शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समधील जाहीर सभेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे नाव न घेण्याची हिम्मत दाखवली असती का? शिवसेनाप्रमुखांना न बोलावता भाजपची सभा झाली असती का?  केवळ महायुती आहे म्हणून नाही तर.. अनेक शिवसैनिकांच्या मनात हा मुद्दा सल करून आहे. महाराष्ट्रात भाजप वाढला तो शिवसेनेच्या आधाराने आजही शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजप ‘शत प्रतिशत’ स्वबळावर काहीही करू शकत नाही, हे वास्तव आहे. पूर्वीही जेव्हा भाजपने सेनेची कळ काढण्याचे उद्योग केले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या ‘क मळाबाई’ला वेळोवेळी तिची जागा दाखवून दिली होती. नवऱ्याने दारू पिऊन बायकोला मारले म्हणून काय बायको सोडून जाते का, या बाळासाहेबांच्या जाहीर सभेतील सवालाला टाळ्यांच्या कडकडाटाने उत्तर मिळायचे. उद्धव न बोलून त्यांना हवे ते करतात एवढाच काय तो फरक!
बाळासाहेबांच्या हयातीमध्येही शिवसेना-भाजपत अनेकदा कुरबुरी झाल्या होत्या. मात्र बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम असायचा.. आता परिस्थितीत असा काय बदल झाला की नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ‘महागर्जना’ करताना महाराष्ट्रातील आपल्या मोठय़ा भावाचा (शिवसेनेचा) साधा उल्लेखही करू नये.. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३५ जागा जिंकण्याचे जे स्वप्न भाजप पाहत आहे ते शिवसेनेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही.. नरेंद्र मोदी यांच्या लाटेवर स्वार झाले तरी भाजपचे तारू महाराष्ट्रात एकटय़ाने किनाऱ्याला लागणार नाही यामागे भाजपतील गटातटांचे राजकारण आहे. अन्यथा मनसेला महायुतीत खेचण्यासाठी ‘दार उघड बये दार उघड’ करण्याचे ‘राज’कारण भाजपच्या नेत्यांनी चालवले नसते. आज चार राज्यांमध्ये भाजपला यश मिळाल्यामुळे मोदीज्वर भाजपला चढला असला तरी महाराष्ट्राच्या मातीतील परिस्थिती वेगळी आहे. भ्रष्ट्राचार आणि महागाईमुळे देशातील वारे काँग्रेसविरोधात आहे. त्यातच अण्णा हजारे आणि ‘आम’ने दिल्लीत काँग्रेसच्या नाकीनऊ आणले आहे. अशा वेळी गुजरातच्या विकास आणि विजयामुळे मोदींकडे लोक आशेने पाहत असले तरी महाराष्ट्रात भाजपला यश मिळण्यासाठी मराठी माणूस आणि शिवसेनेशिवाय पर्याय नाही हेच वास्तव आहे.
अयोध्येत बाबरी मशीद पाडली त्या वेळी शिवसैनिकांनी ती पाडली, अशी भूमिका भाजपने मांडली आणि क्षणाचाही विलंब न लावता ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे उद्गार काढून एका रात्रीत बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदयसम्राट झाले. व्यंगचित्रकार ते मराठी माणसांवरील अन्यायाचा मुद्दा हाती घेत शिवसेनेची स्थापना केल्यापासून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना व पर्यायाने शिवसेनेला यश मिळाले ते त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यापासूनच. १९९३च्या दंगलीनंतर मुंबईत शिवसेनेने बजावलेल्या ‘कामगिरी’चे मराठीच नव्हे तर उत्तर भारतीय, गुजराती व दाक्षिणात्यांनीही स्वागत केले. यातूनच १९९५ साली सेना-भाजपच्या हाती महाराष्ट्राची सत्ता मिळाली. मुंबईतील विधानसभेच्या ३४ जागांपैकी ३२ जागा युतीला तेव्हाच मिळाल्या होत्या. १९९९मध्ये केंद्रातही भाजपला सत्ता मिळाली आणि २००४ मध्ये भाजपच्या ‘इंडिया शायनिंग’ला लोकांनी नाकारल्याने पुन्हा काँग्रेसकडे सत्ता गेली. महाराष्ट्रात १९९९ सालीच युतीची सत्ता