संजीवनीताई खूप चिडल्या. मुलीच्या आरोग्याची काळजी घेतली नाही म्हणून तिच्या आईवर खूप रागावल्या. ‘उद्यापासून मुलीला रोज एक अंडं खायला दे’ असं संजीवनीताईंनी तिच्या आईला सांगितलं आणि ती रडू लागली. हे दृश्यही नवीनच होतं. संजीवनीताईंनी आपली डॉक्टरची भूमिका बाजूला ठेवली. तिला शेजारी बसवून घेतलं आणि त्या मुलीच्या आईचं मन मोकळं होऊ लागलं. आपल्या आजारी मुलीला डॉक्टरकडे नेण्यासाठीही तिने शेजाऱ्यांकडे हात पसरले होते. ‘अशा परिस्थितीत मुलीला पौष्टिक अन्न कुठून देणार?’ आईनं हतबलपणे विचारलं, आणि संजीवनीताई निरुत्तर झाल्या. गरिबीचं रूप इतकं भीषण असू शकतं? ही जाणीव त्यांचं मन पोखरू लागली.
पुढेही असे कितीतरी अनुभव येतच राहिले..
घरोघरी रोज दुधाचा रतीब घालणाऱ्या एका मुलीला नवऱ्यानं टाकलं होतं. एक दिवस अचानक तो आला, तिला घरातून ओढत अंगणात आणलं आणि तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन तो निघूनही गेला. तिच्या आईने संजीवनीताईंकडे धाव घेतली. तिचा आकांत त्यांना पाहवत नव्हता. मुलीला दवाखान्यात आणलं. सत्तर टक्के भाजलेल्या अवस्थेत तिचा मृत्यूपूर्व जबाब लिहून घेतला. तिला मरणानंतर तरी न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी! ती गेली, पण तिच्या जबाबामुळे, तिला जाळून मारणाऱ्या नवऱ्याला शिक्षा झाली.
.. अनेक बायकांना रोज मुकाटपणे, ब्रदेखील न काढता अशा तऱ्हेने अन्याय सहन करावे लागत होते. अशातच वन खात्याच्या नर्सरीत काम करणारं एक जोडपं दवाखान्यात आलं. बाई गरोदर होती. संजीवनीताईंनी तिला तपासलं. गुप्तरोगाचं निदान झालं होतं. त्यांनी नवऱ्याची खरमरीत हजेरी घेतली. दोघं खाली मान घालून निमूटपणे ऐकून घेत होते. अचानक त्या बाईला हुंदका फुटला. मग संजीवनीताईंनी तिला बोलतं केलं, आणि तिनं सांगितलेली हकिगत ऐकून त्या अक्षरश: थिजल्या.
नर्सरीतून माणसं कमी करणार, अशी चर्चा होती. तसं झालं तर नर्सरीत काम करणाऱ्या या जोडप्याची उपासमार अटळ होती. रोजगार टिकवण्यासाठी नर्सरीच्या मुकादमाला रोज रात्री मुक्कामाला घरी आणायचा निर्णय घेतला गेला. नवरा रात्री घराबाहेर अंगणात झोपू लागला. हे असं सहा महिने सुरू होतं. तिच्या पोटातलं मूल आपलं नाही, हे सांगताना तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या वेदनांनी संजीवनीताई कळवळून गेल्या.
.. गरिबीचं हे बीभत्स रूप विक्राळपणे समोर आलं आणि अस्वस्थ मनाची तळमळ संपली. या महिलांना आपण शक्ती द्यायची असं संजीवनीताईंनी ठरवलं. डॉक्टरकीमुळे गावात अनेक महिलांशी मत्रीही झाली होती. रुग्ण म्हणून येणाऱ्या बायकांशीही जिव्हाळ्याचं नातं जडलं होतं. अशातल्याच सात-आठजणींनी आठवडय़ातून एकदा एकत्र यायचं ठरवलं. वर्तमानपत्रं, पुस्तकं वाचायची, त्यावर चर्चा करायची, असं काही आठवडे चाललं. आणि लक्षात आलं की, या बायकांना बोलायचंय, त्यांना व्यक्त व्हायचंय. त्याचीच त्या जणू वाट पाहत होत्या. मग साऱ्याजणींनी मिळून लहानमोठय़ा स्पर्धा सुरू केल्या, आणि बायका व्यक्त होऊ लागल्या. हा काळ होता सुमारे ४० वर्षांपूर्वीचा.
