प्रा. गणपतराव कणसे
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून सर्व स्तरावर गेले वर्षभर आपण विविध उपक्रम राबवत आहोत. शासनाच्यावतीने अमृतमहोत्सवी वर्षांरंभी १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतवासीयांनी आपल्या घरोघरी तिरंगा ध्वज फडकवून त्यास वंदन करून आपले देशप्रेम व्यक्त करावे. अशा प्रकारचे आव्हान केंद्र शासनातर्फे करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसादही मिळाला. आता १५ ऑगस्ट २०२३ रोजी त्याच पद्धतीने तिरंग्याचा सन्मान करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दिमाखदार सांगता करावी व आपले देशप्रेम व मातृभूमीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी.
याच निमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रक्त सांडले. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून, त्यांना विनम्र अभिवादन करावे. त्यांच्याबद्दलचा सन्मान व आदरभाव व्यक्त करावा. तसेच देशासाठी आम्हीही प्राप्त परिस्थितीत बदलत्या आव्हानांचा व आवश्यक त्या सर्व बाबतीत सक्रिय सहभाग देऊन या देशाची शान व मान वाढविण्याचा एकसंघ होऊन प्रयत्न करू अशा प्रकारची कृतज्ञतेची भावना मनात सदैव जागृत ठेवून त्या दिशेने वाटचाल करू अशी प्रतिज्ञा मनोभावे करावी.
अशाप्रकारे सन १९४२ च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये ज्यांनी सक्रिय सहभाग देऊन तुरुंगवास भोगला. यातना सहन केल्या. घरावर तुळशीपत्र ठेवून बलिदान केले. त्या सर्वाना मानाचा मुजरा करतानाच आमच्या सातारा जिल्ह्यातील एका देशभक्ताची करूण कहाणी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामधून सर्वाना नक्कीच प्रेरणा मिळेल.
सातारा जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील उंडाळे हे एक छोटेसे हजार-दोन हजार वस्तीचे खेडे. ज्या खेडय़ातील एका देशभक्ताने व त्याच्या सुपुत्राने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ या आंदोलनाचा एक भाग म्हणून यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या कल्पनेतून साकारलेल्या व इंग्रज राजवटीचा निषेध करण्याच्या इराद्याने ठिकठिकाणच्या तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन सामूहिक पद्धतीने निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये यशही संपादन केले. ते थोर स्वातंत्र्यसेनानी बाळकृष्ण ऊर्फ दादा उंडाळकर व त्यांचे सुपुत्र स्वातंत्र्यसेनानी शामरावअण्णा पाटील ही पिता-पुत्राची जोडगोळी होय.
यामध्ये दादा उंडाळकरांनी २४ ऑगस्ट १९४२ या दिवशी तीन हजार शेतकरी व शेतमजूर एकत्र करून कराडच्या तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन त्या ठिकाणी ध्वज फडकवून इंग्रज सरकारचा तीव्र निषेध केला. त्यामध्ये त्यांना अटक झाली. तुरुंगवासही भोगावा लागला. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपुत्र स्वातंत्र्यसेनानी शामराव पाटील सुध्दा या मोर्चाचे आयोजन करण्यामध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी ऐन तारुण्यात सक्रिय होते. त्यांनाही अटक झाली. त्यांनीही तुरुंगवास भोगला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ही एक दुर्मीळ घटना ज्यामध्ये पिता-पुत्रास एकाच वेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगावा लागला. दुर्दैवाने शामराव पाटील हे अल्पायुषी ठरले. त्यांना अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य लाभले. परंतु, या छोटय़ाशा आयुष्यामध्ये त्यांनी जे काम केले ते निश्चितच विलक्षण होते.
शामरावअण्णा तुरुंगवासात असतानाचा त्यांची प्रकृत्ती ढासळत गेली. स्वातंत्र्यलढय़ातील सक्रिय सहभागामुळे कधी आमने-सामने तर कधी भूमिगत राहून तसेच गनिमी काव्याने केलेल्या सततच्या संघर्षांमुळे तसेच तुरुंगवासात गोऱ्या अधिकाऱ्यांच्या अमानुष वागणुकीमुळे शामरावअण्णा यांचे प्रचंड हाल झाले. पण, त्यांनी घेतला वसा सोडला नाही. स्वातंत्र्याचा ध्यास पूर्ण होईपर्यंत ते स्वस्थ बसले नाहीत. अखेर ब्रिटीश राजवट उलथवून मिळालेल्या स्वातंत्र्याचे ते शिलेदार बनून अजरामर ठरले. अवघे अठ्ठावीस वर्षांचे आयुष्य प्रचंड धावते, संघर्षांचे अन् दगदगीचे गेल्याने शामरावअण्णांचे जीवन अल्पायुषी ठरले.
कराड तालुका बाजार समितीची पहिली निवडणूक सन १९४७ मध्ये झाली. त्यात शामराव पाटील हे शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रथम क्रमांकाने निवडून आले आणि बाजार समितीचे पहिले लोकनियुक्त अध्यक्ष म्हणून एकमताने निवडले गेले. आजही बाजार समिती ही त्यांची चिरंतन स्मृती असून, कराडचे भूषण व वैभव आहे. महाराष्ट्रातील अशा एका अग्रणी व आदर्श बाजार पेठ उभारणीत शामरावांचा सिंहाचा वाटा आहे. अमृत महोत्सवी वर्षांत शामरावअण्णांचा पूर्णाकृती पुतळा विस्तारित बाजार समितीच्या जनावरांचा बाजार व भाजी मार्केटच्या विस्तृत मैदानावर दिमाखात उभा असून, शामरावांच्या कार्याची पोहोचपावती देत आहे. सध्या या बाजार समित्चे नेतृत्व शामराव पाटलांचे पुतणे व विलासकाकांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांच्याकडे आहे. हे सगळे वैभव शामरावांनी घातलेला पाया व विलासकाकांनी त्यावरच चढवलेला कळस असे आहे. त्यांच्या स्मृती अजराअमर आहेत !