आपल्याकडे बाळासाहेबांसारखा करिश्मा नाही हे उद्धव यांना मान्यच आहे. बाळासाहेबांसारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका आहे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन पक्षबांधणी, विकासाचा मुद्दा आणि लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांनी विदर्भ, मराठवाडय़ासह महाराष्ट्र पिंजून काढला.

बाळासाहेब ठाकरे यांनी ‘महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी’ १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे आधी शिवसेनेचे सूत्र होते. कालांतराने राजकीय पक्ष म्हणून त्याची रीतसर नोंदणी झाली. आधी मुंबई, मग ठाणे, औरंगाबाद, कल्याण, नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेने सत्ता मिळविली. १९९५ मध्ये बाळासाहेबांनी झंझावाती दौरे करून अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि राज्यात प्रथमच युतीची सत्ता येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला. प. महाराष्ट्र, विदर्भाचा काही भाग वगळता सर्वत्र शिवसेना फोफावली. या काळात शिवसेनेवर अनेक आघात झाले. भुजबळांपासून राज ठाकरे यांच्यापर्यंत अनेक बडे नेते सेनेतून बाहेर पडले. मधल्या काळात बाळासाहेबांचे निधन झाल्यानंतर शिवसेना संपली अशीही ओरड सुरू झाली,  पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीत पूर्ण लक्ष घातल्याने २० वर्षांनंतर पुन्हा महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. मात्र या वेळी भाजपच्या जागा अधिक आल्याने मुख्यमंत्रिपद फडणवीस यांना मिळाले.. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने हे विशेष लेख..

‘मंदिर वही बनायेंगे, पर तारीख नही बतायेंगे’..‘गाईवर कसली चर्चा करता, हिंमत असेल तर महागाईवर बोला’.. ‘किती काळ सत्तेत राहायचे ते आम्हाला चांगलं कळतं’.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवाजी पार्क येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकापाठोपाठ षटकार मारत होते. उद्धव यांचे ते आक्रमक रूप पाहून शिवसैनिकही बेभान झाले होते. उद्धव यांनी त्या दिवशी मैदान मारले..

 

Untitled-11

मोठय़ा झाडाच्या सावलीत लहान झाड वाढू शकत नाही, असे म्हणतात. ‘बाळासाहेबांनंतर शिवसेना संपणार’ असे भाकीत तर काही वर्षांपूर्वी अनेकांनी वर्तविले होते. त्यामध्ये शिवसेनेचेही ‘जाणते’ होते. ‘बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना संपली. आता ‘मातोश्री’वर कोण जाणार,’ असे म्हणणारे शिवसेनेचे एक नेते आज मंत्रिपदाची झूल मिरवत फिरत आहेत. मोठय़ा नेत्यांच्या मुलांना वडिलांशी होत असलेल्या तुलनेपोटी आणि लोकांच्या अपेक्षाचे ओझे वाहून नेताना काय सोसावे लागते यावर फारसे कोणी बोलत नाही. त्यातच बाळासाहेबांसारखी व्यक्ती आणि भाऊबंदकीच्या नाटय़ाची झालर त्यावर चढलेली असेल तर टीकेचे चौफेर वार झेलत वाट काढणे हेच वाटय़ाला येते. उद्धव ठाकरे यांच्याही वाटय़ाला ते आले. अपेक्षांचे ओझे, करिश्मा, ठाकरी भाषणाचा बाज आणि भाऊबंदकीचा ‘सामना’! हे कमी ठरावे म्हणून सातत्याने चारी बाजूंनी होणारी टीका. उद्धव ठाकरे हे या साऱ्याला पुरून उरले.

Untitled-12

 

खरे तर त्यांचा पिंड राजकारण्याचा नाही. छायाचित्रणात रमलेल्या उद्धव यांनी १९९५ च्या आगेमागे शिवसेनेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यालाही एक कारण होते. मराठीबरोबर शिवसेनेने हिंदुत्वाची कास धरल्यापासून शिवसेना महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पोहोचू लागली. महाराष्ट्रातील सत्तेचा सोपान भाजपच्या साथीने निश्चित चढणार हे स्पष्ट दिसू लागले. ग्रामीण भागात नेतृत्व तसेच पक्षाच्या बांधणीला वेग येऊ लागला. तशा जागोजागी सुभेदाऱ्याही उभ्या राहू लागल्या. संपर्कनेत्यांनी आपापले गडकिल्ले मजबूत करण्यास सुरुवात केली. उद्धव यांनी नेमके हे हेरले. बाळासाहेब वृद्धत्वाकडे झुकू लागल्यामुळे संघटनेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपर्कनेत्यांवरच अवलंबून राहावे लागत होते. ही मंडळी आपापले वर्तुळ तयार करण्यात मग्न होती. याला छेद देत गटप्रमुखांपासून बांधणी करण्याचा निर्णय उद्धव यांनी घेतला तो याच काळात. राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता तेव्हा आली होती. सारेच सुशेगात होते तेव्हा उद्धव यांनी गटप्रमुख, उपशाखाप्रमुख तसेच शाखाप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यास सुरुवात केली. तेव्हाही त्यांच्या या संघटना बांधणीची ‘राज’कीय टिंगलटवाळी होत होती; परंतु ना उद्धव यांनी त्याकडे लक्ष दिले ना त्यांच्याकडे कोणाचे लक्ष होते. पुढे उपविभाग प्रमुख व विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या केल्यानंतर जेव्हा उमेदवारी ही विभाग प्रमुखांच्या अहवालानुसार दिली जाणार असल्याचे स्पष्ट होऊ लागले तेव्हा ‘जोर का झटका धीरे से’ म्हणजे काय याचा अनुभव नेत्यांना येऊ लागला. २००२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांच्या उमेदवारीत राज ठाकरे यांच्या समर्थकांना डावलल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली. काही नेत्यांनी उद्धव यांच्याविरोधात तेव्हापासून सूर लावण्यास सुरुवात केली. तथापि २००२ ची पालिका निवडणूक शिवसेनेने जिंकली. तेव्हापासून मुंबई व ठाण्यावर शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहिला. अर्थात या काळातही उद्धव यांच्या नेतृत्वावर समोरून तसेच पाठीमागून वार करण्याचे काम चालूच होते. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर टीकेची धार अधिकच तीव्र होऊ लागली होती. २००२-०३ मध्ये उद्धव यांनी ‘मी मुंबईकर’ ही संकल्पना मांडली. खरे तर मुंबईतील कमी होत चाललेला मराठी टक्का आणि लोकांच्या बदलत्या अपेक्षा लक्षात घेत शिवसेनेच्या मूळ भूमिकेला धक्का न लावता स्वरूपात बदल करण्याचा तो एक धाडसी प्रयत्न होता. मराठी, गुजराती व उत्तर भारतीयांना एकत्र आणण्याची ती एक खेळी होती. त्याच वेळी कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वेभरतीसाठी उत्तर प्रदेशमधून आलेल्या तरुणांना राज यांच्या समर्थकांनी फटकावून पिटाळून लावले. महाराष्ट्रात मराठी तरुणालाच नोकरी मिळाली पाहिजे, अशी भूमिका राज यांनी तेव्हा मांडली आणि ‘मी मुंबईकर’चा गाशा गुंडाळावा लागला. २००३ मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

उद्धव यांनी शिवसेनेच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केल्यापासून ते बाळासाहेबांच्या निधनानंतरही काही काळ त्यांच्यावर माध्यमांपासून राजकीय पक्षांपर्यंत सर्वाकडून सातत्याने टीका होत होती. कधी भाजपची मंडळी उद्धव यांच्याशी संपर्कच होऊ शकत नसल्याच्या तक्रारी करत होती, तर पक्षातील नेते मंडळीही अधूनमधून डोके वर काढत राज ठाकरेच खरा वारसदार असल्याचे सांगत होती. दरम्यानच्या काळात २००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेत पैसे घेऊन उमेदवाऱ्या दिल्या जातात, असा आरोप पक्षाच्याच मेळाव्यात केला आणि बाळासाहेबांनी त्यांची हकालपट्टी केली. राणे यांचे बंड तेव्हा शिवसेनेला चांगलेच महागात पडले. कणकवलीत खुद्द बाळासाहेबांनी सभा घेऊनही विधानसभेच्या निवडणुकीत राणे विजयी झाले. पुढे त्याच राणे यांना कणकवलीत आणि वांद्रे मतदारसंघात चारीमुंडय़ा चीत करून शिवसेनेने आपली ताकद दाखवली. नारायण राणे यांच्यापाठोपाठ ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरला’ असे सांगत राज ठाकरे यांनीही शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करून शिवसेनेपुढे आव्हान निर्माण केले. मनसेच्या झंझावाताचा सामना शिवसेना नेतृत्व करू शकेल का, असा सवाल उपस्थित केला जात होता; परंतु २०१२ च्या मुंबई व ठाणे महापालिका निवडणुकांत उद्धव यांची पक्षबांधणी कामाला येऊन शिवसेना विजयी झाली.