गेली. तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेवर भगवा फडकवायचे स्वप्न युती पाहत आहे. दरम्यानच्या काळात नारायण राणे यांना शिवसेनेतून काढण्यात आले व त्यापाठोपाठ राज ठाकरे यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरला आहे’, असे सांगून शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. राज यांच्या जाण्याने व मनसेच्या स्थापनेमुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर तेव्हा अनेकांनी टीका केली तर सेनेच्या काही नेत्यांनी उद्धव यांच्या नेतृत्वक्षमतेबाबत प्रश्न निर्माण केले होते. या साऱ्याला पुरून सत्तेचा सोपान चढण्यासाठी उद्धव यांनी रामदास आठवले यांच्या रिपाइंच्या साथीने महायुती भक्कम करण्याला प्राधान्य दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा व त्यांची घणाघाती भाषणे हेच शिवसेनेचे मर्मस्थान होते. साहेबांचा ‘आदेश’  शिवसैनिकांसाठी सर्वस्व असायचे. राज ठाकरे हे बाळासाहेबांसारखे दिसतात व बोलतात. त्यांची आक्रमक शैली शिवसैनिकांना भावायची हे जरी खरे असले तरी साधारणपणे १९९३ पासून उद्धव यांनी पक्षबांधणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली होती. शिवसेना जशी महाराष्ट्रात पसरू लागली तशी जागोजागी सुभेदार निर्माण होऊ लागले. हे सुभेदार आपला सवता सुभा निर्माण करत असल्याचे लक्षात घेऊन उद्धव यांनी तळापासून शिवसेनेची बांधणी करण्यास सुरुवात केली. गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख अशी पद्धतशीर बांधणी करत असताना सत्तेत बसलेले सेनेचे नेते उद्धव यांची पाठीमागे टिंगलही करत होते. परंतु विभागप्रमुखांपर्यंतची पक्षबांधणी केल्यानंतर उद्धव यांच्या पक्षावरील पकडीचा हळूहळू सेनानेत्यांना अंदाज येऊ लागला. विभागप्रमुखांनी व संघटनेने निश्चित केलेल्यांनाच उमेदवारी मिळू लागली. बंडखोरी करून निवडून येऊ शकणार नाही, हे लक्षात येऊ लागले. काही अपवाद वगळता बंडखोरीला थारा नाही, हे स्पष्ट करत उद्धव यांनी पक्षावरील पकड घट्ट केली.
राज यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केल्याचा फटका सुरुवातीला शिवसेनेला बसला असला तरी उद्धव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व ठाणे महापालिका निवडणुका २००७ मध्ये व त्यानंतर २०१२ साली शिवसेनेने जिंकल्या. कल्याण-डोंबिवली पालिकेचा किल्लाही असाच सर केला. लोकसभा निवडणुकीत मनसेने घेतलेल्या लाखभर मतांमुळे सेना-भाजपच्या काही जागा पडल्या तर विधानसभा निवडणुकीत मनसेने तेरा जागा जिंकून आपला दबदबा निर्माण केला. या साऱ्यात शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा लढवूनही त्यांना कमी जागा मिळाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे गेले. मात्र उद्धव यांनी आपली कार्यशैली बदलली नाही. उद्धव बळासाहेबांसारखे आक्रमक भाषण करू शकत नसले अथवा टायमिंग साधून राजकीय वादळ निर्माण करण्याची हातोटी त्यांच्याकडे नसली तरी त्यांची संघटनेवरील पकड घट्ट आहे. बाळासाहेबांसारख्या सभा गाजवत नसले तरी शिवसैनिकांना भावणारे विचार ते देऊ शकतात आणि आज शिवसैनिकांनीही उद्धव यांचे नेतृत्व निर्विवाद मान्य केल्याचे दिसते आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत मोठी फूट पडेल अशी शक्यता व्यक्त होत होती. उद्धव यांच्या नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळेल असे भासवले जात होते. परंतु शिवसेनेची एक वीटही गेल्या वर्षभरात ढासळलेली तर नाहीच उलट सेनेचा वाडा चिरेबंदी होत असल्याचे चित्र आहे.
