‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे यंदाचे आठवे वर्ष. सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न बाळगून समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सेवाव्रतींचे कार्य निधीअभावी थांबू नये हा या उपक्रमाचा हेतू. यंदाही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा संस्थांची आम्ही गणेशोत्सवादरम्यान वाचकांना ओळख करून दिली. त्यात वंचितांना मायेची ऊब देत स्वत:च्या पायावर उभ्या करणाऱ्या, अक्षमांना सक्षम करणाऱ्या, दुर्मीळ ज्ञानभांडार जतन करणाऱ्या संस्थांचा समावेश होता. या संस्थांच्या कार्याला यंदाही वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. मदतीच्या धनादेशांचा ओघ आमच्या राज्यभरातील कार्यालयांकडे सुरू आहे. या संस्थांची पुन्हा थोडक्यात ओळख..

वि शेष मुलांच्या संगोपनाचे आव्हान पेलण्यासाठी मुंबई-ठाण्यातील पालकांनी एकत्र येऊन ‘सोबती पालक संघटना’ स्थापन केली. गेल्या १४ वर्षांत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, नियमित आरोग्य शिबिरे, थेरेपी केंद्र ते टुमदार निवासी संकुल उभारण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.

Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
प्रज्ञावंतांना ऊर्जा देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’चे नवे पर्व
AYUSH district hospitals , AYUSH hospitals ,
राज्यात स्वतंत्र १४ आयुष जिल्हा रुग्णालये!
CM Devendra Fadnavis On Happy New Year 2025
Happy New Year 2025 : “महाराष्ट्र आता थांबणार नाही…”, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा
Political Dramas in 2024
Year Ender : २०२४ या वर्षात महाराष्ट्रात पाहण्यास मिळालेली राजकीय नाट्यं कुठली?

कोणत्याही सरकारी मदतीशिवाय केवळ स्ववर्गणी आणि दात्यांच्या मदतीने ‘सोबती’ने वाडा तालुक्यात तिळसा इथे विशेष मुलांना कायमस्वरूपी राहता येईल, अशी अतिशय देखणी वास्तू उभारली. या निवासी केंद्रात ५० विशेष मुला-मुलींच्या राहण्याची सोय आहे. सुरुवातीची दहा वर्षे ठाणे आणि मुंबई येथील केंद्रात ‘सोबती’च्या विशेष मुलांची शाळा भरत होती. निवासी केंद्र सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षांपासून ही विशेष मुले तिथे राहात आहेत. या केंद्राचे वैशिष्टय़ असे की, सोमवारी सकाळी ठाणे-मुंबईतून ही मुले त्यांच्यासाठी व्यवस्था असलेल्या खास बसने तिळसा इथे जातात. पुढील पाच दिवस तिथे राहतात आणि शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी येतात.  तिळसा येथील केंद्राचा सध्याचा वार्षिक व्यवस्थापन खर्च ३० लाखांच्या घरात आहे. पालकांची वर्गणी आणि हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून सध्या कशीबशी जमाखर्चाची तोंडमिळवणी केली जाते. त्यामुळे हे केंद्र भविष्यात सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी समाजातील दानशूरांकडून मदतीचा हात मिळणे गरजे आहे.

धनादेश या नावाने काढा – सोबती पेरेंट्स असोसिएशन

 (SOBATI  PARENTS  ASSOCIATION)

 

बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन

द हशतवादामुळे फरपट झालेल्या चिमुकल्यांना मायेची ऊब देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम गेल्या २२ वर्षांपासून ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ करत आहे. अधिक कदम या मराठी तरुणाच्या या संस्थेने पाच बालिकाश्रमांद्वारे सुमारे २५० मुलींना आसरा दिला.

‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ या संस्थेची नोंदणी पुण्यात झाली आहे. या संस्थेचे जम्मू शहरात तसेच काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग, श्रीनगर, बिरवा आणि कुपवाडा येथे बालिकाश्रम आहेत. ही संस्था मुलींच्या निवासाबरोबरच त्यांच्या शिक्षणाचाही पूर्ण खर्च उचलते. प्रत्येक मुलीमागे दरवर्षी किमान साठ हजार रुपये खर्च येतो. अठरा वर्षांपर्यंत मुलींना बालिकाश्रमात राहता येते. काही मुलींना पदवी शिक्षणाचीही संधी मिळाली आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, हैदराबाद, बंगळूरु, कन्याकुमारी या शहरांमध्ये या मुली शिकत असून, त्यांच्या शिक्षण आणि निवासाचा खर्चही संस्था करते.

जम्मूमध्ये संस्थेने जागा विकत घेतली असून तिथे मोठी इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या बालिकाश्रमात किमान अडीचशे मुली राहू शकतात. ही वास्तू उभारण्याचा खर्च पाच कोटी रुपये असून, आत्तापर्यंत संस्थेला दीड कोटींचा निधी जमवता आला आहे. संस्थेच्या कामाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी ही वास्तू उभी राहणे महत्त्वाचे असून त्यासाठी मदतीचे आवाहन संस्थेने केले आले आहे.

धनादेश या नावाने काढा- ‘ बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’

 (Borderless World Foundation)

 

दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ

शे तकऱ्यांच्या प्रश्नांच्या थेट मुळाशी भिडणाऱ्या संस्थांपैकी यवतमाळची दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ही एक संस्था. या संस्थेने दीनदयाल शेतकरी विकास प्रकल्प हाती घेतला आहे.

दीनदयाल संस्थेने सुरुवातीला व्यापक सर्वेक्षण करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा केली. ज्या विधवा महिलांवर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, ज्यांना कुठलाही अन्य आधार नाही, कोणत्याही प्रकारचा शासकीय लाभ मिळाला नाही, अशा महिलांना त्यांच्यातील कौशल्याच्या आधारे व्यवसाय उभारून देण्याचे प्रयत्न संस्थेने सुरू केले. संस्थेने आत्महत्याग्रस्त चारशे कुटुंबांची निवड करून त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. या कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्याचा विडाच संस्थेने उचलला आहे. २३४ कुटुंबांची स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. या वर्षी आणखी शंभर कुटुंबांना मदत करण्याची योजना संस्थेने आखली आहे.

शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळच येऊ नये, यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन काम सुरू केले आहे. संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार आत्महत्यांसाठी अपुरी सिंचन व्यवस्था, खर्चीक शेती, शेतीपूरक व्यवसायांची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली होणारी लूट, त्याने वाढवलेले परावलंबित्व आदी प्रमुख कारणे समोर आली. यवतमाळजवळील निळोणा येथील कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे साहाय्य करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेला हे कार्य वाढवायचे आहे.

धनादेश या नावाने काढा –‘ दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ ’

(Deendayal bahuuddeshiya prasarak mandal, Yavatmal)

 

स्नेहग्राम

वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महेश आणि विनया निंबाळकर दाम्पत्याने बार्शीमध्ये स्नेहग्राम प्रकल्प सुरू केला. सध्या प्रकल्पातील विद्यालयात ४० मुले शिकत आहेत.भटक्या जमातींसह स्थलांतरित, अनाथ, वंचित, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची मुले, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुलांचे प्रश्न लक्षात घेऊन निंबाळकर दाम्पत्याने बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील माळरानावर हा प्रकल्प सुरू केला. औपचारिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधिष्ठित शिक्षण व व्यावहारिक जीवनानुभव देण्यावर स्नेहग्रामने भर दिला आहे.

