‘‘आज शेतकऱ्यांना दुसऱ्याची जीभ लावूनच बोलता येते. आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल, अशी साधने आमच्याकडे नसतील. शेती लुटून औद्योगिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत, पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात सलामत ठेवली पाहिजे..’’
शेतकरी संघटनेच्या वध्र्यात शनिवारपासून सुरू झालेल्या पहिल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणाचा हा संक्षिप्त अंश..
नागरी समाजाच्या ग्रामीण जनतेबद्दलच्या करुणेच्या सहभावनेस आलेली बधिरता दूर होणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. ती दूर करता आली तरच ग्रामीण साहित्य प्रभावशाली होऊ शकते, असे ठाम मत पहिल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद जोशी यांनी व्यक्त केले.
वध्र्यातील जोतिबा फुले नगरीत आयोजित या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ वऱ्हाडी कवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष शरद जोशी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाही. त्यांनी संमेलनानिमित्त आपले भाषण लिहून पाठविले. या अध्यक्षीय भाषणातून शरद जोशी यांनी एकूणच ग्रामीण साहित्यावर परखड भाष्य केले. ते म्हणतात, इतिहास जसा विजेते लिहितात, तसेच साहित्य संगीतही विजेत्यांचेच असते. आमचे काहीच नाही. त्यातल्या त्यात संतांचे साहित्य आम्हाला जवळचे वाटू लागले. खरे म्हटले, तर साहित्यात आपण आपल्या ओळखीचे शोधत असतो. शेतावर राबणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचे चित्रण आपण साहित्यात शोधायला पाहिजे. पिकांवरील रोगांच्या धाडी, पिकाचा आनंद, बाजारात गेल्यावरची शोकांतिका, वाढते कर्ज, पुढाऱ्यांची मग्रुरी, पावसाची चिंता, सावकाराची मिनतवारी, सोसायटीतील कारस्थाने, गावच्या आयुष्यातून सुटण्याची ज्याची त्याची स्वत:पुरती धडपड, या किडय़ांसारख्यांच्या जीवनात लिहिण्यासारखी प्रचंड सामग्री आहे, पण ७० टक्के लोकांच्या आयुष्याचे प्रतिबिंब साहित्यात कधीच पडले नाही. गवत काढताना, जात्यावर दळताना उत्स्फूर्ततेने म्हटलेली गाणी माळरानातच विरून गेली. नांगराच्या- बैलाच्या साक्षीने शेतकऱ्यांनी काढलेले दु:खाचे कढ तापलेल्या जमिनीतच जिरून गेले. शहरात गेलेली शेतकऱ्यांची पोरे शहरातच रमली. त्यात लिहिण्याचे कसब असणाऱ्यांनी शहरास काय पटेल, याचाच विचार करीत लिहिले. माझे गाव लुटले, या पापाचा तुम्हाला झाडा द्यावा लागेल, हा टाहो कुणी फ ोडला नाही. उलट, आपल्या ग्रामीण जन्मामुळे साहित्यात आपल्याला काही राखीव जागा असावी, असा आक्रोश करणारी एक साहित्य आघाडी उभी झाली. शेतकऱ्यांच्या दु:खाचे भांडवल करून त्यावर साहित्य क्षेत्रात स्थानाचा जोगवा ही मंडळी मागू लागली. शेतकरी संघटनेच्या कामाच्या ओघात माझ्या लक्षात आले की, शेतकऱ्यांची जीभ कापली गेलेली आहे. दुसऱ्याची जीभ लावूनच त्यांना बोलता येते. आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल, अशी साधने आमच्याकडे नसतील. शेती लुटून औद्योगिकीकरण करणारी व्यवस्था संपेपर्यंत ती साधने आमच्याकडे येणारही नाहीत, पण तोपर्यंत आमची जीभ तोंडात सलामत ठेवली पाहिजे. शब्द कसेही येवोत, पण त्यातला अर्थ आमच्या अनुभूतीचा प्रामाणिकपणा टिकवणारा पाहिजे. तंत्रज्ञान विकसित होते गेले तसतशा विविध वाहिन्या गावोगावी आल्या, पण त्यात तरी आम्ही लोक कितपत दिसतो? शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात या प्रसारमाध्यमांतून अनेक कार्यक्रम सादर केले जातात, पण त्यातून शेती, शेतकरी यांच्या परिस्थितीत काही फ रक जाणवतो का? का हे पुन्हा शेतकऱ्यांचे दु:ख विकणेच आहे? अशा प्रयत्नांतून शेतकऱ्यांच्या मनाला उभारी मिळत नसेल, तर तेही शेतकऱ्यांचे दु:ख विकण्यासारखेच आहे.
