शाळा लांब असली की मुलांचे शिक्षण कसे अध्र्यावर तुटते, हे चित्र एरवी ग्रामीण भागातले. पण, महानगरी मुंबईला लागूनच असलेल्या ठाणे शहरातही हे चित्र काही फारसे वेगळे नाही. म्हणून इथल्या शारदा विद्यामंदिर या शाळेने मुलांनाच घरापासून शाळेपर्यंत विनामूल्य बससेवेची सोय करून दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व खर्च शाळेतील शिक्षकच आपल्या वेतनातून दरमहा अदा करीत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाण्यातील नौपाडा येथील ‘शारदा विद्यामंदिर’ ही शाळा ‘पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळा’ची. गेली तब्बल ३९ वर्षे ठाण्यात शिक्षण क्षेत्रात एका वेगळ्या उंचीचे काम करून या शाळेने आपला ठसा उमटविला आहे. या शाळेतील बहुतेक मुले कळवा व मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधली. अनेकांच्या घरांमध्ये दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत. शाळेत येईपर्यंत अनेकांच्या जीवनाची वाताहतच झालेली. बहुतेक मुलांचे आई-वडील  बिगारी, रोजंदारीवर काम करणारे कामगार तर काहींच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपलेले आणि काहींचे आई-वडील रेल्वे स्थानकात भीक मागणारे, फेरीवाले असे. अशी केविलवाणी कौटुंबिक पाश्र्वभूमी असलेली तब्बल ५०० मुले सध्या येथे शिक्षण घेत आहेत.

विद्यार्थ्यांचा शोध

या मुलांचे बालपण करपू न देण्याचा निर्धार शाळेचे मुख्याध्यापक आनंदा सूर्यवंशी व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी केला आहे. ठाणे, मुलुंड, मुंब्रा, विक्रोळी अशा विविध भागांतून मुलांना जमवून आणून त्यांना शिक्षण देण्याचे काम ही शिक्षक मंडळी करतात. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत वसतिगृह असून येथे मुंबई, शहापूर, कल्याण, भिवंडी येथील ७५ मुले कायम वास्तव्याला आहेत. गरीबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे नाही या न्यायाने मुख्याध्यापकांसह १५ शिक्षक शाळांना उन्हाळी सुट्टय़ा लागल्या की झोपडपट्टय़ांमध्ये विद्यार्थी शोधण्यास बाहेर पडतात. ठाणे शहर परिसरातील अनेक गरीब वस्त्या ही मंडळी पालथी घालून विद्यार्थी निवडतात. या विद्यार्थ्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून, कोणतेही शुल्क न घेण्याचे वचन देऊन त्यांना शाळेत धाडण्याकरिता राजी करतात. पण कोणतीही शैक्षणिक पाश्र्वभूमी नसलेल्या या मुलांचा प्रवेश झाल्यानंतर शिक्षकांच्या खऱ्या कसोटीला सुरुवात होते.

परिवहन समिती

विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत येणे अपेक्षित असले तरी त्यांच्या पालकांना मुलांना शाळेत दररोज शाळेत सोडणे परवडत नाही. तसेच, नव्या मुलांनाही विशेष उत्साह नसतो. यासाठी शाळेने एक क्लृप्ती लढवली. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांच्या अध्यक्षतेखाली एक परिवहन समिती स्थापन करण्यात आली. या समितीने ठाणे, कळवा, मुंब्रा येथील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दोन बस व एक व्हॅन भाडय़ाने घेतली.

या गाडय़ा १६२ विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडतात व नेतात, तर ३३ विद्यार्थ्यांना बेस्ट बसचे पास काढून देण्यात आले असून काही विद्यार्थ्यांना दररोजचे रिक्षा भाडे देण्यात येते. दरमहा हा खर्च ८० हजारांच्या घरात येत असून हा भागविणे शाळेसाठी आव्हानात्मक बाब आहे. शाळा अनुदानित असल्याने शिक्षकांचे पगार शासनाकडून येतात. या पगारातून पदरमोड करून ही मंडळी हा खर्च भागवतात. यासाठी मुख्याध्यापकांसह प्रत्येक शिक्षक पगारातले पाच हजार रुपये दरमहा शाळेच्या परिवहन समितीकडे सुपूर्द करतो आणि यातूनच हे भाडे अदा केले जाते.

शिक्षकांचे अनोखे प्रेम

शाळेत सुजय नावाचा मुलगा असून तो अनाथ आहे. २०१५ साली कळव्यात उनाडक्या करताना सापडला. तो आत्याकडे राहायचा. शिक्षकांनी त्याला शाळेत आणले व वसतिगृहात ठेवले. आज तो इथे आनंदाने राहतो.

मात्र, काही दिवसांत त्याची आत्या गायब झाली व बहीणही सापडेनाशी झाली. तेव्हा तो उन्हाळी सुट्टीच्या काळात प्रत्येक शिक्षकाच्या घरी चार-पाच दिवस राहिला. आज तो शाळेच्या वसतिगृहात आणि सुट्टीत शिक्षकांच्या घरी आनंदाने राहतो. आपले सख्खे कोणी नाही, याचे शल्य त्याला बोचत नाही. ‘गरजू विद्यार्थ्यांना या प्रकारे मदत करण्याची सक्ती आम्ही शिक्षकांवर करत नाही. सुदैवाने आमचे शिक्षकच संवेदनशील असल्याने कायम विद्यार्थ्यांना मदत करण्याकरिता पुढाकार घेत असतात. कुठल्याही कारणामुळे निराधार मुलांचे शिक्षण अध्र्यावर सुटू नये, म्हणून स्वखुशीने आम्ही ही काळजी घेत असतो,’ असे मुख्याध्यापक सूर्यवंशी सांगतात.

भाषेवर विशेष प्रयत्न

विद्यार्थ्यांची भाषा समृद्धीकरिता शाळा विशेष प्रयत्न करते. त्याकरिता अन्य शाळांमधील भाषेच्या शिक्षकांनाही आमंत्रित केले जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांचे विशेष वर्ग घेऊन परीक्षेची तयारी करवून घेतली जाते. शाळा घेत असलेल्या मेहनतीमुळे यंदा दहावीचा निकाल ८८ टक्के लागला आहे. शाळेतून पहिला आलेला विद्यार्थी गोविंदा राठोड याला ८३.२० टक्के मिळाले असून त्याचे आई-वडील बिगारी आहेत. येथील एकही विद्यार्थी शिकवणीसाठी बाहेर जात नाही. तसेच मुलांचे वारंवार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येते. इतर विद्यार्थ्यांकरिताही पायाभूत चाचण्यांचे आयोजन शाळा करीत असते. त्यावरून त्यांची शैक्षणिक प्रगती समजते.

इतर उपक्रम

नव्या जगाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून ई-लर्निगचे धडे संगणकाद्वारे दिले जातात. अभ्यासक्रम अ‍ॅनिमेटेड स्वरूपात विद्यार्थ्यांना शिकविला जातो. या शिवाय विज्ञान प्रदर्शन, वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिला जातो. ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत या शाळेतील मुलांचा सहभाग असतो.

 

संकेत सबनीस

संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com