दादासाहेब घटाटे

१९५७ मध्ये नागपूर सोडून दिल्लीला शिक्षणासाठी गेलो आणि त्याच काळात अटलबिहारी वाजपेयी प्रथम ग्वाल्हेर लोकसभा मतदार क्षेत्रातून खासदार म्हणून निवडून दिल्लीत आले. त्यापूर्वी जनसंघाच्या कामामुळे ओळख होती मात्र दिल्लीला एकत्र आल्यामुळे आमच्यातील मैत्रीअधिक दृढ होत गेली. त्या काळात अनेकदा आमच्या भेटी होत. माझ्याजवळ दुचाकी होती. त्यामुळे अटलजींना कुठल्याही कार्यक्रमाला वा पक्षाच्या कामासाठी जायचे असले तर मी त्यांना माझ्या दुचाकीवर  घेऊन जायचो. अटलजी जेवढे गंभीर स्वरूपाचे आणि कविमनाचे आहेत तेवढेच ते विनोदी स्वभावाचेही आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत प्रचाराला किंवा दौऱ्यांवर जात असताना कंटाळा येत नसे. भारतीय राजकारणाचा इतिहास त्यांना मुखोद्गत होता.

पंतप्रधान इंदिरा गांधी, नरसिंह राव यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. एक दिवस अटलबिहारी बाजपेयी आजारी होते आणि त्या दिवशी सभागृहात एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. त्यांच्याशिवाय ती बैठक होणे शक्य नव्हते. त्यामुळे त्या दिवशी संसदेतील कामकाज बंद ठेवून इंदिरा गांधी त्यांची भेट घेण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. भारतीय जनता पक्षाचे केवळ १३ दिवसांचे सरकार पडले. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या निवासस्थानी खूप गर्दी होती. मी बाहेर उभा असल्याचे त्यांच्या स्वीय सचिवांनी बघितले आणि ते मला आतमध्ये घेऊन गेले.

त्यावेळी अटलजींच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव किंवा सरकार पडल्याचे दुख नव्हते.

माझे वडील लेखक होते. त्यांची अटलजींशी ओळख होती. त्यामुळे त्यांची साहित्यावर बरीच चर्चा होत असे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, बंगाली या भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. पुण्याला एकदा त्यांची सभा होती त्या वेळी त्यांनी मराठीमध्ये भाषण केले होते.

साधारण १९८४ मध्ये अटलजी एका बैठकीच्या निमित्ताने बंगलोरला असताना तेथील एका कार्यकर्त्यांला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. अटलजी त्या वेळी बैठक सोडून त्या कार्यकर्त्यांच्या घरी गेले होते. पंतप्रधान असताना अटलजींची भेट ठरलेलीच असायची. ते निवासस्थानातून बाहेर पडण्याच्या आधी सकाळी ९ वाजता नास्ता करीत होते.

त्यामुळे अनेकदा नास्त्याच्या वेळी ते मला बोलवीत होते. मला कधीच त्यांची भेट घेण्यासाठी वेळ घ्यावी लागली नाही. राजकीय सबंधांच्या पलीकडे अटलजींचे अनेकांशी जे नाते होते त्या नात्याने समाजातील प्रत्येकाला अटलजी आपलेसे वाटायचे आणि यातच त्यांचे मोठेपण होते.

(घटाटे हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत बराच काळ घालवलेले मूळचे नागपूरकर आहेत.)

Story img Loader