समाजातील वंचितांसाठी मोलाचे कार्य करणाऱ्या दहा सेवाव्रती संस्थांना समाजातील दानशुरांनी सढळ हस्ते दिलेल्या मदतीच्या धनादेशांच्या वाटपाचा हृद्य सोहळा बुधवारी, १६ ऑक्टोबरला पार पडला. प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यावेळी पाटेकरांनी व्यक्त केलेले मनोगत..
सगळ्यात गंमत म्हणजे, इथं इतक्या वेळेत पोहोचायचं म्हणून यांना गाडी पाठवायला सांगितलं. गाडी अशी पाठवली होती की त्यामुळे मी डाफरलो. कसला मूर्खपणा असतो, मी कुठल्या कार्यक्रमाला जातोय? तरीसुद्धा माझ्या डोक्यातलं माझं स्टेटस, मी कुठल्या गाडीतून जायचं हे काही जात नाही. खरंतर निवांतपणं मी या गाडीतून यायला हवं होतं. पण, आमचं कसं सगळंच सोयीस्कर असतं. समाजसेवा सोयीस्कर.. वागणंसुद्धा सोयीस्कर. आमच्यातला ‘मी’पणा काही संपत नाही.
मुळामध्ये हा असा उपक्रम राबविणं कौतुकास्पद. कारण, आजकाल पांडवांबद्दल कमी लिहावं लागतं. कारण, कौरव जास्त आहेत. काय करणार? पण, या पांडवांचा विचार करणारी ही मंडळी. पैसे किती दिले हा विचार नाही. आपल्या कामाची दखल लोक घेत आहेत, याचा हा आनंद आहे. चांगल्यावर विश्वास आहे अजून. सरकारच्या कामाला मर्यादा आहेत. कायदेकानू आहेत. त्यात काही गोष्टी बसवायच्या. नाही बसल्या तर काढायच्या. पण त्याच्या पलीकडे जाऊन असे उपक्रम राबविणं त्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद नाही म्हणणार. हे करायलाच पाहिजे. कारण तुमच्याबद्दलचा जो समाजात विश्वास आहे, तो वृद्धिंगत करण्यासाठी या गोष्टी फार गरजेच्या आहेत आणि तुम्ही जेव्हा त्या करता तेव्हा त्या लोकांपर्यंत पोहोचतात.
निश्चितपणे (संस्थांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून) ही जी गोष्ट करता त्याकरता तुम्हाला प्रसिद्धीची गरज वाटत नाही. मनापासून हे करावंसं वाटतं. त्यातला आनंद. मलाही ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ती मी करतो. त्याला तुम्ही मग समाजसेवा नाव द्या, नाटक द्या, वा लेखन द्या. बाबा आमटेंकडे जायला मला आवडतं. तिथं गेल्यानंतर माझ्यामध्ये होणारा बदल मला आवडतो. देवळात मी सहसा जात नाही. तितकीच देवासारखी माणसं मला भेटली. त्यांनाच भेटण्यात वेळ इतका जातो. त्यामुळे वेळ मिळत नाही. एकदा कधी शेवटचा जाईन तेव्हा बोलेन त्याच्याकडे. तेव्हा या जन्मात त्याच्याकडे जाण्याची इच्छा नाही आणि वेळही नाही. कारण इतकी सुंदर माणसं मला भेटली. आज पुन्हा एकदा दहा माणसं, संस्था मला भेटल्या. इतकं पराकोटीचं काम करणारी मंडळी आहेत. त्याची दखल तुम्ही वृत्तपत्राद्वारे घेत आहात. आभार वगैरे मला जमत नाहीत. प्रत्येक गोष्ट शिवीनं सुरुवात करायची आणि शिवीनं संपवायची, अशी माझी पद्धत. त्यातून प्रत्येक शिवीचं अधिष्ठान वेगळं असतं. एकच शिवी वेगवेगळ्या पद्धतीनं देता येणं, हे नटासाठी फारच महत्त्वाचं. यातून वेगवेगळे आविष्कार यायला हवे.
