लोकशाहीर कॉ. अमरशेख यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान अतुलनीय होते. अतिशय धारदार आणि टिपेला पोहोचणाऱ्या त्यांच्या आवाजाचा व उंच तानेचा प्रभाव जनमानसावर पडत असे. गाण्याचा आशय व विचार तर ते लोकांपर्यंत टोकदारपणे पोहोचवायचेच, पण भावोत्कट गाणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते.  सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीची प्रेरणा ठरलेल्या या शाहिरी कलावंताचे जन्मशताब्दी वर्ष संपत आले तरी कोणत्याच स्तरावर या घटनेची  दखल घेतली गेली नाही.  अशा या उपेक्षित शाहिराविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येत्या २० ऑक्टोबरला लोकशाहीर कॉ. अमरशेख यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे. गेल्या वर्षभरात ना सत्ताधाऱ्यांना त्यांची आठवण झाली ना कला-साहित्यातील धुरिणांना. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जो तीव्र संघर्ष मुंबई व महाराष्ट्रातील कामगार व सर्वसामान्य जनतेने केला त्या जनतेला या लढय़ात सामील होण्याची प्रेरणा देण्यात लोकशाहीर अमरशेख, त्यांचे कलापधक व शाहिरीचा सिंहाचा वाटा होता. कॉ. डांगे, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांच्या इतकेच या लढय़ात शाहिरांचे योगदान होते. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सारा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या व इतर वेळीही कामगार चळवळीची प्रेरणा ठरलेल्या या शाहिरी कलावंतांकडे दुर्लक्षच झाले. कारण समाजाच्या संस्कृतीची सूत्रे हातात असणाऱ्या, साहित्य, कला व इतर प्रासारमाध्यमांवर नियंत्रण असणाऱ्या मध्यम व अभिजन वर्गाने सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असणाऱ्या या शाहिरी कलेला दुय्यम मानले. प्रस्थापित साहित्य, कला क्षेत्रातील कुणा कलाकाराला लाभली नसेल एवढी अफाट लोकप्रियता या कलाकारांना लाभली. पण प्रस्थापित कला-साहित्याच्या मूल्यमापनाच्या निकषात ‘लोकप्रियता’ हा दुय्यमत्वाचा निकष मानला जातो. त्यामुळेही या कलाकारांची विशेष दखल घेतली गेली नाही.

लोकशाहीर अमरशेख दुर्लक्षित राहिले त्याची आणखीही काही कारणे आहेत. अमरशेख मुस्लीम होते. त्यामुळे हिंदुत्ववादी प्रभावातील साहित्यविश्वाने त्यांची उपेक्षा केली. ते कम्युनिस्ट होते म्हणून मुस्लीम समाज व भांडवली सत्ताधारी वर्ग त्यांच्या विरोधात होते. आपल्या कलेवर येणारी पक्षाची बंधने झुगारली म्हणून कम्युनिस्ट पक्षातील कडव्या मंडळींनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अमरशेखांवर बहुरंगी भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता. आई मुनेरबीकडून आलेले वारकरी व संतवाङ्मयाचा त्यांच्यावर संस्कार होता. लहान वयातच स्वातंत्र्य चळवळीतील प्रभात फेऱ्यांमधून गाणी म्हणणाऱ्या अमरशेखांच्या नसानसात देशभक्ती भिनलेली होती. मराठी मातीवर त्यांचे प्रेम होते. आणि विशेष म्हणजे माणसावर त्यांची निष्ठा होती. जातिभेद, धर्मभेद व आíथक विषमता यामुळे माणसांची होणारी पिळवणूक व अन्याय संपून एका शोषणविरहित समाजाचे स्वप्न ते पाहत होते. अमरशेख म्हणत, ‘‘कवी काय किंवा शाहीर काय, तो समकालीन युगप्रवृत्तीचा प्रवक्ता असतो. येईल त्या परिस्थितीला तोंड देऊन त्या युगातील सत्य, म्हणजे युगधर्म त्याने सांगायचा असतो. आजचा युगधर्म आहे समाजवाद आहे म्हणून मी त्याचा वाहक आहे.’’ समाजवादाची बांधिलकी मानणारा साहित्यिक म्हणून साहित्य व कलेला स्वायत्त क्षेत्र मानणाऱ्यांनी त्यांच्या साहित्याला प्रचारकी ठरवून त्याकडे दुर्लक्ष केले.

