डेंग्यू आणि मलेरियाचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. ‘कीटकजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करा’ या आशयावर आधारित उपरोक्त घोषवाक्य यंदा जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्या निमित्ताने..
७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. १९४८ मध्ये याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना कार्यरत झाली. त्यामुळेच दर वर्षी हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना ही आरोग्य क्षेत्रातील जगातील सर्वोच्च संस्था आहे. ती संयुक्त राष्ट्र संघाची अराजकीय अशी आरोग्यविषयक संस्था आहे. या संघटनेचे मुख्यालय स्वित्र्झलडमधील जिनेव्हा येथे आहे. ‘जगातील सर्व लोकांना आरोग्याचा अत्युच्च स्तर प्राप्त करता येणे’ हे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य ध्येय आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतर संघटनांपेक्षा जागतिक आरोग्य संघटना वेगळी यासाठी आहे की, तिला स्वत:ची स्वतंत्र घटना आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य नसलेला देशही जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य बनू शकतो. सध्या जगातील जवळपास सर्वच देश या संघटनेचे सदस्य आहेत.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त १९५० पासून जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी एक घोषवाक्य जाहीर करते. तात्कालिक महत्त्वाच्या आरोग्य प्रश्नाकडे सर्व जगाचे लक्ष वेधले जावे व त्यावर उपाय सापडावेत हा यामागील हेतू असतो. या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने Protect Yourself from vector-borne diseases अर्थात ‘कीटकजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करा’ या आशयावर आधारित रें’ Smal Bite : Big Threat किंवा ‘चावा छोटा : धोका मोठा’ असे घोषवाक्य जाहीर केले आहे.
‘एक मच्छर इन्सान को..’ हा नाना पाटेकरचा लोकप्रिय डायलॉग जरी फिल्मी वाटला तरी मच्छराच्या एका चाव्यामुळे झालेल्या मेंदूच्या हिवतापामुळे भारतातील एका प्रख्यात औद्योगिक घराण्याच्या प्रमुखाचा अमेरिकेत मृत्यू झाला हे ढळढळीत वास्तव आहे. डासांखेरीज इतर अनेक कीटक मानवात वेगवेगळे आजार निर्माण करू शकतात. मानवाच्या पर्यावरणात अगणित कीटक आहेत. यातील बरेचसे कीटक निरुपद्रवी आहेत, पण काही कीटक मात्र माणसाला चावतात, त्याच्या शरीरात प्रवेश करतात व रोगांचा प्रसार करतात. ‘वैद्यकीय कीटकशास्त्र या ज्ञानशाखेत अशा रोगप्रसारक कीटकांचा अभ्यास केला जातो. रोग प्रसार करणाऱ्या कीटकांमध्ये मुख्यत्वे डास, घरातील माशी, वाळवंटी माशी, पिसवा, उवा, टिक (छोटा कोळीसदृश कीटक), माईट (लिखा) तसेच सायक्लोप आदींचा समावेश होतो. हे कीटक अनेक प्रकारे मानवात रोगप्रसार करतात. खरजेच्या किडय़ांसारखे काही कीटक प्रत्यक्ष स्पर्श वा संपर्काद्वारे रोगप्रसार करतात. घरातील माशी यांत्रिक रोगप्रसार या मार्गाने रोग पसरवते. यात कीटकाच्या शरीराला रोगजंतू चिकटून बसतात व यांत्रिकपणे ते कीटकांबरोबर इकडून तिकडे नेले जातात. यामुळे रोगप्रसार होतो. घरातील माशी याच पद्धतीने हगवण, जुलाब, खुपऱ्या आदी रोगांचा प्रसार करते. जैविक रोगप्रसार या पद्धतीत रोगजंतूंचा कीटकांच्या शरीरात वाढ किंवा/आणि विकास होतो. कधी त्यांची संख्या वाढते तर कधी शारीरिक अवस्थांतर होते वा कधी या दोन्ही गोष्टी घडून येतात. जैविक रोगप्रसाराच्या पद्धतीने डास हिवताप तसेच हत्तिरोग आदी रोगांचा प्रसार करतात.
