बीड जिल्ह्यातील शिरुरच्या तागडगावमध्ये सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य सर्पराज्ञी हा प्रकल्प चालवते. जखमी किंवा आजारी वन्यजीवांना हे दाम्पत्य मायेची ऊब देते आणि त्यांच्या अंगात बळ आले की त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडून देते. ही सृष्टी जितकी माणसांची आहे, तितकीच वन्यजीवांचीही आहे, ही या दोघांची आत्मियतेची भावना बरेच काही सांगते.

बीड जिल्ह्यच्या शिरुर तालुक्यातील तागडगावचा डोंगरपट्टा तसा दुष्काळी भाग. या माळरानावरच्या सुमारे १५  एकर परिसरात, कुठे काळवीट हिंडताहेत,  तर ठरावीक वेळेला एका झाडावर गरुड येऊन बसतो. घार तर इथे मुक्कामीच असते. जखमी अवस्थेत ज्या जागेवर आपल्यावर उपचार झाले आणि ज्यांनी ते केले, त्यांच्यासाठी हे वन्यजीव आवर्जून तागडगावच्या माळरानावर येतात. हा परिसर आहे सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्पाचा. गेली १५ वर्षे येथे राहणाऱ्या सृष्टी आणि सिद्धार्थ सोनवणे या दोन वन्यजीवप्रेमींनी दहा हजारांहून अधिक पशू-पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत. ‘वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सॅंक्च्युअरी असोसिएशन’ च्या माध्यमातून सुरू झालेल्या या कामाला आता गती मिळू लागली आहे. सोनवणे दाम्पत्य येथे जखमी, आजारी वन्यजीवांवर उपचार करतात. त्यांना मायेचा आधार देतात आणि जखमा बऱ्या झाल्या, पंखात बळ आले, शरीरात जगण्याची ताकद आली की त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात म्हणजे जंगलात सोडून देतात.

vasai palghar forest area
वसई, पालघरचे वनक्षेत्र ३५ टक्क्यांनी घटले, भूमाफियांकडून जंगलतोड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
is Tiger hunt in yavatmal Decomposed body found in Ukani coal mine
वाघाची शिकार? उकणी कोळसा खाणीत कुजलेला मृतदेह आढळला; १३ नखे व दोन दात…
Need to reconsider the guaranteed price policy
हमी भाव धोरणाच्या पुनर्विचाराची गरज
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
agricultural and livestock exhibition inaugurated by sharad pawar
कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्यांना कृषी विद्यापीठाने साथ द्यावी ; शरद पवार यांची अपेक्षा
Comprehensive development of the village in Palghar district with the help of schemes
समृद्ध गावांसाठी खोमारपाडा प्रारूप; योजनांच्या मदतीने पालघर जिल्ह्यातील गावाचा सर्वांगीण विकास

सिद्धार्थ सोनवणे हा शिरुर तालुक्यातला तरुण. सृष्टी त्याची बालपणीची मत्रीण आणि आता पत्नी. दोघांनीही स्वत:ला वन्यजीवांच्या सेवेसाठी वाहून घेतले. औषध न पिणाऱ्या लेकराला कडेवर घेऊन जसे आंजारले-गोंजारले जाते, तसेच अनेक जखमी प्राण्यांना इथे प्रेम दिले जाते. एखादे आजारी लेकरू जपल्यासारखे सारे. जो कोणी वन्यजीव किंवा पक्षी जखमी दिसेल, त्याची माहिती भोवतालचे नागरिक सृष्टी आणि सिद्धार्थला देतात. मग ते दोघे जखमी अवस्थेतील त्या प्राण्यापर्यंत पोहोचतात आणि घरी घेऊन येतात. मोठे कष्टाचे काम हे. नागरिकांच्या मदतीने, कधी दोघेच हे काम करतात. सिद्धार्थ सोनवणेची तागडगावला १७ एकर जमीन आहे. त्यातील चार एकर जमीन ते कसतात. बाकी सगळी जमीन वन्यजीवांसाठी. ही सृष्टी जितकी माणसांची आहे, तितकीच वन्यजीवांचीही आहे. ही भावना हृदयात ठेवून हे जोडपे काम करत आहे.

