सहा दशकांपूर्वी १९५२ मध्ये ठाणे जिल्ह्य़ातील एक गाव असणाऱ्या अंबरनाथमधील काही महिलांनी एकत्र येत भगिनी मंडळाच्या माध्यमातून बचत गटाची स्थापन केली. कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत उत्कर्षांचा हेतू नव्हता. समाजाप्रति काही तरी विधायक उपक्रम राबवावा, या उद्देशाने एकत्र आलेल्या या महिला संघटनेच्या कार्याचे फलित म्हणजे आताची भगिनी मंडळ शाळा.
येत्या दसऱ्याला सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणाऱ्या भगिनी मंडळ संस्थेच्या अंबरनाथ शहरात बाळवाडी भगिनी मंडळ प्राथमिक, सुहासिनी अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक अशा तीन शाळा असून त्यात सध्या दोन हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शाळा पूर्वेकडच्या साई विभागात तर तिसरी शाळा पश्चिमेकडील विम्को नाका परिसरात आहे. केवळ क्रमिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा असा भगिनी मंडळचा सध्या ठाणे जिल्ह्य़ात लौकिक आहे.
पुष्पमाला कर्णिक यांनी त्यांच्या समविचारी मैत्रिणींना सोबत घेऊन ही संस्था स्थापन केली. शाळेची इमारत बांधण्यासाठी विविध उपक्रम राबवून निधी संकलित केला. त्यासाठी जागोजागी खाद्यपदार्थाची विक्रीही केली. शहरातील शंकरराव केळकर यांनी कोणतीही अट न घालता त्यांचे भाऊ बाळ केळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेच्या इमारतीसाठी साई विभागात स्वत:च्या मालकीचा भूखंड संस्थेला दान केला. संस्थेनेही ‘बाळवाडी’ नाव ठेवून त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवली. संस्थेच्या एक सदस्या सरस्वती गोगटे यांनी शाळेसाठी भूखंड मिळवून देण्यात मोलाची मदत केली. १९६७ मध्ये ज्या वेळी संस्थेने शाळेचे रोपटे लावले तेव्हा गावात मुळातच शाळा कमी होत्या. विद्यार्थ्यांना शाळेसाठी बरीच पायपीट करावी लागे. आता शहरात शिक्षणाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. इंग्रजी माध्यमाच्या प्रभावामुळे मराठी शाळांना पट कमी होत आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीतही भगिनी मंडळाच्या तिन्ही शाळांचा पट केवळ कायमच नव्हे तर वाढता आहे.
कारभार महिलांच्या हाती
अगदी स्थापनेपासून शाळेचा कारभार संपूर्णपणे महिलांच्या हाती आहे. शाळेत साठहून अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असून काही अपवाद वगळता सर्व महिलाच आहेत. संस्थापिकांपैकी एक असणाऱ्या सुहासिनी अधिकारी तब्बल चार दशके संस्थेच्या सचिव म्हणून कार्यरत होत्या. लतिका मुकावार या शाळेतील पहिल्या शिक्षिका. पुढे त्या मुख्याध्यापिकाही झाल्या. मुख्याध्यापिका ऊर्मिला गुप्ते यांच्या काळात उपक्रमशील शाळा असा भगिनी मंडळचा लौकिक झाला. आता सचिव डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक शाळेचा लौकिक वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
काळानुरूप बदल
शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वास्तवाची नोंद घेत भगिनी मंडळ शाळेनेही वेळोवेळी आपल्या धोरणात तसेच कार्यप्रणालीत बदल केले. सुरुवातीला बरीच वर्षे शाळा सातवीपर्यंत होती. परिणामी आठवीला विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांच्या आग्रहाखातर २००५ पासून शाळेत आठवीचा वर्ग सुरू झाला. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली. इंग्रजी माध्यमाचे आक्रमण थोपविण्यासाठी शाळेने २००७ पासून इयत्ता पाचवीपासून अर्धइंग्रजी (सेमीइंग्लिश) माध्यमाची तुकडी सुरू केली. आधुनिक शिक्षणात अपरिहार्य असलेले इ-लर्निग विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले. आता नववी-दहावीच्या अभ्यासक्रमात व्यवसाय मार्गदर्शन या विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध कंपन्यांमध्ये क्षेत्रभेटी आयोजित करून तेथील उत्पादन प्रक्रियेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाते. नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि क्रीडा स्पर्धामध्येही शाळेतील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असतो. बहुतेक शाळांच्या दर्शनी भागातील सूचना फलकावर रोजचा दिनविशेष लिहिलेला असतो. भगिनी मंडळचे वैशिष्टय़ हे की त्यातील अनेक दिनविशेष शाळेच्या आवारात साजरे केले जातात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत दिंडी काढली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरू-शिष्यांचे नाते समजावून देण्यासाठी नाटिका बसवून सादर केल्या जातात.