डास, माश्या, टिक व स्वच्छ पाण्यातील गोगलगायींमुळे मानवाला अनेक गंभीर रोग होऊ शकतात. यांतील डासांपासून होणाऱ्या रोगांमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, पीतज्वर, हत्तिरोग, जपानी मेंदूज्वर आदींचा समावेश होतो. वाळवंटी माशीमुळे वाळवंटी माशीज्वर व लिश्मेनियासीस हे रोग पसरतात. टिक्समुळे लाईम रोग, बोरेलिऑसिस, टिकजन्य मेंदूज्वर तसेच टुलारिमिया हे रोग पसरतात. त्सेत्से माशीमुळे स्लििपग सिकनेस होतो. ट्रायाटोमिन किडय़ांमुळे छागाचा रोग होतो. पिसवांमुळे प्लेग होतो. काळ्या माश्यांमुळे ऑन्कोसíकयासीस तर पाण्यातील गोगलगायींमुळे शिस्टोसोमियासीस हे आजार होतात.
मानवामध्ये आढळून येणारे रोगजंतू तसेच परजीवींमुळे होणाऱ्या रोगांना कीटकजन्य रोग म्हणतात. हिवताप, डेंग्यू, पीतज्वर, जपानी मेंदूज्वर आदी रोगांमुळे जगात दर वर्षी १०० कोटी लोक आजारी पडतात व त्यातील १० लाख लोक मृत्युमुखी पडतात. जगात होणाऱ्या एकूण संसर्गजन्य रोगांपैकी १७ टक्के रोग हे कीटकजन्य असतात. या रोगांचे जगभरातील वितरण हे कायम परिवर्तनशील असलेले पर्यावरणातील घटक तसेच सामाजिक घटक या दोहोंवर अवलंबून असते. प्रवास व व्यापार यांचे जागतिकीकरण, नियोजन नसलेले शहरीकरण तसेच पर्यावरणातील हवामानबदलासारखी आव्हाने यांचा कीटकजन्य रोगांच्या जगभरातील प्रसारावर खूप परिणाम होतो. त्यामुळेच डेंग्यू तसेच चिकुनगुन्यासारखे रोग पूर्वी ते जेथे आढळत नसत अशा देशांमध्ये आढळून येत आहेत. कीटकजन्य रोगांच्या प्रसाराला तापमान तसेच पर्जन्यमानातील बदल यांमुळे होणाऱ्या शेतीसंदर्भीय पद्धतीतील बदल कारणीभूत ठरतात.
कीटकजन्य रोगांपकी काही महत्त्वाच्या रोगांविषयी थोडक्यात माहिती घेऊ. २०१२ मध्ये जगभरात २० कोटी लोकांना हिवतापाची लागण झाली व त्यांपकी ६ लाख २७ हजार रुग्ण मरण पावले. आफ्रिकेमध्ये प्रत्येक मिनिटाला पाच वर्षांखालच्या एका बालकाचा हिवतापाने मृत्यू होतो. हिवताप प्लाझ्मोडियम या परजीवींच्या व्हायवॅक्स, फाल्सीपॅरम, मलेरिए व ओव्हेल या चार प्रकारांमुळे होतो. यातील व्हायवॅक्स व फालसीपॅरममुळे मुख्यत्वे रोग होतो. फाल्सीपॅरम हिवतापात मेंदूवर परिणाम होऊन व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते. अॅनोफिलस डासाच्या मादीच्या चाव्यांमुळे हा रोग पसरतो. एडिप्स इजिप्ती डासांमुळे डेंग्यू हा रोग होतो. जगात २५० कोटी लोकांना डेंग्यू होण्याचा धोका आहे. हा एक विषाणूजन्य रोग असून बऱ्याच रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. काही वेळा रोगात गुंतागुंती निर्माण होऊन रक्तस्राव होऊन वा शॉकमुळे रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. जगभरातील डेंग्यूचे प्रमाण गेल्या काही दशकांमध्ये वाढत चालले आहे. या रोगावर प्रभावी उपचार नसल्याने डासांचे नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचे आहे. चिकुनगुन्या हा रोग एडीस इजिप्ती व एडीस अल्बोपिक्टस