बाबा आमटे मुळात मालगुजारू कुटुंबातला मुलगा. जमीनदार हा माणूस. गाडी (बग्गी) निघाली की पुढे एक धावत असणार. मागे कुणी तरी धावत असणार. असा हा माणूस कुठल्यातरी एका प्रसंगानं बदलतो आणि अख्खं आयुष्य त्यासाठी वाहून घेतो. त्याच्यानंतर ताईंना हे काही माहीत नव्हतं. त्यांचीही खरी तर फरफट व्हायला हवी होती. पण, त्याही त्याच पराकोटीनं जगतात. मुलंसुद्धा, सुनासुद्धा, नातवंडंसुद्धा, त्यांच्या बायकासुद्धा. त्याग हा आनुवांशिक असतो की काय, असं या मंडळींना पाहिल्यावर वाटतं. आणि मग आपण एवढंसं काहीतरी केलं की त्याचा किती उदोउदो करायचा. राजकारण्यांमध्ये तर एवढय़ातेवढय़ा सन्मानासाठीसुद्धा केविलवाण्या परिस्थितीत जातात ही माणसं. ज्यांनी इतकं ऐश्वर्य उपभोगलं आहे. नेमकी ऐश्वर्याची व्याख्याच लोक विसरायला लागले आहे. महाराष्ट्राची परंपरा तर इतकी छान आहे. आपल्यामागे इतकं रेफरन्स म्हणून आहे. टिळकांपर्यंत तर जायलाच नको. पण, त्यांच्यानंतरही कितीतरी अशी नावं देता येतील. सी. डी. देशमुख हे नाव आजच्या पिढीला माहीतच नसेल. एकदा ते कुठेतरी लवकर उठून चालले होते. आईनं विचारलं, ‘का रे इतक्या लवकर कुठे चाललास.’ तर म्हणाले, ‘आज रिझल्ट आहे.’ आई म्हणाली, ‘मग घाबरलास का?’. तसे म्हणाले, ‘तसं नाही, आई. दुसरा कोण आहे ते पाहून येतो.’ म्हणजे पहिला मीच. किती कमालीचा आत्मविश्वास असलेली ही माणसं. काय लागतं आपल्याला? फक्त एक ट्रिगर लागतो. अशी किती ट्रिगर्स आहेत आपल्याकडे? किती आदर्श आहेत आपल्याकडे? आज हे दहा आदर्श आपल्यासमोर आहेत. पण, त्यावेळचा समाज किती जागृत होता. आज समाजातील सगळीच माणसं बदलली आहेत. विचार, माध्यम, दृष्टिकोन बदलले आहेत. एकच गोष्ट इथून पाहताना वेगळी दिसते. तेथून पाहताना वेगळी दिसतेय, त्याप्रमाणे आम्ही लिहितो. सगळे कायदे आपण आपल्या पद्धतीने बदलू लागलो आहोत. मला सतत तुमच्याकडून काहीतरी घ्यायचंय. हे मला घेता आलं तर आनंद आहे. मला सतत काहीतरी ओरबाडायचंय. मला नेहमी असं वाटतं की ओरबाडलं तर नखात जितकं राहील तितकंच मिळतं. पण, असंच मागितलं तर किमान ओंजळीभर तर मिळेल. पण, वृत्ती का अशी आहे? असे का झालो आपण? राजकारण्यांना तरी संचय करायचाय तो किती करायचाय? तुमची पुढची पिढी लुळीपांगळी आहे? त्यांची पात्रता नाही का? ताकद नाही का? मग हा संचय कशासाठी? कुणासाठी? प्रत्येक गोष्ट मला माझ्या नावावर हवी. माझ्या नावावर हा आहे की तुम्ही आहात की.. ही मंडळी माझ्या नावावर असताना मला जमीन कशाला लागते. ही जमीन माझी. हा डोंगर म्हणायचा माझा.. माझं म्हटलं की आपलं होऊन जातं. माणसांना ‘तू माझा’ म्हणायचं नाही. ते आपलेपण आपण विसरत चाललो आहोत. मला अशा ठिकाणी यायला खूप आवडतं. मी किती कोता आहे, तेवढं एकदा कळलं ना की उद्या जगायला काहीतरी कारण मिळतं. अशा कार्यक्रमातून ते मिळतं. माझ्यामध्ये किती उणिवा आहे, याची जाणीव होते. ही जाणीव फार महत्त्वाची आहे. कुठल्यातरी एका घरटय़ात राहणारे आम्ही. माझीच सुखदुख.. त्यांचंच अवडंबर. देण्याची वृत्ती नाही. आज कुणीतरी दिलेले चेक असतील. कुणाची नावे माहिती नाही. पण हेतू चांगला.
