महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने झालेल्या वादातून राज्यात ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी विभागणी पुन्हा केली जाऊ लागली आहे. ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असा विचार रुजतो आहे. फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांना हे पुरोगामित्व अपेक्षित होते का? या महापुरुषांची नावे घेणाऱ्या आजच्या पुरोगाम्यांचा वर्तनव्यवहार, त्यांचे विचार-आचार खरोखरच पुरोगामी या संज्ञेस पात्र आहेत काय?..
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यावरून जातीय अस्मितेचा पालापाचोळा उडवणारे वादळ घोंगावले आणि शांत झाले. पाचोळा मात्र अजून हवेत तरंगत आहे. योगायोग असा की, १९९५ मध्ये युतीचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले त्याच वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यावेळीही असाच वाद पेटला होता. मात्र त्या आणि आताच्या वादामध्ये मूलभूत फरक आहे. यावेळी पुरंदरे यांच्या नावालाच विरोध झाला. त्यावरून सरकार-पुरंदरे विरुद्ध इतर असा वाद पेटला. त्यात स्वतला पुरोगामी म्हणवणारे साहित्यिक-विचारवंत, काही संघटना उतरल्या होत्या. महाराष्ट्राला पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक वाद नवा नाही. जे सनातनी विचारांचे आहेत, ते प्रतिगामी आणि जे प्रगत विचारांचे आहेत ते पुरोगामी अशी या वादाची किंवा संघर्षांची सरळ वैचारिक विभागणी आहे. पुरोगाम्यांचा पुरोगामी असल्याचा वैचारिक आधार कोणता, तर त्यांच्या तोंडी लगेच म. जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येते. फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार पुरोगामीच. त्याबद्दल शंका घेण्याचे काहीच कारण नाही. परंतु या महापुरुषांची नावे घेणाऱ्यांचे विचार-आचार पुरोगामी आहेत का? किंवा सांगण्यासाठी विचार फुले-शाहू-आंबेडकरांचा असला, तरी प्रतिगामी विचाराला बळ मिळेल असा त्यांचा वर्तन व्यवहार आहे का? पुरंदरे पुरस्कार वादाच्या निमित्ताने असे काही प्रश्न पुढे आले आहेत. पुरोगामी म्हणवणाऱ्यांना त्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत.
हे प्रश्न उपस्थित होण्याचे मुख्य कारण म्हणजे, ब्राह्मण विरुद्ध बहुजन किंवा इतर अशी नवी जातीय विभागणी केली जाऊ लागली आहे आणि ब्राह्मणविरोधक म्हणजे पुरोगामी असणे असा एक घातक विचारप्रघात सुरू झाला आहे. अशा विचारावर काही संघटना, चळवळी उभ्या आहेत. त्यांचा दावा मात्र आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार मानणारे आहोत म्हणजे पुरोगामी आहोत असा असतो. अशी जातीय विभागणी करून आपण पुरोगामी असल्याचा आव आणणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील काही थोर विचारवंतांचाही समावेश आहे. त्यामुळेच फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार नेमके काय आहेत, पुरोगामित्व म्हणजे काय आणि पुरोगामी कोणाला म्हणायचे, याचा एकदा ताळेबंद मांडण्याची गरज आहे.
फुले-शाहू-आंबेडकर एका जातीच्या विरोधात होते की, माणसा-माणसांत भेद निर्माण करणाऱ्या, जन्मावर आधारित उच्च-नीच प्रवृत्तीचे पोषण करणाऱ्या, एका वर्गाला बहिष्कृत करणाऱ्या, गुलाम करणाऱ्या संपूर्ण जाती व्यवस्थेच्या विरोधात होते? खरे तर विषमतेवर, शोषणमूल्यावर उभी असलेली जाती व्यवस्था आणि धर्म व्यवस्थाही गाडून त्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, विज्ञानवाद, बुद्धिवाद, विवेकवाद या मूल्यांवर आधारित नवसमाजाची निर्मिती करायची होती. पुरोगाम्यांनी हे विचार स्वीकारले आहेत काय आणि ते अमलात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे काय, याचीही एकदा जाहीर चिकित्सा झाली पाहिजे.
फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार जात-धर्म या पलीकडे होते. त्यांना धर्म-जातीच्या बंधनातून मनुष्यप्राण्याला मुक्त करून त्याला माणूस बनवायचे होते. त्यांचे विचार व आचार तंतोतंत तसेच होते, त्यात तसूभरही असमतोल नव्हता. याबाबत काही उदाहरणे सांगता येतील. जोतिबा फुले यांनी जेव्हा विषमतामूलक हिंदूू धर्म व्यवस्थेविरुद्ध वैचारिक उठाव केला, त्यावेळी त्यांच्या घरातूनच त्यांना पहिल्यांदा विरोध झाला. ज्या समाजात त्यांचा जन्म झाला होता, त्या माळी समाजाने त्यांना बहिष्कृत केले. त्यावेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये विष्णुपंत थत्ते, केशवराव भवाळकर-जोशी या ब्राह्मण समाजातील व रानबा महार व लहुजी साळवे या अस्पृश्य समाजातील विचारी माणसांचा समावेश होता. आता माळी समाजानेच विरोध केला म्हणून फुल्यांनी त्यांचा तिरस्कार केला का? किंवा उच्च-नीचतेची उतरंड असलेल्या जातीव्यवस्थेशी लढताना त्यांनी जन्माने ब्राह्मण असलेल्या थत्ते, भवाळकर वा अन्य जणांचे सहकार्य नाकारले का? अथवा ब्राह्मण आपल्या बाजूने आले म्हणून त्यांनी ब्राह्मण्यग्रस्त धर्मव्यवस्थेशी दोन हात करण्याचे थांबविले का? तर नाही. कारण त्यांना धर्मव्यवस्थेचे गुलाम असलेल्या सर्वच समाजाला मुक्त करायचे होते. ते ब्राह्मणविरोधक असते तर त्यांनी विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या मुलांना कशासाठी पोसले असते? अशाच एका विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले होते. विधवा ब्राह्मण स्त्रियांचे मुंडन करण्याच्या विरोधात आवाज उठवला होता. त्यासाठी त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. हे सर्व ते ब्राह्मणांच्या विरोधात होते म्हणून की माणसाला दु:खद प्रसंगातही अवमानित जिणे जगायला लावणाऱ्या धर्म-रूढी परंपरेच्या विरोधात होते म्हणून? एकदा एक जाहीर पत्रक काढून त्यांनी नीतिमान लोकांना आवाहन केले होते, की जो कोणी मनुष्य ईश्वरास स्मरून नीतीने वागत असेल, त्याच्या जाती-पातीच्या दर्जाचा, धर्माचा, देशाचा विचार न करता, सोवळ्या-ओवळ्यांचे बंड न माजवता, त्यांच्याबरोबर अन्नव्यवहार करण्यास मी तयार आहे. त्यातून त्यांना काय सांगायचे होते? काय संदेश द्यायचा होता? पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांना पुन्हा एकदा फुले समजावून घ्यावे लागतील.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनाला वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणाने कलाटणी दिली होती. तो इतिहास सर्वश्रुत आहेच. परंतु पुराणोक्त मंत्र म्हणून शाहू महाराजांचा अपमान करणाऱ्या नारायण भटजीचे कारस्थान उघडकीस आणणारे राजारामशास्त्री भागवत हे जन्माने ब्राह्मणच होते. वेदोक्त-पुराणोक्त प्रकरणाने लोकमान्य टिळक व शाहू महाराज यांच्यात वैचारिक संघर्ष उभा राहिला होता. तरीही इंग्रज राजवटीची बंधने असतानाही शाहू महाराज टिळकांच्या स्वराज्याच्या आंदोलनाला हस्ते-परहस्ते आर्थिक मदत करीत होते. टिळक आजारी पडल्यानंतर, त्यांनी विश्रांतीसाठी पन्हाळ्याला यावे, असा आग्रह धरणाऱ्या शाहू महाराजांची मनाची विशालता आणि विचारांची उत्तुंगता दिसते. शाहू महाराजांनीही इथल्या विषमतामूलक जाती व्यवस्थेला विरोध केला. जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होणार नाही, अशी सुस्पष्ट भूमिका