डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते आणि त्यामुळे त्यांनी अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या पोलादी शक्तीला भीमशक्ती संबोधण्याचा प्रघात होता. महाडच्या पाणी प्रशासनाच्या प्रसंगानंतर आंबेडकरी शक्तीला भीमशक्ती म्हटले जाऊ लागले, परंतु हा शब्द प्रामुख्याने प्रचारात आला तो १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर. १९५७ च्या निवडणुकीचे वारे वाहू लागले तेव्हा भारतीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात एक प्रबळ पक्षनिर्मितीची अपेक्षा प्रबोधनकार ठाकरे यांनी बाबासाहेबांकडे केली होती. बाबासाहेबांनी प्रबोधनकारांना सांगितले होते की, ‘तुम्ही आपापले राजकीय पक्ष खुंटीला टांगून ठेवलेत तर माझा ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन’ हा पक्ष तुमच्या मागे जिब्राल्टरसारखा उभा राहील.’
१. सर्वानी आपापले पक्ष विसरून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. १९५६ साली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले, परंतु त्यांच्या इच्छेनुसार शेकाप हा पक्ष समितीचा घटक पक्ष झाला. या काळात भीमशक्ती एवढी प्रबळ ठरली की संयुक्त महाराष्ट्र समितीचा ती कणा बनली. १९५७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष काठावरचे बहुमत घेऊन सत्ताधारी पक्ष झाला असला तरी त्यानंतर घेण्यात आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समिती अनेक शहरांत सत्ताधारी झाली. अगदी महानगरीय (मेट्रोपोलिटन) बृहन्मुंबई राज्यातसुद्धा या काळात प्रभावी असलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये ठळक बातमी येत होती ती भीमशक्ती- शिवशक्तीच्या प्रभावाची. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शवत राजवटीला डोळ्यासमोर ठेवून या शक्तीला शिवशक्ती असे संबोधले जाऊ लागले. १९५८ नंतर भीमशक्ती कमकुवत झाल्यानंतर या शब्दाचा पुनरुच्चार केला तो १९७८ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. १९८५ साली शिवसेनेने मुंबई-ठाण्याबाहेर मुसंडी मारली. तेव्हा खेडय़ापाडय़ांत जागृत असलेला भीमसैनिक अनुभवला. १९७२ साली निर्माण झालेल्या दलित पँथरची शक्ती शिवसेना आणि काँग्रेस यांना टकरा मारीत होती. ठाकरे यांनी या शक्तीला आव्हान देण्यासाठी बौद्धांना आव्हान दिले तर बौद्धेतर दलितांना जवळ केले. त्यांना सत्ता दिली. नामांतराच्या काळात ठाकरे यांनी आंबेडकरद्वेष जोपासला. बौद्ध समाज हा आपला मतदार नाही हे ओळखल्यामुळे भीमशक्ती त्यांच्यापासून दुरावली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा