महाराष्ट्रात अनेक मंदिरांमध्ये विषमतेला, लिंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या प्रथा आजही सुरू आहेत. शनिशिंगणापूरच्या
चौथऱ्यावरील स्त्री प्रवेशबंदीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात महिलांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शनिशिंगणापूरमध्ये महिलांना चौथऱ्यावर जाता येत नसले तरी बऱ्याच ठिकाणी शनी मंदिरात महिलांवर कोणतेही र्निबध नाहीत.. या वादाच्या निमित्ताने राज्यातील काही प्रमुख मंदिरांतील रूढी, प्रथा, परंपरा यांचा आढावा..

महाराष्ट्रातील शनिशिंगणापूरच्या शनी मंदिरात महिलांना चौथऱ्यावर जाण्याची बंदी मोडून काढण्यासाठी आंदोलन सुरू झाले, तेव्हाच उत्तर प्रदेशात एका ऐतिहासिक घटनेची नोंद होऊ घातली होती. गढवालमधील जौनपूर बावरच्या सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या परशुराम मंदिरात महिला आणि दलितांना प्रवेश देण्याचा निर्णय अखेर मंदिर प्रशासनाने घेतला. कर्नाटकातील एका मंदिरात सवर्णाची जेवणावळ संपली की त्या उष्टय़ा पत्रावळींवरून दलितांनी लोळण घ्यायची प्रथा मोडून काढण्यासाठी काही प्रयत्न झाले, पण त्या प्रयत्नांनाच विरोध झाला. उष्टय़ा पत्रावळींवर लोळण घेतल्याने जुनाट आजार बरे होतात, असा अंधविश्वास समाजात रुजून राहिल्याने या प्रथेविरुद्धचे आवाज क्षीण झाल्याच्या बातम्या तीन-चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. लोकशिक्षण वा जनजागृती करूनही काही अनिष्ट प्रथा बंद करता येत नाहीत, तेव्हा सरकारी यंत्रणांनीच पुढाकार घेऊन समाजातील सुधारक प्रवृत्तींना साथ द्यायला हवी. कर्नाटकातील चंद्रेगुत्ती येथील मंदिरातील नग्नपूजेची प्रथा सुमारे तीन दशकांपूर्वी पोलिसांनी पुढाकार घेऊन बंद पाडली आणि ती पुन्हा सुरू होणार नाही, याचीही काटेकोर काळजी घेतली होती. महाराष्ट्रातही अनेक मंदिरांमध्ये विषमतेला,  लिंगभेदाला खतपाणी घालणाऱ्या घाणेरडय़ा प्रथा आजही सुरू आहेत. पण शनी चौथरा प्रवेशाच्या लढय़ातून बुरसट प्रथा-परंपरा पुसण्याची एक प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवीच्या जत्रेत चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर तेथील अनेक अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यात प्रशासन यशस्वी ठरले होते. कोंबडय़ा-बकऱ्याचे बळी, नारळ फोडणे, झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहुल्या बांधणे अशा प्रथांना आता पायबंद बसला आहे.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १४ नुसार सर्वाना समान अधिकार आहेत, तर अनुच्छेद १५ नुसार लिंगभेद करणे बेकायदा आहे. महाराष्ट्रातील अनेक खासगी मंदिरेही सार्वजनिक न्यास कायद्याखाली नोंदविलेली असल्याने, त्यामध्ये प्रवेशाचा भेदाभेद करणे म्हणजे घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांवर गदा आणणे ठरते. अनेक मंदिरांच्या वा धार्मिक संस्थांच्या स्वतंत्र घटना असतात, परंतु त्यामध्ये मात्र महिला-पुरुषांच्या प्रवेशाबाबतचे स्पष्ट उल्लेख नसतात. त्यामुळे विश्वस्त वा व्यवस्थापन मंडळ किंवा ग्रामस्थच तेथील नियम ठरवतात आणि त्या पुढे प्रथा वा परंपरा म्हणून चालू राहतात. त्याच्याभोवती आख्यायिका गुंफल्या जातात, त्यातून विशिष्ट समाजघटकांना कधी धाक तर कधी भीती दाखविली जाते आणि त्यापोटी