तुम्हाला ३९ हजाराची नोकरी सोडावीशी वाटते. स्वत:ला कर्करोग असताना इतरांची सेवा करावीशी वाटते. दु:ख ही इतकी जवळ धरली की ती डोंगराएवढी वाटतात. पण, ती अशी लांब धरली की वाटतं, अरे एवढंसच आहे की रे.. आपण दुख कुठे धरतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. तुम्ही स्वत:च्या दु:खाला तर पार तडीपारच करून टाकलं आहे. स्वत:च्या दु:खाला तुमच्या जीवनामध्ये वावच नाही ठेवला तुम्ही. बरं, दुसऱ्यांची दु:खं इतकी डोंगराएवढी आहे की स्वत:ची दु:खं विसरून जातो. खूप दुखायला लागल्यानंतर आपण बाम लावतो. बाममुळे दुखणं जातं अशातला भाग नाही. पण, ते इतकं जळजळतं की आतलं दुखणं विसरून जातो आपण.
प्रकाश आमटेंचा सिनेमा करताना मजा आली. जनावरं पण इतकी प्रेम करायला लागतात. कदाचित मी त्यांना त्यांच्यातलाच वाटत असेन आणि त्यांच्याशी कम्युनिकेट करणं जास्त सोयीचं आहे. त्यात एक कविता सुचली..
वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे
कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी
वेळुत कधी वा पडक्या वाडीपाठी
ती एवढीच इच्छा असते. ती झुळुक कुठून तरी तुला शिवून गेली तर तर तुला आनंद मिळतो. काहीच नाही तर पानांना हलवायचं. देठालाही कळू देत नाही त्याचं पान गळलंय. मनापासून छान जगलेलं. फांदीला कळत नसतं, आपलं एक पिल्लू गेलं. पण, कुठेतरी दुसरी पालवी फुटलेली असते. संपत नाही कुठे.. आज हा जाईल, उद्या तो जाईल. तुमचीही अशी पालवी फुलतच राहू दे.
अशा कार्यक्रमाला बोलावल्यानंतर मला प्रकाश आमटे, बाबा आमटे यांची आठवण येते. आपल्या नकळत्या वयात अशी माणसं तुमच्या वाटय़ाला आल्यानं सगळंच बदलतं. पण, कूपमंडूक वृत्तीमुळे आपण गाडी कुठली आणली पाहिजे, बायकोला साडी कुठली घ्यायची यातच मग्न होऊन राहतो. कुमार शिराळकर, विठ्ठल पटेल, वाहरू सोनावणे.. ही श्रमिक संघटनेची मंडळी. कुमार हा संत आहे. ॠषीमुनी आहेत ही माणसं. कुठलीच अपेक्षा न ठेवता ही मंडळी वर्षांनुवर्षे काम करताहेत.