१९४२-४३ च्या दरम्यान सांगलीचे अण्णा भाऊ साठे, बार्शीचे अमरशेख व कोल्हापूरचे दत्ता गवाणकर हे तिघे कलाकार कम्युनिस्ट पक्षात एकत्र आले आणि त्यांनी लाल बावटा कलापथक चालू केले. या कलापथकाने शाहिरी कलेचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी तमाशाचा बाज स्वीकारला पण त्याचे स्वरूप पालटून नवे लोकनाटय़ जन्माला घातले. शिवाय सामाजिक/राजकीय आंदोलनांशी ही शाहिरी जोडलेली असल्याने त्यातून एक आधुनिक जनवादी शाहिरीची परंपरा निर्माण झाली. या कलापथकाचे प्रमुख गायक व कलाकार होते लोकशाहीर अमरशेख. त्यांचा पल्लेदार आवाज, अण्णा भाऊंचे शब्द आणि गवाणकरांचे दिग्दर्शन यांचा संगम झाला आणि महाराष्ट्रातील रस्ते, मदाने, सभागृहे या कलापथकाच्या कार्यक्रमांनी गर्जू लागली. हजारो लोक कार्यक्रमांना जमू लागले. शाहिरी कलेचा हा नवा आविष्कार जनतेत प्रचंड लोकप्रिय झाला. या कलापथकाचे कार्यक्रम पाहून वीर वामनराव जोशी म्हणाले, ‘‘जर प्रामाणिक देशभक्तांच्या व्याख्यानांनी देशात एका वर्षांत क्रांती झाली तर या कलाकारांच्या प्रभावी प्रचाराने ते कार्य केवळ तीन महिन्यांत होऊ शकते.’’

संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात या शाहिरी कलेने अत्युच्च शिखर गाठले. शाहीर अमरशेखांच्या कलेला बहर आला. भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व स्वीकारूनही कॉँग्रेसने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या एकभाषिक राज्याबाबत धरसोड करायला सुरुवात केली व महाराष्ट्रात प्रचंड असंतोष उफाळून आला. या लढय़ाला धगधगते ठेवण्याचे काम शाहिरांनी केले. गावोगाव फिरून शाहिरांनी महाराष्ट्र ढवळून काढला. १९४८ साली भरलेल्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेत अमरशेखांनी अण्णा भाऊ साठे यांचा ‘महाराष्ट्राचा पवाडा’ व ‘माझी मुंबई’ हा वग सादर केला. त्याचा प्रभाव इतका होता की, परिषदेच्या सगळ्या भाषणांमधून व ठरावांमधून जे व्यक्त झाले नाही ते शाहिरांच्या या कार्यक्रमातून व्यक्त झाले, असे अनेक वृत्तपत्रांनी म्हटले. या आंदोलनात १९५६च्या गोळीबारामुळे १०५ हुतात्मे झाले व महाराष्ट्र पेटला. गावोगाव हजारोंच्या सभा सुरू झाल्या व त्या अण्णा  भाऊ अमरशेखांच्या गीते व पवाडय़ांनी व वगनाटय़ांनी गाजवल्या. ‘गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’, ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा खुशाल कोंबडं  झाकून धरा’ ही अमरशेखांनी ढंगदार पद्धतीने सादर केलेली गीते आबालवृद्धांच्या तोंडी झाली. मुंबईच्या गल्लीबोळात व महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ांत होणाऱ्या अमरशेखांच्या कार्यक्रमांना १० ते १५ हजार लोक जमत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या तीन-साडेतीन लाखांच्या काही सभा चौपाटी, शिवाजी पार्क येथे झाल्या. या सभांमध्ये अमरशेख ‘गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’ व ‘खुशाल कोंबडे झाकून धरा’ ही गीते सुरू करीत तेव्हा तीन-साडेतीन लाखांचा जमाव त्यांना कोरस देतोय असा थरारक अनुभव शाहिरांना आला. अमरशेख व त्यांचे सहकारी शाहीर हे संयुक्त महाराष्ट्र समिती व सर्वसामान्य लोक यांच्यातील दुवा झाले होते.