कोठून आली असेल ही भावना? उत्तरही तितकेच गमतीदार. सिद्धार्थला बोलते केल्यानंतर तो सांगतो- ‘माझे बालपणीचे मित्र भिल्ल समाजातले. त्यांच्यासोबत मासे, खेकडे पकडायला जायचो. अशातच एकदा पाण्यातला इरुळा पकडला आणि मग आपण साप पकडू शकतो हे लक्षात आले. हळूहळू वृत्तपत्रांमधून सापाची माहिती मिळवत गेलो आणि सगळ्या प्रकारचे साप पकडायला शिकलो. हे करताना मी सर्पमित्र कधी झालो हेदेखील कळले नाही. सृष्टीचेही तसेच. ती माझी बालमत्रीण. अनेकदा आम्ही सोबत साप पकडायचो. एकदा सर्पमित्र अशी ओळख तयार झाली की अनेक ठिकाणांहूनही रात्री-अपरात्री फोन यायचे. हळुहळू सापासोबतच काही जखमी वन्यजीव कोणाला दिसले की ते आम्हाला सांगायचे. लहानपणी कुत्रा, मांजर यांना काही जखमा झाल्या की त्यांना पकडून मी घरी आणायचो, त्यांच्यावर औषधोपचार करायचो, हा अनुभव गाठीला होता. त्यातूनच जखमी, आजारी, वन्यजीवांच्या पुनर्वसनासाठी काम करण्याचा निर्णय झाला आणि आम्ही तागडगावमधील आमच्या १७ एकर जागेवर हा प्रकल्प सुरू केला.’ वन्य जीव आपल्या उपकारकर्त्यांबद्दल बोलू शकत नसतील. मात्र, त्यांच्यातली कृतज्ञता त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. सृष्टी सांगते, ‘आजही ज्या गरुडावर आम्ही उपचार केले ते दोन गरुड दररोज दुपारी इथल्या झाडावर येऊन बसतात. आखूड कानाचे एक घुबड दरवर्षी फेब्रुवारी, मार्चमध्ये न चुकता येते. ज्या हरीण-काळविटांवर उपचार केलेत ते तर सातत्याने इथे येऊन बागडत असतात. या माळरानावर या सगळ्या वन्यजीवांनी स्वत:चा ‘माहेरवास’ शोधला आहे. आपल्याला या सर्वाची थोडी का होईना सेवा करता येते, याचे समाधान आहे.’

कायम वन्यजीवांमध्ये रमणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टीला हे वन्यजीव अगदी कौटुंबिक सदस्यांसारखे वाटत आले आहेत. त्यांचे या जीवांवरचे प्रेम इतके की, २०१० मध्ये त्यांचे लग्नही सौताडय़ाच्या जंगलात झाले. वधू-वर गळ्यात पुष्पहार घालून लग्नगाठी बांधतात, यांनी मात्र गळ्यात साप घालून एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचा संकल्प केला. वन्यजीवांबद्दलचे हे प्रेम आज दुर्मीळ होत चालले आहे.

सर्पराज्ञी प्रकल्पाने या परिसरात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. पण हा सारा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. या मार्गात देखील अनेक अडचणी आल्या, आपण हे सारे का करतोय, असे वाटावे असे प्रसंगही घडले. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर परिसरातील बेकायदा शिकारीवर नियंत्रण आले, यामुळे काही विघ्नसंतोषी लोक दुखावले गेले. या प्रकल्पाच्या पाणीपुरवठय़ाला अडचणी आल्या. वन्यजीवांसाठी केवळ स्वत:चा वेळच नव्हे तर स्वत:च्या चरितार्थाचे साधन असणारी जमीन या दाम्पत्याने दिली. आपले सर्वस्व या वन्यजीवांसाठीच द्यायचे, हे या जोडप्याने ठरवले आहे.

माहेरात आल्यावर जसे आईला न बोलता लेकीच्या वेदना कळतात, अगदी तसेच वन्यजीवांच्या केवळ शरीराकडे पाहून या जीवाचे दुखणे काय हे सिद्धार्थ आणि सृष्टीला कळते आणि मग सुरू होतो उपचाराचा, थकलेल्या जीवांना नवे बळ देण्याचा प्रवास. जखम साफ करणे, औषध पाहणे, पशुवैद्यकीय तज्ज्ञाला भेटणे आणि असे बरेच काही. या सर्व प्रकारात धोके नसतात असे नाही, वन्यजीव काही एका क्षणात आपलेसे होत नसतात. त्यांच्या कलाने वागत त्यांना बरे करण्याचे काम सर्पराज्ञी प्रकल्पात होते. प्रत्येक वन्यजीवाच्या रचनेनुसार कुठे पिंजरा, कुठे मोकळी जागा, कुठे झाडाच्या फांद्या किंवा आणखी काही वापरून केलेला झोका असे बरेच काही करावे लागते. पण हे सर्व लेकरांसाठी करतो आहोत या आत्मीयतेने सर्पराज्ञीचे आधारस्तंभ असलेले सिद्धार्थ आणि सृष्टी करत असतात.