चॅनेलाईज होणं फार आवश्यक आहे. माझ्यातली ऊर्जा चॅनेलाईज झाली नाही तर मी मारामाऱ्या करेन. नाटक, सिनेमा माध्यम मिळालं नसतं, तर माझ्यातली घुसमट बाहेर कशी निघाली असती? ते करीत असताना तुम्हाला वाटतं मी अभिनय करतोय. रडायचं असेल तर कुठे तरी एखादा प्रसंग असतो, त्याचं बटन दाबायचं की झालं. डोळ्यांत अश्रू येतात. लोकांना अश्रू पाहायला नाही आवडत. तुमचे कोरडे डोळे ते अश्रू हा प्रवास आवडतो.
कार्यक्रमाचा इतिवृत्तांत पाहा : indianexpress-loksatta.go-vip.net आणि YouTube.com/LoksattaLive
धनादेश पावतीकरिता संस्था प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक त्या-त्या ठिकाणी.
विश्वास वाटला की मदत मिळते

समाजात नेहमी चांगले घडत असते. मात्र समाज लगेच मागे उभा राहत नाही. तो आधी जोखतो, पारख करतो आणि एकदा का तुमच्या कामाविषयी विश्वास वाटला की भरभरून मदत करतो. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांना सांभाळताना सुरुवातीला अडचणी आल्या, डोक्यावर छप्पर नव्हते, पैसे नव्हते. पुढे काय करायचे ते समजत नव्हते. पण या सर्व परिस्थितीत समाजानेच मदत केली. संस्था उभी करण्यासाठी समाजच पुढे आला. आज संस्थेतील मुले इंजिनीअर झाली आहेत, स्वतच्या पायावर उभी आहेत. पण त्यांच्या मनात थोडा गंड राहतो. तो घालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संस्थेला मदत मिळत असली तरी मुलांचा जेवणा-राहण्याचा,  शिक्षणाचा खर्च भागवताना कष्ट पडतात. सध्या संस्थेला चार लाख रुपयांची देणी द्यायची आहेत. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून ही देणी भागवली जातील. त्यानंतर मुलांसाठी भोजनगृह बांधायचा विचार आहे.
राम इंगोले, विमलाश्रम घरकुल, नागपूर. (९६८६०९९०५१४)
कला क्षेत्रात कुशल व्यक्ती घडवायच्या आहेत

समाजात झालेल्या समस्या सोडविण्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहे. पण आमची संस्था ही सांस्कृतिक कार्य करत असून या माध्यमातून आम्ही समाजातील अपप्रवृत्ती कशा कमी होतील याचा प्रयत्न करत असतो. आम्ही समाजाला कोणत्याही प्रकारची कीड लागू नये यासाठी आधीच काळजी घेऊन काम करत असतो. या संस्थेवर अनेक दिग्गज कलाकारांनी नाटक मंडळींनी प्रेम केले आहे. ‘लोकसत्ता’च्या माध्यमातून आमची संस्था सामान्यांपर्यंत पोहोचली आहे. भविष्यात आम्हाला ललित कला शिक्षण, विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे, एफएम रेडिओ यांसारख्या ठिकाणी आवश्यक कुशल व्यक्ती घडविण्याचे काम करायचे आहे.
वामन पंडित, वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, रत्नागिरी (९४२२०५४७४४)
पोलिसांच्या विश्वासाला पात्र

स्वप्नांच्या मागे लागून मायानगरीत हरवणाऱ्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्याचे काम संस्था करते. या संस्थेच्या मदतीसाठी आतापर्यंत जेवढय़ा लोकांना भेटलोय त्यातील बहुतांश लोकांनी लहानपणी हरवल्याचा अनुभव सांगितला आहे. हा प्रश्न सर्वाच्याच जिव्हाळ्याचा आहे. पूर्वी हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर उभे राहत. अनेकांनाही या संस्थेची माहिती नव्हती. संस्थेची माहिती ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध झाली आणि ४० लोक प्रत्यक्ष भेटायला आले. फोन तर अगणित आले. लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद आला. आता पोलीस ठाण्यात संस्थेचे कार्यकर्ते गेले की त्यांना संस्थेची माहिती द्यावी लागत नाही. पोलिसांनाही आता संस्थेविषयी एवढा विश्वास वाटतो की एखादा मुलगा हरवल्याची तक्रार आली की तो संस्थेत पोहोचला आहे का, त्याची चौकशी आमच्याकडे करतात. मुंबईत पळून येणाऱ्या मुलांची संख्या खूप जास्त आहे. आतापर्यंत आम्ही सहा हजारांहून अधिक मुलांना घरी सोडले आहे. महिन्याला संस्थेत ३० ते ४० मुले येतात. त्यांच्यासाठी आणखी एका निवासस्थानाची सोय करण्याचा विचार आहे. या निधीतून त्याची सुरुवात करता येईल.
