|| मोहन अटाळकर
शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून सोडविण्यासाठी शेतीप्रश्नांच्या मुळाशी भिडणाऱ्या संस्थांपैकी यवतमाळची दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ ही एक महत्त्वाची संस्था. शेतकरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ही संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत आहे. या कुटुंबांतील महिलांना स्वयंरोजगार उभारण्यास मदत करून आणि मुलांचे पालकत्व स्वीकारून संस्था त्यांना नवी उमेद देत आहे.
दोन-तीन एकरांची कोरडवाहू शेती. शेतीसाठी कर्ज काढले, पण नापिकीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने शेतकऱ्याने स्वत:ला संपवले. शेतकऱ्याच्या विधवा पत्नीसमोर जगण्याच्या साधनांची चिंता. अशा स्थितीत एका संस्थेचे कार्यकर्ते दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने सांत्वन करण्यासाठी जातात. संसारोपयोगी भेटवस्तू देतात. एक भाऊ म्हणून आत्महत्याग्रस्त कुटुंबाला भावनिक आधार देण्यासोबतच त्यांना स्वावलंबी होण्यासाठी मदत केली जाते. अशा शेकडो कुटुंबांना दिलासा देण्याचे व्रत विदर्भातील यवतमाळ येथील दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने हाती घेतले. पारधी समाजाच्या विकासापासून सुरू झालेले संस्थेचे कार्य आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे मूळ शोधून त्यावर उपाय करण्यापर्यंत पोहोचले आहे.
शेतकरी आत्महत्या हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला. पूर्वी शेतकऱ्यांकडे खूप पैसा नसला, तरी गरजा कमी असल्यामुळे त्या भागत होत्या. कधी दुष्काळही पडायचा; पण शेतकरी नाउमेद झाला नव्हता. त्याने स्वत:ला संपवले नव्हते. घरच्यांच्या पाठबळावर तो बिकट परिस्थितीचा नेटाने सामना करीत उभा राहायचा. आर्थिक संकटे यायची; पण त्यातून तो उभारी घेत होता; परंतु ही परिस्थिती बदलली. शेतीच्या मशागतीचा खर्च वाढत गेला. गरजा वाढल्या. निसर्गाचा प्रकोपही वाढू लागला. पिकाला भाव नाही. पैशांची निकड असते, त्या वेळी येईल त्या भावात हाती आलेले पीक विकावे लागते. दलाल लूट करतात. शेतीत घातलेला पैसा मिळेल का नाही, कष्टाचे चीज होईल की नाही, याची शाश्वती नाही. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागेनासा झाला, की तो मेळ बसवायला शेतकरी कर्ज काढतो. ते कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज. मग व्याज देण्यासाठी तिसरे कर्ज. बँका कर्ज देत नाहीत, तेव्हा सावकाराकडे जावे लागते. व्याज खूप जास्त असते. पैशाचे सर्व मार्ग बंद झाले की समाजात प्रतिष्ठा संपते. शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो आणि बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो.
दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाने या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. शेतकरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून दीनदयाल मंडळाने शेतीत सुव्यवस्था आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम शेतीची विविधता विचारात घेऊन अभ्यास केला. त्यातून अनेक निष्कर्ष काढले. शेती परावलंबी आणि बडय़ा कंपन्यांनी निर्माण केलेल्या बाजारावर आधारित झाली आहे, शेती खर्चीक झाली, शेतीशी निगडित निसर्गचक्राचा ऱ्हास, कृषी पर्यावरणाचा समतोल ढासळणे, अशा एकूण ४७ दुष्टचक्रांमध्ये शेती अडकल्याचे संस्थेच्या अभ्यासकांच्या लक्षात आले. या आकलनावरून तीन वर्षांपूर्वी चार गावांमधील ४० शेतकऱ्यांसोबत प्रयोग करण्यात आले. त्यात शेतीचा खर्च कमी करणे, बीज प्रक्रिया करून पिके सदृढ करणे, गावातीलच संसाधनांपासून फवारणीची औषधी आणि खते बनवण्यात आली. या प्रयोगात चांगले यश मिळाले. खर्च कमी होऊन उत्पन्न वाढले. शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली. शेतकऱ्यांच्या बरोबरीने काम करून त्यांना शिकवणे हे संस्थेचे काम बनले. या कामासाठी संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांची फळी तयार होत गेली. हे कार्यकर्ते शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर जाऊन बीज प्रक्रियेपासून ते औषधांच्या फवारणीपर्यंत शेतकऱ्यांना मदत करतात. आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांचे सकारात्मक अनुभव कार्यकर्त्यांच्या शिदोरीत जमा झाले आहेत. त्यांच्या कमी खर्चाच्या शेती प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अनेक गावे या प्रयोगाकडे वळली आहेत. या शेतकऱ्यांच्या यशोगाथा इतरांसाठी प्रेरक ठरू लागल्या आहेत.