तो वर्ग त्या प्रथा मोडण्यास धजावतच नाही. कायद्याचा आधार घेऊन कोणत्याही सामाजिक अन्यायाच्या विरोधात उभे राहण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर लढा देण्याची मानसिकता भारतात फारशी रुजलेली नाही. त्यामुळे अनिष्ट रूढी-परंपरांचा किंवा जाचक बाबींचा त्रास व्यक्तिगत पातळीवर जाचक ठरू लागला, तर त्याकडे पाठ फिरवून आपल्या दैनंदिन व्यवहारातून त्यावर फुली मारली जाते. यामुळे अशा गोष्टी सुरूच राहतात, आणि संघटित विरोध सुरू झाला तरच त्यांना वाचा फुटते. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशबंदी ही काही नवी प्रथा नाही. वर्षांनुवष्रे या प्रथेचा बागुलबोवा उभा केला गेला होता आणि शनिकोपाच्या भयापोटी त्याविरुद्ध बोलण्याची मानसिकता मूळ धरलीच नव्हती. आता मात्र, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या लिंगभेदांविरोधात जनजागृती होऊ लागली आहे. शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील स्त्री प्रवेशबंदीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे धार्मिक स्थळांच्या क्षेत्रात महिलांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीच्या जाणिवा जाग्या झाल्या आहेत. शनीभोवती असलेले परंपरेच्या धाकाचे कडे तोडण्याची तयारी समाजात सुरू झाली आहे. इतरही अनेक धार्मिक क्षेत्रांत व प्रार्थनास्थळांमध्ये महिलांसाठी लक्ष्मणरेषा आखून ठेवल्या गेल्या आहेत. त्या ओलांडण्याची त्यांना परवानगी नाही. तसे धाडसही केले जात नव्हते. आता महिलांना जाग आली आहे, हेच या आंदोलनाने दाखवून दिले आहे. आता मंदिर व्यवस्थापनांना किंवा अगदी सरकारलाही, तळ्यात मळ्यात भूमिका घेता येणार नाही, हेही मुख्यमंत्र्यांच्या ताज्या विधानामुळे उघड झाले आहे. सरकार म्हणून एक भूमिका आणि व्यक्ती म्हणून एक भूमिका असा दुटप्पी खेळ न खेळता, अशा आंदोलनांना बळ देऊन, महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारला आता घ्यावी लागेल, हेही स्पष्ट झाले आहे.
कालपरवापर्यंत, शनीच्या पीडेला घाबरून राहणारा समाज, आता रूढी परंपरांच्या कडय़ाने वेढलेल्या शनिदेवाला त्यातून मुक्त करण्यासाठी सरसावला आहे. माणसाने देवाच्या मुक्ततेसाठी सुरू केलेल्या अनेक लढाया इतिहासानेही पाहिल्या. महिला प्रवेशबंदीच्या जाचक विळख्यातून शनीला मुक्त करण्यासाठी सुरू झालेल्या या लढय़ात भक्ती किती हा सवालही विचारला जात आहे. त्याचे उत्तर काहीही असले, तरी या आंदोलनाने स्त्री हक्काच्या जाणिवांचा हुंकार प्रबळ होत आहे, हे मात्र वास्तव आहे.
असेही घडते आहे..
शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशबंदीचा मुद्दा राज्यभर गाजत असला, तरी काही मंदिर व्यवस्थापनांनी नव्या विचारांना वाव दिला आहे. म् ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहानजीकच्या प्रसिद्ध शनी मंदिराचा गाभारा महिलांच्या दर्शनसुविधेसाठी सदैव उघडा असतो. केवळ गाभाऱ्यातच नव्हे, तर अभिषेक वा अन्य धार्मिक विधींसाठीही महिलांना येथे प्रवेश मिळतो. ठाण्यातीलच वर्तकनगरातील साईबाबा प्रतिष्ठानमधील शनी मंदिरातही रूढी मोडीत काढून महिलांना प्रवेश दिला जातो. शहरांतील काही शनी मंदिरांत महिलांना प्रवेश आहे, पण गाभाऱ्यात मात्र प्रवेशबंदीच आहे. शनिशिंगणापूरचीच प्रथा पाळण्याचे या मंदिर व्यवस्थापनांचे धोरण असते.

