शेतकरी पारंपरिक शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु, काही शेतकरी नव्या वाटा शोधून शेतीमधून भरपूर उत्पन्न कमवित असतात. रेशीम शेती म्हणजेच तुती लागवड ही अशा शेतकऱ्यांसाठी एक चांगला मार्ग आहे. थोडे कष्ट, व्यवस्थितपणा व शिस्त यांचा अवलंब केला, तर कमी खर्चात रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न घेता येते व आपल्या कुटुंबातील सर्वांना रोजगारही पुरवता येतो.

रेशीम शेती हा शेतीला पूरक उत्कृष्ट जोडधंदा आहे. वर्षातून ४ ते ५ पिके घेता येतात. एकदा केलेली तुती लागवड १० ते १५ वर्षे टिकते. पर्यावरणपूरक व्यवसाय, कमीत कमी रासायनिक खतांचा वापर, घरातील प्रत्येक व्यक्तीला घरातच रोजगार मिळतो. त्यामुळे मजुरीचाही प्रश्न मिटतो. इतर पिकांच्या तुलनेत कमी पाणी व खते लागतात. उत्पादित कोषांना बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. शासनातर्फे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण व अनुदान दिले जाते.

रेशीम शेतीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अनुदान योजना आहे. यामध्ये नवीन शेतकऱ्यांना एकरी ५०० रुपये भरून लागवडीसाठी नोंदणी करून सभासद होता येते. अशा शेतकऱ्यांना अंडीपुंज अनुदान योजना, प्रशिक्षण, सिल्कसमग्र योजनांतर्गत लाभ, मनरेगा या अनुदान योजनांचा त्या शेतकऱ्यांनी शासनाचे आवश्यक ते निकष पूर्ण केल्यानंतर लाभ घेता येतो.

तुती लागवड तुती बेण्यापासून करायची असते. त्यासाठी एम-५, एस-५४, एस-३६, व्ही -१ अशा सुधारित जातीची बेणे वापरावीत. बेणे तयार करताना ६ ते ८ महिने वयाच्या तुती झाडांची १० ते १२ मिमी जाडीच्या फांद्या निवडण्यात याव्यात व बेण्याची लांबी ६ ते ८ इंच असावी. त्यावर किमान ३ ते ४ डोळे असावेत व तुकडे करताना धारदार कोयत्याने तुकडे करावेत कोवळ्या फांद्या बेणे तयार करण्यासाठी वापरु नयेत.

बेण्यावरील रासायनिक प्रक्रिया

तुती कलमे तयार केल्यानंतर जमिनीतली वाळवी/ उधळी, बुराशी रोगापासून बेण्याचे नुकसान होऊ नये यासाठी बेण्यावर रासायनिक प्रकिया करावी. पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. १) थॉयमेटच्या १ टक्के द्रावणात कलमे ४ ते ५ तास बुडवून ठेवावेत.

२) बुरशीनाशक बाव्हिस्टिन, कॅप्टॉन यांचे १ टक्के द्रावणात तुती बेणे ४ ते ५ तास बुडवून ठेवाव्यात.

३) तुती झाडाचा लवकर मुळे फुटावीत याकरिता रुटेक्स पावडर किंवा कॅरडॉक्स पावडर बेण्याच्या खालच्या भागास लावावी. त्यामुळे लवकर मुळे फुटून झाडांची जोमदार वाढ होईल.

तुतीचे लागवड अंतर

नवीन सुधारित पद्धतीनुसार फांदी पद्धत कीटक संगोपनामध्ये वापरली जात असल्यामुळे फांदी पद्धतीसाठी महाराष्ट्रात नव्यानेच रेशीम संचालनालयामार्फत तुती लागवडीसाठी ५ बाय २ बाय १ फूट अंतर ठरलेले आहे. मध्यम जमिनीसाठी व ६ बाय २ बाय १ फूट अंतर तर भारी जमिनीसाठी तुती कलमांची लागवड करवून घेण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये तुती झाडाची संख्या एकरी १० हजार ८९० इतकी बसते. त्यामुळे प्रतिएकरी पाल्याच्या उत्पादनात नेहमीच्या ३ बाय ३ फूट लागवड पद्धतीपेक्षा दुपटीने वाढ होते.

पट्टा पद्धतीच्या तुती लागवडीचे फायदे:

१) या पद्धतीमुळे झाडाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

२) तुती लागवडीमध्ये हवा खेळती राहते व भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश सर्व झाडांना मिळाल्यामुळे तुती पाल्याची प्रत चांगली मिळते व पाल्याचे उत्पादनही भरपूर प्रमाणात वाढते.

३) आंतरमशागत करण्यासाठी सोईचे होते.

४) कोळपणी करून तुती झाडांच्या रांगामधील तण काढू शकतो. त्यामुळे खुरपणी, तणनाशकावरील खर्च कमी करता येतो.