शेतकऱ्यांच्या दु:खाच्या प्रतिमा दाहक राहिल्या नाहीत. मी ज्वारी पिकवतो, पण माझ्या ज्वारीच्या कणसाला चांदणे लगडलेले दिसले आणि मला फार हर्ष झाला असे कधी घडले नाही. ही ज्वारी निघाल्यानंतर त्याचे पुढे काय होते ते साहित्यात कधी येतच नाही. कणसाला चांदणे लगडणे सोडाच, कर्जाचा बोजा थोडा कमी झाल्याच्या आनंदाची रेघसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर उमटणार नाही? कितीही पिके झाली तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्ज फि टण्याची शक्यता नाही, असे एकाही कवीला का वाटले नाही? हे सत्य जर तुम्ही ग्रामीण साहित्यिक मांडू शकला नाहीत, तर तुमची अनुभूती किती खरी, याबद्दल मला शंका आहे. एकेक दिवस, बी पेरल्यानंतर हाती पीक येईपर्यंत किंवा न येईपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतकऱ्यांच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात, त्याचे चित्र साहित्यात मला कुठेही दिसत नाही. मराठीतले जे ग्रामीण म्हणून साहित्य आहे, ते खेडय़ांशी संबंधित आहे, असे मला खरेच वाटत नाही. तुम्ही संमेलने घालाल, डेरे घालाल, ग्रामीण, दलित आणि आता आणखी काही साहित्य निघालीत, त्यांची संमेलने घालाल, निधी जमवाल, पण तुम्हाला असे वाटत असेल की, यातून मराठी भाषा जगणार आहे, तर तो तुमचा भ्रम आहे. त्याने मराठी भाषा जगणार नाही. मराठी भाषा मोठी करायची असेल तर मराठी माणूस मोठा झाला पाहिजे. लहान माणसाची भाषा-मातृभाषा मोठी असूच शकत नाही, एवढेच मला सांगायचे आहे. ज्या काळात शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड कामे असतात अशा वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी वारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनासाठी ही मंडळी जातात, हे काही मला पटेना. मी देहूला गेलो, यात्रेत सामील झालो. एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आले. कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवलेली ज्वारी शेतात फुंकून टाकली की, घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून वारीत जातो. वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठे फुटाणे वाटताहेत, कुठे कुरमुरे वाटताहेत, त्याच्या आशेवर पुढे पुढे जात राहतो. कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकऱ्यांची पंढरपूपर्यंतच्या रस्त्यावरील पाण्याची सोय असलेल्या भागातून जाणारी ती भिकदिंडी असते. हे साहित्याला का जाणवले नाही?
दूरचित्रवाणी माध्यमातील कथा-मालिकांमध्ये शेतकरी कुटुंब नाही. पाच टक्क्यांच्या आयुष्याच्या चित्रणाने ९९ टक्के दूरचित्रवाणी वाहिन्या भरल्या आहेत, पण आमच्या घरच्या लुटून नेलेल्या वैभवाने भरलेल्या त्यांच्या महालाचे आम्ही जिभल्या चाटत कौतुक करतो, या विचाराने संतापून उठत नाही. हे अपरिहार्य आहे. ताकद साहित्याची नसते, ताकद त्यामागील समाजाच्या सधनतेची असते. युरोपातील देश आज इंग्रजी शिकत नाहीत. अमेरिकी शिकतात. आम्ही अक्षरश: गुलामांचे गुलाम आहोत. मला एक प्रश्न सहज पडतो. अर्थशास्त्री मूर्ख असतील. गेली पन्नास वर्षे शेतकऱ्यांची जाणीवपूर्वक लूट हे त्यांना कळले नाही, हे समजण्यासारखे आहे, कारण ते इंग्रजी पुस्तके वाचतात आणि त्यावरूनच लिहितात. त्या पुस्तकात लिहिले नव्हते म्हणून त्यांना कळले नसावे, पण तुम्ही ग्रामीण साहित्यिक म्हणवणारे, मी शेतमजुराच्या घरी जन्मलो आहे म्हणून मला ग्रामीण साहित्यिकाचा तंबू टाकण्याचा अधिकार आहे, असे मोठय़ा आग्रहाने सांगणारे, शेवटी शेतकऱ्यांच्या दु:खाचा बाजार मांडून नागरी साहित्यिकांच्या पेठेत आपलेही दुकान असावे म्हणूनच प्रयत्न करता की नाही? जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या दु:खाची खरी जाण झाली होती, तर तुम्ही गावामधील झोपडे आणि गावामधील विटांचे घर यांच्यामधील भांडण का भांडलात? त्याचे कारण, तुमची ग्रामीण भागाची प्रतिमा खोटी होती. तुमचे शेती अर्थव्यवस्थेचे ज्ञान हे डाव्यांच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकातून आले होते. शेतकऱ्यांच्या मनाला ज्या सहस्र इंगळ्या डसतात त्याचे चित्र साहित्यात मला कुठेही दिसत नाही. साहित्यातही नाही आणि सिनेमातही नाही.
संयुक्त राष्ट्रसंघात काम करीत असताना वेगवेगळ्या देशांत जाण्याचा योग आला. तिसऱ्या जगातील गरिबीचा उगम शेतीत आहे, हे त्या वेळी लक्षात आले आणि मग शेती विकत घेऊन शेतकरी बनलो. ज्यांनी शेतकऱ्यांना पिढय़ान्पिढय़ा पिळले अशा ब्राह्मण जातीत जन्मलेला आहे, हे मुद्दाम सांगतो. अशाकरिता की, कोणी आपल्या पैतृक वारशाने शेतकऱ्यांशी निष्ठा सांगू नये. जन्माने शेतकरी नाही, धर्माने नाही, मराठीशीही संपर्क नाही, एवढे असूनसुद्धा शेतकरी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी मला प्रकर्षांने जाणवल्या, त्या गोष्टी मला ग्रामीण साहित्यात सापडल्या नाहीत. शेतीवर श्रीमंत होणे अशक्य आहे. शेती जर तोटय़ाचे साधन असेल तर शेती जितकी मोठी तितका तोटा अधिक. शेती घेऊन लाखोंचा नफो मिळवणारे कुणी असतील तर ते अशी कोणती पिके घेऊन तो मिळवतात त्याचा हिशेब तर सांगू द्यात. वीस वर्षांपूर्वी मी हे मांडायला सुरुवात केली तेव्हा वि.म. दांडेकरांपासून सगळ्यांनी विरोध केला, पण आज या विषयावर काही वाद राहिला नाही.
आजकालचे शेतकरी साहित्य किंवा ग्रामीण साहित्य म्हणजे जणू विनोदी विषय आहे. ग्रामीण साहित्यात जिवंत हाडामांसाचे चित्रण फोर कमी होते. व्यक्तिचित्रण कमी होते. विद्रूपीकरण जास्त होते. महाराष्ट्राचा ग्रामीण साहित्याचा वारसा सांगताना गेल्या वीस वर्षांत महाराष्ट्रातील शेतकरी जीवनात जे घडले ते पूर्णपणाने न येवो, पण त्याची छटाही ग्रामीण साहित्यात दिसत नाही, हे का? शेतकऱ्यांच्या मनात शेतकरी संघटनेने फुलवलेला अंगार जवळजवळ विझण्याच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्या पाहिल्या, की वाटते हा अंगार पुन्हा फुलवून त्याचे मशालीत रूपांतर करण्याची ताकद तुमच्या या शेतकरी साहित्य संमेलनातून उभी राहील, अशी आशा धरावी का? तशी आशा धरायला वाव आहे. २०१४ च्या ‘लोकसत्ता’च्या दिवाळी अंकात वसंत आबाजी डहाके यांच्या लेखातून अनेक तरुण-तरुणींच्या अभिव्यक्तीची उदाहरणे दिली आहेत. हे संमेलन एकमेकांची दु:खे एकमेकांना सांगण्यापुरते न राहता शेतकरी संघटनेने फुलविलेल्या निखाऱ्यांवरील राख उडवून ते पुन्हा धगधगविण्याची हिंमत व ताकद शेतकरी समाजात निर्माण करणारी ठरो, हीच सदिच्छा.
अंगाराचे मशालीत रूपांतर व्हावे..
‘‘आज शेतकऱ्यांना दुसऱ्याची जीभ लावूनच बोलता येते. आम्ही बोललेले जगात ऐकले जाईल, अशी साधने आमच्याकडे नसतील.
आणखी वाचा
First published on: 06-03-2015 at 12:55 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad joshi speech at the first conference of the all indian farmers