अण्णा भाऊ व अमरशेख यांचे कलापथक एवढे यशस्वी झाले याचे कारण कलापथकातील कलावंत एका ध्येयाने प्रेरित झालेले होते. उपजीविकेसाठी वा धंद्यासाठी कला विकण्याचा उद्देश त्यामागे नव्हता. पण केवळ विचारांची बठक होती म्हणून ते लोकप्रिय झाले असे नाही. ते सादर करीत असलेल्या कलेमध्ये कलात्मकतेची मूल्ये व दर्जाही होता. अण्णा भाऊंकडे बालवयात आत्मसात केलेला लोककलेचा अस्सल बाज होता तर अमरशेखांकडे उत्तम गायकी कला होती. अतिशय धारदार आणि टिपेला पोहोचणाऱ्या त्यांच्या आवाजाचा व उंच तानेचा प्रभाव पडत असे. गाण्याचा आशय व विचार तर ते लोकांपर्यंत टोकदारपणे पोहोचवायचेच, पण भावोत्कट गाणे हे त्यांचे वैशिष्टय़ होते. ते उत्तम अभिनयपटू होते. प्रपंच चित्रपटातील देवा कुंभाराच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषक मिळाले होते. त्यामुळे ते आपल्या गाण्यातून समोरचा जमाव हलवून सोडायचे. आचार्य अत्रे म्हणत ‘अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज.’ अमरशेख कविहृदयाचे होते. त्यांचे ‘धरतीमाता’ व ‘कलश’ असे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले होते. त्यांच्या काव्य व गायनामागची प्रेरणा व्यक्तिगत भावना-विचारांचा आत्माविष्कार एवढय़ापुरती मर्यादित नव्हती. सामाजिक असंतोष, दु:ख यांचा आविष्कार व परिवर्तनाच्या ऊर्मी जागृत करणे ही त्यामागची प्रेरणा होती. रशियन कवी मायकोव्हस्कीच्या मते कवीला दोन गोष्टींची जरुरी आहे. एक ही की, त्याच्या काव्यामागे सामाजिक ऊर्मी पाहिजे. आणि दुसरी म्हणजे आपण कोणत्या वर्गाचे प्रतिनिधी आहोत याची त्याला स्पष्ट जाणीव हवी. अमरशेखांकडे या दोन्ही गोष्टी होत्या, म्हणून आचार्य अत्रे त्यांना महाराष्ट्राचा मायकोव्हस्की म्हणत.

अमरशेख कम्युनिस्ट पक्षाची शाखा असलेल्या लाल बावटा कलापथकातील कलाकार होते. साम्यवादी विचारसरणीवर त्यांची निष्ठा होती. या विचारसरणीच्या मुशीत त्यांची ध्येयनिष्ठा घडली होती. पण ते कष्टकरी-कामगार वर्गातून आलेले असल्याने त्यांच्या कलेतील जीवननिष्ठा त्यांच्या अनुभूतीवर आधारलेली होती. म्हणूनच त्यांच्या काव्यात साम्यवादी विचारांची कृत्रिम पोपटपंची नसे. तसे असते तर ते येवढे लोकप्रिय झाले नसते. पण काही वर्षांनी लाल बावटा कलापथकातून ते बाहेर पडले व त्यांनी आपले वेगळे कलापथक काढले. राजकारण्यांनी कलेच्या क्षेत्रात किती हस्तक्षेप करायचा याचे भान न राखले गेल्याने अण्णा भाऊ साठे व अमरशेख या कलापथकापासून दूर गेले. कलाकारांनी निर्माण केलेल्या कलेची तपासणी राजकीय पुढाऱ्यांनी करायची व त्यांनी मान्य केल्यावरच कलाकारांनी ती सादर करायची अशा प्रकारची बंधने अमरशेख व अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या कलाकारांना रुचणारी नव्हती. याचा अर्थ राजकीय पुढाऱ्यांनी काही सूचनाच करू नयेत असे त्यांचे म्हणणे नव्हते. पण पुढाऱ्यांना जसे भाषणातून काही सांगायचे असते तसे कलाकारालाही आपल्या कलेच्या माध्यमातून काही सांगायचे असते, तेवढे स्वातंत्र्य त्याला असावे असे त्यांना वाटे. कलाकार राजकारणाबाबत निर्बुद्ध नसतो. आपली कला पक्षीय चौकटीत गुदमरून जाते म्हणून अमरशेखांनी पक्षाचा राजीनामा दिला. पण त्यांनी आपली कला इतर भांडवली पक्षांसाठी राबवली नाही. सरकारशी लागेबांधे बांधले नाहीत. आपली कला त्यांनी जनसेवेला वाहिली. अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या मदतीसाठी त्यांनी कार्यक्रम केले.

कलापथाकांकडे केवळ राजकीय उद्दिष्टांसाठीचे हत्यार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, सभेपूर्वी गर्दी जमवण्यासाठी कलाकारांचा उपयोग करणे, जनतेशी संवाद साधण्याच्या कलाकारांच्या क्षमतेला व स्वतंत्र अस्तित्वाला महत्त्व न देणे इ. कारणांसाठी अनेक कलाकार पक्षापासून दूर गेले. हे केवळ कम्युनिस्ट पक्षात नव्हे तर इतरही पक्षांत घडले. अमरशेख, अण्णा भाऊ साठे वारले तेव्हा नारायण सुर्वे यांनी लिहिले : ‘‘प्रत्यक्ष कम्युनिस्ट चळवळीने वाङ्मय व कला या जीवनाच्या अविभाज्य व आवश्यक गोष्टी आहेत असे त्याकडे किती पाहिले आणि पाहिलेच असेल तर गरज म्हणून किती? आणि खरीखुरी वाङ्मयीन चळवळ अथवा मूल्य म्हणून किती? या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या सर्वाच्या मनाचे दरवाजे ठोठावीत आहेत.’’ अमरशेखांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सरत असताना आजही हे प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत.

 

अविनाश कदम

avinashh58@yahoo.com