विजय जाधव, समतोल फाऊंडेशन, ठाणे. (९८९२९६११२४)
विश्वासाला मिळालेली  पावती

स्वतच्या मुलाची समस्या जाणवली तेव्हा इतर मुलांच्या समस्येचीही जाणीव झाली व ही संस्था सुरू केली. मात्र, सुरुवातीला लोकांनी ‘वेडय़ांची शाळा’ म्हणून हिणवले. दगडावर डोके आपटताहेत, असे म्हणणारे लोक आता या कार्याविषयी आस्था बाळगायला लागले आहेत. आज आमच्या संस्थेत तीन वर्षांपासून ५९ वर्षांपर्यंतची मुले आहेत. एकदा ती संस्थेत आली की कायमची आमचीच होतात. ‘सर्वकार्येषु’च्या माध्यमातून आमची माहिती लोकांपर्यंत पोहोचली. आम्हाला मिळालेली मदत ही ‘लोकसत्ता’च्या विश्वासाला मिळालेला प्रतिसाद आहे. संस्थेमध्ये काम करत असलेल्या १०० शिक्षकांपैकी ४४ शिक्षकांना सरकारकडून वेतन मिळते तर ५६ शिक्षकांना संस्थेकडून मानधन दिले जाते. या दोहोंच्या वेतनातील दरी भरून काढण्यासाठी मानधनात वाढ करण्याचा संस्थेचा प्रयत्न राहील. त्याशिवाय वाहनाच्या देखभालीसाठी, गॅरेजसाठी या निधीचा वापर केला जाईल.
त्या दिवसांना या दिवसाचा सलाम
नव्हते तेव्हा दाणापाणी,
खुशीत फिरलो अनवाणी,
आज सुखाचा घास तरीही,
त्या दिवसाची जाण..
घन अंधारी यात्रा होती,
वणवण फिरूनी गात्रे शिणती,
स्नेहमयी कोणी लावी पणती,
आज निळाई अंगणात तरी,
त्या पणतीची जाण..
त्या दिवसांना या दिवसाचा सलाम..
रजनी लिमये, प्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक
संपर्कासाठी – पूनम यादव (९३७३०५४८००)
कक्षा रुंदावतील

इंटरनेटच्या महाजालात वाचनसंस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. ही संस्कृती जपण्याचे काम गेली ७२ वष्रे आमची संस्था अव्याहतपणे करत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात काम करणाऱ्या संस्थांचा विचार करता ग्रामीण भागात काम करणाऱ्या या संस्थेची ओळख ‘लोकसत्ता’च्या या उपक्रमाच्या माध्यमातून झाल्याचा आम्हाला आनंद वाटतो. ही संस्था समाजातील दानशूर व्यक्तींच्या जोरावरच कार्य करत आहे. या संस्थेला आपल्या कक्षा रुंदवायच्या असून त्याचा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले ग्रंथालय तयार करणे, प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे आणि वेबसाइट तयार करणे असे आमचे काही उपक्रम विचारधीन आहेत. याचबरोरब संस्थेत असलेल्या दुर्मीळ ठेवाही जतन करणे आमचा मुख्य उद्देश आहे.
