अभिनय आणि सामाजिक कार्याची सांगड घालणे अनेकांना जमत नाही. पण अभिनय आणि समाजसेवेचे व्रत निष्ठेने जपणाऱ्यांपैकीच एक म्हणजे सदाशिव अमरापूरकर. किंबहुना सदाशिव अमरापूरकर यांचे नाव घेताच अभिनेता आणि समाजसेवक हे त्यांचे दोन्ही चेहरे समोर येतात. अर्थात, पडद्यावरच्या गाजलेल्या निवडक भूमिकांमुळे त्यांचा अभिनय नेहमी पहिल्यांदा लक्षात येतो. हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. अगदी विनोदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या भूमिकेने छाप पाडली. त्यांनी साकारलेला महेश भट्ट यांच्या ‘सडक’ चित्रपटातील ‘महाराणी’ आणि गोविंद निहलानी यांच्या ‘अर्धसत्य’ या चित्रपटातील खलनायक गुंड ‘रामा शेट्टी’ या व्यक्तिरेखा लोकांच्या मनावर इतक्या ठसल्या की ते खलनायक म्हणूनच प्रसिद्ध झाले.
बहुसंख्य मराठी कलावंतांची कारकीर्द रंगभूमीवरुनच झाली आहे. तशी सदाशिव अमरापूरकर यांनीही आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा रंगभूमीवरुनच गिरविला आणि यशाची शिखरे गाठली. अमरापूकर यांचा जन्म १९५० साली अहमदनगरमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि तेव्हापासून त्यांची नाळ रंगभूमीशी जोडली गेली. ‘हॅन्ड्स अप’ या मराठी नाटकामध्ये १९८१ मध्ये त्यांनी पहिली भूमिका साकारली. त्यांचे पहिलेच नाटक सुपरहिट झाले. याच नाटकात काम करताना दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांना हेरले आणि रुपेरी पडद्यावर ‘रामा शेट्टी’ म्हणून त्यांची पहिल्यांदा प्रेक्षकांना ओळख झाली. ‘अर्धसत्य’ या चित्रपटातील त्यांचा ‘रामा शेट्टी’ भाव खाऊन गेला. ‘अर्धसत्य’मुळे आपल्या जीवनात मोठा बदल झाला, असे ते म्हणत. त्यानंतरच्या ३० वर्षांमध्ये अमरापूरकर यांनी जवळपास २५० हिंदी-मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. १९८७ मध्ये ‘हुकूमत’ चित्रपटात त्यांनी धर्मेद्रबरोबर काम केले. या चित्रपटापासून त्यांची एवढी जोडी जमली की या दोघांनीही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यांची बोलण्याची वेगळी ढब आणि नेहमी वेगळा लुक ठेवण्याचा प्रयत्न यामुळे खलनायक म्हणून ते कायम स्मरणात राहिले.
१९९१ साली महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ या चित्रपटात त्यांनी ‘महाराणी’ नामक तृतीयपंथियाची भूमिका केली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. दरम्यान, मधल्या काही वर्षांमध्ये त्यांनी विनोदी भूमिकाही केल्या. ‘आँखे’, ‘इश्क’, ‘कुली नं. १’, ‘आंटी नं. १’ अशा चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिकाही केल्या होत्या. त्यांच्या अगदी अलिकडच्या चित्रपटांमध्ये २०१३ च्या ‘होऊ दे जरासा उशीर’ या मराठी चित्रपटाचा, तसेच ‘बॉम्बे टॉकीज’ या हिंदी चित्रपटाचा उल्लेख करता येईल. सामाजिक कार्यातील त्यांचा सहभागही फार मोठा आहे. मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनापासून ते अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनापर्यंत विविध आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले होते.
पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील ‘नायक’
अभिनय आणि सामाजिक कार्याची सांगड घालणे अनेकांना जमत नाही. पण अभिनय आणि समाजसेवेचे व्रत निष्ठेने जपणाऱ्यांपैकीच एक म्हणजे सदाशिव अमरापूरकर. किंबहुना सदाशिव अमरापूरकर यांचे नाव घेताच अभिनेता आणि समाजसेवक हे त्यांचे दोन्ही चेहरे समोर येतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-11-2014 at 12:41 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social activities of sadashiv amrapurkar