संस्थेने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण केले. कुटुंबावर असलेल्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन त्यांच्या गरजा ओळखल्या. संस्थेने गरजू चारशेच्या वर कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले. अशा कुटुंबांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरू केले. त्यांना वेगवेगळे छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेकडून मदत व प्रोत्साहन दिले जाते. कुटुंब आधार योजनेच्या माध्यमातून संस्थेने शेळीपालन, किराणा दुकान, शिवणकाम, शेवई व्यवसाय, भाजीपाला दुकान, चप्पल दुकान, चहा दुकान इत्यादी व्यवसाय सुरू करून दिले. विशेष म्हणजे कुटुंबातील सदस्यांची आवड आणि कौशल्य विचारात घेऊनच व्यवसायांची निवड करण्यात आली. ही कुटुंबे आता स्वावलंबी झाली असून सन्मानाने जगत आहेत.संस्थेचे कार्यकत्रे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात व त्यांना भावनिक व मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करतात. संस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या एका तालुक्यातील अशा सर्व कुटुंबांची एक बैठक आयोजित केली जाते. त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातात. त्यानुसार संस्था आपला कार्यक्रम निश्चित करते. दरवर्षी संस्थेच्या भाऊबीज कार्यक्रमातून महिलांना गरजेच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. हा शेतकरी कुटुंबांसोबत संवादाचा सुरुवातीचा दुवा ठरत असतो. शेतीला पूरक ठरणाऱ्या अनेक दुर्लक्षित बाबी संस्थेच्या संशोधकांनी हेरल्या. शेततळी, लघु बंधारे बांधण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम संस्थेने केले. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याचे काम संस्था करीत आहे. शेतीसाठी आवश्यक बियाण्यांचा पुरवठा संस्थेकडून केला जातो. शेतीतील लागवडीचा खर्च कमी करण्यासाठीदेखील संस्थेतर्फे विविध प्रयोग केले जात आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातच उपलब्ध असलेल्या संसाधनांपासून औषधी, खते तयार करण्यापासून ते पिकांच्या संगोपनापर्यंत सर्व प्रकारची शास्त्रीय माहिती संस्थेमार्फत पुरवली जाते. संशोधनात्मक आणि संघटनात्मक पातळीवर संस्थेने विकसित केलेली व्यवस्था ही या क्षेत्रात कार्य करण्यासाठी पथदर्शकच ठरली आहे. सोप्या शेती पद्धती विकसित करण्याचे किंबहुना अनेक परंपरागत पद्धतींना पुनरुज्जीवित करण्याचे काम संशोधक करीत आहेत. या कृषी संशोधन प्रकल्पासाठी सातारा येथील डॉ. विजय होनकळसकर आणि अहमदनगर येथील निखिलेश बागडे हे ‘आयआयटीयन्स’ संशोधक संस्थेला साहाय्य करीत आहेत. कृषी क्षेत्रातील समस्यांची प्रभावी उकल करण्याच्या उद्देशाने यवतमाळजवळ निळोणा येथे कृषी संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. जलभूमी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून केळापूर तालुक्यात पाथरी येथे निरुपयोगी झालेल्या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले. सेंद्रिय शेती प्रकल्प आणि शेतीपूरक उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव विजय कद्रे यांनी दिली.
अपराधीपणाचा शिक्का बसलेल्या पारधी समाजाच्या प्रगतीसाठी संस्था १९९७ पासून म्हणजे स्थापनेच्या काळापासूनच काम करीत आहे. पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने विवेकानंद विद्यार्थी वसतिगृह सुरू केले आहे. दुर्गम भागातील बेडय़ावर राहणाऱ्या पारधी समाजातील लोकांना आरोग्य सेवा पुरवता यावी, यासाठी संस्था फिरते रुग्णालय चालवते. तसेच, मुलांसाठी बालसंस्कार केंद्र, आरोग्य शिबीर, रोजगार प्रशिक्षण कार्यशाळा आदी उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत. पारधी समाजातील केवळ पाच विद्यार्थ्यांना घेऊन भाडय़ाच्या खोलीत विवेकानंद छात्रावास उघडण्यात आले होते. आज या छात्रावासाची स्वत:ची इमारत उभी झाली आहे. मात्र, पारधी समाजात होत असलेली शिक्षणाची जागृती लक्षात घेता किमान १०० विद्यार्थ्यांसाठी मोठी इमारत आवश्यक झाली आहे. सोबत व्यवसाय मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा संकल्प आहे, असे संस्थेचे अध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी सांगितले. सामाजिक कार्यासाठी संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर
शेतकऱ्याची आत्महत्या व कर्ज यामुळे त्याच्या कुटुंबाने आपला आर्थिक आधारच गमावलेला असतो. त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी संस्था प्रयत्न करते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करणे, तसेच त्यांना तांत्रिक, व्यवसाय शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे काम संस्था करते. संस्थेच्या वसतिगृहात अशा कुटुंबांतील मुलांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. स्वत:च्या गावात राहूनच शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही ही संस्था करते. पालकांच्या आत्महत्येमुळे शालेय शिक्षणाचा मार्ग बंद होण्याची वेळ आलेल्या या विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेच्या मदतीने पुढे सुरू राहिले. अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या वाटा प्रशस्त केल्या आहेत.
दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ
यवतमाळ ते गोधनी मार्गावरून पुढे गेल्यानंतर निळोणा तलावाजवळ, मातोश्री वृद्धाश्रमाच्या बाजूला संस्थेच्या दीनदयाल प्रबोधिनीची इमारत आहे.
धनादेश -‘ दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ, यवतमाळ’
(Deendayal bahuuddeshiya prasarak mandal, Yavatmal)
या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.