बहुतेक सारे महत्त्वाचे वैज्ञानिक-तंत्रज्ञानीय शोध भारतात प्राचीन काळीच लागले होते, अशी विधाने अलीकडच्या काळात अनेक उच्चपदस्थ व्यक्ती महत्त्वाच्या विचारपीठांवरून सार्वजनिकरीत्या करीत आहेत. इलेक्ट्रॉनिक व सामाजिक माध्यमांतून मोठय़ा प्रमाणावर या युक्तिवादाचा प्रचार व कमी प्रमाणावर त्याचा प्रतिवाद होताना दिसतो. सर्व आधुनिक विद्या पाश्चात्त्यांनी भारतातून पळवल्या आहेत असे भारतातील अभ्यासक्रमातून शिकविले जावे, यासाठी आज सत्तास्थानी असणाऱ्या अनेक व्यक्ती हिरिरीने कामाला लागल्या आहेत व त्याचा विरोध करण्यासाठी ख्यातनाम वैज्ञानिकांसह अनेक जण पुढे सरसावले आहेत. या पाश्र्वभूमीवर ही लेखमाला लिहिली जात आहे. या वादातील दोन्ही बाजूंच्या व्यक्ती व अनेक सामान्य वाचक (ज्यांची कोणतीही भूमिका अद्याप निश्चित झालेली नाही) मला ‘या प्रश्नावर तुम्ही लिहाच’ असे सांगत आहेत. प्राचीन काळात भारतीयांनी कोणकोणते शोध लावले होते याची यादी बरीच मोठी आहे व तिच्यात रोज भरही पडत आहे. त्यातील महत्त्वाचे शोध म्हणजे क्लोनिंग (उदा. शंभर कौरवांचा जन्म), प्लास्टिक सर्जरी (उदा. गणपती – माणसाच्या धडावर हत्तीचे डोके), इंटरनेट (उदा. संजयची दिव्यदृष्टी), प्रक्षेपणास्त्रे इ. याशिवाय भारतीय परंपरेतील अनेक बाबी – आयुर्वेद, आहारविहार आणि ऋतुचर्या-दिनचर्या याविषयीच्या लोकसमजुती, स्थापत्य, धातुविज्ञान (मेटॅलर्जी), पारंपरिक शेतीतील पर्यावरणविषयक विचार – या सर्व बाबी विज्ञानाधारित आहेत की नाही, याविषयी बहुसंख्यांच्या मनात संभ्रम आहे व उत्सुकतादेखील. ही लेखमाला अशा जागरूक, उत्सुक, आपली मते तपासून पाहण्यास व आवश्यक वाटल्यास ती बदलण्यास तयार असणाऱ्या सर्व वाचकांसाठी आहे. या विषयावर ज्यांची मते आधीपासून तयार आहेत, त्यांनीही ती यानिमित्ताने तपासून पाहावी, असे माझे त्यांना नम्र आवाहन आहे. या चच्रेत अनेक वाद-विवादांचे धागे परस्परांत गुंतले आहेत. आपण आधी त्यांची सोडवणूक करून प्रत्येक धाग्याचा थोडक्यात परामर्श घेऊ या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा