हिंगोली जिल्ह्य़ात विविध संस्थेच्या शाळेसह अनेक आश्रमशाळा आहेत. परंतु एकूणच आश्रमशाळेचे चित्र त्यांच्या विषयीच्या विविध तक्रारींवरून समाधानकारक दिसत नाही. या भागातील अनेक शाळा तर वादग्रस्त म्हणाव्या अशाच आहेत. या सगळ्यांमध्ये औंढा तालुक्यातील ‘शिवनेरी आश्रमशाळा’ मात्र अपवाद ठरते.
औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बळवंतराव चव्हाण यांनी वयाच्या अठराव्या वर्षी सुशिक्षित तरुणांना संघटित करून ‘छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापन केली. या संस्थेअंतर्गत ‘शिवनेरी आश्रमशाळे’ची मुहूर्तमेढ १९९६ साली रोवली गेली. भटक्या विमुक्त, आदिवासी अशा वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ काम करता यावे यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षकाची नोकरीही सोडली. आज शाळेत पहिली ते दहावीच्या वर्गातील ६३३ विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी २४० विद्यार्थी निवासी आहेत. त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था शाळेत केली जाते. शाळेने पारंपरिक शिक्षणपद्धतीला फाटा देऊन ज्ञानरचनावाद पद्धती अनुसरली आहे. कृतियुक्त अध्यापनावर भर देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे आणि त्याचबरोबर आपली सामाजिक बांधीलकी जपणे या दोन ध्येय्याने प्रेरित होऊन शाळेचे काम चालते.
विज्ञान शोधिका
ऐकलेले आपण लगेच विसरतो. पण, पाहिलेले लक्षात राहते. आणि ते करून पाहिले तर समजते आणि आयुष्यभर साथीला राहते. या उक्तीला सार्थ ठरविणारी आणि विज्ञानातील शोधक वृत्तीला खतपाणी घालणारी ‘विज्ञान शोधिका’ ही प्रयोगशाळा शाळेत आहे. साध्या घरगुती व टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना विद्यार्थी स्वत: प्रयोगाद्वारे पडताळून पाहतात. विज्ञानातील प्रकाश, चुंबक, उष्णता, दाब, जीवशास्त्र आदी उपघटकांवर शैक्षणिक साहित्याची निर्मितीदेखील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करतात.
गणित प्रयोगशाळा
शाळेतील प्रत्येक मुलाला गणित समजले पाहिजे, सहजरित्या सोडविता आले पाहिजे, गणितातील आनंद घेऊन त्यावर प्रभुत्व मिळविले पाहिजे यासाठी दोन पायऱ्यांची सक्रिय गणित पद्धत शाळेत वापरली जाते. त्रिकोण, वर्तुळ व त्यांचे गुणधर्म, मापन, अपूर्णाक, पायथागोरसचे प्रमेय व इतर भौमितिक संकल्पना विद्यार्थी स्वत: करून समजून घेतात. विविध प्रकारच्या गणिती किट व साहित्याच्या सहाय्याने गणिताची भाषा विद्यार्थ्यांनी समजून घेतली आहे.
भूगोल दिन व खगोलशास्त्राची कार्यशाळा
शाळेतील मुलांवर दिवस, रात्र, चंद्रग्रहण, अमावस्या, पौर्णिमा या संकल्पना नाटिकाद्वारे मनावर ठसविल्या जातात. सूर्यदर्शक, सूर्यकांड, जादुई आरसा अशा साहित्यातून ‘सूरज जमींपर’ हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘तारांगण छत्री’ची दखल जर्मन शास्त्रज्ञांनीही घेतली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी टाकाऊ पुठ्ठय़ापासून अवकाश निरीक्षणाचा टेलिस्कोप तयार केला आहे.
पारंपरिक अध्ययन पद्धतीच्या आधारे इंग्रजी भाषा रटाळ व नीरस वाटू शकते. परंतु, ही भाषा शिकविण्यासाठीच नव्हे तर तिच्याविषयी असलेली भीती काढून टाकण्याकरिता शाळेने कल्पक ‘फ्लॅशकार्ड’ तयार केली आहेत.
डिजिटल ग्रंथालय
शाळेचे डिजिटल ग्रंथालय विज्ञान, पर्यावरण प्रबोधन, प्रेरणा देणाऱ्या कथा, गोष्टींचे व्हीडिओ, शैक्षणिकपट, ई-पुस्तके आदी साहित्याने समृद्ध आहे.
पर्यावरण व सामाजिक उपक्रम
शाळेत ‘इको क्लब’च्या माध्यमातून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प राबविला जातो. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला शाळाही विद्यार्थ्यांकडून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करवून घेऊन हातभार लावते. रस्त्यावरील अपघात कमी व्हावे म्हणून ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडय़ांना रेडिअमचे रिप्लेक्टर लावण्याचा उपक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने राबविला आणि वाहतूक सुरक्षा अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
महापुरुषांच्या प्रबोधनात्मक विचारांचा जागर व्हावा या उद्देशाने दरवर्षी शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शाळा करते. त्यामध्ये ज्वलंत विषयांचा समावेश असतो. या वर्षी ‘जल है, तो कल है’, दाभोळकर-पानसरे विवेकाची हत्या थांबणार कधी? या विषयांवर विद्यार्थ्यांना बोलते करण्यात आले होते.
गप्पांचा तास
आठवडय़ातील एक दिवस परिसरातील उद्योजक, शेतकरी, डॉक्टर, कवी, संगीतकार यांना आमंत्रित करून त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या जातात. या शिवाय विद्यार्थ्यांना मूलोद्योगी शिक्षण देण्याकडेही शाळेचा कटाक्ष असतो. त्यात दुग्धपदार्थ प्रक्रिया, अन्न पदार्थ प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिके दाखविली जातात.
दहावीच्या परीक्षेत दरवर्षी उत्कृष्ट निकाल देत शाळेने गुणवत्तेचा ‘शिवनेरी पॅटर्न’ तयार केला आहे. दहावीत चांगली कामगिरी करता आलेले शाळेचे अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.
दुर्गम भागातील गरीब कुटुंबांचा आधार
शाळेत दुर्गम भागात राहणाऱ्या कित्येक कष्टकरी कुटुंबातील मुले शिकत आहेत. इथल्या सेंदुरसेना या दुर्गम भागातील दत्तराव सुपनर यांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची. मुलांना शिक्षण देणे तर दूरच पण पालनपोषण करणेही त्यांच्या दृष्टीने कठीण बाब होती. संपूर्ण कुटुंबच अशिक्षित. परंतु, त्यांच्या मुलाला शिवनेरी आश्रमशाळेने आधार दिला. आज सुपनर यांचा मुलगा एमबीबीएसला शिकतो आहे. आपल्या कुटुंबासाठी हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचे सुपनर सांगतात. हे केवळ शाळेमुळेच होऊ शकले, असे सांगत त्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
ही शाळा जीवनमूल्य शिकविते. पुस्तकातील मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्याबरोबरच वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेरही शिक्षण असते, हे शाळेने येथील विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर ठसविले आहे.
शाळेने निर्माण केलेल्या आत्मविश्वासामुळे विद्यार्थीही आता विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय संमेलने, स्पर्धा, प्रदर्शने यांत आपला ठसा उमटवू लागले आहेत. तर शिक्षकही सतत नव्याचा ध्यास घेत वेगवेगळ्या शैक्षणिक संमेलनांना, चर्चासत्रांना हजेरी लावून, इतर प्रयोगशील शाळांना भेटी देऊन आपल्या ज्ञानात भर घालत असतात. वंचित कुटुंबांमधील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी सतत धडपडणारी ही शाळा म्हणूनच इतर शाळांकरिताही प्रेरणादायी ठरते.
तुकाराम झाडे
reshma.murkar@expressindia. Com