4th-century CE Sanskrit inscription unearthed in PoK's Gilgit
Shaivism in POK: पाकव्याप्त काश्मीरमध्ये सापडला शिव उपासनेचा प्राचीन पुरावा; का ठरतोय हा संस्कृत कोरीव लेख महत्त्वाचा?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव कसा असतो?
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…

अहमदनगर जिल्ह्य़ातील नेवासे तालुक्यात दोन दगडी शिळांना कमालीचे महत्त्व आहे. यातील पहिली शिळा आहे, नेवासे शहरातील ज्ञानदेवांची! ती ‘पसाचा खांब’ म्हणून ओळखली जाते. ७०० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी या दगडी शिळेला टेकूनच ज्ञानेश्वरी लिहिली. भागवत संप्रदायाची या स्थानावर अपार श्रद्धा आहे. नेवासे तालुक्यातच दुसरी दगडी शिळा आहे. त्या स्थानाला शनिशिंगणापूर म्हणतात. या शनीचे माहात्म्य गेल्या काही वर्षांत खूपच वाढले. या देवस्थानाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्यावरूनच सध्या वादंग सुरू आहे. खुद्द देवस्थान व स्थानिकांचा महिलांच्या प्रवेशाला विरोध आहेच, शिवाय हिंदुत्ववादी संघटना त्यांच्या पाठीशी आहेत. सध्या याच कारणावरून वादंग सुरू असले तरी, गेल्या पाच वर्षांपासून पुरुषांनाही शनिदेवाच्या चौथऱ्यावर बंदीच आहे.
शनिशिंगणापूर देवस्थानला सुमारे ५०० वर्षांची परंपरा आहे. चारपाचशे वर्षांपूर्वी गावातील पारस नाल्याच्या पुरात वाहून आलेल्या एका भल्यामोठय़ा शिळेवर एका गुराख्याने काठी मारली, तर त्यातून रक्त आले. त्याच दिवशी रात्री एका ग्रामस्थाला शनीचा दृष्टान्त झाला. या शिळेच्या रूपाने मीच गावात आलो आहे, माझी प्राणप्रतिष्ठा करा, असा आदेश त्याने दिला. त्यानुसार ग्रामस्थांनी वाजतगाजत ही शिळा सध्या जेथे हे देवस्थान आहे, तेथे आणून तिची शनी महाराज म्हणून प्राणप्रतिष्ठा केली, अशी या देवस्थानची आख्यायिका सांगितली जाते.
नव्वदच्या दशकात गुलशनकुमार यांचा ‘शनि की साडेसाती’ हा हिंदी सिनेमा आला आणि हे देवस्थान नगर व आसपासच्या जिल्ह्य़ांच्या नकाशावरून थेट देशाच्या व पुढे जगाच्याही नकाशावर आले. शनीच्या साडेसातीचा फेरा चुकवण्यासाठी आता देश-विदेशातून भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. त्याच्या जोडीलाच येथे अध्यात्माचेही आता पक्के व्यावसायिकीकरण झाले आहे. धार्मिक तीर्थस्थळावरील वाढत्या गर्दीने परिसरात गुन्हेगारीही प्रचंड वाढली असून गावात चोरी होत नाही, हाही समज आता खोटा ठरला आहे! येथील व शेजारच्याच सोनई गावातील पोलीस ठाण्यामध्ये तसे गुन्हेही दाखल आहेत. हे प्रमाण फारसे दिसत नसले, तरी अनेक भाविक अशा तक्रारी देण्यासच टाळाटाळ करतात. विशेषत: पाकिटमारी व तत्सम चोऱ्यांच्या बऱ्याचशा तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जातच नाहीत. अध्यात्मातील व्यावसायिकता टिकवण्यासाठी हे पाळले जाते.
शनिशिंगणापूर येथील शनीच्या चौथऱ्यावर पूर्वापार महिलांना प्रवेश नाही. त्याचे कारण विटाळ हेच आहे. पण महिलांना प्रवेशबंदी ही काही नवी बाब नाही. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी येथे पूर्वीही मोठी आंदोलने झाली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याही नेतृत्वाखाली येथे पूर्वी मोठे आंदोलन झाले होते. त्याहीवेळी मोठा गदारोळ होऊन आत्तासारखाच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. तसे झाले की, प्रशासनही परंपरेची कास धरते. परंपरेनुसार जे काही आहे, तेच चालू द्या, असाच प्रशासनाचा हेका आजवर दिसला.
सुमारे चार महिन्यांपूर्वी एका तरुणीने अनाहूतपणे चौथऱ्यावर जाऊन शनीचे दर्शन घेतले. मात्र ही बाब लक्षात येताच तिला लगेचच खाली आणून दुधा-दह्य़ाच्या अभिषेकाने शनिमूर्ती शुचिर्भूत (?) करण्यात आली. तेव्हापासून पुन्हा हा विषय चच्रेला येऊन आता त्यावर वादंग सुरू आहे. शनिशिंगणापूर येथे सध्या पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी आहे. अर्थात त्याचे कारण वेगळे आहे. भाविकांची होणारी तोबा गर्दी आणि चौथऱ्याचा आकार लक्षात घेऊन सुरक्षेच्या कारणासाठी देवस्थानने मार्च २०११ मध्ये पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी घातली. सुरुवातीला ११ हजार रुपये आकारून (तशी देणगीची पावती दिली जाई) पहाटेच्या व सायंआरतीला एका कुटुंबातील एकाला चौथऱ्यावर जाऊ दिले जाई. मात्र आता तेही बंद करण्यात आले असून शनीच्या चौथऱ्यावर आता फक्त देवस्थानचा पुजारीच जाऊ शकतो.