आपल्याकडे बाळासाहेबांसारखा करिश्मा नाही हे उद्धव यांना मान्यच आहे. बाळासाहेबांसारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका आहे. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन पक्षबांधणी, विकासाचा मुद्दा आणि लोकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांनी विदर्भ, मराठवाडय़ासह महाराष्ट्र पिंजून काढला. नव्या दमाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन पक्षबांधणी भक्कम केली. शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळाचा मुद्दा घेऊन जागोजागी सभा घेतल्या. या सभांना लोकांनीही  गर्दी केली. करिश्मा नसला तरी उद्धव यांच्या सभांना गर्दी जमू लागली. टीकाकारांना उत्तर देण्याच्या भानगडीत न पडता शांतपणे पक्ष कार्यकर्ते व संघटनेवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. आगामी काळात भाजपशीही टक्कर घ्यावी लागणार हे लक्षात घेऊन हातात दगड घेतलेल्या शिवसैनिकाला दगड मारण्याऐवजी त्याचा किल्ला बांधायला सांगू लागले. ‘करून दाखवले’ आणि ‘शिवसेना प्रगतीसाठी’ या जाहिराती करून शिवसेना विकासाची कास धरणारी असल्याचे स्पष्ट केले. समाजमाध्यमांचा वापर करतानाच राज यांच्याकडे वळलेल्या तरुणाईला सेनेकडे खेचण्यासाठी युवासेना व आदित्य ठाकरे यांचा प्रभावी वापर केला. याचा परिणाम असा झाला की, बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेला खिंडार काय, साधी भेगही पडू शकली नाही. हृदयशस्त्रक्रियेनंतरही (अँजिओप्लास्टी) महाराष्ट्रभर त्यांचा संचार सुरूच आहे. यातूनच बाळासाहेबांप्रमाणेच आता शिवसैनिक व उद्धव यांचे नाते तयार झाले. शांत, संयमी वागणे, प्रसंगी आक्रमक होणे तसेच बाळासाहेबांप्रमाणेच भावनिक मुद्दय़ांना हात घालत थेट शिवसैनिकांशी संवाद ठेवत असल्यामुळे शिवसेनेत आता त्यांना आव्हान देण्याच्या भानगडीत कोणी पडणार नाही हे स्पष्ट आहे. मनसेच्या स्थापनेनंतर मोठय़ा संख्येने शिवसेनेतून बाहेर जाणाऱ्यांना थांबविण्यासाठी ‘या चिमण्यांनो परत फिरा’ असे उद्गार बाळासाहेबांना काढावे लागले होते; परंतु उद्धव यांनी निर्धाराने शिवसेना बांधल्यामुळे उलटी गंगा वाहू लागली. चिमण्यांबरोबर कावळेही शिवसेनेत येऊ लागले.  लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे शिवसेनेचे खासदार मोठय़ा प्रमाणात निवडून आल्याचे भाजप उच्चरवाने सांगत होती. माध्यमेही उद्धव यांना श्रेय देण्यास तयार नव्हती. उद्धव यांना ते अमान्य होते. परिणामी विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपला अंगावर घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर शरसंधान करत ६३ आमदार निवडून आणले तेव्हा शिवसेनेची ताकद स्पष्ट झाली. उद्धव यांनी ही निवडणूक लढवली तेव्हा बाळासाहेब नव्हते आणि युतीही नव्हती. करिश्मा विरुद्ध निर्धार अशा सामन्यात उद्धव यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. आज महाराष्ट्रात सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका शिवसेना बजावतेय. भाजपला निजामशाही म्हणून हिणवतेय. बिहारची निवडणूकही शिवसेना लढली आणि यापुढे देशातील अन्य राज्यांतही लढण्याचा मनोदय व्यक्त करून राष्ट्रीय राजकारण करण्याची दिशाही स्पष्ट केली आहे. शिवसेनेची ही खेळी आगामी मुंबई व ठाणे महापालिका निवडणुकांत ‘लक्ष्यवेध’ करणार का, याचेच आता कुतूहल शिल्लक आहे.

Untitled-13

 

– संदीप आचार्य
sandeep.acharya@expressindia.com

 

 

Story img Loader