ते आयुष्यभर मांडत राहिले. सामाजिक समतेचा आग्रह धरणारे शाहू महाराज आपण स्वीकारले आहेत का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत भारतातील मानवमुक्तीच्या लढय़ाला प्रारंभ झाला, त्या महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे एकच उदाहरण देता येईल व त्यांचे समतावादी विचार समजून घेण्यास पुरेसे ठरू शकतील. ४ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई विधिमंडळात सीताराम केशव बोले यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठे, देवालये, विद्यालये, धर्मशाळा खुली करण्यात यावीत, असा ठराव मांडला व तो मंजूर झाला. त्यांनतर महाड नगरपालिकेने त्याच्या अंमलबजावणीचा ठराव मंजूर केला. त्यावेळी नगरपालिकेचे अध्यक्ष होते सुरबानाना टिपणीस. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाडचा धर्मसंगर झाला. त्यावेळी ग. नि. सहस्रबुद्धे यांनी मनुस्मृतीचे दहन करण्याचा ठराव मांडला, त्यानुसार मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. धर्मव्यवस्थेच्या विरोधात बाबासाहेबांच्या बाजूने लढण्यासाठी उभे राहिलेले बोले, टिपणीस, सहस्रबुद्धे कोण होते?
त्या काळचे जेधे-जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीचे लढाऊ पुढारी होते. महाडच्या सत्याग्रहात सहभागी होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली, परंतु त्यासाठी त्यांनी एक अट घातली. या सत्याग्रहात कोणाही ब्राह्मण गृहस्थाला सामील करून घेऊ नये, अशी ती अट होती. बाबासाहेबांनी त्यांची ती अट फेटाळून तर लावलीच, परंतु त्यावर त्यांना दिलेले उत्तर फार महत्त्वाचे आहे. आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही, तर आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नाहीत, तर ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत, असे आम्ही समजतो. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर आम्हाला दूरचा वाटतो व ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हास जवळचा वाटतो. बाबासाहेब जन्माधिष्ठित विषमतेच्या विरोधात होते, तसेच ते आपला शत्रू कोण व मित्र कोण हे जन्माने कोण आहेत, हे ठरविण्याच्याही विरोधात होते. जे-जे समतावादी ते-ते त्यांचे मित्र होते व जे-जे विषमतावादी ते-ते त्यांचे शत्रू होते; मग ते जन्माने कोण का असेनात, ही त्यांची विचारधारा होती. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे तेच मर्म व महत्त्व आहे. जन्माने तुम्ही कुणीही असा, तुमचे विचार व आचार पुरोगामी विचाराला बळ देणारे आहेत की प्रतिगामी विचारसरणी पोसणारे व वाढविणारे आहेत हे महत्त्वाचे आहे. फुले-शाहू-आंबेडकरांना विषमतेवर, शोषणमूल्यावर उभी असलेली धर्म व्यवस्था-जाती व्यवस्था उद्ध्वस्त करायची होती, तेच त्यांच्या विचारांचे अंतिम ध्येय आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार धर्म-जात यांच्यापलीकडे जाणारे आहेत, फक्त आणि फक्त माणसाच्या कल्याणाचा विचार करणारे आहेत, त्याचा स्वीकार करणे व तसे वर्तन करणे म्हणजे पुरोगामी असणे होय. आणि अर्थातच फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारव्यूहाला अनुसरून पुरोगामी असण्यासाठी निधर्मी असणे ही पूर्वअट आहे. ती पुरोगामी असल्याचा दावा करणाऱ्यांना मान्य आहे का?
madhukar.kamble@expressindia.com