स्काउट गाइड अजिंक्य
स्काउट गाइड जिल्हा मेळाव्यात येथील विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे शाळेला सर्वसाधारण अजिंक्यपद मिळवून दिले आहे. शहरात विविध प्रसंगात भगिनी मंडळाचे स्काऊट गाइड स्वयंसेवक मदतीसाठी पुढे येतात. शाळेत गेली दोन दशके दर रविवारी संध्याकाळी मराठी विज्ञान परिषदेचे वर्ग भरतात. मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी लागावी म्हणून प्रा. भगवान चक्रदेव आणि त्यांचे सहकारी या वर्गात विनामूल्य मार्गदर्शन करतात.
प्रकल्प प्रदर्शन
शाळेत एका वर्षी स्नेह संमेलन तर त्यापुढील वर्षी प्रकल्प प्रदर्शन भरविले जाते. या प्रकल्प प्रदर्शनाची तयारी शाळेतील शिक्षिका वर्ष-दीड वर्ष आधीपासून करतात. विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाते. एखादा विशिष्ट विषय निवडून त्यासंदर्भातील सर्व माहिती प्रदर्शनात मांडली जाते. १९८८ पासून शाळेने हा उपक्रम सुरू केला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्याविषयी पहिले प्रदर्शन शाळेने भरविले. ग्लोबल वॉर्मिग, कर्तृत्ववान महिलांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे अग्निशिखा, साहित्यिकांच्या प्रांगणात, गीतरामायण, नोबेलनगरी आदी विषय प्रदर्शनांच्या माध्यमातून हाताळले. गेल्या शैक्षणिक वर्षांत ‘सेवाव्रती बाबा आमटे’ हा विषय संस्थेने प्रदर्शनासाठी निवडला. त्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संस्थेच्या पदाधिकारी आणि शिक्षिका आनंदवन आणि हेमलकसाला स्वखर्चाने जाऊन आल्या. तिथे आमटे कुटुंबीयांशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. संस्थेने दिलेले आमंत्रण स्वीकारीत डॉ. प्रकाश आमटे यांनी प्रदर्शनाला भेट दिली. गेल्या पाच दशकांच्या वाटचालीत शाळेला खूप मोठय़ा मंडळींनी भेटी दिल्या आहेत. त्यात महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे, वसंतराव गोवारीकर, सिंधूताई सपकाळ आदींचा समावेश आहे.
नवी आव्हाने
अनेक खाजगी शाळा घटत्या पटसंख्येमुळे चिंतेत आहेत. भगिनी मंडळ शाळेत नेमके उलटे चित्र आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा असा लौकिक असल्याने शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात शाळेची विद्यमान वास्तू अपुरी पडत आहे. इमारत जुनी झाली असून तिचा लवकरच पुनर्विकास करावा लागणार आहे. त्यासाठी माजी विद्यार्थी तसेच शहरातील दानशूरांकडून निधी संकलन करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. शाळेच्या विस्तारासाठी संस्थेला आणखी एका भूखंडाची आवश्यकता असून त्यासाठी शासनदरबारी तसेच स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुलींसाठी स्वतंत्र शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय या संस्थेच्या भावी योजना आहेत.
– संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com