वन्यप्राण्याला खायला घालण्याची मेहनत वेगळीच. अजगराला दिवसाला किमान एक कोंबडी तरी लागते. रोज कोंबडी कुठून आणायची? मग काही व्यक्तींकडे मदत मागितली जाते. आजारपणाच्या काळातला एखादा प्राणी दत्तक घ्या, अशी विनंती सिद्धार्थ करतो आणि मग एखाद्या प्राण्याचा खर्च भागतो. २०१२च्या दुष्काळात प्राण्यांना खायला काय द्यायचे, असा प्रश्न यायचा. मानवलोकच्या द्वारकादास लोहिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहा क्विंटल धान्य दिले होते.

गेल्या वर्षीही हा प्रश्न निर्माण आला होता. तेव्हा शिरुरच्या हमालांनी सांगितले, काळजी करू नका, आम्ही धान्य देऊ. २० क्विंटल धान्य हमालांनी एकत्रित केले आणि सिद्धार्थ आणि सृष्टीच्या या प्रकल्पाला दिले.

बप्पा कानडे नावाच्या हमाली करणाऱ्या गृहस्थाने नेतृत्व करत दाखवलेली भूतदया अद्भूत होती. या प्राण्यांना लागणाऱ्या औषधांसाठी स्वामी विवेकानंद शास्त्री हेदेखील मदत करतात. शिरुरच्या सिद्धेश्वर संस्थानाचा हा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सिद्धार्थ सांगतो. बरीच माणसे मदतीचा हात देऊ करतात. दरवर्षी मूठभर धान्य प्राण्यांसाठी व एक रुपया पाण्यासाठी असे ब्रीद ठरवून सिद्धार्थ अनेकांकडे मदत मागतो. ती काही वेळा दिली जाते, काही वेळा शेतीतून आलेल्या उत्पन्नाचा भागही खर्च होऊन जातो. आता वन्यजीवांचे अधिवास, प्रजननाचा कालावधी, वन्यप्राण्यांत दिसणारी आजाराची लक्षणे सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांना अनुभवाने माहीत झाली आहेत. पण प्रकल्पासाठी अजूनही अनेक गोष्टींची आवश्यकता आहे. कारण हा पट्टा दुष्काळी आहे आणि भोवताली पाणीच नसते. त्यामुळे एखादी विहीर बनवता आली तर बरे होईल, असा त्यांचा विचार आहे. शिवाय समाजात जनजागृती करण्यासाठी निसर्ग शिक्षण केंद्र उभारण्याचा या दाम्पत्याचा विचार आहे.

सर्पराज्ञीला गरज अशी.

  • सर्पराज्ञी प्रकल्पात रोज एक तरी जखमी किंवा आजारी वन्यप्राणी उपचारासाठी दाखल होतो. या वन्यजीवांवर योग्य उपचार करण्यासाठी, त्यांना ठेवण्यासाठी शेडची गरज आहे.
  • या प्रकल्पाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर हवी आहे.
  • सहा एकर मोकळ्या जागेत चारही बाजूंनी तारेचे कंपाउंड असण्याची गरज आहे. त्यामुळे जखमी, आजारी वन्यजीवांना तिथे हिंडता-फिरता येईल.
  • वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी व झाडांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी २५ हजार लिटर क्षमता असलेली सिमेंट टाकी असणे गरजेचे आहे.
  • निसर्ग, वन्यजीवांविषयी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी व समाजात निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्यासाठी निसर्ग शिक्षण केंद्र उभारण्याचा सोनवणे दाम्पत्याचा विचार आहे.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

  • सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन प्रकल्प
  • बीड -खालापुरीमाग्रे शिरुरकडे जाताना पाडळीजवळून जाता येते. मुख्य रस्त्यापासून दोन किलोमीटरवर हा प्रकल्प आहे. अहमदनगर – पाथर्डी- शिरुर -पाडळी हादेखील पर्यायी मार्ग आहे.
  • धनादेश -‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड सॅंक्च्युअरी असोसिएशन, शिरुर-कासार’

(Wild-life protection and sanctuary association, shirur kasar)

या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

Story img Loader