हिंदुत्व आणि मराठीचा ताळमेळ साधत त्यांची वाटचाल सुरू आहे. पक्षातील ‘मनोहरी’ काटे सहज मोडून टाकले. शिवसेनेच्या गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांशी दृक्श्राव्य माध्यमातून संवाद साधताना उद्धव यांनाच साथ देण्याचे आवाहन केले होते आज शिवसैनिक एकदिलाने उद्धव यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत. बाळासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणार नाही, हे उद्धव यांचेही म्हणणे आहे. परंतु त्यांचा वारसा जपत उद्धव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली सेनेची वाटचाल आता थांबणार नाही, हेही तितकेच स्पष्ट आहे.
२२ जागा लढविल्या –
२२ विजयी ११ (एकूण मतांची टक्केवारी १७.०१ टक्के)
विभागनिहाय संख्याबळ
विदर्भ           ०३
मराठवाडा     ०३
प. महाराष्ट्र     ०३
कोकण     ०२
मुंबई-खान्देश    ००
केवळ महायुतीच..- संजय राऊत, शिवसेना नेते व खासदार
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला सर्वप्रथम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच पाठिंबा दिला आहे. शिवसेना-भाजपमध्ये उत्तम ताळमेळ असून रिपाइंसह महायुती देशात काँग्रेसला नेस्तबानूब करेल. मोदींचे नेतृत्व हे बाळासाहेबांच्याच पावलावर पाऊल टाकून चालले असून हिंदुत्वाच्या अतूट धाग्यावर ही युती उभी आहे.
हिंदू मतांचे विभाजन टाळण्याच्या मुद्दय़ावरच बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सेना-भाजप युती झाली होती. महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा हा अग्रणी असणारच आणि हिंदुत्वाची वीण घट्ट असल्याचा परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल. काँग्रेसच्या देशव्यापी भ्रष्टाचाराला लोक कंटाळले आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे थैमान घातले आहे. महागाईने जनता कोलमडून पडली आहे. त्यामुळे त्यांना साथ देणाऱ्या राष्ट्रवादीचेही विसर्जन जनता केल्याशिवाय राहणार नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे किमान १७ खासदार निवडून येतील.
नरेंद्र मोदी यांनी वांद्रे येथील सभेत शिवसेनेचे नाव घेण्याचे का टाळले याचे उत्तर तेच देऊ शकतील. पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी शिवसेना व बाळासाहेबांचे नाव घेतलेले असल्यामुळे यावर आता चर्चा करण्याचे कारण नाही. बाळासाहेबांचे स्थान अढळ असून आमच्यासाठी बाळासाहेबांचे हिंदुत्व महत्त्वाचे आहे. त्यांनीच आखून दिलेल्या मार्गावरून शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या निधनानंतरही शिवसेनेला कोठेही तडा गेलेला नाही की चिरा पडल्या नाहीत. मराठी बाणा कायम ठेवून व्यापक हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आमची घोडदौड जोरात चालेल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत येणार का हा विषय आमच्या लेखी संपला आहे. यावर आता कोठेही चर्चा नाही. सेना-भाजपमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २६-२२ असे जागावाटपही झाले असून रिपाइंला यात सामावून घेऊन योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महायुतीत नव्याने कोणाला सामावून घेण्याचा प्रश्नच येत नाही.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Loksatta lalkilla BJP Congress video viral Rahul Gandhi Amit Shah
लालकिल्ला : शहांची कोंडी आणि भाजप सैरावैरा!
Ajit Pawar On Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Case : “मास्टरमाईंड कोणी असो, त्याला सोडणार नाही”, अजित पवारांचं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आश्वासन
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Aditya Thackeray criticizes Amit Shah,
केंद्रीय गृहमंत्र्यांवर आदित्य ठाकरेंचा निशाणा; म्हणाले,”भारत जोडो यात्रेत नक्षलवादी होते तर…”
MVA Andolan
MVA Agitation : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन; जयंत पाटील म्हणाले,”षडयंत्र…”
beed sarpanch murder case in maharashtra assembly session
बीड: सरपंच हत्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद, आमदार संदीप क्षीरसागर यांचं उद्विग्न भाषण; म्हणाले, “बीडमध्ये चॉकलेट खाल्ल्याप्रमाणे…”,
Story img Loader