तुती बागेची आंतरमशागत :

तुती कलमांची लागवड केल्यानंतर १ महिन्याने खुरपणी करून गवत/तण काढावे. बागेतील गवतामुळे सूर्यप्रकाश मिळत नाही व उष्णता निर्माण होऊन तुती कलमाची पाने पिवळी पडतात, तसेच तुती कलमांना गवतामुळे अन्नद्रव्ये कमी पडून पाने गळून पडतात. त्यामुळे तण काढणे अतिशय आवश्यक बाब आहे. यानंतर प्रत्येक पिकानंतर उपलब्ध साधन व अंतरानुसार बैलजोडी अथवा ट्रॅक्टरने अंतर मशागत करावी.

तुती झाडांची छाटणी:

तुती बागेच्या आंतरमशागतीमध्ये तुती झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटनी करण्यास फार महत्त्व आहे. सर्वसाधारणपणे शेतकरी फांदी कीटकसंगोपन पद्धतीचा वापर करत असताना तुती झाडांची / फांद्याची छाटणी विळ्याने फांद्या खेचून करतो. यामध्ये झाडांचा डिंक बाहेर निघून वाया जातो. व मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तसेच उन्हाळ्यात झाड सुकून जाऊन गॅप पडते. यासाठी शेतकऱ्यांनी तुती झाडांच्या छाटणी करिता कटरचा वापर केला पाहिजे. अशा प्रकारे छाटणी केल्यानंतर तुती झाडापासून सकस व भरपूर पाला मिळतो. कमी पाण्याच्या (आठमाही) क्षेत्रामध्ये तुतीझाडाची प्रथम छाटणी जमिनीपासून एक फुटाच्या वर करावी एक फुटापर्यंत तुती झाडास आडवी फांदी न वाढू देता सरळ खोड वाढू द्यावे व पुढील छाटणी एक फुटाच्या वर करावी. जिरायत तुती लागवड क्षेत्रात वाढविलेल्या तुती झाडाची दीड ते दोन वर्षानी ४ ते ५ फूट उंचीवर छाटणी करावी व तद्नंतर प्रत्येक पिकानंतर दोन डोळे ठेवून फांद्यांची छाटणी करावी.

गांडूळ व इतर खताचा उपयोग:

तुती लागवड केलेल्या जमिनीत गांडुळ खत वापरणे फयदेशीर आहे. गांडुळखतामुळे जमिनीतील पाला-पाचोळा गांडुळ कुजवितात, जमिनीत हवा खेळती राहण्यास पोकळी तयार करतात तसेच जमिनीतील सुक्ष्म जंतूचे कार्यप्रणाली वाढवितात. त्यामुळे तुती झाडांना सुक्ष्म अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात उपलब्ध होऊन तुती पानामध्ये कार्बोहायड्रेट व प्रथिनांचे प्रमाणदेखील वाढते.

तुतीबागेत रासायनिक खते :

तुतीची वाढ योग्य होण्यासाठी रासायनिक खताची मात्रा देणे महत्त्वाचे आहे. तुती लागवड केल्यानंतर २ ते अडीच महिन्यात कलमांना मुळे फुटतात. तेव्हा पहिली मात्रा अडीच महिन्यांनतर एकरी २४ किलो नत्र, स्फुरद, पालाश रिंग पद्धतीने तुती झाडांच्या बाजूला गोल खड्डे करून द्यावे व खत दिल्यानंतर त्यावर मातीचा भर द्यावा. जेणेकरुन दिलेले खत वाया जाणार नाही. दुसरा डोस ३ ते ४ महिन्यांनी एकरी २४ किलो नत्र रिंग पद्धतीने द्यावा. अशी दोन वेळा रासायनिक खताची मात्रा पहिल्या वर्षी द्यावी. तुतीच्या बागेस माती परीक्षण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी. शेणखत व रासायनिक खते जमिनीत ८ ते १० सेमी खोलवर टाकावीत. रासायनिक खतांचा वापर करताना एकच मूलद्रव्याची खते जसे नत्राकरिता अमोनियम सल्फेट, स्फुरदाकरिता सिंगल सुपर फॉस्फेट व पालाशकरिता म्युरेट ऑफ पोटॅश यांचा प्राधान्याने वापर करावा.

तुतीच्या झाडांवरील रोग नियंत्रण :

इतर झाडांप्रमाणेच तुतीच्या झाडांवर ही बरेच रोग आहेत. वेळेवर सर्व पाला वापरला गेल्यास मात्र या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत नाही. तसेच ठरावीक रोगांमुळे पूर्ण झाडाचे नुकसान झाले आहे व त्यामुळे पूर्ण पीक पाया गेले असे कधीही आढळून आलेले नाही. तरीदेखील काही महत्त्वाच्या रोगांची व जे महाराष्ट्रात आढळून येतात अशा रोगांची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

तुतीच्या पाल्यावर गुजराण करणारे रेशीम कीटकाचे अंडीपुंज कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने खरेदी करून संगोपन करावे. अंडीपुंजाचे संगोपन, रेशीम कोश तयार झाल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था करण्यास शासन पातळीवर शेतकऱ्यांना मदत मिळू शकते. शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा म्हणून रेशीम उद्याोग फायदा तर मिळवून देतोच, पण याचबरोबर उत्पन्नही मिळते.
digambarshinde64@gmail. com