महिला अध्यक्षही परंपरावादी
शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या नव्या विश्वस्तांची अलीकडेच नियुक्ती झाली. १९६३ मध्ये धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या या देवस्थानच्या विश्वस्त मंडळात यंदा प्रथमच दोन महिलांचा समावेश झाला असून त्यातही आणखी विशेष म्हणजे या विश्वस्तांच्या पहिल्याच सभेत देवस्थानच्या अध्यक्षपदी अनिता शेटे यांची एकमताने निवड करण्यात आली. आता तरी महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र शेटे या परंपरावादी आहेत. देवस्थानच्या परंपरा पाळल्याच पाहिजेत, त्यावर वादंग घालू नये. हा सर्वाच्याच श्रद्धेचा भाग असून त्याला कोणी धक्का लावू नये, अशी त्यांची भूमिका आहे.

नगर शहरात खुला प्रवेश
नगर शहरात माळिवाडा वेस, शनी गल्ली आणि दिल्ली गेट अशी तीन प्रमुख शनी-मारुती मंदिरे आहेत. या तिन्ही मंदिरांत महिलांना प्रवेश खुला आहे. यातील शनी गल्ली मंदिरात कोणतीच बंधने नाहीत. अन्य दोन मंदिरांमध्ये महिलांना गाभाऱ्यात प्रवेश खुला आहे, मात्र मूर्तीला स्पर्श करू दिला जात नाही. माळिवाडा धर्मफंड विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी सांगितले की, येथील मंदिरात महिलांना गाभाऱ्यात प्रवेश खुला असला तरी, बहुसंख्य महिला स्वेच्छेनेच शक्यतो ते टाळतात.

कोल्हापूर : महालक्ष्मीलाही महिलांचे वावडेच?
साडेतीन शक्तिपीठांपकी एक असलेले करवीरनिवासिनी महालक्ष्मीचे मंदिर, नारीशक्तीचे प्रतीक. पण या मंदिरातील देवीच्या प्रत्यक्ष पूजेपासून आजवर महिलाच वंचित आहेत. इथे महिलांना पूजेचा मान मिळावा यासाठी पाच वर्षांपूर्वी आंदोलन घडले. महिलांना पूजा करण्याची संधीही मिळाली. पण सुरक्षा अन् अन्य भाविकांना दर्शनाचा होणारा खोळंबा या कारणांमुळे ही पूजा पुन्हा उंबरठय़ाबाहेर गेली. अन्यायावर प्रहार करणाऱ्या या देवतेची पूजा करण्याचा मान मात्र छत्रपती घराण्याला आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनाच. काही वर्षांपर्यंत देवीचा अभिषेक घालण्याची संधीही सामान्य भाविकांना मिळायची, पण या साऱ्या प्रकारात देवीच्या निस्सीम उपासक असलेल्या महिलांना मात्र उंबरठय़ाबाहेरूनच दर्शन घ्यावे लागायचे. त्यातून महिलांमध्ये दुजाभाव होत असल्याची भावना पेरली गेली. त्यातून आंदोलनाचे धुमारे फुटले. राम कदम, नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनाही गाभाऱ्यात प्रवेश करण्याचा, देवीची पूजा करण्याचा मान मिळावा यासाठी संघर्ष सुरू झाला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसरी फळी उभी राहिली. स्थानिकांनी बाहेरच्यांनी येऊन महिलांना पूजा करावयास मिळावी या नावाखाली उपद्व्याप करू नयेत असा प्रतिकार सुरू केला. अखेर या लढय़ात नारीशक्तीची काहीशी सरशी झाली. महिलांनाही देवीची पूजा करण्याचा मान मिळू लागला, त्यांना गाभाऱ्यात जाण्याची संधी मिळाली. पण यामुळे दर्शनासाठी उभ्या असणाऱ्या भाविकांची गरसोय होऊ लागली. नंतर हा वाद तूर्तास शमला आहे.

नागपूर : बंधने आणि मोकळीकही!
पौराणिक पाश्र्वभूमी लाभलेल्या विदर्भात सध्या तरी हिंदूंच्या धार्मिकस्थळांवर भक्तांमध्ये महिला-पुरुष असा भेद केला जात नसला तरी काही ठिकाणी महिलांवर बंधने आहेत. विशेषत: शनिदेव आणि मारुतीच्या मंदिरासंदर्भात ही बाब आढळून येते. काही ठिकाणी ही बंधने पूर्वापार चालत आलेल्या परंपरेतून, तर काही ठिकाणी व्यवस्थापनाने घालून दिली आहेत.
महिलांनीही ती स्वीकारत वाद टाळला आहे. महिला-पुरुष असा भेद बहुतांश ठिकाणी केला जात नाही. सर्वच ठिकाणी महिलांना प्रवेश दिला जातो. नागपुरातील लोखंडी पुलाजवळील शनी मंदिरात तर सपत्निक अभिषेकाचीही सोय आहे. जिल्ह्य़ातील निवडक शनी मंदिरात व मारुती मंदिरात महिलांना प्रवेश असला तरी त्यांना थेट मूर्तीपर्यंत जाता येत नाही. हे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेतून होत आहे. मात्र यावरून कुठेही वाद नाही. मध्य प्रदेशजवळील जामसावळीयेथील मारुती मंदिरात महिलांना थेट मूर्तीपर्यंत जाता येत नाही. नागपूरजवळील आदासा येथील मारुती मंदिरात महिलांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. चंद्रपूरमधील मोरगावच्या शनी मंदिरातही हीच स्थिती आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील यवतमाळ-दारव्हा मार्गावर ढुमणापूर येथील पुरातन मंदिरात महिलांना थेट मूर्तीपर्यंत जाता येत नाही. नागपूरच्या राजाबक्षासह इतरही मारुती मंदिरात भक्तांना मंदिरातील एका चौकटीपर्यंत प्रवेश आहे. ही चौकट महिला आणि पुरुष या दोन्हीसाठी समान आहे.