या डासांमुळे होतो. हाही एक विषाणूमुळे होणारा रोग आहे. यात रुग्णामध्ये ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे व अनेक आठवडे सांधे दुखणे ही लक्षणे दिसतात. डेंग्यूप्रमाणेच प्रभावी उपचार नसल्याने डासांचे नियंत्रण हाच रोगप्रतिबंधाचा मुख्य मार्ग आहे. पीतज्वराला ‘पीतज्वर’ हे नाव त्यात होणाऱ्या काविळीमुळे पडले आहे. जगात दर वर्षी २ लाख लोकांना पीतज्वराची लागण होते व त्यांपकी ३० हजार व्यक्ती मृत्युमुखी पडतात. आफ्रिका तसेच दक्षिण अमेरिकेत मुख्यत्वे आढळणारा हा रोग सुदैवाने अजूनही भारतात पोचलेला नाही. या रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी लस उपलब्ध आहे. जपानी मेंदूज्वराची लागण जगात दर वर्षी ५० हजार लोकांना होते व त्यांपकी १० हजार व्यक्ती मरण पावतात. हा रोग भारतातही काही राज्यांमध्ये आढळून येतो. या रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी लस उपलब्ध आहे. याखेरीज हत्तिरोग, लिश्यमेनियासिस, छागाचा रोग तसेच शिस्टोसोमियासीस हे इतर महत्त्वाचे कीटकजन्य रोग आहेत. भारतातही उपरोक्त रोग (पीतज्वर वगळता) मोठय़ा प्रमाणात आढळून येतात.
कीटकजन्य रोगांचे वर्णन ऐकून चिंता करत बसण्यापेक्षा काळजी घेणे जास्त महत्त्वाचे ठरेल! मुख्य म्हणजे यासाठी खूप खर्चीक वा अत्याधुनिक यंत्रतंत्रांचीदेखील गरज पडणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या रोगांचा लसींद्वारे प्रतिबंध करणे शक्य आहे त्या रोगांसाठी आवश्यकतेनुसार लसीकरण करून घ्या. घरात कीटक शिरू नयेत यासाठी दारे व खिडक्यांना सुयोग्य आकाराची छिद्रे असलेल्या जाळ्या बसवून घ्या. कीटकांच्या चाव्यांपासून स्वत:चा बचाव करा. त्यासाठी फिकट रंगाचे, अंग झाकणारे कपडे घाला. कीटकांच्या चाव्यांपासून वाचण्यासाठी त्वचेवर रिपेलंट (कीटकविरोधी) द्राव वा मलम लावा. झोपताना कीटकनाशक प्रक्रिया केलेल्या मच्छरदाणीमध्ये झोपा. मुख्य म्हणजे घराभोवतीच्या डास तसेच इतर कीटकांच्या पदाशीच्या जागा नष्ट करा. वैयक्तिक स्वच्छता, घरातील स्वच्छता व घराभोवतीची स्वच्छता या त्रिसूत्रीच्या आधारे कीटकांच्या पदाशीला नक्कीच आळा घालता येईल. मुख्य म्हणजे हे करण्यासाठी व्यक्ती, कुटुंब सक्षम आहेत. त्यासाठी सरकारकडे बघण्याची आवश्यकता नाही. उपरोक्त साधे-सोपे उपाय केल्यास छोटय़ा चाव्यांमुळे होणाऱ्या मोठय़ा धोक्यांपासून आपण स्वत:चे, कुटुंबाचे व समाजाचे रक्षण करू शकू यात शंका नाही!
चावा छोटा, धोका मोठा!
डेंग्यू आणि मलेरियाचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. ‘कीटकजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करा’ या आशयावर आधारित उपरोक्त घोषवाक्य यंदा जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. त्या निमित्ताने..
आणखी वाचा
First published on: 06-04-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Small bite more dangerous