आता संजीवनीताई एकटय़ा नव्हत्या. मुलांसाठी संस्कारवर्ग सुरू झाले. पुढे बालक मंदिराचा विचार पुढे आला. काही महिलांनी पोस्टाद्वारे बालवाडी शिक्षिकेचा कोर्स करायची तयारी सुरू केली. पण बालवाडीसाठी हातात पैसे नव्हते. पुण्यातील प्रसिद्ध जादूगार विजय रघुवीर हे संजीवनीताईंचे वर्गमित्र. त्यांनी सांगोल्यात चॅरिटी शो केला आणि २२ हजार रुपये उभे राहिले. हॉस्पिटलमधल्याच एका खोलीत बालक मंदिर सुरू झालं. मुलांना चांगल्या सवयी लागू लागल्या. घरातलं मुलांचं बदलतं वागणं बघून आई-वडीलही सुखावले. पण बालवाडीनंतर पुढे पुन्हा तिथल्याच त्याच शाळेत जाऊन हे संस्कार कसे टिकणार, या प्रश्नानं पालक बेचन झाले.
इथूनच एका शाळेच्या जन्माची प्रक्रिया सुरू झाली होती. पालकांच्या आग्रहामुळे या प्रक्रियेनं वेग घेतला आणि पहिलीचा वर्ग सुरू झाला. आमदार गणपतराव देशमुख यांनी थेट मंत्रालयातून शाळेची मंजुरी मिळवून आणली आणि शाळा सुरू झाली. ‘ग्राममंगल’च्या धर्तीवरच्या या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना अध्यापनक्षमतेचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि शाळा फोफावत गेली. आज सांगोल्यात ही एक आदर्श शाळा म्हणून उभी आहे.आज इथे दहावीपर्यंत शाळा सुरू आहे..
बदलत्या काळात नवे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. महिलांना कायद्यांचे संरक्षण मिळत आहे, पण कौटुंबिक संघर्ष सौम्य करून प्रबोधनाचे काम करण्याची संस्थेची भूमिका असते. नवविवाहितांच्या वैयक्तिक नाजूक समस्या असतात. त्या उग्र झाल्या, तर वैवाहिक आयुष्याची वाताहत होऊ शकते. हे टाळण्यासाठी, वैवाहिक वाटचालीच्या पहिल्या पावलावरच त्यांचे समुपदेशन करावे लागते. अनेक शाळांमध्ये ‘मत्रीण’च्या वतीने ‘कळी उमलताना’ नावाचे उपक्रम घेतले जातात. चौथीपाचवीच्या मुलामुलींसाठी, ‘ओळख स्पर्शाची’ नावाचा कार्यक्रम चालविला जातो. ‘उत्कर्ष कलामंच’ नावाच्या उपक्रमातून ‘बोल बिन्धास’ नावाने सांस्कृतिक कार्यक्रम केला जातोय. लैंगिक छळाचे अनुभव येत असतील, तर मुलांनी बेधडकपणे ते बोलून दाखविले पाहिजेत, हा त्यामागचा उद्देश.. सतत बंडाचा झेंडा घेऊन पुरुषांशी भांडणे म्हणजे स्त्रीहक्क नव्हे, तर प्रसंगी सामंजस्य दाखविण्यातही शहाणपणा असतो, हेही महिलांना शिकविले जाते.
गेल्या ३१ जुलैला ‘लँग्वेज लॅब’ -भाषा दालन- नावाचा एक नवा उपक्रम सुरू झालाय. मुलं फक्त ‘मार्क्स-वादी’ -म्हणजे, केवळ मार्काच्या मागे लागणारी- नकोत. त्यांचं व्यक्तिमत्त्व घडलं पाहिजे. इंग्रजीचं खूळ खेडय़ातही रुजलंय, पण त्यात मुलांची फरफट होते. शिक्षण यंत्रवत होत जाते, हे लक्षात घेऊन प्रतिष्ठानने पुण्याच्या अक्षरनंदन या प्रयोगशील शाळेची मदत घेतली. आणि सहावी, आठवी, दहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील धडय़ांचे भारतीय उच्चारात, छान आवाजात वाचन करून सीडी बनविल्या. मुलांना आता इंग्रजी सोपं वाटायला लागलंय.