त्र्यंबकेश्वर : गर्भगृहात प्रवेश बंद
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त अन्य धर्मीयांना प्रवेश नसल्याचा फलक आजदेखील झळकत असला, तरी या जुनाट परंपरेला अलीकडेच पूर्णविराम मिळाला आहे. तथापि, याच मंदिरातील गर्भगृहात महिलांच्या प्रवेशास बंदी आहे. पुरुषांना गर्भगृहात म्हणजे थेट पिंडीपर्यंत जाऊन दर्शन घेण्यास परवानगी आहे. या ठिकाणी १ मे २०१५ पर्यंत पुरुष भाविकांना दिवसभरात कोणत्याही वेळी गर्भगृहात जाऊन दर्शन घेता येत होते. आता मात्र, सकाळी सहा ते सात या वेळातच सोवळे नेसूनच पुरुष भाविकांना गर्भगृहातून दर्शन घेता येते. या प्रथेचे पालन न करणाऱ्यांना प्रवेश नाकारला जातो. गर्भगृहासाठी पुरुषांना सोवळ्याचा नियम असताना महिलांसाठी कोणता निकष लावणार असा प्रश्न काही विश्वस्त उपस्थित करत आहेत. मासिक पाळीचा जर संबंध असेल तर त्याची तपासणी कशी करणार, असेही त्यांचे म्हणणे आहे.

पुणे : महिलांना माहीतच नाही
एकेकाळी महिलांना दर्शनासाठी वर्ज्य असलेल्या आणि महिलांना प्रवेशबंदी असलेल्या श्री देवदेवेश्वर संस्थानच्या पर्वती येथील काíतकस्वामी मंदिराच्या प्रवेशद्वारावरील ‘महिलांना दर्शनासाठी मनाई’ अशी कित्येक वर्षांपासूनची पाटी दोन वर्षांपूर्वीच काढून टाकली गेली. त्याआधी वर्षांतून एकदाच म्हणजे केवळ कार्तिकी पौर्णिमेलाच येथे महिलांची दर्शनासाठी रांग लागत असे. आता या मंदिरात महिला केव्हाही दर्शन घेऊ शकतात, पण ही पाटी काढून टाकल्याचे अनेक महिलांच्या लक्षातच आलेले नाही. कार्तिकस्वामींचे दर्शन महिलांनी घेऊ नये अशी प्रथा पूर्वीपासूच पाळलीही जात होती. मात्र, आम्ही एकमताने दोन वर्षांपूर्वीच कार्तिकस्वामी मंदिरावरील पाटी काढून टाकली आहे, अशी माहिती प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित आणि वसंत नूलकर यांनी दिली. कार्तिकस्वामीचे दर्शन घेतल्यास संबंधित महिलेच्या पतीचे निधन होते, अशी समजूत होती. मात्र, असे असूनही महिला दर्शन घ्यायला धजावत नाहीत.

Untitled-1

 

संकलन – महेंद्र कुलकर्णी (अहमदनगर), अनिकेत साठे (नाशिक),
दयानंद लिपारे (कोल्हापूर), चंद्रशेखर बोबडे (नागपूर), विद्याधर कुलकर्णी (पुणे)

Story img Loader