सध्या ‘स्नेहग्राम’मध्ये ४० मुले निवासी शिक्षण घेतात. त्यासाठी दरमहा एक लाखापर्यंत खर्च होतो. पत्र्याच्या दोन खोल्यांमध्ये ही शाळा चालते. या दोन खोल्यांमध्येच पाच वर्ग भरतात. या दोन खोल्यांमध्येच या मुलांची राहण्याची सोय करावी लागते. भटक्या, गरजू मुलांची संख्या मोठी आहे. या मुलांनाही या प्रकल्पाच्या छत्रछायेची गरज आहे, पण आर्थिक आधाराअभावी व्यवस्था उभी करणे चालकांना शक्य होत नाही. देणगीदारांनी सढळ हातांनी मदत केल्यास या प्रकल्पात जवळपास ५०० वंचित मुलांसाठी शिक्षण देण्याची व्यवस्था उभी करता येणे शक्य होणार आहे.

धनादेश या नावाने काढा-‘ अजित फाऊंडेशन ’

(Ajit  Foundation)

 

रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट

‘रि व्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट’ ही संस्था वाई येथे गतिमंद मुले आणि प्रौढांच्या प्रश्नावर गेली ३६ वर्षे निरंतर कार्य करीत आहे. गतिमंद मुलांवर मायेची पखरण करीत त्यांना रोजगारक्षम बनवण्याचा विडा संस्थेने उचलला आहे.

विशेष मुलांच्या गरजा, मर्यादा आणि क्षमता यांचा विचार करून त्यांचे जीवन सुखी, आनंदी आणि अर्थपूर्ण करण्यासाठी ही संस्था झटत आहे. या मुलांचे शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, शारीरिक-मानसिक विकास, रोजगार कौशल्य प्रशिक्षण यांची जबाबदारी नेटाने पार पाडत ही संस्था मुलांना स्वत:च्या पायावर उभे करणारी व्यवस्था तयार करते. सध्या संस्थेत १०० हून अधिक गतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. तेवढय़ाच संख्येने शिक्षण पूर्ण झालेले प्रौढ गतिमंदही संस्थेतर्फे सुरू असलेल्या विविध रोजगार उपक्रमांतून स्वत:च्या पायावर उभे आहेत. हे कार्य सुरू ठेवण्यासाठी संस्थेला निधीची सतत चणचण भासते. दैनंदिन खर्च, कर्मचाऱ्यांचे अल्प वेतन, संस्थेतील व्यवस्था या साऱ्या गोष्टींचा मेळ घालतानाही कसरत करावी लागत आहे. उपेक्षेचे जीवन जगणाऱ्या, निसर्गाने काही प्रमाणात अन्याय केलेल्या या मुलांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण व्हावा यासाठी झटणाऱ्यांचे हे कार्य निरंतर सुरू ठेवण्यासाठी संस्थेला मदतीचे हात हवे आहेत.

धनादेश या नावाने काढा –‘ रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिटय़ूट, वाई ’

(Rivka Sahil Akshar Institute, Wai)

 

सर्पराज्ञी प्रकल्प

शि रूर तालुक्यातील तागडगाव परिसरात सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याने ‘वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सँक्चुअरी असोसिएशन’च्या माध्यमातून ‘सर्पराज्ञी’ प्रकल्प हाती घेतली आहे. त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक वन्यजीवांवर उपचार करून त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडले आहे.

बालपणापासूनच वन्यप्राण्यांबद्दल कळवळा असणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी २००३ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू केले. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांनी स्वत:च्या मालकीच्या १७ एकरांपैकी १३ एकर जागा या वन्यजीवांसाठी म्हणून राखून ठेवली आहे. परिसरातील जखमी जनावरांचे आश्रयस्थान म्हणून ‘सर्पराज्ञी’ हा प्रकल्प ओळखला जातो. या प्रकल्पाला आता गरज आहे ती कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यास केंद्राची. प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही गरज आहे. त्यासाठी मदत मिळाली तर हे काम अधिक प्रभावीपणे करता येऊ शकेल. आता हे काम बाळसे धरू लागले आहे. वन्यजीव बऱ्याचदा जीव वाचविणाऱ्याच्या जवळ येऊन राहतात. पण जेथे तो जखमी झालेला असतो, त्या अधिवासात त्याला नेऊन सोडणे आवश्यक असते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे काम आम्ही करतो आहोत, पण त्याला समाजाने सहकार्य आणि आर्थिक मदत करावी, असे आवाहन सोनवणे दाम्पत्याने केले आहे.