‘सेवावíधनी’च्या सहयोगाने केलेल्या जलसंधारण प्रकल्पामुळे वाटंबरे, अकोला व निजामपूर या गावांचे सुजलाम् होण्याचे स्वप्न साकारणार आहे. आतापर्यंत या कामासाठी ५० लाखांचा खर्च प्रतिष्ठानने उभा केला. अनेक हात मदतीसाठी पुढे आले, आणि सततच्या दुष्काळामुळे संत्रस्त झालेली गावे सुखद भविष्याच्या स्वप्नांनी आश्वस्त झाली. गणेशनगर वस्तीतील पिण्याच्या पाण्याची वणवण एका टाकीने संपुष्टात आणली..
इथली दख्खन मेंढी प्रसिद्ध आहे. तालुक्यात घोंगडय़ा बनविण्याचा परंपरागत व्यवसाय चालायचा. पण काळाच्या ओघात घोंगडय़ांची मागणी कमी होत गेली आणि अनेक कुटुंबांचा जगण्याचा संघर्ष तीव्र होऊ लागला. मग लोकरीपासून कलात्मक वस्तू बनविण्याचं नवं तंत्र या कुटुंबांना शिकविण्याचा प्रकल्प संजीवनीताईंनी हाती घेतला. आता इथे तयार होणाऱ्या लोकरीच्या जाकिटांना जोरदार मागणी आहे. तालुक्यातल्या खेडोपाडी आरोग्य सुविधांचा अभाव होता. बालमृत्यू, बाळंतपणातील आजार आणि मृत्युदरही वाढता होता. ही समस्या लक्षात घेऊन गावोगावी आरोग्यदूत योजना सुरू झाली. गावागावातील चुणचुणीत मुलींना नर्सिगचं प्रशिक्षण देण्यात आलं. मोबाइल क्लिनिक्स सुरू झाली. गावात आरोग्य तपासणी शिबिरं होऊ लागली आणि गावातील गर्भवती महिला व बालकांच्या आरोग्याबाबत कुटुंबंही जागरूक झाली. आरोग्य जपण्याचं महत्त्व त्यांना उमगू लागलं. आता तालुक्यात माता, बालकं आणि उमलत्या कळ्या निर्भर झाल्या आहेत. कारण, ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या रूपाने त्यांना जगण्यासाठी ‘संजीवनी’ लाभली आहे!
स्वयंविकासाचा मार्ग
१९९० मध्ये सांगोल्यात महिलांसाठी मोफत कायदेविषयक सल्ला व मदत केंद्र सुरू केलं आणि महिलांच्या समस्यांना वाचा फुटू लागली. महिलांवरील अत्याचाराच्या कहाण्या जिवंत झाल्या. २००४ मध्ये या केंद्राला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आणि सांगोल्यात अन्यायग्रस्त, तसंच आर्थिक समस्यांना तोंड देताना हतबल महिलांसाठी ‘मत्रीण’ नावाचा नवा प्रकल्प उभा राहिला. सांगोला तालुक्यात मेंढीपालनाचा परंपरागत व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. मेंढीपालनापासून संगणकापर्यंत अनेक गोष्टींचं शिक्षण देणारं व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू झालं आणि महिलांना स्वयंविकासाची वाट सापडली. अनेक महिला उत्साहाने शिक्षण घेऊ लागल्या. पण व्यवसायासाठी पसा उभा करण्याचं आव्हानही त्यांच्यासमोर होतं. त्याकरता स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याचं संजीवनीताईंनी ठरवलं. आज तालुक्यात असे पावणेतीनशे बचत गट आहेत आणि दोन हजारांहून जास्त महिलांनी स्वयंरोजगाराचं व्यवसाय शिक्षण घेऊन कुटुंबाला उभं करण्याचं आव्हान आत्मविश्वासानं स्वीकारलंय.त्यांच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी, म्हणून कर्तबगार महिलांचा सत्कारही केला जातो. पारंपरिक व्यवसायास प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि स्त्रियांची िहमत वाढली. शब्दाचं वजनही वाढलं आणि कुटुंबातली किंमतही वाढली. परिणामी कुटुंबातलं सौख्य वाढलं. आपण आधी काय होतो आणि आता काय आहोत, या जाणिवेनं महिला सुखावल्या आहेत.
संस्थेपर्यंत कसे जाल?
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान
डॉ. केळकर हॉस्पीटलसमोर, देशपांडे गल्ली, सांगोला, जिल्हा -सोलापूर, ४१३३०७
धनादेश -‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’
(mata balak utkarsha pratisthan)
या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.
देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.
नवी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज..
धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
पुणे कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५ नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३
औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
नगर कार्यालय
संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००
दिनेश गुणे