नानासाहेब तुळपुळे, खरे वाचन मंदिर, मिरज (९४२२६१५५८८)
ओझोन मिळाला आहे

वैद्यकीय शिक्षण घेऊन चांगल्या पगाराची नोकरी करत होतो. बायको प्राध्यापक होती. चांगले घर, गाडी अशी आमचीही स्वप्ने होती. पण आनंदवनातून प्रेरणा घेऊन काहीतरी करण्याचा विचार डोक्यात आला. एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या मुलांचे संगोपन करण्याची कल्पना त्यातूनच पुढे आली आणि नव्या आयुष्याला सुरुवात झाली. गाडी विकली, दागिने विकले आणि हाती आलेल्या साडेदहा लाख रुपयातून डोंगरावर जमीन खरेदी केली. मात्र आमच्या कामाविषयी कळल्यावर डोंगरावर जागा द्यायलाही गावकरी तयार नव्हते. आज आमच्याकडे ४२ मुले आहेत. दोन स्त्रिया आहेत. मात्र, त्यांच्या मदतीसाठी संस्थेत कोणी नोकरी करायला तयार नाही. माझी बायको त्या दोन स्त्रियांच्या मदतीने स्वयंपाक करते. ८०-९० भाकऱ्या थापल्या जातात. कधी त्यापैकी एखादी महिला आजारी असते. माझा मुलगा त्या मुलांमध्येच खेळतो. माझे वडीलही आमच्यासोबतच राहतात. आमचे सर्व कुटुंब त्यांच्यामध्येच आहे. मात्र हे पाहूनही कोणी नोकरीसाठी सहसा तयार होत नाही. या सर्व पाश्र्वभूमीतही पुढे चालण्याची प्रेरणा मिळते ते कोणीतरी पाठीवर थोपटते तेव्हा. ‘लोकसत्ता’ने दिलेल्या शाबासकीने आम्हाला ओझोन मिळाला आहे. त्यामुळे संस्थेचे आरोग्यही सुधारू लागले आहे. समाजाच्या समस्या अंशत तर कमी करण्यासाठी आयुष्यभर काम करण्याची प्रेरणा यातून मिळाली आहे. मिळालेल्या निधीतून निवासस्थानाचे काम होईल तसेच स्वयंपाक करणाऱ्या स्त्रियांना अधिक वेतन देता येईल.
दत्ता बारगजे, इन्फंट इंडिया, बीड.  (९४२२६९३५८५)
सकारात्मकतेचा परिचय

स्वमग्न, बहुविकलांग, अक्षम मुलांना आधार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम संस्था करते.  समाजात सकारात्मक विचाराने काम करणारी अनेक माणसे आहेत. अशा कामांना पाठिंबा देण्याचा सकारात्मक विचार करणारीही अनेक माणसे आहेत. या दोघांना एकमेकांचा परिचय करून देण्याचे काम लोकसत्ताने केले आहे. संस्थेची माहिती प्रसिद्ध झाल्यावर आलेल्या भरभरून प्रतिसादाने आश्रयमिश्रीत सुखद धक्का बसला. संस्थेचे काम लोकांपर्यंत पोहोचले. अनेकांनी फोनवरून माहिती घेतली. अनेकांनी मदत करूनही नाव प्रसिद्ध न करण्यास सांगितले. या सर्व मदतीसाठी लोकांचे आभार मानणार नाही, तर कायम त्यांच्या ऋणात राहायचे आहे. या मुलांसाठी शाळेची जागा नाही. ती शोधतो आहोत. लोकांनी दिलेल्या मदतीतून शाळा उभारण्याचे प्रयत्न करणार आहोत.