धनादेश या नावाने काढा –‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड सॅंक्च्युअरी असोसिएशन, शिरुर-कासार’

(Wild-life protection and sanctuary association, shirur kasar )

 

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

म हाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे योगदान अनन्यसाधारण आहे. सुमारे सव्वाशे वष्रे ग्रंथोत्तेजनातून महाराष्ट्राच्या बुद्धिवैभवासाठी धडपडणाऱ्या या संस्थेला अर्थोत्तेजनाची गरज आहे.

न्या. महादेव गोविंद रानडे, प्राच्यविद्या पंडित डॉ. रामकृष्ण भांडारकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशा विद्वानांनी ग्रंथोत्तेजन आणि मराठी भाषा समृद्धीसाठी डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेने १८९४ पासून लेखक, भाषांतरकार, ग्रंथांना पुरस्कारांच्या रूपाने उत्तेजन दिले आहे. या सगळ्यांतून महाराष्ट्राची वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडण झाली. महाराष्ट्रातील ही सर्वात जुनी साहित्यिक संस्था मानली जाते. मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर संस्थेचे अध्यक्ष, तर डॉ. अविनाश चाफेकर सहकार्यवाह आहेत.

संस्थेकडील दुर्मीळ ८५०० पुस्तकांचा ठेवा जपण्याबरोबरच, नवी इमारत उभारणीसह इतर उपक्रम राबविण्यासाठी संस्थेला आर्थिक पाठबळ हवे आहे.  ग्रंथ आणि साहित्यातून महाराष्ट्राचे सांस्कृतिक पोषण करणाऱ्या या संस्थेला दानशूरांनी आर्थिक पाठबळ दिल्यास महाराष्ट्राचा वैचारिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचविणे शक्य असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

धनादेश या नावाने काढा –‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’

(Maharashtra Granthottejak Sanstha)

 

वसुंधरा विज्ञान केंद्र

भा वी पिढीवर विज्ञानाच्या संस्कारांचे कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यतील नेरूर येथील वसुंधरा विज्ञान केंद्र गेली सुमारे दोन दशके चिकाटीने करत आहे. या केंद्राचे संस्थापक चंद्रकांत बाबाजी नाईक आहेत.

कुडाळपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या या संस्थेच्या प्राथमिक उद्दिष्टाला अनुसरून विज्ञानाची मूलभूत तत्त्वे शालेय विद्यार्थ्यांना सहज करता येतील अशा प्रयोगांमधून समजावून सांगितली जातात. त्यासाठी फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच संस्थेच्या आवारातील ‘युरेका हॉल’ या सभागृहात सुमारे ३५-४० विविध प्रकारचे प्रयोग करून दाखवले जातात. नवनवीन वैज्ञानिक विषयांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी टॅबचा वापर केला जातो. शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, शिबिरे, अवकाश दर्शन, शैक्षणिक खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञानाशी मैत्री असे विविध उपक्रम राबवले जातात. डॉ. होमी भाभा सायन्स पार्क, फुलपाखरांचे उद्यान, औषधी वनस्पती उद्यान, फिरत्या प्रयोगशाळेबरोबरच फिरते वाचनालय, हे आणखी काही वेगळे उपक्रम ‘वसुंधरा’तर्फे राबवले जात आहेत. या उपक्रमांच्या विस्ताराबरोबरच काही नवीन योजना राबवण्याचा संस्थाधुरीणांचा संकल्प आहे. दुसरी फिरती प्रयोगशाळा उभी करून दर वर्षी आणखी काही हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा संस्थेचा मनोदय आहे.

धनादेश या नावाने काढा –  ‘ वसुंधरा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’

(Vasundhara public charitable trust)

 

श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय

सो लापूर येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयाने भारतीय संगीताचा स्वरवारसा जोपासण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक बुजूर्ग स्वरतपस्व्यांचा संगीत ठेवा आधुनिक माध्यमाद्वारे जतन करण्याचा संस्थेचा संकल्प आहे.

तब्बल १६५ वर्षांपूर्वी म्हणजेच १८५३ मध्ये सोलापूरमध्ये हे वाचनालय सुरू झाले. वालचंद समूहाने देणगी दिल्यानंतर या वाचनालयाचे ‘श्री हिराचंद नेमचंद वाचनालय’ असे नामकरण झाले. किल्ल्याच्या समोर मुरारजी पेठ येथे असलेल्या या वाचनालयाची नवी वास्तू १९९४ मध्ये आकाराला आली. सोलापूरच्या सांस्कृतिक जीवनाशी एकरूप झालेले ज्येष्ठ संगीत अभ्यासक आणि मर्मज्ञ रसिक प्रा. श्रीराम पुजारी हे या वाचनालयाचे आधारस्तंभ होते.

वाचनालयाने या संगीत संग्रहालयाचे ‘श्रीराम पुजारी संगीत संग्रहालय’ असे नामकरण केले. वेगवेगळ्या १८ गायकांच्या स्वरांतील ‘बाबुल मोरा’ ही बंदिश हे या संग्रहालयाचे वैशिष्टय़ आहे. ग्रामोफोन रेकॉर्ड्स, कॅसेट्स, सीडी, व्हीसीडी, पेन ड्राइव्ह अशा विविध स्वरूपांतील या संगीत संग्रहाचे डिजिटायझेशन करण्याचा वाचनालयाचा संकल्प आहे. त्यासाठी वाचनालयाला निधीची आवश्यकता असून समाजातील दानशूरांनी अर्थसाह्य़ करावे, असे आवाहन वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले आहे.

धनादेश या नावाने काढा – श्री हिराचंद नेमचंद वाचनालय, सोलापूर

(Shri Hirachand Nemchand Wachnalaya, Solapur)

 

हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड

अ पंगांच्या सर्वागीण विकासाचे आणि पुनर्वसनाचे कार्य कोल्हापुरातील ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेने हाती घेतले आहे. हे कार्य २५ वर्षांहून अधिक काळ अव्याहत सुरू आहे. हजारो अपंग या संस्थेत शिकले, वाढले आणि स्वतच्या वाटा निर्माण करून पुढे गेले. जात आहेत. आजही या संस्थेत शेकडो अपंगांना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांचे पुनर्वसन केले जाते.

आपल्या मदतीला कोणी धावून येईल, दया दाखवेल अशी अपेक्षा न बाळगता अपंगांनी स्वाभिमानी व स्वयंपूर्ण बनण्याचा प्रयत्न करायचा असा दृष्टिकोन घेऊन संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हुरजुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अपंगसेवेचे हे व्रत घेतले आहे. कोल्हापूरपासून सात किमीवर ‘हेल्पर्स’चा सेवाकार्याचा वेलू वाढतो आहे. ही संस्था म्हणजे अपंगांचे केवळ निवासस्थान नाही, तर त्यांच्या सर्वागीण विकासाचे केंद्र आहे. येथे त्यांच्या शिक्षणाची आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची सोय आहे. शिवाय त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधीही आहेत. अपंगांच्या विकासाचे आणि सेवेचे कार्य करताना ‘हेल्पर्स’ला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रमुख अडचण आहे ती पैशांची. येथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत, शैक्षणिक साहित्याची खरेदी, कला-क्रीडा उपक्रमांसाठी निधीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शिक्षक, प्रशिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनासाठीही निधीची आवश्यकता आहे. शिवाय प्रशिक्षणाची साधने जुनी झाली असल्याने दर्जेदार साधने घेण्यासाठी मोठा खर्च येणार आहे.

धनादेश या नावाने काढा-‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड, कोल्हापूर’

 (Helpers of the Handicapped, Kolhapur)

Story img Loader