नेत्रा तेंडुलकर-पाटकर, झेप पुनर्वसन केंद्र, चिंचवड (९८५०२८०६६९)
संस्थेला  हक्काची  जागामिळवून  द्यायचीय

समाजातील निराधार वृद्धांना आधार देणाऱ्या आमच्या संस्थेबद्दलची माहिती ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झाल्यानंतर आमच्या संस्थेला एक चेहरा मिळाल्यासारखे झाले. संस्थेची माहिती डोंबिवलीमधीलच अनेक जणांना नव्हती. या वृत्तामुळे ही माहिती पोहोचली. अनेकांनी विविध प्रकारच्या मदतीसाठी आम्हाला संपर्क साधला. यातील काही जणांनी अन्नधान्य अशा विविध स्वरूपांची मदत आम्हाला दिली तर काहींनी आर्थिक साहाय्यही केले. सध्या आमच्या संस्थचे काम हे एका भाडय़ाच्या जागेत सुरू आहे. पण या संस्थेला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न आहे. तसेच अल्झायमर यांसारखे आजार झालेल्या व्यक्तींना सर्वसामान्य वृद्धांसोबत ठेवणे तसे अवघड जाते. यामुळे अशा व्यक्तींसाठी वेगळा कक्षही सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
डॉ. मालिनी केरकर, मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट, डोंबिवली (९८२०२८१३२९)
मोठे  रुग्णालय  स्थापन  करायचेय

घरच्यांना नको वाटणारे आणि समाजातही ज्यांना आपले म्हणण्याची तयारी दाखवत नाही अशा रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी काम करणाऱ्या नगरजवळील एका गावातील आमच्या संस्थेची माहिती ‘सर्वकार्येषु’ उपक्रमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचे फोन आले पण दुर्दैव असे की, मदतीसाठीचे फोन कमी आणि आमच्या घरातील अमुक महिला मनोरुग्ण आहे, तिला तुमच्या आश्रमात सोडू का? असे प्रश्न विचारणारे हे फोन होते. ‘सर्वकार्येषु’ या उपक्रमामुळे आमच्या संस्थेचे कार्य समाजात अधोरेखित झाले. यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. सध्या आमच्याकडे ७५ खाटांचे छोटेखानी रुग्णालय आहे. ते ५०० खाटांचे करण्याचा मानस आहे. संस्थेत मनुष्यबळ, साधनसामग्री याचीही अनेकदा उणीव भासते, ती भरून काढण्यासाठी प्रयत्न करू आणि आमच्याकडे असलेल्या स्त्रियांना बरे करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करू.
डॉ. राजेंद्र धामणे, इंद्रधनू प्रकल्प, अहमदनगर (९८६०८४७९५४)
संगीताच्या प्रसारासाठी

माणसाच्या मनाला सुखद अनुभव देणारा गायनाचा अनमोल ठेवा जपणारी आमची संस्था तशी १०२ वष्रे जुनी आहे. संस्थचे कामही खूप मोठे आहे. या संस्थेला सध्या चारही बाजूंनी बळ मिळण्याची मोठी गरज आहे. हे बळ देण्याचे काम ‘सर्वकार्येषु’ उपक्रमाने केले आहे. या संस्थेत सध्या भास्करबुवा भगरे यांची पाचवी पिढी काम करत आहे. आमच्या संस्थेची जागाही रस्ता रुंदीकरणाच्या कामात गेली होती. आता पुन्हा संस्थेवर ही वेळ येण्याची शक्यता आहे. यामुळे संस्थेला जागेची गरज आहे. संस्थेत संगीतविषयक पुस्तके, सीडीज असे एक समृद्ध ग्रंथालय तयार करण्याचा आमचा मानस आहे. याचबरोबर आम्हाला जुने ग्रामोफोनच्या रेकॉर्ड सीडीमध्ये रुपांतरित करायचे आहे. आम्हाला मिळालेल्या या निधीचा वापर आम्ही संस्थेच्या भावी कामासाठी करू आणि समाजात संगीत रुजवण्याचे आणि टिकवण्याचे काम अव्याहत करत राहू.
सुहास दातार, पुणे भारत गायन समाज (०२०-२४४५३९३७)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा